Wednesday, March 8, 2017

लोकराज्यचा महिलाशक्ती विशेषांक प्रकाशित
लोकराज्यतील यशकथा महिलांसाठी पथदर्शी
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 8 : लोकराज्य मार्च 2017 च्या महिला विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे झाले. लोकराज्य मासिकातील योजना, कायदेविषयक माहितीसोबतच अंकातील विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांच्या यशकथा राज्यातील महिलांसाठी पथदर्शी ठरणा-या असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागातर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास तथा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित,महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंघल, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, महिला व बालविकास आयुक्त लहुराज माळी, 'माविम'च्या व्यवस्थापकीय संचालिका इंद्रा मालो आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी, इंग्रजी व उर्दू भाषेत प्रकाशित झालेल्या या महिला विशेषांकात विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांच्या यशकथा, महिलांसाठीच्या विविध योजना, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, महिलाविषयक कायदे यावरील लेखांचा समावेश करण्यात आला आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज घडीला महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. या अंकात समाविष्ट करण्यात आलेल्या यशकथांच्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्याचा छोटासा प्रयत्न लोकराज्यने केला आहे. त्यासोबतच अंकात समाविष्ट करण्यात आलेली विविध योजनांची माहिती महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.
महालक्ष्मी सरस या प्रदर्शनात सहभागी झालेल्या बचतगटांच्या यशकथांचा अंकात समावेश आहे. या यशकथा महिलांना आर्थिक उन्नतीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच राज्यमंत्री विद्या ठाकूर यांची अंकातील मुलाखत राज्यातील महिला सक्षमीकरणाची दिशा अधोरेखीत करणारी आहे. महिलांसाठीचे सुरक्षा ॲप, सायबर सुरक्षेविषयी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या महत्त्वपूर्ण कायद्यांविषयी माहिती या अंकात देण्यात आली आहे. महिलांसाठीच्या विविध योजना, धोरण आणि संधींचा माहितीपूर्ण खजिना असलेला हा अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...