Wednesday, March 8, 2017

* लेख क्र. 5

मराठवाड्यातील तरुणांसाठी कौशल्य वृद्धी कार्यक्रम
मागील काही वर्षामध्ये कृषि क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञानामुळे अमुलाग्र बदल झाले आहेत. परिणामी कृषि क्षेत्रामध्ये बदलत्या तंत्रज्ञानानुरुप शेती व शेतीपुरक व्यवसाय, उद्योग यामध्ये कुशल मनुष्य बळाची मागणी वाढू लागली आहे. बदलणाऱ्या या तंत्रज्ञानाचा वापर अधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीपुरक उद्योग करुन अर्थार्जनाचे विविध पर्याय उपलब्ध करण्याच्यादृष्टिने शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या मुलांकरीता कृषिक्षेत्रात कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे व त्यामाध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी क्षेत्रातील शेती व शेतीपुरक असणाऱ्या उद्योग धंद्यासंदर्भातील कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याविषयी माहिती देणारा हा लेख...
राज्यातील मराठवाडा विभागाचे एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळपास 85 टक्के क्षेत्र हे लागवडीखाली क्षेत्र आहे. या लागवडीखालील क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्र हे आवर्षण व प्रवरण क्षेत्र असल्याने या भागातील शेतकरी हा कायमचा कोरडवाहू शेतीवर अवलंबून असतो. येथील शेतकऱ्यांना टंचाई, दुष्काळ, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. लोकसंख्येचा विचार केल्यास औरंगाबाद विभागातील ग्रामीण लोकसंख्या, विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या 72.88 टक्के इतकी आहे. ग्रामीण भागातील बहुतांश लोक शेतीवरच अवलंबून आहेत. मराठवाड्यातील शेतीचा विचार करता कोरडवाहू शेतीमुळे येथील शेतकऱ्यांना वर्षभर रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी अल्प उत्पन्नामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत होवून त्यांच्या जीवनमानाचा स्तर खालावला आहे.
राज्यात युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने 2 सप्टेंबर 2015 रोजी "प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान" राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था यांना राज्य पातळीवर "नोडल संस्था" म्हणून नियुक्त केले आहे. या निर्णयातील तरतुदीनुसार मराठवाडा विभागातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबासाठी कृषि क्षेत्रातील शेती व शेतीस पुरक उद्योगधंद्याशी संबंधित कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेमार्फत तयार करण्यात आलेले अभ्यासक्रम तसेच शेती व शेती पुरक उद्योगधंद्याशी संबंधीत पुढील प्रमाणे कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी सर्वसाधारणपणे 8 हजार शेतकरी किंवा त्यांचे कुटुंबीय यांचेसाठी कौशल्यवृद्धीचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कृषी यांत्रिकीकरणाचे कौशल्य विकासाद्वारे प्रशिक्षण
मराठवाड्यात शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन देण्यासाठी व आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी उपयोगी असणाऱ्या शेती यंत्रणाची दुरुस्ती व निगा राखण्याबाबत येथील तरुणांना प्रशिक्षण देऊन कौशल्य बळ निर्माण करण्यात येणार आहे.
कृषी उत्पादन विक्रीसाठी "मोबाईल ॲप" विकसीत करणे
साधारणपणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्तभाव व बाजारपेठ मिळणे अत्यंत आवश्यक असते. ही बाब विचारात घेता शेतमालाला अधिकाधिक भाव कोणत्या बाजारपेठेत मिळू शकेल किंवा विविध बाजारपेठेमधील शेतमालाचा भाव किती आहे, इत्यादी सारख्या गोष्टी शेतकऱ्यांना मोबाईलवर एक चांगले मोबाईल ॲप विकसीत केल्यास त्यांना नक्की फायदा होईल. यासाठी कौशल्य विकासाद्वारे तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मृदा व संवर्धन व मृदा तपासणी
शेतीचे उत्पादन मुख्यत: शेत जमिनीतील मृदेवर अवलंबून असते. अधिक शेती उत्पादनासाठी मृदेचा कस व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील यादृष्टीने या भागातील तरुण व महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून मृदा संवर्धन निर्माण करण्यात येणार आहे.  
शेतीस पुरक जोड व्यवसायांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रोत्साहन
कौशल्य विकासाचा वापर करुन या भागात समृद्धी आणण्यासाठी शेतीला पुरक असे व्यवसाय जसे फुलांची शेती, रेशीम उत्पादन आणि प्रक्रिया, मधुमक्षिका पालन, डेअरी पदार्थाची निर्मिती व विक्री, कुक्कट पालन व शेळीपालन असे जोड व्यवसाय सुरु करण्याचे प्रशिक्षण कौशल्य विकासाच्या माध्यमातून देता येईल. यासाठी तरुणांना व महिलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्यामार्फत बीज भांडवल योजनेतून कर्ज देऊन लहान-लहान उद्योग उभे करता येणार आहेत.
शेत मालावर प्रक्रिया व पॅकेजिंगसाठी कौशल्य विकास विकसीत करणे
बहुतांश वेळा उत्पादित केलेला शेतमाला हा जास्त काळ टिकवून ठेवता येत नाही. त्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण आणि महिलांना कोल्ड स्टोरेज टेक्निशियन व ग्रीन हाऊस टेक्निशियचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच उत्पादित केलेला शेतमाल हा आधिकाधिक आकर्षित पद्धतीने पॅकेजिंग करुन तो बाजारपेठेत कसा उपलब्ध करुन देता येईल, याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. ऊसापासून साखर अथवा गुळ तयार करताना ऊसाच्या टाकावून भागापासून तसेच कापसापासून सूत बनविण्याचे प्रक्रियेदरम्यान गोवऱ्या बनविण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना कुटुंबियांना देऊन स्वस्त इंधनाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याशिवाय बेरोजगारांनाही रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.
कृषी विद्यापिठांशी करार
राज्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे कृषी विद्यापीठ काम करीत असून त्यांचे सोबत करार  ( एम.ओ.यु.) करुन त्या विद्यापीठामध्ये मराठवाड्याचे तरुण युवक व महिला शेती व शेतीस पुरक असणाऱ्या उद्योगधंदाच्या अनुषंगाने कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी कृषी विद्यापिठामध्ये कौशल्य विकास केंद्र उपलब्ध करण्यात येणार आहेत.  
"व्हॅल्यू चेन" उभी करणे
मराठवाड्याच्या काही भागामध्ये कापूस आणि रेशीमचे काम परंपरागत पद्धतीने मोठ्या प्रमाणावर केले जाते. विशेषत: पैठणी साडी जी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. अशा व्यवसायाचे कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिला व तरुणींना नवीन डिझाईन व टेक्नोलॉजीचे प्रशिक्षण देऊन परंपरागत व्यवसायामधून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियमित "जॉब फेअर" आयोजित करणे
मराठवाड्यात हळू-हळू उद्योगाचा विकास होत असून याविषयाच्या संदर्भाने औरंगाबाद येथे औद्योगिक संस्था यांचेशी चर्चा झाली आहे. त्यांच्या सहकार्याने मराठवाड्यामध्ये स्मॉल स्कील उद्योगामध्ये तरुणांना रोजगार मिळण्यासाठी उद्योग संस्थांसोबत करार (एम.ओ.यु.) करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरुन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
मराठवाड्यामध्ये महिला आणि मुलींना "स्कील सखी"च्या माध्यमातून प्रशिक्षण
"स्कील सखी"चा प्रयोग कौशल्य विभागाने यु.एन.डी.पी. यांच्या सहकार्याने नागपूरमध्ये केला असून तेथे जवळपास पाचशे स्कील सखी या नव्याने तरुण मुलींना प्रशिक्षण देऊन ही स्कील सखी त्या गावाच्या महिला व युवतीला त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये कौशल्य प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देतात. हा प्रयोग मराठवाडयामध्ये केल्यास येथे सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्कील सखी या नव्याने तरुण महिला व मुलींना प्रशिक्षण देऊन प्रत्येक गावामध्ये स्कील सखी पाठवून महिलांना शेती किंवा शेतीसपुरक असणाऱ्या उद्योग धंद्याच्या अनुषंगाने कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  
 संकलन -  काशिनाथ र. आरेवार ,
 जिल्हा माहिती कार्यालय , नांदेड

*********

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...