Monday, December 9, 2024

 वृत्त क्र. 1171

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत

 नविन अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
• वसतीगृहस्तरावरुन नाकारण्यात झालेले अर्ज पुन्हा दुरुस्त करता येणार
                                                                                                                                                                                 नांदेड, दि. 9 डिसेंबर :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. शासन परिपत्रकानुसार स्वाधार साठी पात्र विध्यार्थ्यास अर्ज कण्यासाठी  16 डिसेंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी खालील निकषा प्रमाणे अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

*सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष/सूचना *
                                                                                                                                                                                विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास  विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी (केवळ प्रथम वर्षात प्रवेशित असलेल्या) विध्यार्थ्यानी अर्ज करणे आवश्यक आहे परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थ्यास इयत्ता १०वी/११ वी,१२वी/पदवी/ पदविकामध्ये  किमान ५० टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी ३% आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा ४० टक्के असेल. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून ०५ कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा ०२ वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती ७५ टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. तसेच या प्रणालीमध्ये आपले महाविद्यालय महानगर पालिकेच्या हद्दीपासून ५  कि.मी. च्या आत असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज वसतिगृहस्तरावरून रिजेक्ट झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना इडीटचे ऑपशन येणार आहेत. हे ऑपशन आल्यानंतर अर्ज इडिट करून अर्ज स्वाधार साठी शासन निर्णयातील निकषानुसार सर्व कागदपत्र जोडून पुश्च एकदा महाविद्यालयातील समान संधी केंद्राकडे सादर करावेत.
                                                                                                                                                                                   विद्यार्थ्यांचे या योजनेच्या लाभाची रक्कम  ही आधार संलग्न बँक खात्यात पडणार असल्याने सर्व विध्यार्थ्यानी आधार लिंक करून केवायसी करून घ्यावी व अर्ज भरत असताना आधार क्रमांक अचूक आहे याची खात्री करावी.  ज्या विद्यार्थ्यांचा नूतनीकरणाचा अर्ज आहे त्यांनी EXISTING या टॅबवरून अर्ज भरावा (वसतीगृहास करू नये ) तसेच जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी थेट स्वाधारला अर्ज करावा. तसेच ज्या  विद्यार्थ्यानी यापूर्वी ऑनलाईन प्रणाली मार्फत वस्तीगृहासाठी अर्ज केला आहे. त्यांचे अर्ज स्वाधार साठी आपोआप वर्ग होतील त्यांना वेगळ्याने स्वाधार साठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तेंव्हा पात्र विद्यार्थ्यानी http://hmos.mahait.org या संकेतस्थळावर निकषानुसार १६.१२.२०२४ या कालवधीत कार्यालयीन वेळेपर्यंत ऑनलाईन भरलेला  अर्ज भरल्यानंतर २ दिवसात अर्जाची १ प्रिंट आवश्यक त्या कागदपत्रा सह प्रवेशित महाविद्यालयातील समान संधी केंद्राकडे जमा करणे बंधनकारक आहे.
                                                                                                                                                                                     सूचना:-
विद्यार्थ्यांनी खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे  निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची १२ टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल.
अपुर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही असेही समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 1 कोटीपर्यत निधी संकलन करण्याचा निर्धार क्युआर कोडचा वापर करुन ध्वजदिन निधीत रक्कम करता येणार जमा

  वृत्त क्र. 1173

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

1 कोटीपर्यत निधी संकलन करण्याचा निर्धार
  क्युआर कोडचा वापर करुन ध्वजदिन निधीत रक्कम करता येणार जमा
                                                                                                                                                         
नांदेड, दि. 9 डिसेंबर :-  ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कुटूंबाच्या कल्याणासाठी हा निधी संकलित करण्यात येतो.  मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2024-25 संकलन उद्दिष्ट 1 कोटीपर्यत करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, वीरपिता, वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक यांच्या उपस्थितीत ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला.

ध्वजदिन निधी संकलनासाठी यावेळी क्युआर कोडचा वापर करुन निधी संकलन करता येणार आहे. क्युआर कोडच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यत पोहचून जास्तीत जास्त निधी संकलित करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना योगदान देण्याबाबत आवाहन केले. तसेच माजी सैनिकांच्या इतर मागण्याबाबतही दर तीन महिन्याला बैठक आयोजित करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यातील युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मागील वर्षात ज्या विभाग प्रमुखांनी ध्वजनिधी संकलनात विशेष योगदान दिले त्यांचे अभिनंदन करुन त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
                                                                                                                                                         
यावेळी वीरपीता धोंडीबा शेटोबा जोधळे, वीरपत्नी अरुणाताई टर्के,वीर पीता व वीरमाता आशाबाई व गणपतराव गोंविदे, वीरपत्नी शितल संभाजी कदम, वीरपिता श्रीराम डूबुकवाड यांचा सन्मान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विशेष गौरव पुरस्कार कुमार अविष्कार मोरे, कुमारी नंदिनी कांगणे या सैनिकांच्या पाल्याचा विशेष गौरव करुन प्रत्येकी 20 हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते दिला.  
                                                                                                                                                      
कार्यक्रमाची सुरूवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी प्रास्ताविकात ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलित झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांच्याच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात यांची माहिती दिली. तसेच माजी सैनिकांसाठी सीएसडी कॅण्टीन, सैनिक संकुलन व भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे सुरु करण्याबाबत विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
                                                                                                                                                        
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अन्वर शेख यांनी केले तर कल्याण संघटक कॅप्टन विठ्ठल कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हयातील माजी सैनिक, विधवा, अवलंबित उपस्थित होते. माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष रामराव थडके, पठाण हयुन, एल.देवदे, विकास बल्फेवाड, ज्ञानेश्वर पाटील डुमने, कमलाकर शेटे इत्यादी उपस्थित होते.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयाचे कल्याण संघटक, विठ्ठल कदम, होस्टेल अधीक्षक अर्जून जाधव, लिहिक अनिल देवज्ञे, सुर्यकांत कदम यांनी प्रयत्न केले.
 00000










                                                                                                                                                        

9.12.2024

वृत्त क्र. 1170

माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड, दि. 9 डिसेंबर :- माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सव 12 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या उत्सवासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे या कालावधीत मिरवणुका व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे, त्यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये व शांतता रहावी यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये 12 ते 15 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे व माहूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलमे अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार केले आहेत.

प्रदान करण्यात आलेले अधिकार पुढीलप्रमाणे  आहेत. रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे ते फर्मविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणेबाबत. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये घाटात किंवा घाटावर, सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, जत्रा, देवालय आणि सार्वजनिक स्थळी, लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखणेबद्दल. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना देण्यासंबंधी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेल्या त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राहणेकामी योग्य आदेश देण्याबाबत.

हा आदेश लागू असेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे  व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्याकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधितांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा यात समायोजित घोषणा सोडून ज्या घोषणांमुळे शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जारी केले आहेत.
000000

भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब व लेखा पुनर्मेळ तपासणी 20 डिसेंबरला

  वृत्त क्र. 1172

भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या

खर्चाचा हिशेब व लेखा पुनर्मेळ तपासणी 20 डिसेंबरला


नांदेडदि. डिसेंबर :-  भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 85-भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व त्यांच्या लेखा पुनर्मेळ बैठक शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर येथे आयोजित केली आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे.

अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल याची नोंद घ्यावी.


लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: ,ती स्वत: किंवा त्याच्यातिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्यालातीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुनत्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहेअसे निवडणूक निर्णय अधिकारी 85-भोकर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


000000

8.12.2024

   वृत्त क्र. 1169

नांदेड जिल्हा निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हब बनविणार- अभिजीत राऊत

 मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत केळी उत्तम कृषी पद्धती या विषयावर प्रशिक्षण संपन्न

नांदेड दि. 8 डिसेंबर : अलिकडच्या काळात शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धती सोडून निर्यातक्षम केळी उत्पादकतेवर भर द्यावा. तसेच शेतीसह शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. उत्पादित केलेला पक्का शेतमाल निर्यात करण्याकडे भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच सहकार व पणन विभाग अंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी व आत्मा विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने केळी उत्तम कृषी पद्धती या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मॅग्नेट प्रकल्प पुण्याचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, प्रकल्प संचालक आत्मा  शिरफुले,  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, प्रकल्प उपसंचालक मॅग्नेट लातूर महादेव बरडे, विभागीय प्रकल्प अधिकारी मॅग्नेट, केळी संशोधनाचे प्रभारी अधिकारी डॉक्टर शिवाजी शिंदे, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख,  संचालक के डी एक्सपोर्ट सोलापूर किरण डोके, उपसरव्यवस्थापक महाकृषी शेतकरी उत्पादक कंपनी सोलापूर नरहरी कुलकर्णी, बारड शितलादेवी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष निलेश देशमुख, बारडकर, हिरकणी बायोटेकचे रत्नाकर देशमुख, विभागीय अधिकारी सोमनाथ जाधव, गजेंद्र नवघरे, अक्षय हातागळे आदी उपस्थित होते.





 मॅग्नेट प्रकल्पा अंतर्गत नांदेड, परभणी व हिंगोली या तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केळी निर्यातीसाठी मॅग्नेट प्रकल्पांतर्गत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे मॅग्नेट प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक  डॉ. अमोल यादव यांनी आश्वासित केले. केळी निर्यातीसाठी आवश्यक ती सर्व मदत, त्यासाठी लागणारी ऑनलाइन नोंदणी याविषयी कृषी विभाग मार्गदर्शन व मदत करेल असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सांगितले. एमसीडीसीला लातूर विभागामध्ये केळी पिक प्रशिक्षण घेण्यासाठी मॅग्नेट प्रकल्पाने संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकल्पाचे हेमंत जगताप यांनी आभार मानले. किरण डोके यांनी निर्यातक्षम केळी पीक लागवड तंत्रज्ञानातील विविध बारकावे समजून सांगितले .  निलेश देशमुख यांनी निर्यातक्षम केळी पिकाची वाव व संधी याविषयी मार्गदर्शन केले. नरहरी कुलकर्णी यांनी केळी लागवडी मधील खत व पाणी व्यवस्थापन व निर्यातक्षम उत्पादन याविषयी मार्गदर्शन केले. गणेश पाटील यांनी ग्लोबल गॅप प्रमाणिकरण व फ्रुट केअर योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. लिंग समानता व सामाजिक समावेशन याविषयी अक्षय हातागळे यांनी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ३५० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.


00000

वृत्त क्र. 1185 सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 812 कोटी नुकसान भरपाई मंजूर डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार शेतकऱ्यांनी ईक...