Monday, January 15, 2024

वृत्त क्र. 46

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने

आदिवासी जनजातींना मिळाला विकासाचा मार्ग

- केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा 

 

·         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला संवाद 

·         कोलाम जमातीतील 35 मुलींच्या खात्यावर 70 हजार रुपये प्रत्येकी वर्ग 

·         आदीकोलाम ॲपचे लोकार्पण

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनाही विकासाची संधी भेटली पाहिजे. त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण होतील अशा योजना साकारून त्यांना नवे मार्ग मिळावेत यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेवली. त्यांनी आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा एक व्यापक आराखडा तयार केला. यानुसार योजनांची अंमलबजावणी अचूक व्हावी यासाठी त्यांनी प्रशासनाला मार्गदर्शन केले. या प्रयत्नांमुळेच आज आदिवासी कुटुंबांना 1 लाख पक्की घरे, सुमारे 1 हजार 200 किमी एवढ्या एकुण लांबीचे जोडणारे रस्ते, 405 वनधन विकास केंद्राची निर्मिती, 450 मल्टीपर्पज केंद्र, 206 मोबाईल टॉवर्स, 906 अंगणवाडी केंद्र, आयुष्यमान भारत कार्ड, किसान सन्मान निधी आदी, आरोग्याच्या सुविधा व विविध प्रकारच्या योजना आदिवासी बांधवांपर्यंत यशस्वी पोहोचल्या असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक आणि नवीन व नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी केले.

 

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत किनवट येथील एनके गार्डनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, संबंधित विभाग प्रमुख यांची यावेळी उपस्थिती होती.

 

आदिवासी समाजामुळे या देशातील जंगल व वनसंपत्ती टिकून राहण्याला मोठी मदत झाली आहे. पिढ्यांपिढ्या आदिवासी बांधवांनी विविध नैसर्गिक आव्हानांना सहन करत जंगल राखली, झाडे वाढवली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बिरसा मुंडा यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. मातृभूमीसाठी भगवान बिरसा मुंडा लढले. त्यांच्या योगदानाला अधोरेखीत करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जयंती दिनी आदिवासी गौरव दिन सुरू केला. संपूर्ण आदिवासी समाजाचा आत्मविश्वास या दूरदृष्टीपणामुळे वाढला. या देशातील वंचित असलेल्या 75 आदिवासी जमातींच्या हितरक्षणासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. भारतातील साडेतेरा करोड लोकांना दारिद्र्यरेषेच्यावर आणण्याची किमाया शासनाने केली आहे. भारतातील 81 करोड गरीब लोकांना योजनांचा लाभ मिळाला आहे. सर्वांना पक्की घरे, पिण्याचे पाणी नळाद्वारे, प्रत्येक घराला वीज, शिक्षण, आरोग्य याची हामी देण्याचे धाडस व धैर्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले, असे गौरवोद्गार केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी काढले.

 

गोरगरीब, वंचित, आदिवासी घटकातील प्रत्येकाला पक्के घर भेटले पाहिजे हे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले. त्याला आकार दिला. अल्पवधितच करोडो लोकांचे स्वत:च्या घराचे स्वप्न त्यांनी घरकूल योजनेतून पूर्ण करून दाखविले, असे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. विविध विभागाचे नेतृत्व करतांना एक साधेपणाचा आदर्श केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी निर्माण करून दाखविला आहे. केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा हे सुद्धा साध्या जीवनशैलीचे प्रतीक असून देशातील प्रत्येक भागाच्या विकासासाठी त्यांनी दाखविलेली कटिबद्धता मोलाची आहे, असे त्यांनी सांगितले. वंचित घटकासाठी असलेल्या योजनांचे शतप्रतिशद लाभ त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शिबिरे घ्यावीत, अशी सूचना खासदार हेमंत पाटील यांनी केली.

 

भारतातील 18 राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश असलेल्या अंदामन-निकोबार द्वीपसमूह येथे सुमारे 22 हजारापेक्षा अधिक गावात राहणाऱ्या 75 प्रकारच्या जनजाती या कमजोर आहेत. त्यापैकी आपल्या किनवट आणि माहूर तालुक्यात कोलाम ही जमात आहे. या जमातीतील आदिवासींच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान हे महत्त्वपूर्ण असल्याचे आमदार भिमराव केराम यांनी सांगितले.

 

कोलाम जमातीतील 35 मुलींच्या खात्यावर 70 हजार रुपये प्रत्येकी वर्ग

कोलाम जमातीतील मुलींना शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या कुटूंबियांनी त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे यादृष्टिने मुलींसाठी 70 हजार रुपये मुदतठेव योजना कोलाम जमातीसाठी सुरू केली आहे. याचा उद्देश या मुदतठेव योजनेच्या लाभासह त्यांचे शिक्षणही विनाखंड सुरू राहावे, असा आहे. किनवट व माहूर तालुक्यातील कोलाम जमातीच्या 8 वी ते दहावी या वर्गात शिकणाऱ्या पात्र सर्व 35 मुलींना प्रत्येकी 70 हजार रुपये मुदत ठेवीचे धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात आले. याचबरोबर 11 वी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोलाम जमातीतील 5 मुलींना प्रत्येकी 48 हजार रूपयांचा शैक्षणिक साहित्य, संगणक व पुस्तके या स्वरूपात लाभ देण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कोलाम जमाती करीता बहुउद्देशीय सभागृहाची भेट मिळाली. यात जवरला, काजीपोड व कोलामपोड येथे हे बहुउद्देशीय सभागृह मंजूर झाले. याचबरोबर इतर विभागाच्या योजनांचा प्रातिनिधिक स्वरूपात या कार्यक्रमात लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

 

आदीकोलाम ॲपचे लोकार्पण

किनवट आणि माहूर तालुक्यात असलेल्या कोलाम जमातीतील सर्व माहिती एकत्रीत स्वरूपात गोळा व्हावी या उद्देशाने आदीकोलाम ॲपचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. मराठीत असलेल्या या ॲपमुळे कोलाम जमातीतील कौटुंबिक माहितीसह ते सध्या करत असलेली कामे, उपजिविकेची साधने, शिक्षण, आजूबाजूचा परिसर, घरांची रचना याची नेमकी वस्तुस्थिती आता तात्काळ गोळा होऊ शकेल. याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांना दिली.

00000











 वृत्त क्र. 45 

केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण

राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा


नांदेड, (जिमाका) दि. 15:- केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

मंगळवार 16 जानेवारी 2024 रोजी पुसद येथून वाहनाने सकाळी 9 वा. माहूर तालुक्यातील आष्टा येथे आगमन. सकाळी 9 वा. मयत भिमराव पुनवतकर यांच्या कुटूंबियाची सात्वंनपर भेट. दुपारी 12.15वा. माहूर तालुक्यातील आष्टा येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. समाज कल्याण अधिकारी यांच्यासमवेत चर्चा व राखीव. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून जिल्हा परिषद, मुलींचे हायस्कूल मैदान, गार्डनच्या बाजूला, तहसिल कार्यालयाजवळ, मुखेड येथे आगमन व नागरिकांसमवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.45 वा. जिल्हा परिषद मुलींची शाळा, मुखेड येथून वाहनाने हैदराबाद कडे प्रयाण.

0000

 वृत्त क्र. 44 

जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजनेतर्गत च्या कामासाठी

यंत्रधारकांनी 19 जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करावी

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजनेअंतर्गत विविध यंत्रणेमार्फत सिमेंट नाला बांध बांधणे, गॅबीयन बंधारे, नाला खोलीकरण यासारखे विविध कामे केली जातात. नालाखोलीकरणासाठी शासनाने 4 सप्टेंबर 2017 रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकान्वये नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासाठी यंत्रधारकांनी जेसीबी/पोकलेन मशिन उपलब्ध केल्यास त्यांना प्रति घनमीटर इंधनासह  जास्तीत जास्त 30 रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबाबत इच्छूक जेसीबी/पोकलेन यंत्र धारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक यंत्रधारकांनी नोंदणी अर्ज  जिल्हा जलसंधारण कार्यालयातून  उपलब्ध करून घ्यावीत. तसेच अर्जात यंत्राच्या सविस्तर माहितीसह 19 जानेवारी 2024 पर्यत आपली नावे मृद व जलसंधारण कार्यालयात नोंदवावीत. अधिक माहितीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकारीमृद व जलसंधारण विभागचैतन्य नगरनांदेड-5 दुरध्वनी क्रमांक 02462-260813 किंवा कार्यालयाचा ई-मेल eesswcnanded@gmail.com र संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार  पात्र ठरणाऱ्या गावामध्ये जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल तेथे पाणलोट विकासाची कामे करणेजलसाक्षताद्वारे गावातील पाण्याची उपलब्धता व कार्यक्षम  वापर यासाठी प्रयत्न करणे. तसेच मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे. उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा श्वाश्वत विकास करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

0000

 वृत्त क्र. 43 

न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत

23 व 24 जानेवारी रोजी फिरत्या लोक अदालतीचे आयोजन


नांदेड (जिमाका) दि. 15 :- ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचता यावे यासाठी ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत मोबाईल व्हॅनमधून फिरत्या लोकअदालतीचे आयोजन 24 जानेवारीपर्यत करण्यात आले आहे. नांदेड तालुकांतर्गत ग्रामपंचायत विष्णुपुरी येथे 23 जानेवारी व ग्रामपंचायत निळा येथे 24 जानेवारी 2024 रोजी फिरत्या लोकअदालतचे फिरते वाहन पोहोचणार आहे. या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील वादपुर्व प्रकरणे तसेच पो.स्टे. नांदेड ग्रामीण व पो.स्टे. लिंबगांव हद्दीतील प्रलंबित दिवाणी व फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे याठिकाणी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.


न्याय आपल्या दारी
 या फिरत्या लोक अदालतीसाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश मो. युनुस अब्दुल करीम शेख यांची पॅनल प्रमुख म्हणून तर रिटेनर लॉयर अॅड. मंगेश वाघमारे, मुख्य लोक अभिरक्षक अॅड. ए.व्ही. सराफ,  उप-मुख्य लोकअभिरक्षक ॲड. एच.व्ही. संतान यांची पॅनल सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. दिनांक 23  24 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वा. पासून फिरत्या लोकअदालतीच्या माध्यमातून कायदेविषयक शिबीरादरम्यान विविध कायद्यांचे मार्गदर्शन होणार आहे. या संधीचा लाभ ग्रामस्थ-नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.

00000

दि. 14 जानेवारी 2024 वृत्त क्र. 42

 रसायन व उर्वरक आणि नवीन व नवीकरणीय उर्जा

केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांचा दौरा
नांदेड (जिमाका) दि. 14 :-केंद्रीय रसायन व उर्वरक आणि नवीन व नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
सोमवार 15 जानेवारी 2024 रोजी बिदर येथून वाहनाने उदगीर, जळकोट, कंधार मार्गे सकाळी 10.30 वा. एनके गार्डन, किनवट ब्लॉक नांदेड येथे आगमन. सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत किनवट येथे एनके गार्डन, ब्लॉक नांदेड येथे पीएम जनमन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा. किनवट येथून फरांदे पार्क, पावडेवाडी रोड, नांदेड येथे आगमन. दुपारी 1.वा. फरांदे पार्क, पावडेवाडी रोड, नांदेड येथे महेश पाटील हंगरगेकर यांच्या निवासस्थानी भोजणासाठी राखीव. दुपारी 2. वा वाहनाने बिदर कडे प्रयाण.
0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...