Thursday, July 25, 2019



लोकसभा निवडणूकीत मतदानापासून वंचित
राहिलेल्‍या मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्‍याची सुवर्ण संधी
दिनांक 27 (शनिवार) व 28 (रविवार) जुलै 2019 रोजी विशेष मोहिम
              नांदेड, दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका विचारात घेऊन दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत महाराष्ट्र राज्यातील  सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
              या कार्यक्रमांतर्गत लोकसभा निवडणूकीत पात्र असतांना पण मतदार नसल्‍यामुळे किंवा यादीत नाव न आलेमुळे मतदान करता आले नाही अशा व्‍यक्‍तींना त्‍यांची नावे मतदार यादीत नोंद करण्‍यासाठी दिनांक 30 जुलै 2019 ( सोमवार) पर्यंत अर्ज करता येतील. 
              या कार्यक्रमाचे वेळापत्रकानूसार दिनांक 15 जुलै 2019 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. या मतदार यादीमध्‍ये ज्‍या व्‍यक्‍तींची नावे समाविष्‍ट नाहीत अशांना नमुना -६ मध्‍ये अर्ज सादर करून त्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट  करता येतील. तसेच अनिवासी भारतीय नागरिकांना नमुना -6अ मध्‍ये अर्ज करुन मतदार यादीत नाव समाविष्‍ट करता येईल. मतदार यादीत समाविष्‍ट असलेल्‍या नोंदीबाबत आक्षेप असल्‍यास सदर नोंद वगळण्‍यासाठी नमुना -७ मध्‍ये अर्ज सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्‍या नोंदीबाबत दुरूस्‍ती करावयाची असल्‍यास नमुना -८ मध्‍ये आणि एका भागातून दुस-या  यादीभागात नोंद स्‍थलांतरीत करावयाची असल्‍यास विहीत नमुना -८अ मध्‍येअर्ज सादर करता येतील.
             मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍याच्‍या अनुषंगाने  दिनांक 27 (शनिवार) व 28 (रविवार) जुलै 2019 रोजी रोजी विशेष मोहिम राबविण्‍यात येत आहे. सदर दिवशी जिल्‍हयातील सर्व मतदान केंद्रस्‍तरीय  अधिकारी संबंधित मतदान केंदावर उपस्थित राहुन मतदारांचे नाव नोंदणी / वगळणी तसेच दुरूस्‍ती बाबतचे अर्ज स्विकारतील.
             आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2019 च्‍या अनुषंगाने प्रत्‍येकाने आपले नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्‍ट असल्‍याची खात्री करून घ्‍यावी, मतदार यादीत नाव समाविष्‍ट नसल्‍यास दिनांक  30 जुलै 2019 पर्यंत आपले अर्ज भरून संबंधित बीएलओ, तहसिल कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात जमा करावेत. तसेच मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन नाव नोंदणीची, यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 लागू



नांदेड, दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 जुलै 2019 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 जुलै 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 ऑगस्ट 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000

जिल्हा परिषदेची मंगळवारी सर्वसाधारण सभा



नांदेड, दि. 25 :- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार 30 जुलै 2019 रोजी दुपारी 12.30 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.
00000

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ; अर्जाची प्रक्रिया सुरु



नांदेड, दि. 25 :- अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार  सन 2019-2020  साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनचे ऑनलाईन अर्ज  भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
         अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  अर्ज केंद्र शासनाच्या  www.scholarships.gov.in  या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन भरावयाचे आहेत. सन २०१९-२० या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे  अर्ज  रीनिवल स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. तसेच नवीन विद्यार्थ्यांचे  अर्ज फ्रेश स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती नवीन विद्यार्थी (फ्रेश स्टुडंट)    नुतनीकरण  विद्यार्थी (रीनिवल स्टुडंट) यांचे ऑनलाईन  अर्ज भरावयाची अंतिम मुदत  15 ऑक्टोंबर 2019 पर्यंत  आहे. याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास शेख रुस्तुम शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड मो.न. 9689357212 यांचेशी संपर्क साधावा.
शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या  मुख्याध्यापकांची  आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दयावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यामिक)  यांनी केले आहे. 
0000

मतदान केंद्रावर मतदार नोंदणी ; अनुषंगिक सुधारणा करण्याचे आवाहन



            नांदेड, दि. 25 :- सर्व मतदान केंद्रावर 27 व 28 जुलै 2019 रोजी बिएलओ उपस्थित राहणार असून मतदारांनी मतदार नोंदणी व अनुषंगिक सुधारणा करुन घ्यावात, असे आवाहन नांदेडचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने 31 जुलै 2019 पर्यंत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पूनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या नवीन मतदारांचे नाव समाविष्ट करणे, नावात दुरुस्ती, रंगीत छायाचित्र समाविष्ट, नाव वगळणे, दुबारा नाव कमी करणे ही कामे होणार आहेत, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.   
00000

पशुसंवर्धनच्या नाविन्यपूर्ण योजनेत अर्ज करण्यास 8 ऑगस्टची मुदत



            नांदेड, दि. 25 :- दुधाळ गाई / म्हशी व शेळी / मेंढीचे गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील 18 वर्षावरील अर्जदारांकडून ऑनलाईन अर्ज 8 ऑगस्ट 2019 पर्यंत मागविण्यात आली आहेत.   
या योजनेची व अर्ज करण्याची माहिती https.//ah.mahabms.com या संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअरवरील AH MAHABMS या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारली जाणार आहेत. इच्छूक अर्जदारांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज करावीत. अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदाराने भ्रमणध्वनी क्रमांक योजनेंतर्गत अंतिम निवड होईपर्यंत बदलू नये.   
अर्जदाराची प्राथमिक निवड अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाद्वारे करण्यात येणार असली तरी अंतिम निवड ही त्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात येणार आहे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

शेती विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे


शेती विकासासाठी तंत्रज्ञान मदतीला
पथदर्शी प्रकल्पासाठी नांदेड जिल्ह्याची निवड ;

नांदेड दि. 25 :- राज्यातील बहुतांश शेती निसर्गचक्रावर अवलंबुन आहे. हवामानाचा थोडा जरी अंदाज चुकला तरी शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसून शेतीचे गणितच बिघडते. आता मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आठवडाभरा अगोदरच हवामानाचा अचूक वेध घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी देखील शेती विकासासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  अरूण डोंगरे यांनी केले.
केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय व आय.बी.एम.वेदर कंपनीच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या हवामान विषयक यंत्रणेच्या आढावा बैठकीत श्री. डोंगरे बोलत होते. हवामानाचा अचूक वेध व जमिनीतील आर्द्रता अशा महत्वपूर्ण घटकांची अद्यावत माहीती या अँपमुळे शेतकऱ्यांना घर बसल्या मिळणार आहे. या अनुषंगाने गुरुवार दि. 25 रोजी जिल्हाधिकारी यांचे दालनात बैठक घेण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचे सल्लागार सी.एम.पांडे यांनी या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.  भारत सरकारने कृषि विज्ञान केंद्र, नवीबाग भोपाळ येथे वैज्ञानिकांच्या मदतीने कृषि उत्पादन वाढीसाठी डिजीटल अॅप विकसीत करण्यात आले असून प्रायोगिक तत्वावर प्रथमत: भारतातील तीन जिल्ह्यात त्याचा वापर करण्यात येणार आहे. यात मध्यप्रदेश मधील भोपाळ, गुजरात राज्यातील राजकोट व महाराष्ट्रातील नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या यंत्रणेच्या माध्यमातून  वातावरणातील संभाव्य बदल, पाऊस, जमिनीची आर्द्रता लक्षात घेऊन शेतातील पेरणी,मशागतीचे कामे,खते,किटक नाशक-औषध फवारणी, पिक कापणी आदी कामांचे योग्य नियोजन करण्यासाठी या  अॅपची खूप मदत होईल. 
सुरुवातीला जिल्हायातील 1 हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना मोबाईल अॅपवर नाव नोंदणी करावयाची आहे. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड हे संपर्क अधिकारी आहेत. त्यांच्या मदतीने इच्छूक शेतकरी नोंदणी करू शकतात. यावेळी प्रत्यक्ष शेतावर जावूनच नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे शेताचे अक्षांश-रेखांशासह अचुक ठिकाणाची नोंद होऊन त्यांना पुढील 7 दिवसामध्ये  त्यांच्या शेतीचे लोकेशन अपलोड नोंदणी झाल्यानंतर त्यांना त्या शेतीच्या पाचशे चौ. मिटर क्षेत्रात पाऊस किती पडेल, केंव्हा पडेल, पिक कोणते घ्यावे, खत, किटक नाशक औषधी किती प्रमाणात व केंव्हा फवारणी करावी व फवारणी करतांना काय दक्षता घ्यावी यासंदर्भात लघू संदेशाद्वारे (एसएमएस) संबंधीत शेतकऱ्यास अद्यावत माहिती उपलब्ध होणार असल्याचे श्री पांडे यांनी सांगीतले.
बैठकीस तंत्रज्ञान तज्ञ सुरज प्रकाश, डाँ.सुकुमार मंडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.बी.चलवदे, एम.आर.सोनवणे, कार्यासन अधिकारी उज्ज्वला पांगरकर, प्रगतीशील शेतकरी दासरा हंबर्डे, एम.के.वडवळे, जी.टी.आरसुळे, एस.एस.पवार, जी.एस.पांडागळे, गंगाधर कदम, नागोराव आढाव,आनंदराव तिडके,प्रसाद देव,अशोक गदादे,गोपाळराव ईजळीकर आदींसह कृषी संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...