Thursday, July 25, 2019

शेती विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे


शेती विकासासाठी तंत्रज्ञान मदतीला
पथदर्शी प्रकल्पासाठी नांदेड जिल्ह्याची निवड ;

नांदेड दि. 25 :- राज्यातील बहुतांश शेती निसर्गचक्रावर अवलंबुन आहे. हवामानाचा थोडा जरी अंदाज चुकला तरी शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसून शेतीचे गणितच बिघडते. आता मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आठवडाभरा अगोदरच हवामानाचा अचूक वेध घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी देखील शेती विकासासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  अरूण डोंगरे यांनी केले.
केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय व आय.बी.एम.वेदर कंपनीच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या हवामान विषयक यंत्रणेच्या आढावा बैठकीत श्री. डोंगरे बोलत होते. हवामानाचा अचूक वेध व जमिनीतील आर्द्रता अशा महत्वपूर्ण घटकांची अद्यावत माहीती या अँपमुळे शेतकऱ्यांना घर बसल्या मिळणार आहे. या अनुषंगाने गुरुवार दि. 25 रोजी जिल्हाधिकारी यांचे दालनात बैठक घेण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचे सल्लागार सी.एम.पांडे यांनी या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.  भारत सरकारने कृषि विज्ञान केंद्र, नवीबाग भोपाळ येथे वैज्ञानिकांच्या मदतीने कृषि उत्पादन वाढीसाठी डिजीटल अॅप विकसीत करण्यात आले असून प्रायोगिक तत्वावर प्रथमत: भारतातील तीन जिल्ह्यात त्याचा वापर करण्यात येणार आहे. यात मध्यप्रदेश मधील भोपाळ, गुजरात राज्यातील राजकोट व महाराष्ट्रातील नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या यंत्रणेच्या माध्यमातून  वातावरणातील संभाव्य बदल, पाऊस, जमिनीची आर्द्रता लक्षात घेऊन शेतातील पेरणी,मशागतीचे कामे,खते,किटक नाशक-औषध फवारणी, पिक कापणी आदी कामांचे योग्य नियोजन करण्यासाठी या  अॅपची खूप मदत होईल. 
सुरुवातीला जिल्हायातील 1 हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना मोबाईल अॅपवर नाव नोंदणी करावयाची आहे. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड हे संपर्क अधिकारी आहेत. त्यांच्या मदतीने इच्छूक शेतकरी नोंदणी करू शकतात. यावेळी प्रत्यक्ष शेतावर जावूनच नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे शेताचे अक्षांश-रेखांशासह अचुक ठिकाणाची नोंद होऊन त्यांना पुढील 7 दिवसामध्ये  त्यांच्या शेतीचे लोकेशन अपलोड नोंदणी झाल्यानंतर त्यांना त्या शेतीच्या पाचशे चौ. मिटर क्षेत्रात पाऊस किती पडेल, केंव्हा पडेल, पिक कोणते घ्यावे, खत, किटक नाशक औषधी किती प्रमाणात व केंव्हा फवारणी करावी व फवारणी करतांना काय दक्षता घ्यावी यासंदर्भात लघू संदेशाद्वारे (एसएमएस) संबंधीत शेतकऱ्यास अद्यावत माहिती उपलब्ध होणार असल्याचे श्री पांडे यांनी सांगीतले.
बैठकीस तंत्रज्ञान तज्ञ सुरज प्रकाश, डाँ.सुकुमार मंडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.बी.चलवदे, एम.आर.सोनवणे, कार्यासन अधिकारी उज्ज्वला पांगरकर, प्रगतीशील शेतकरी दासरा हंबर्डे, एम.के.वडवळे, जी.टी.आरसुळे, एस.एस.पवार, जी.एस.पांडागळे, गंगाधर कदम, नागोराव आढाव,आनंदराव तिडके,प्रसाद देव,अशोक गदादे,गोपाळराव ईजळीकर आदींसह कृषी संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...