उष्माघातापासून बचावासाठी उपाययोजना
नांदेड
दि. 5 :- सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे व जून या महिण्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो तसेच त्यामूळे
मृत्यूही होण्याची शक्यता असते. महाराष्ट्रात विदर्भ व मराठवाडा या विभागात
उष्माघात प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो. उष्माघाताने जनतेचे आरोग्य बाधित
होऊ नये, उष्माघातापासून बचाव व्हावा व जनतेत याबाबत नांदेड
जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजनेची माहिती
दिली आहे.
उष्माघात
बाबत अतिजोखमीचे घटक - 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या
व्यक्ती. एक वर्षाखालील व 1 ते 5 वर्ष
वयोगटातील मुले. गरोदर माता. मधूमेह व ऱ्हद्यविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती. अतिउष्ण
वातावरणामध्ये काम करणा-या व्यक्ती.
उष्माघात
होण्याची कारणे:- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळ करणे. कारखान्याच्या
बॉयलर रुममध्ये काम करणे,काच कारखान्यातील कामे करणे. जास्त
तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे. घट्ट कपडयांचा वापर करणे. अशा प्रत्यक्ष
उष्ततेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबध येण्याने उष्माघात होतो.
लक्षणे:-
थकवा येणे, ताप येणे, त्वचा
कोरडी पडणे. भुक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही
होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे
अथवा पेटके येणे. रक्तदाब वाढणे, मानसिक बैचैन व अस्वस्थता,
बेशुध्दावस्था इत्यादी.
प्रतिबंधक
उपाय:- वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. कष्टाची कामे सकाळी
लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळा
किंवा भडक रंगाचे ) वापरु नयेत,सैल पांढ-या रंगांचे कपडे
वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा,भरपूर पाणी प्यावे. सरबत
प्यावे. अधुनमधुन उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी. ही
लक्षणे सुरु होताच ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. उन्हात
बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपकरणे यांचा वापर करावा.
उपचार-
रुग्णास वातानुकूलीत अथवा हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत. रुग्णांचे तापमान खाली आणणाच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णांच्या
कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात. नजीकच्या दवाखान्यात जाऊन उपचार
घ्यावेत.
उष्माघात
टाळण्यासाठी काय करावे:- तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात
यावे. हलकी पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स छत्री/टोपी,बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत
घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रींचा वापर
करण्यात यावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके,मान व चेहरा
झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस,घरी बनविण्यात आलेली लस्सी,तोरणी,लिंबूपाणी,ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा.
अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम
इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ
डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे,शटर
व सनशेडचा वापर करण्यात यावा.रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा.तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान
करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात
यावी. सुर्य प्रकाशाचा थेट संबध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे. पहाटेच्या
वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये
मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर स्त्रीया व आजारी कामगारांची
अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड
उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.
काय
करु नये :- लहान मुलांना उन्हात जाऊ देऊ
नये.बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात जाऊ देऊ नये. दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद
रंगाचे, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान
अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावित दुपारी 12.00 ते 3.30
या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक
करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी
ठेवण्यात यावी.
000000