कोरोनाशी एकजूटीने लढा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
आपआपल्या घरी राहून साजरी करु या
-
पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 9 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी घराबाहेर न पडता आपआपल्या घरीच राहून ती साजरी करु
या. कोरोनाशी एकजूटीने लढा देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संघटना, प्रमुख
नेत्यांचे सहकार्य रहावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद
साधतांना पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,
मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह
परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाच्या
संकटावर मात करण्यासाठी आयोजित बैठकीत आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण
निर्णय घेण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, आरोग्य सुविधा
अधिक बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून 20 टक्के रक्कम दिली जाणार आहे. आमदार
निधीतील प्राप्त होणाऱ्या रक्कमेतून कोरोना रुग्णांच्या तपासणी, उपचारासाठी लागणाऱ्या
अत्यावश्यक साहित्यांची खरेदी करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य सेवेच्या कामांना
अधीक गती देण्यासाठी इतर बाबींवरील खर्च थांबवून तो आरोग्य सुविधेवर करणार
असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नांदेडपासून दूर असणाऱ्या किनवट, देगलूर, मुखेड या
तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी डायलेशिसची
सुविधा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी
राज्यात तातडीने विविध उपाययोजना
करण्यात येत आहेत. एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात तीन किलो गहू
आणि दोन किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळात मान्यता दिली आहे. दुर्गम भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा
पुरवठा करण्यात येत असून शिधापत्रिका नाही अशा गरजूंना अन्न-धान्य देण्यासाठी
सेवाभावी संस्थांचा पुढाकार महत्वाचा आहे. या मदतीचा ओघ वाढविण्यासाठी प्रयत्न
केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
कोराेना रुग्णांची तपासणी व उपचारासाठी जिल्हा
शल्यचिकित्सक रुग्णालय राखीव करण्यात आले आहे. तर ओपीडीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक
कार्यालयाच्या बाहेरील मोठी इमारत ही स्वतंत्र उपलब्ध राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेचे
सहकार्य खूप महत्वाचे आहे. नागरिकांनी नको तेंव्हा घराबाहेर पडू नये, घरातच रहावे
असे भावनिक आवाहन करुन त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास नाईलाजाने नागरिकांना घरी
बसण्यासाठी बळाचा वापर करावा लागेल, असा इशाराही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी
दिला.
सुदैवाने नांदेड जिल्ह्यात आज कोरोनो मुक्त असून तो तशाच
रहावा यासाठी आरोग्य, पोलीस, महसूल, विविध सेवाभावी संस्था, अधिकारी, कर्मचारी कोरोनाचे गांभीर्य लक्षात आपआपल्या क्षेत्रात काम करुन मोठे योगदान देत असल्याचेही त्यांनी
नमूद केले. जीवनात प्रत्येक दिवस महत्वाचा असून लॉकडाऊनमुळे परिस्थिती बिकट असली तरी पुढील काळात ज्या जिल्ह्यात
कोरोना नाही तेथे वेगळे नियम लागू करण्यासाठी परिस्थिती पाहून योग्य त्यावेळी, योग्य तो निर्णय
घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
अन्नापासून कोणालाही वंचित ठेवणार नाही
-
डॉ.
विपीन इटनकर
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले, जिल्ह्यात अन्नापासून
कोणालाही वंचित ठेवणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाचे पूर्ण प्रयत्न आहेत. इतर राज्यातील, स्थलांतरीत व्यक्तींना दररोज सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यात येत आहे. जनधन
योजनेच्या बँक खात्यातील रक्कम काढण्यासाठी नागरिकांनी बँकेत गर्दी करु नये. गरज नसेल
व खर्च चालू शकतो त्यांनी रक्कम काढण्यासाठी जाऊ नये. आपली रक्कम बँकेतच जमा राहणार
असून ती रक्कम वापस जाणार नाही. जनतेनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
000000