तंत्रज्ज्ञानासोबतच भाषा संवर्धनाची
मनोवृत्तीही विकसीत व्हावी - डॅा. जोशी
मराठी भाषा गौरव दिन संपन्न
जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालयाचे आयोजन
नांदेड, दि. 27 :-
भाषेसाठी तंत्रज्ज्ञानाचा प्रभावी वापर करून घेता येणे आवश्यक आहे. त्यामुळे
तंत्रज्ज्ञानासोबतच भाषा संवर्धनाची मनोवृत्तीही महत्त्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र संकुलाचे सहयोगी
प्राध्यापक डॅा. महेश जोशी यांनी आज येथे केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय तसेच
जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव
दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत
महाविद्यालयाच्या भाषा व संशोधन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॅा. शंकर विभुते
होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा ग्रंथालय
संघाचे कार्यवाह तथा प्रकाश निर्मलकुमार सुर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील
हुसे, माहिती अधिकारी निशिकांत तोडकर यांची उपस्थिती होती. या निमित्ताने कुसुमाग्रज यांच्यासह मराठी भाषेतील नावाजलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात
आले.
‘संगणक
व महाजालावरील मराठी’ या विषयावर मांडणी करताना डॅा. जोशी
यांनी भारतातील प्रांतिक भाषांच्या जतनासाठी स्वातंत्र्यपुर्व काळातील जिज्ञासुंचे
प्रयत्नाची माहिती दिली. त्यामध्ये विलीयम्स जोन्स या तत्कालीन ब्रिटीश
सरन्यायाधीशांचे आणि तंजावूर संस्थानाचे महाराजा सरफोजी राजे यांचे योगदान याविषयी
त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की , त्या-त्या भाषेतील ज्ञानाचा विस्तार करणे ,
तिच्यामध्ये संशोधन करणे यातून भाषा संवर्धीत करता येते. साक्षरतेचा प्रसार आणि
तंत्रज्ज्ञानाच्या वापरामुळे भाषेचा विकास होत गेला. छपाई तंत्रज्ज्ञानाच्या
उदयामुळे भाषेबाबतची सहज सुलभता वाढली. याशिवाय दैनंदिन जीवनातील
तंत्रज्ज्ञानाच्या वापरामुळेही प्रसार-ग्रहण आणि संशोधन यासाठीची सुलभता वाढली.
संगणक आणि तंत्रज्ज्ञानाच्या प्रसारामुळे आता भाषेच्या वापराच्या संकल्पनाही बदलल्या आहेत. भाषेच्या संवर्धनासाठी, तिच्या
जतनासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. केवळ तंत्रज्ज्ञानाच्या वापरातून
भाषेचा विकास होणार नाही. तर कला, विज्ञान, शास्त्रीय अशा सर्व आशयांच्या दृष्टीने
मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे तंत्रज्ज्ञानाच्या वापराबरोबरच मराठी
भाषेच्या विकासासाठी मनोवृत्ती बदलावी लागेल. त्यातही विविध अंगानी समतोल साधावा
लागेल. अन्य भाषांना दुय्यम ठरवूनही, कमी लेखूनही चालणार नाही.
डॅा. जोशी म्हणाले की, डिजिटायझेशनमुळे
दुर्मिळ ग्रंथाची उपलब्धता वाढली आहे. ग्रंथ प्रकाशनाची संकल्पनाही बदलली आहे.
मुक्तद्वार पद्धतीमुळे तुम्हाला अनेक माहिती कोष संपादित करता येतात. माहितीत भर
घालता येते. अचूक संदर्भ देता येतात. त्यामुळे आता या माहिती महाजालकांवरही
जाणीवपुर्वक आपले योगदान दिले पाहिजे. मराठीचा वापर करत अनेक संदर्भ, माहिती, तपशील
अचूक आणि अद्ययावत देण्यासाठी पुढे आले पाहिजे. यातून व्यक्तीच्या आणि समाजाच्या
ज्ञानाच्या कक्षांचाही विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॅा. विभुते म्हणाले की,
मराठी भाषेचे सामर्थ्य मोठे आहे. ते पदोपदी सिद्ध झाले आहे. कुमूमाग्रजांच्या साहित्य
संपदेतून तर मराठी भाषेचे सौंदर्य आणि सामर्थ्य अनेकदा अधोरेखीत झाले आहे.
तंज्ञज्ज्ञानाचा वापर करतानाच, मराठी भाषा एक संस्कृती घेऊन पुढे जाते. ही
संस्कृती समृद्ध करण्याची संधी आहे. त्यामुळे मराठीचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक
आहे.
सुरवातीला कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर
यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा
ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रताप सुर्यवंशी
यांनी सुत्रसंचलन केले. माहिती अधिकारी श्री. तोडकर यांनी आभार मानले. तत्पुर्वी
जिल्हा ग्रंथालयात कुसुमाग्रजांच्या साहित्य संपेदसह विविध ग्रंथ संपदेच्या
प्रदर्शनाचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास
विद्यार्थी, रसिक वाचक तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी आदींची
उपस्थिती होती.
0000000