Saturday, November 2, 2019


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 2 :- जिल्ह्यात रविवार 17 नोव्हेंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 3 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते रविवार 17 नोव्हेंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत
हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना  
नांदेड दि. 2 :-जिल्हयात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारीत पिक विमा योजना 2019-20 मध्ये आंबिया बहाराकरतिा लागु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
भारतीय कृषि पिक विमा कंपनी, मुंबई या कंपनी मार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.  शासन निर्णयानुसार द्राक्ष, मोसंबी, केळी, आंबा या 4 फळपिकांसाठी गारपीट व  हवामान धोक्यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार शेतकऱ्यांसाठी द्राक्ष, केळी, मोसंबीसाठी गुरुवार 7 नोव्हेंबर 2019, व आंबा पिकासाठी 31 डिसेंबर 2019 पर्यंत राहील. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी द्राक्ष, केळी, मोसंबी पिकासाठी शुक्रवार 15 नोव्हेंबर 2019 व आंबा पिकासाठी मंगळवार 31 डिसेंबर 2019 पर्यंत अंतिम मुदत राहील.
या योजनेत कंसाबाहेर फळपिक (कंसात विमा संरक्षित रक्कम नियमित रुपये ) कंसाबाहेर गारपीट विमा संरक्षित रक्कम रुपये (कंसात शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. नियमित व गारपीट) पुढील प्रमाणे राहील. संत्रा व मोसंबी- (77 हजार रुपये) 25 हजार 667 रुपये (नियमित 3 हजार 850, गारपीट 1 हजार 283), केळी (1 लाख 32 हजार रुपये) 44 हजार (नियमित 6 हजार, गारपीट 2 हजार 200), अंबा (1 लाख 21 हजार), 40 हजार 333 (नियमित 6 हजार 50, गारपीट 2 हजार 17) या प्रमाणे विमा हप्ता दर राहील.
योजनेची अंमलबजावणी वेळापत्रक, अधिसुचित मंडळे
ही योजना जिल्ह्यात पुढीलप्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल. कंसाबाहेर अधिसुचित फळपिक तर (कंसात तालुका- अधिसुचित महसूल मंडळ) आहेत.
मोसंबी- (नांदेड – लिंबगाव, विष्णुपुरी), (मुदखेड-बारड), (अर्धापूर-मालेगाव), केळी – (नांदेड- तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपूरी), (अर्धापूर- अर्धापूर, दाभड, मालेगाव) (मुदखेड- मुदखेड, मुगट, बारड), (हदगाव- हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी), (लोहा- शेवडी बा.),  (भोकर-भोकर), (देगलूर- मरखेल, हाणेगाव), (किनवट- किनवट, बोधडी). अंबा- (अर्धापूर- मालेगाव, दाभड), (मुखेड- मुक्रमाबाद).
प्रधानमंत्री पिक विमा योजना हवामनावर आधारित फळपिक विमा आंबीया बहारामध्ये वरील अंतिम दिनांकापुर्वी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी व नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
000000


आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाची संधी
नांदेड दि. 2 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, किनवट जिल्हा नांदेड या प्रशिक्षण केंद्रात 2 डिसेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या 101 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धापरिक्षेची तयारी करीता प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय किनवट येथे गुरुवार 28 नोव्हेंबर 2019 तत्पुर्वी पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रवेशासाठीची अटी पुढीलप्रमाणे राहील. उमेदवार अनुसूचित जमातीपैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीतकमी शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहाण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. उमेदवरांचे वय 30 नोव्हेंबर 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण असावेत व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन संबंधित प्रशिक्षार्थींचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीच्या बँकेमध्ये चालू खाते असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा हे प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाते. पात्र अशा इच्छूक उमेदवारांनी गुरुवार 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत शैक्षणिक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र , पेटकुलेनगर, गोकुंदा किनवट जि. नांदेड या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02469-221801 या कार्यालयाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. 
00000


अल्पसंख्याक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे
ऑनलाईन अर्ज करण्यास 15 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
नांदेड दि. 2 :- अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार  सन 2019-2020   साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनचे ऑनलाईन  अर्ज  भरण्याची प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत होती. परंतु आत्ता शुक्रवार 15नोव्हेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन  अर्ज  पर्यंत भरता येतील.  
          सन 2019-20 या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केवळ ऑनलाईन भरावयाचे आहेत. सन 2019-20  यावर्षी रीनिवल व फ्रेश विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.)  नांदेड यांनी केले आहे. 
00000


विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना
डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व ; मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती  योजना  
नांदेड दि. 2 :- भारत सरकारच्या डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ नांदेड जिल्हयातील पात्र विद्यार्थ्यांना करुन देण्यासाठी शासनमान्य शाळांनी प्रयत्न करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी संयुक्त केले आहे.  
विमुक्त जाती भटक्या जमाती (DNT) व इतर मागास प्रवर्गातील गरीब कुटुंबातील मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाणे वाढावे यासाठी केंद्र शासनाने भारत सरकारची डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राज्यात इयत्ता 1 ते 10 वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यास शासन निर्णय 27 मे 2019 नुसार मान्यता दिली आहे.
            या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ पुढील अटी व शर्ती पुर्ण करणा-या विद्यार्थ्यांना अनुज्ञेय राहील. शासनाच्या मान्यता प्राप्त शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांस या योजनेचा लाभ मिळेल. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकाची उत्पन्न मर्यादा 2 लाख व इतर मागास प्रवर्गाकरीता 2 लाख 50 हजार  वार्षिक इतकी राहील. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती बंद करण्यात येईल. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्याने तो शिकत असलेल्या शाळेमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांस अन्य मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही. शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक वर्षातील एकूण 10 महिन्यासाठी लागु राहील. एकदा मंजूर झालेली शिष्यवृत्तीचे पूढील शैक्षणिक वर्षामध्ये नुतनीकरण करण्यात येईल तथापी मागील शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची किमान उपस्थिती 60 टक्के नियमित असणे अनिवार्य राहील. शिष्यवृत्ती मंजूर रक्कम विद्यार्थ्यांचा आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येईल. विजाभज (डीएनटी) साठी आवश्यक निधी केंद्र हिस्सा 75 टक्के व राज्य हिस्सा 25टक्के असा राहील व इतर मागास प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा 50 टक्के व राज्य हिस्सा 50 टक्के असा राहील.
डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे दर पुढील प्रमाणे राहतील. इयत्ता 1 ते 8 वी पर्यंत प्रतीमाह शंभर रुपये. इयत्ता 9 ते 10 वी पर्यंत प्रतीमाह 150 रुपये. डॉ. आंबेडकर मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती (निर्वाह भत्ता) दर पुढील प्रमाणे राहतील. (विजाभज).- सुरवातीला गट (कंसात वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी रक्कम) तर कंसाबाहेर वसतिगृहात न राहणाऱ्यांसाठी रक्कम  1 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थी (रु. 1 हजार200) रु. 550. 2 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थी ( रु. 820) रु. 530. 3 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थी(रु. 570) रु. 300. 4 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थी  (रु. 380)  रु. 230 दर याप्रमाणे राहतील.
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे दर पुढील प्रमाणे राहतील. शिष्यवृत्तीचे दर (प्रतीमाह) व तदर्थ अनुदान (वार्षिक) योजना अनिवासी- 1 ते 10 वी पर्यंत शंभर रुपये, निवासी- इयत्ता तीसरी ते दहावीमध्ये पाचशे रुपये राहील.  
या योजनेचा लाभ नांदेड जिल्हयातील विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त करुन देण्यासाठी शासन मान्यताप्राप्त शाळांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी संयुक्त केले आहे.
00000


बागायतदारांनी ठिबक, तुषार सिंचनाचा
वापर करण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन
               नांदेड दि. 2 :- सिंचन प्रकल्पातील जलाशयाच्या उपसा साठ्यावरील कमांड क्षेत्रातील ऊस, केळी आणि फळबागा सारख्या बारमाही पिकांना सुक्ष्म सिंचन पध्दती लागु आहे. सर्व बागायतदारांनी / लाभधारकांनी ठिबक व तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने  नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेडचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे यांनी केले आहे.
               राज्य शासनाचे पत्र 8 ऑगस्ट 2019 व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण ठराव क्र. 42 दि. 20 मे 2019 अन्वये बारामाही पिकांसाठी ठिबक व तुषार सिंचन यासारख्या सुक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर सक्तीचे करण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत.
              नांदेड पाटबंधारे विभाग (त्तर) नांदेड अंतर्गत शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प, आमदुरा उच्च पातळी बंधारा, बळेगाव उच्च पातळी बंधारा, बाभळी उच्च पातळी बंधारा व मध्यम प्रकल्पावरील उपसाद्वारे सिंचन करणाऱ्या सर्व बागायतदारांना व लाभधारकांनी शासनाच्या आदेशानुसार व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण ठराव क्र. 42  दि.20 मे 2019 अन्वये बारामाही पिकांसाठी (ऊस, केळी, फळबाग इत्यादी) केवळ ठिबक व तुषार सिंचन पध्दतीने होणाऱ्या सिंचनास पाणी उपसा करण्याची परवानगी आहे. त्यामुळे उपसा पध्दतीने पाणी घेऊन सुक्ष्म सिंचन किंवा तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करण्यात यावा. ज्या बागायतदाराने, लाभधारकाने ठिबक किंवा तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब केला नाही अशा बागायतदार, लाभधारकांची उपसा परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल. सर्व बागायतदारांनी / लाभधारकांनी ठिबक व तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने  नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेडचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे यांनी केले आहे.  
00000



पालकमंत्री रामदास कदम यांचा नांदेड दौरा
              
नांदेड दि. 2 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
               शनिवार 2 नोव्हेंबर 2019 रोजी औरंगाबाद विमानतळ येथून रात्री 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
               रविवार 3 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची नुकसानीची पाहणी. त्यानंतर सायंकाळी 5 वा. औरंगाबादकडे शासकीय वाहनाने प्रयाण करतील.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...