Monday, November 11, 2024

वृत्त क्र. 1066

नांदेड शहराला प्रशासनाने घातली साद 

यावेळी करा रेकॉर्डब्रेक मतदान


महावीर चौकातून मतदान वाढविण्याचे आवाहन 

स्वीप अंतर्गत निरीक्षकासह अधिकारी सहभागी


नांदेड, दि. 11 नोव्हेंबर : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ 61 टक्के मतदान झाले होते. यावेळी ही टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली पाहीजे यासाठी प्रशासन जोमाने कामाला लागले असून सर्वच स्तरातून प्रशासनाला प्रतिसाद मिळत आहे. आज महावीर चौकातील स्वीप अंतर्गत जाहीर कार्यक्रमामध्ये निवडणूक निरीक्षकांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. नांदेडकरांनी लोकशाहीच्या या पर्वात आपली जबाबदारी बहुसंख्येने पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. 


आज दि. 11 नोव्हेंबर रोजी 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान जनजागृती विशेष अभियान राबविण्यासाठी महावीर चौकात मनोरंजनासह प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी निवडणूक निरीक्षक श्रीमती बी. बालामाया देवी, श्रीमती पल्लवी आकृती, कालुराम रावत , शैलेंद्र कुमार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, नांदेड वाघाळा शहर महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, श्रीमती अनुष्का शर्मा, मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,   मनपा उपायुक्त अजितपालसिंघ संधु, उपायुक्त संजय जाधव, सुप्रिया टवलारे, सहायक आयुक्त मिर्झा बेग, गुलाम सादिक यांची प्रमुख उपस्थिती होती. 


जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना निष्पक्षपणे व कुठल्याही प्रलोभणाला बळी न पडता मतदान करण्याची शपथ दिली. याप्रसंगी भोकर येथील स्वीप कक्षाचे अधिकारी श्रीमती सुमन गोणारकर आणि सुधांशु कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार राजा आता तरी तू जागा हो! कणखर लोकशाहीचा तू मजबूत धागा हो! या आशयाचे पथनाट्याचे सादरीकरण करीत मतदार राजाला मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.


सादर करते समूहामध्ये सरस्वती कारले, सरस्वती जाधव, ज्योती पाटेकर, रूपाली कांबळे अनघा नरवाडे, वर्षा ढवळे,  रेखा कांग्गठीकार, मनोरमा गोवंदे, रामेश्वर शिंदे, राजू सोनकांबळे, रंगराव कासराळे, प्रमोद फुलारी, गुलाब पावडे, साहेबराव डोंगरे यांचा समावेश होता.


या मतदारसंघातील कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते केंद्र सरकारकडून आलेल्या केंद्रिय सुचना कार्यालयाच्या  क्षेत्रीय प्रचार कार्यालयामार्फत जिल्ह्यात सुरु झालेल्या चलचित्र रथाचे उद्घाटन करण्यात आले. या रथाद्वारे मतदार संघातील शहरी आणि ग्रामीण भागात मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त मतदान होऊन लोकशाही बळकट होईल. यानिमित्त स्वीप कक्षाद्वारे सेल्फी पाँईंट उभा करण्यात आला होता यामध्ये महाविद्यालयातील तरुण मतदारांनी आणि इतर सामान्य नागरिकांनी सेल्फी काढून आपला सहभाग नोंदवला. 


प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रापर्यंत पोहोचा

लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला महत्व आहे. आपला देश या लोकशाहीच्या आधारावर चालतो. पण मतदार राजा मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी थोडा निष्काळजी करतो. यावेळी आपल्या सर्वांना मिळून जास्तीत-जास्त मतदान करायचे आहे. काश्मीरसारख्या दुर्गम भागात आपल्यापेक्षा अधिक मतदान होते. यावेळी प्रत्येक नांदेडकरांनी मतदान करावे. आपले प्रत्येक मत हे आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केले.

00000










कसे करणार मतदान

 


नांदेड :लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने मतदान केले जाईल याची सोप्या शब्दातील अभिरूप मतदान केंद्रावरील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निवेदित केलेली चित्रफीत... कृपया सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी ही विनंती🙏🏻


कोणतेही सब टायटल नसलेली चित्रफित इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी. 
कृपया आपापल्या चॅनल्सवरून प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती
























 

वृत्त क्र. 1065

मुखेड विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 

12 व 13 नोव्हेंबर रोजी दुसरे प्रशिक्षण                                                                                              

नांदेड, दि. 11 नोव्हेंबर : 91-मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दुसरे प्रशिक्षण 12 व 13 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे दोन सत्रात ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये 12 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात 500 व दुसऱ्या सत्रात 500 मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत ठेवण्यात आले आहे. 

तसेच 13 नोव्हेंबर 2024 रोजी पहिल्या सत्रात 540 व दुसऱ्या सत्रात 500 मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपार 2 ते सायंकाळी 5 यावेळेत ठेवण्यात आलेले आहे. 

91-मुखेड विधानसभा मतदार संघातील दिव्यांग व वय 85 वर्षे वरील व्यक्तीचे टपाली गृह मतदान 12 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. त्यासाठी एकूण 15 पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दिनांक 12 ते 18 नोव्हेंबर 2024 या कालावधीतसकाळी 9 ते 5 पर्यत अधिकारी कर्मचारी यांच्या टपाली मतदानासाठी वोटींग सेंटर तहसिल कार्यालय मुखेड येथे उभारण्यात आले आहे असे 91 मुखेड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे. 

00000

वृत्त क्र. 1064

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 13 धडक कारवाई

कारवाईत 2 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. 11 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. 10 नोव्हेंबर रोजी विभागाने 13 ठिकाणी धाडी टाकून एकूण 2 लाख 9 हजार 110 रुपयांच्या मुद्देमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे.

10 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये विविध ठिकाणी एकुण 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या जानमालामध्ये एकूण 13 गुन्हे, वारस 13, अटक आरोपी 13, देशी मद्य 51.94 लि.,  विदेशी मद्य 3.6 लि,ताडी 225 लि, जप्त वाहन संख्या 02  जप्त असे एकूण सर्व मुद्येमाल 2 लाख 9 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये विभागामार्फत धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. निवडणूक काळामध्ये यामध्ये अधिक वाढ करण्यात आली असून अवैध दारू विक्रीवर विभागाची काटेकोर नजर आहे.  

जिल्ह्यात आचारसंहिता लागू असून या काळामध्ये कोणीही अवैध मद्य खरेदी करू नये. तसेच स्वत:जवळ बाळगू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. मद्याचा गैरवापर निवडणूक काळात होत असल्यास या संदर्भात विभागाला नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमध्ये अधिक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नमाला गायकवाड, जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, सरकाळे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

0000

वृत्त क्र. 1063

नांदेड दक्षिणच्या दुसऱ्या प्रशिक्षणात डिजीटल पध्दतीचा पूर्ण वापर करणार- डॉ .सचिन खल्लाळ 

नांदेड, ११ नोव्हेंबर:- 087 नांदेड दक्षिणचे द्वितीय प्रशिक्षण 12 व 13 रोजी नागार्जुना पब्लिक स्कुल,कौठा,नांदेड येथे आयोजित केले आहे. या दोन दिवसात 2246 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेणार आहेत. 

यावेळेस या प्रशिक्षणात पूर्णतः डिजीटल प्रणालीचा प्रथमच उपयोग करण्यात येणार आहे. एकूण  15 विविध कक्षामध्ये प्रत्येकी 40 जणांना तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण दिल्या जाणार आहे,असे प्रतिपादन नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ . सचिन खल्लाळ यांनी केले आहे. 

प्रशिक्षण कंटाळवाणे होऊ नये म्हणून प्रशिक्षणार्थांनी सुध्दा सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी या आधुनिक तंत्राचा वापर करावा. या आधुनिक तंत्राचा वापर प्रशिक्षणात करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया राबविण्यासाठी शाळेचे संचालक केशव गड्डम यांनी आपल्या संपूर्ण तंत्रज्ञ टिमसह तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी भरीव सहकार्य केले आहे. तंत्रज्ञ म्हणून सुशील माळवतकर, मोईन खान कार्य करणार आहेत. प्रशिक्षणाच्या पूर्व संध्येस प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी तहसीलदार प्रविण पांडे,नितेशकुमार बोलोलु, नायब तहसीलदार, सचिन नरंगले,प्रशिक्षण टिम सदस्य संजय भालके,प्रा.राजेश कुलकर्णी व बालासाहेब कच्छवे यांनी भेट देवून पाहणी केली.

०००००



वृत्त क्र. 1062

मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनला जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते हिरवी झेंडी

येत्या 20 नोव्हेंबरला मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन  

नांदेड, दि. 11 नोव्हेंबर : मागच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे, त्याठिकाणी  एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येईल. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आजपासून केंद्रीय संचार ब्युरो  यांच्यामार्फत नांदेड विधानसभा मतदार संघातील गावामध्ये एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. आज या एलईडी व्हॅनला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी परिसरात हिरवी झेंडी दाखविण्यात आली. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमीत डोडल आदीची  उपस्थिती होती. 

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. सर्व मतदार संघातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे. यासाठी स्वीपअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. मतदारापर्यत पोहोचवून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच स्वीपचे नोडल अधिकारी यांच्यामार्फत विविध मतदार जनजागृती साठी कार्यक्रम सुरु आहेत. 

मागील निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे, त्याठिकाणी हे एलईडी वाहन जावून जनजागृती करेल. या वाहनामार्फत दृकश्राव्य माध्यमांचा वापर करुन मतदाराना आवाहन करणारे मतदानाचा संदेश देणे या वाहनाचा उद्देश आहे. या वाहनासोबत जिल्ह्यातील व राज्यातील मान्यवरांचे आवाहानात्मक संदेश प्रसारित होणार आहे. या वाहनाच्या वापरामुळे जिल्ह्यात नक्कीच मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होणार असून, चांगल्या प्रकारे जनजागृती होईल, असे आवाहन  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

येत्या 20 नोव्हेंबरला मतदानासाठी घराबाहेर पडा

जिल्ह्यात मागील निवडणुकीत जिथे जिथे मतदान कमी झाले आहे, तीथे तीथे ही मतदार जनजागृतीची एलईडी व्हॅन फिरणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात नांदेडला 25 वर्षानंतर या दोन्ही निवडणूक एकत्र होत आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला जेव्हा मतदार बुथवर जातील तेव्हा त्यांना दोन वेगवेगळे मशिन दिसतील. यावेळेस मतदारांना लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभेसाठी दोन बटन दाबायचे आहे. प्रत्येक नागरिक, युवा-युवतींनी मतदानासाठी घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी केले आहे. 

मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅन जाणार या गावात

मतदार जनजागृतीसाठी केंद्रीय संचार ब्युरो यांच्यामार्फत एलईडी व्हॅन 11 ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील विविध गावामधून फिरणार आहे. यामध्ये 11 नोव्हेंबर रोजी नांदेड उत्तरच्या जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी चौक, एसपी ऑफीस चौक, शिवाजीनगर, आयटीआय चौक, राज कार्नर, तरोडा नाका, भावसार चौक, अर्धापूर शहरात 3 ते 4 ठिकाणे (अर्धापूर येथे मुक्काम). दि. 12 नोव्हेंबर रोजी हदगाव व किनवट विधानसभा क्षेत्रात लहान फाटा, तामसा गावात 3 ते 4 ठिकाणी, हदगाव येथे 3 ते 4 ठिकाणी, माहूर 3 ते 4 ठिकाणी. (माहूर येथे मुक्काम). दिनांक 13 नोव्हेंबर रोजी हदगाव किनवट मतदार संघात वाई, सारखणी येथे 2 ठिकाणी, किनवट शहरात 4 ते 5 ठिकाणी, बोधडी, इस्लापूर येथे 2 ठिकाणी, हिमायतनगर 3 ते 4 ठिकाणी. दिनांक 14 नोव्हेंबर रोजी भोकर मतदारसंघातील भोकर शहरात 4 ते 5 ठिकाणे, बारड येथे 2 ठिकाणी, मुदखेड येथे 3 ते 4 ठिकाणी तसेच उमरी येथे मुक्काम. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी उमरी शहर, धर्माबाद शहर, कुंडलवाडी शहर, बिलोली शहर, नायगाव शहर, दिनांक 16 नोव्हेंबर रोजी देगलूर शहर, होट्टल, मरखेल, करडखेड, मुक्रमाबाद,, दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मुखेड मतदारसंघातील बाऱ्हाळी, मुखेड शहर, कुरुळा, पेठवडज, कंधार मुक्काम, 18 नोव्हेंबर रोजी लोहा मतदार संघातील कंधार शहर, माळाकोळी, लोहा शहर, सोनखेड, 19 नोव्हेंबर रोजी नांदेड दक्षिण मतदारसंघातील कारेगाव, जानापुरी, वाडीपाटी, विष्णुपूरी, हडको नांदेड, सिडको नांदेड, वाजेगाव, देगलूर नाका याठिकाण जाणार आहे. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी नांदेड दक्षिण उत्तर मतदार संघातील नमस्कार चौक नांदेड, हिंगोली नाका, अण्णाभाऊ साठे चौक, नवीन मोंढा चौक, आनंदनगर, भाग्यनगर, वर्कशाप कॉर्नर नांदेड याठिकाणी जाणार आहे.   00000







 वृत्त क्र. 1061

नांदेड उत्तर मतदारसंघातील जेष्ठ मतदाराचे आज गृहमतदान

नांदेड, दि. 11 नोव्हेंबर : मतदानाचा टक्का वाढावा तसेच दिव्यांग आणि 85 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार एक ही मतदार मतदाना पासून वंचित राहू नये यासाठी 85 वर्ष वयाच्या वरील मतदारांच्या घरी जाऊन आज मतदान करून घेतले. 

आज नांदेड उत्तर मतदार संघातील कैलास नगर प्रभागातील वरिष्ठ नागरिक मोहनराव शिंदे यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात आले. श्री शिंदे यांनी लोकसभा व विधानसभा मतदार संघासाठी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी मतदान अधिकारी सौ सरस्वती शिंदे, रोहिदास बसवंरे, सूक्ष्म निरीक्षक बालाजी अंचेवार, सहाय्यक मतदान अधिकारी आर. एम. जाधव, पोलीस कर्मचारी पांचाळ आदी उपस्थित होते.

00000








समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...