Monday, November 11, 2024

वृत्त क्र. 1066

नांदेड शहराला प्रशासनाने घातली साद 

यावेळी करा रेकॉर्डब्रेक मतदान


महावीर चौकातून मतदान वाढविण्याचे आवाहन 

स्वीप अंतर्गत निरीक्षकासह अधिकारी सहभागी


नांदेड, दि. 11 नोव्हेंबर : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ 61 टक्के मतदान झाले होते. यावेळी ही टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली पाहीजे यासाठी प्रशासन जोमाने कामाला लागले असून सर्वच स्तरातून प्रशासनाला प्रतिसाद मिळत आहे. आज महावीर चौकातील स्वीप अंतर्गत जाहीर कार्यक्रमामध्ये निवडणूक निरीक्षकांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. नांदेडकरांनी लोकशाहीच्या या पर्वात आपली जबाबदारी बहुसंख्येने पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. 


आज दि. 11 नोव्हेंबर रोजी 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान जनजागृती विशेष अभियान राबविण्यासाठी महावीर चौकात मनोरंजनासह प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी निवडणूक निरीक्षक श्रीमती बी. बालामाया देवी, श्रीमती पल्लवी आकृती, कालुराम रावत , शैलेंद्र कुमार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, नांदेड वाघाळा शहर महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, श्रीमती अनुष्का शर्मा, मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,   मनपा उपायुक्त अजितपालसिंघ संधु, उपायुक्त संजय जाधव, सुप्रिया टवलारे, सहायक आयुक्त मिर्झा बेग, गुलाम सादिक यांची प्रमुख उपस्थिती होती. 


जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना निष्पक्षपणे व कुठल्याही प्रलोभणाला बळी न पडता मतदान करण्याची शपथ दिली. याप्रसंगी भोकर येथील स्वीप कक्षाचे अधिकारी श्रीमती सुमन गोणारकर आणि सुधांशु कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार राजा आता तरी तू जागा हो! कणखर लोकशाहीचा तू मजबूत धागा हो! या आशयाचे पथनाट्याचे सादरीकरण करीत मतदार राजाला मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.


सादर करते समूहामध्ये सरस्वती कारले, सरस्वती जाधव, ज्योती पाटेकर, रूपाली कांबळे अनघा नरवाडे, वर्षा ढवळे,  रेखा कांग्गठीकार, मनोरमा गोवंदे, रामेश्वर शिंदे, राजू सोनकांबळे, रंगराव कासराळे, प्रमोद फुलारी, गुलाब पावडे, साहेबराव डोंगरे यांचा समावेश होता.


या मतदारसंघातील कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते केंद्र सरकारकडून आलेल्या केंद्रिय सुचना कार्यालयाच्या  क्षेत्रीय प्रचार कार्यालयामार्फत जिल्ह्यात सुरु झालेल्या चलचित्र रथाचे उद्घाटन करण्यात आले. या रथाद्वारे मतदार संघातील शहरी आणि ग्रामीण भागात मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त मतदान होऊन लोकशाही बळकट होईल. यानिमित्त स्वीप कक्षाद्वारे सेल्फी पाँईंट उभा करण्यात आला होता यामध्ये महाविद्यालयातील तरुण मतदारांनी आणि इतर सामान्य नागरिकांनी सेल्फी काढून आपला सहभाग नोंदवला. 


प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रापर्यंत पोहोचा

लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला महत्व आहे. आपला देश या लोकशाहीच्या आधारावर चालतो. पण मतदार राजा मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी थोडा निष्काळजी करतो. यावेळी आपल्या सर्वांना मिळून जास्तीत-जास्त मतदान करायचे आहे. काश्मीरसारख्या दुर्गम भागात आपल्यापेक्षा अधिक मतदान होते. यावेळी प्रत्येक नांदेडकरांनी मतदान करावे. आपले प्रत्येक मत हे आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केले.

00000










No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...