Thursday, October 20, 2022

 बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ 

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास शनिवार 22 ऑक्टोंबर पासून 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.    

बँकेत परीक्षा शुल्क भरल्याबाबत चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करण्याचा कालावधी पुढील प्रमाणे आहे. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाउनलोड करुन शुल्क बुधवार 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत भरावयाचा आहे. तसेच शुल्क आरटीजीएस / एनइएफटीद्वारे भरणा केल्याची पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट शुक्रवार 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत जमा करावयाची आहे.    

व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेवून परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज 22 ऑक्टोंबर 2022 पासून ऑनलाईन भरण्यास सुरू होत आहेत. 

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगीनमधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टर नुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्ट वर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी.त्यानंतर प्रिलिस्ट परीक्षा शुल्क चलन व विद्यार्थी यादीसोबत विभागीय मंडळाकडे निर्धारित कालावधीत जमा करावी. 

विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क पुढे नमूद केलेल्या बँकेमध्ये आरटीजीएसद्वारे भरणा करून चलनाची प्रत तसेच विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. लातूर, नागपूर, मुंबई विभागीय मंडळासाठी एचडीएफसी बँक Virtual Account, अमरावती, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर विभागीय मंडळासाठी बँक ऑफ इंडिया Virtual Account तर नाशिक, कोकण मंडळासाठी AXIS Virtual Account या बँकेचा समावेश आहे. 

अर्ज सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क संगणकीय चलन डाऊनलोड करून चलनावरील Virtual Account मध्ये आरटीजीएस / एनईएफटी द्वारे भरावयाचे आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी एनईएफटी / आरटीजीएसद्वारे भरणा केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष वजा झाली आहे किंवा नाही तसेच खाते क्रमांक व आयएफसी कोड चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्यांची राहील. 

कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व अर्जाचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांचे प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत याची सर्व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी नोंद घ्यावी. परिपूर्ण व अचूक शुल्क भरल्याची खात्री विभागीय मंडळ स्तरावर करून त्याबाबतचा अहवाल गणकयंत्र विभागाच्या नमून्यात राज्यमंडळ कार्यालयास सादर केल्यानंतर संबंधित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

0000

 

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- नांदेड जिल्ह्यात शनिवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 5 नोव्हेंबर   2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 22 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 5 नोव्हेंबर   2022 च्या  मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

 ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 20 :- असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने असंघटीत कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने नांदेड येथील हाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात विविध कामगार संघटनेच्या प्रतिनीधीची बैठक घेण्यात आली. नांदेड जिल्हयातील जास्ती जास्त  संघटीत कामगारांची नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मो. अ.सय्यद यांनी केले आहे.

बैठकीला  विविध कामगार संघटनेचे प्रतीनिधी नागापुरकर, यादव आझादे, फारुख अहमद,ॲड श्रीधर कांबळे, विष्णु गोडबोले, अब्दुल वसीम, रमेश बरडे, बालाजी पवार, प्रभु नारायण उरडवड, मोहम्मद सोहेल, मोहम्मद इम्रान, खलिद हुसैन, आदित्य देशमुख, सय्यद मुनीर तसेच कार्यालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

असंघटीत क्षेत्रातील कामगार व्यक्तीचा समावेश पुढील प्रमाणे आहे. यात उसतोड कामगार, सुतारकाम करण्यारी व्यक्ती, बांधकाम कामगार, शेतीकाम करणारी व्यक्ती, घरकाम करणारी महिला, ऑटो चालक / रिक्षा चालक आशा सेविका व अंगणवाडी सेविका, न्हावी कामगार, वृत्तपत्र विक्रेते, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, ब्युटीपार्लर कामगार महिला, फेरीवाले/भाजीवाले/फळवाले, पेंटर/इलेक्ट्रिशियन प्लंबर, रस्त्यावरील विक्रेते, पीठ गिरणी कामगार, पशुपालन करणार कामगार, लहान शेतकरी, वीटभट्टी कामगार, मनरेगा मजूर, माथाडी कामगार, चहा विक्रेते अशा असंघटीत क्षेत्रातील 300 कामगार व्यक्तींचा समावेश होतो.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्याचे फायदे

असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. नोंदणीकृत असंघटित कामगार प्रधानमंत्री सुरक्षा योजना लागू राहील. ई-श्रम काढणाऱ्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र सरकारकडून त्याच्या वारसदाराला  दोन लाख रूपयांचे  विम्याचे कवच देण्यात येईल. अपघातात  कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास  एक लाख रूपयांची  भरपाई केंद्र सरकार कडून मिळेल. प्रत्येक असंघटीत कामगाराला एक ओळखपत्र दिले जाईल. त्यावर एक युनिक ओळखपत्र क्रमांक असेल. हा डेटाबेस असंघटीत कामगारांसाठी धोरण आणि कार्यक्रमामध्ये सरकारला मदत करेल. स्थलांतरित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेणे आणि त्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे आहे.

 

नोंदणी करिता पात्रता

असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याचे  वय 16 ते 59 दरम्यान असावे. कामगार आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा. असंघटीत कामगार शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असणे आवश्यक आहे.

 

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड , बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक अथवा आयएफएससी कोड असलेली इतर कोणतेही बँक), सक्रीय मोबाईल नंबर, स्वयं नोंदणी करण्यासाठी कामगारांचा सक्रिय मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे

 

नोंदणी कोठे करावी

स्वतः नागरी सुविधा केंद्र (सीएससी), कामगार सुविधा केंद्र , eshram portal url : eshram.gov.in या संकेतस्थळावर करावी. राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 14434, टोल फ्री नंबर 18001374150 हा आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रातील जास्तीत जास्त कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

00000

 जास्त प्रवासी भाडे आकारणाऱ्या

ट्रॅव्हल्स विरुद्ध तक्रारी नोंदवा

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- दिवाळी व इतर सणांच्या कालावधीत प्रवासी मोठया प्रमाणात गावी येत व जात असतात. अशा कालावधीत शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिक भाडे प्रवासी बस धारकामार्फत घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. 26 ऑक्टोबर 2021 रोजीच्या राज्य महामंडळाच्या भाडेदराच्या तुलनेत कंत्राटी परवाना वाहनांना कि.मी.प्रमाणे भाडे निश्चित करण्यात आले आहे. कंत्राटी वाहतुकदार प्रवासी भाडयापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाच्या ईमेल dycommr.enf2@gmail.com  rto.26-mh@gov.in वर तक्रार नोंदवावी. त्यामध्ये आपले नावे, मोबाईल क्रमांक, तिकीट, प्रवासाचा तपशील याची माहिती देण्यात यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

0000

 त्यांच्या नजरेतील आकाश कंदील शोधू यात

- जिल्हाधिकारी अभिजित राऊत
▪️बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना द्यावे प्राधान्य
▪️जिल्हा परिषदेत महिला बचतगटाच्या स्टॉलचे उद्घाटन
नांदेड (जिमाका) दि. 20 :- महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी बचतगटांसारखे अत्यंत प्रभावी माध्यमे आपल्या हातात आहेत. असंख्य महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून आपले कला कौशल्य सिद्ध करून दाखविले आहे. अनेक महिला यात पुढे सरसावल्या आहेत. किनवट सारख्या आदिवासी कोलाम पाड्यावरील महिलांनी त्यांच्या भावविश्वात असलेल्या आकाश कंदीलांची बांबूच्या पट्यांपासून निर्मिती केली आहे. त्यांच्या नजरेतीलही आपण आकाश कंदील शोधून त्याची खरेदी केली तर त्यांचीही दिवाळी उजळेल या शब्दात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कृतज्ञतेसाठी समाजाला आवाहन केले.
जिल्हा परिषद येथे महिला बचतगटांच्या विविध स्टॉलचे त्यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. पी. माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, व्ही. आर. पाटील, आर. पी. काळम आदी उपस्थित होते.
बचतगटांचे संघटन, त्यांचे प्रशिक्षण, त्यांची क्षमता बांधणी चांगल्या प्रकारे झाली आहे. आता खरी गरज ही त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठेशी जोडून त्यांना तशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याशी निगडीत आहे. यादृष्टिने येथील विद्यापिठातील इनक्युबेशन सेंटर पुढे येऊन मदत करण्यास तयार आहेत. यादृष्टीने जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपात 25 बचतगटांना विशेष प्रशिक्षण देण्याच्यादृष्टिने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी ग्रामीण विकास प्रकल्प यंत्रणेला दिल्या. महिलांनीही आपल्या ठराविक चौकटीच्या जबाबदारीला पार पाडून इतर जे काही शक्य होईल त्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्यास्तव बाहेर पडले पाहिजे. अन्न प्रक्रिया उद्योगा संदर्भात केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजना आहेत. याचाही लाभ आपल्याला घेण्याच्या दृष्टीने बचतगटांनी विचार करून पुढे सरसावले पाहिजे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी मानले.
00000





 शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी

22 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ


नांदेड (जिमाका) दि. 20 :- राज्याच्या काही भागात उशिराच्या मान्सूनमुळे काही शेतकऱ्यांना अद्यापही आपली ई-पीक पाहणी पूर्ण करता आलेली नाही. पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग, कृषि पतपुरवठा धारण आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई लक्षात घेऊन योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे यासाठी ई-पीक पाहणी पारदर्शक करण्यात आली आहे.

 

याचा साकल्याने विचार करून खरीप हंगाम 2022 च्या शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीची कालमर्यादा 22 ऑक्टोंबर 2022 पर्यंत वाढचिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील खरीप हंगामाची ई-पीक पाहणी निर्धारीत कालावधीमध्ये पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  

0000

 जिल्ह्यात हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नुसार

नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ पीक विमा मंजूर  

- जिल्हाधिकारी अभिजित राऊत


नांदेड (जिमाका) दि. 20 :-  नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर व ख. ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लागू केली. या अधिसुचनेद्वारे सर्व महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात 25 टक्के रक्कम आगाऊ देण्यात येते. त्याअनुषंगाने आज जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये विमा कंपनीस दिलेल्या निर्देशानुसार वर नमूद पिकांसाठी विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले. यामुळे नांदेड जिल्ह्यास जवळपास 400 कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...