Thursday, October 20, 2022

 त्यांच्या नजरेतील आकाश कंदील शोधू यात

- जिल्हाधिकारी अभिजित राऊत
▪️बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना द्यावे प्राधान्य
▪️जिल्हा परिषदेत महिला बचतगटाच्या स्टॉलचे उद्घाटन
नांदेड (जिमाका) दि. 20 :- महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी बचतगटांसारखे अत्यंत प्रभावी माध्यमे आपल्या हातात आहेत. असंख्य महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून आपले कला कौशल्य सिद्ध करून दाखविले आहे. अनेक महिला यात पुढे सरसावल्या आहेत. किनवट सारख्या आदिवासी कोलाम पाड्यावरील महिलांनी त्यांच्या भावविश्वात असलेल्या आकाश कंदीलांची बांबूच्या पट्यांपासून निर्मिती केली आहे. त्यांच्या नजरेतीलही आपण आकाश कंदील शोधून त्याची खरेदी केली तर त्यांचीही दिवाळी उजळेल या शब्दात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कृतज्ञतेसाठी समाजाला आवाहन केले.
जिल्हा परिषद येथे महिला बचतगटांच्या विविध स्टॉलचे त्यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. पी. माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, व्ही. आर. पाटील, आर. पी. काळम आदी उपस्थित होते.
बचतगटांचे संघटन, त्यांचे प्रशिक्षण, त्यांची क्षमता बांधणी चांगल्या प्रकारे झाली आहे. आता खरी गरज ही त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठेशी जोडून त्यांना तशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याशी निगडीत आहे. यादृष्टिने येथील विद्यापिठातील इनक्युबेशन सेंटर पुढे येऊन मदत करण्यास तयार आहेत. यादृष्टीने जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपात 25 बचतगटांना विशेष प्रशिक्षण देण्याच्यादृष्टिने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी ग्रामीण विकास प्रकल्प यंत्रणेला दिल्या. महिलांनीही आपल्या ठराविक चौकटीच्या जबाबदारीला पार पाडून इतर जे काही शक्य होईल त्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्यास्तव बाहेर पडले पाहिजे. अन्न प्रक्रिया उद्योगा संदर्भात केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजना आहेत. याचाही लाभ आपल्याला घेण्याच्या दृष्टीने बचतगटांनी विचार करून पुढे सरसावले पाहिजे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी मानले.
00000





No comments:

Post a Comment

 नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत विधानसभा निहाय झालेल्या मतदानाची एकत्रित अंतिम टक्केवारी मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी अभिज...