Thursday, October 20, 2022

 बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ 

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास शनिवार 22 ऑक्टोंबर पासून 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.    

बँकेत परीक्षा शुल्क भरल्याबाबत चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करण्याचा कालावधी पुढील प्रमाणे आहे. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाउनलोड करुन शुल्क बुधवार 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत भरावयाचा आहे. तसेच शुल्क आरटीजीएस / एनइएफटीद्वारे भरणा केल्याची पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट शुक्रवार 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत जमा करावयाची आहे.    

व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेवून परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज 22 ऑक्टोंबर 2022 पासून ऑनलाईन भरण्यास सुरू होत आहेत. 

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगीनमधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टर नुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्ट वर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी.त्यानंतर प्रिलिस्ट परीक्षा शुल्क चलन व विद्यार्थी यादीसोबत विभागीय मंडळाकडे निर्धारित कालावधीत जमा करावी. 

विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क पुढे नमूद केलेल्या बँकेमध्ये आरटीजीएसद्वारे भरणा करून चलनाची प्रत तसेच विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. लातूर, नागपूर, मुंबई विभागीय मंडळासाठी एचडीएफसी बँक Virtual Account, अमरावती, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर विभागीय मंडळासाठी बँक ऑफ इंडिया Virtual Account तर नाशिक, कोकण मंडळासाठी AXIS Virtual Account या बँकेचा समावेश आहे. 

अर्ज सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क संगणकीय चलन डाऊनलोड करून चलनावरील Virtual Account मध्ये आरटीजीएस / एनईएफटी द्वारे भरावयाचे आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी एनईएफटी / आरटीजीएसद्वारे भरणा केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष वजा झाली आहे किंवा नाही तसेच खाते क्रमांक व आयएफसी कोड चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्यांची राहील. 

कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व अर्जाचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांचे प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत याची सर्व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी नोंद घ्यावी. परिपूर्ण व अचूक शुल्क भरल्याची खात्री विभागीय मंडळ स्तरावर करून त्याबाबतचा अहवाल गणकयंत्र विभागाच्या नमून्यात राज्यमंडळ कार्यालयास सादर केल्यानंतर संबंधित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...