Tuesday, October 3, 2017

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात
"भारतीय राज्यव्यवस्था" या विषयावर मार्गदर्शन
नांदेड दि. 3 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वल नांदेड अभियानांतर्गत गुरुवार 5 ऑक्टोंबर 2017 रोजी सायं 5 वा. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिबिरात पुणे येथील प्रा. एस. एम. बडजाते हे "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मार्गदर्शनशिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.

000000
दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड दि. 3 :- जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसाठी मतदान व मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडु नये यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांनी दारु विक्री बंदचे आदेश काढले आहेत.
मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्या पुढील प्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायत मतदान पुर्वीचा दिवस 6 ऑक्टोंबर व मतदानाचा दिवस 7 ऑक्टोंबर रोजी ज्या गावामध्ये मतदान आहे ते गाव व त्या गावास संलग्न सर्व गावातील अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस. मतमोजणीचा दिवस 9 ऑक्टोंबर रोजी ज्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे त्याच ठिकाणी मतमोजणी होईपर्यंत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील मतदान पुर्वीचा दिवस 10 ऑक्टोंबर व मतदानाचा दिवस 11 ऑक्टोंबर रोजी महानगरपालिका हद्दीतील व हद्दीला लागून 5 किमी परिसरातील सर्व अनुज्ञप्त्या पुर्ण दिवस. मतमोजणीचा दिवस 12 ऑक्टोंबर रोजी फक्त मतमोजणीच्या दिवशी नांदेड महानगरपालिका हद्दीतील सर्व अनुज्ञप्त्या 5 वाजेपर्यंत बंद राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही नमुद केले आहे.

00000
निवडणुका मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी
नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी
- राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया
         नांदेड, दि. 3 :- जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहिता व निवडणुकीच्या अनुषंगीक बाबींच्या नियमांचे संबंधीत यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे दिले. 
         

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक व जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची आढावा बैठक राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनुराधा ढालकरी, निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षक, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. सहारिया म्हणाले, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रामुख्याने उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या माहितीची अचुक तपासणी बरोबर उमेदवार करीत असलेल्या खर्चावरही नजर ठेवावी. त्यासाठी चित्रीकरण करावे व संबंधीत विभागाच्या मदतीने पुरावे घ्यावेत. मतदान केंद्राच्या दर्शनी भागावर उमेदवारांची संपत्ती, गुन्हेगारी पार्श्वभुमी व इतर माहिती संबंधीचा गोषवारा मोठ्या अक्षरात मतदारांना स्पष्ट दिसेल या स्वरुपात लावावा. मतदार जागृती करताना मतदानाची टक्केवारी वाढविण्यावरही भर दयावे. अवैध मद्य विक्री व वाहतुकीला आळा घालणे, मतदान मतमोजणीच्या दिवशी विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची खबरदारी घ्यावी, आदी सूचना त्यांनी दिल्या. आदर्श निवडणूक आचारसंहितीच्या मार्गदशक तत्वानुसार निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी दक्षता घ्यावी. निवडणुकीत कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता मतदारांना मतदान करता यावे अशी व्यवस्था करावी. तसेच संपुर्ण निवडणूक प्रक्रिया समन्वयाने पार पाडावी, असे सांगितले.
सचिव शेखर चन्ने यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व मतदारांना व्होटर्स स्लीप (Voter Slip) वाटप शंभर टक्के करावे. सिंगल विंडो सिस्टीमद्वारे उमेदवारांना आवश्यक परवानगी देणे. तसेच उमेदवार व पक्षांचा निवडणूक खर्चाची माहिती, आचारसंहिता कक्ष, नियंत्रण कक्ष, मतदान केंद्र व्यवस्था, मतदार यादी, मिडीया सेंटर आदी विषयी आढावा घेऊन विविध सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकी संबंधी माहिती दिली. जिल्ह्यातील निवडणुकांचे कामे सर्व यंत्रणाचे समन्वयाने सुरु असून निवडणुका यशस्वीरित्या पार पडतील असे सांगितले. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी निवडणूक काळातील पोलीस बंदोबस्तासंबंधी माहिती दिली. तर मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसंबंधी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्र. 2 मधील 37 मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट (VVPAT)  या यंत्रणेचा राज्यात स्थानीक स्वराज्य निवडणुकीसाठी प्रथमच वापर केला जाणार आहे. त्यासंबंधीचे प्रात्यक्षिक श्री. सहारिया यांना दाखविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने राज्य निवडणूक आयोगाचे विविध आदेशाचे संकलन केलेल्या पुस्तिकेचे विमोचन श्री. सहारिया यांचे हस्ते यावेळी करण्यात आले.   
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी प्रास्ताविक केले व मनपा उपआयुक्त रत्नाकर वाघमारे यांनी आभार मानले. 

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...