Tuesday, December 8, 2020

 

विकेल ते पिकेल धोरणांतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 8 :- विकेल ते पिकेल संकल्पनेतून शेतमाल काढणी पश्च्यात व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा उभारणीकरिता कृषी व सलग्न विभागाच्या  विविध योजना उपलब्ध आहेत त्यात  मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया विकास योजना (PMFME), केंद्र पुरस्कृत अँग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड (AIF), मा.मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY), अशा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांर्गत नांदेड जिल्ह्यातील समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून शेतमाल ज्यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, तूर, हरभरा, डाळी, भात, भरडधान्ये, संत्रा, पेरु, सीताफळ, आंबा, हळद व भाजीपाला पिके आणि शेळ्या व परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र घटकात समुदाय आधारित संस्थांमध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे. यासोबतच अर्ज सादर करण्यासाठी पात्र खरेदीदारांमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील कॉर्पोरेटस, प्रक्रियादार, निर्यातदार, लघु-मध्यम उद्योजक, स्टार्टअप्स,कोणताही खरेदीदार आदींचा समावेश आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी प्राप्त स्पर्धात्मक व उत्कृष्ठ अर्जांना प्रकल्पाच्या 60 टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना, आदी माहितीसाठी https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर भेट द्यावी. इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी दि. 15 डिसेंबर 2020 पर्यंत कालावधी आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी उत्पादकसंघ व प्रकल्पासाठी निवड झालेल्या गावातील कोणत्याही यंत्रणेकडे नोंदणी झालेले शेतकरी / महिला / भूमिहीन व्यक्तीचे इच्छुक गट याचा लाभ घेवू शकतात. यामध्ये प्रामुख्याने शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, कृषी अवजारे बँक याबाबींचा लाभ घेता येईल. कारखाना व यंत्रे (Plant & Machinery) आणि प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक बांधकाम खर्चाच्या 60 टक्केअनुदान देय आहे. 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया विकास योजना (PMFME) एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) योजनेंतर्गत  वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, बचत गट किंवा खासगी उद्योग यांना पायाभूत सुविधासाठी जसे की, शेतमालाचे वर्गीकरण, ग्रेडिंग, पॅकेजिंग, गोदाम, कोल्ड स्टोरेज, एक जिल्हा एक उत्पादन यांच्या प्रक्रियेसाठी सामान्य प्रक्रिया सुविधा इत्यादीसाठी प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के जास्तीत जास्त रु. 10 लाख रुपयांच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. इच्छुकांनी PMFME PORTAL वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.  

केंद्र पुरस्कृत अँग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड (AIF) या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी,विविध कार्यकारी सहकारी संस्था, सहकारी पणन संस्था, स्वयंसहाय्यता गट, वैयक्तिक शेतकरी, संयुक्त दायित्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था,कृषी उद्योजक यांना रुपये 2 कोटी मर्यादेपर्यंत कर्ज पुरवठा केलेल्या प्रकल्पांना प्रति वर्षी 3 टक्के व्याज सवलत आणि 7 वर्षाकरिता कर्जाकरिता पतहमी यामधून मिळणार आहे. तसेच इतर योजनांची अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर त्यांचा लाभ घेता येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.   

0000

 

49 कोरोना बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू

37 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  मंगळवार 8 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 49 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 34 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 15 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 37 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

 आजच्या 930 अहवालापैकी 879 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 675 एवढी झाली असून यातील 19 हजार 576 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 350 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 19 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. सोमवार 7 डिसेंबर 2020 रोजी उमरी तालुक्यातील सोमठाणा येथील 29 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे, स्नेहनगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर नायगाव तालुक्यातील कुटुंर येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 554 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14, किनवट कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालय 8, लोहा तालुक्यांतर्गत 2, मुखेड कोविड रुग्णालय 2, धर्माबाद तालुक्यांतर्गत 3 असे एकूण 37 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.68 टक्के आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 25, कंधार तालुक्यात 1, नायगाव 2, मुदखेड 1, माहूर 1, देगलूर 3, लोहा 1 असे एकुण 34 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, मुखेड तालुक्यात 6, हदगाव 1, परभणी 1 असे एकुण 15 बाधित आढळले.  

जिल्ह्यात 350 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 32, मुखेड कोविड रुग्णालय 24, भोकर कोविड केअर सेंटर 2, किनवट कोविड रुग्णालय 2,  हदगाव कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 64, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 151, खाजगी रुग्णालय 26 आहेत.  

मंगळवार 8 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 186, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 65 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 59 हजार 315

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 34 हजार 684

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 675

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 576

एकूण मृत्यू संख्या- 554

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.68 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-404

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-350

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-19.  

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

000000

 

 

मानवी हक्क दिनानिमित्त गुरुवारी विविध उपक्रमांच्या आयोजनाचे निर्देश 

नांदेड (जिमाका), दि. 8 :- जिल्ह्यात गुरुवार 10 डिसेंबर 2020 रोजी मानवी हक्क दिन साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहेत. 

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण, कारागृह, बालसुधारगृह अनाथालय आदी विभागांनी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करावी असे राज्य मानवी हक्क आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे सूचित केले आहे. 

या कायदाअंतर्गत समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान व्हावे त्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार न्यायालय, विद्यापीठ, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभाग, पंचायत, ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, महसूल विभागाची सर्व कार्यालये, शिक्षणाधिकारी, कारागृह अधीक्षक, बालगृह मुलांचे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती करावी याविषयी पत्राद्वारे निर्देशीत केले आहे.

00000

 

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम संपन्न

यावर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास भरभरुन योगदान द्यावे

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

 नांदेड (जिमाका) दि. 8 :- सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनात देशप्रेमाच्या भावनेतून नांदेड जिल्ह्याने नेहमीच चांगला पुढाकार घेऊन निधी संकलनात भरीव योगदान दिले आहे. यावर्षीच्या ध्वजनिधी संकलनातही शासनातील विविध विभागांसह समाजातूनही देशप्रेमाच्या भावनेतून भरीव निधी दिला जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला. या आर्थीक वर्षाच्या ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ नियोजन भवनात नुकताच संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

गतआर्थीक वर्षासाठी शासनाने जिल्ह्याला 35 लाख 50 हजार एवढे उद्दीष्ट दिले होते. नांदेड जिल्ह्याने हे उद्दीष्ट 124.14 टक्क्यांनी पूर्ण केले. या आर्थीक वर्षासाठीही शासनाने तेवढेच उद्दीष्ट दिले असून नांदेड जिल्ह्यातून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक निधी जमा करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे यांनी माजी सैनिक व त्यांच्या महिलाबचतगटास सर्वेातोपरी मदत करण्याचे सांगीतले. ध्वजनिधी जमा करण्याविषयी "हाच संकल्प हिचसिद्वी" उपक्रम राबवून प्रत्येक अधिकारी कर्मचारी व नागरीकांना आवाहन करुन निधी जमा करण्यात येईल असे आश्वासित केले. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सेवारत सैनिक किंवा माजी सैनिक यांच्या काही पोलीस संरक्षण किंवा अतिक्रमणाबाबतच्या तक्रारी आहेत. त्यासाठी प्राथमिकतेने लक्ष देवून निपटारा करण्यात येईल असे  माजी सैनिकांना सांगितले. 

यावेळी जिल्ह्याला दिलेले उद्दीष्ट वेळेच्या आत पूर्ण करुन गत आर्थीक वर्षात निधी शासनास जमा केल्याबद्दल शासनाच्यावतीने जिल्हा प्रशासनाचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. या निधी संकलनात जिल्ह्यातील शासकिय कार्यालय, शाळा तथा महाविद्यालयांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचाही प्रातिनिधीक सत्कार जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन करण्यात आला.   

कार्यक्रमाची सुरुवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. यानंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी  प्रास्ताविकात ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलीत झालेल्या निधीचा विनियोग माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती दिली. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी सी. एस. डी कॅण्टीन, मुलींचे वसतिगृह व पूर्व प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे सुरु करण्याबाबत विनंती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना केली. 

स्वंयरोजगारासाठी माजी सैनिक महिला बचतगटांना सुविधा केंद्र प्राथमिकतेने आंवटीत करण्यात येतील.  या कार्यक्रमाचे औचित्य साधून संजीवनी माजी सैनिक महिला बचतगट यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यामधून  शासकीय पुर्ननियुक्त माजी सैनिक कर्मचारी संघटना, भारतीय माजी सैनिक संघटना, विरसैनिक ग्रुप यांनी उत्साहने भाग घेतला. कार्यक्रमात विरनारी, विरमाता व विरपिता यांचा सत्कार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधिक्षक नांदेड यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.  याप्रसंगी आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले.  माजी सैनिक पाल्य धनंजय माधव केन्द्रे यास या वर्षीचा एअर मार्शल व्ही. ए. पाटणकर पुरस्कार माजी सैनिक विधवा पाल्य यांनी इयत्ता 10 वीमध्ये लातूर विभागात 96 प्रतिशत मार्कस प्राप्त केल्याबाबत प्रदान करण्यात आला. 

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी केले.  हा कार्यक्रम  यशस्वीपणे पार पाडण्याकरिता कार्यालयाचे  बुधसिंग शिसोदे, सुभे काशिनाथ ससाने,  सुर्यकांत कदम, सुरेश टिपरसे, माधव गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. 000000







  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...