Friday, December 17, 2021

त्रिकुट येथील गोदावरी संगमाच्या स्वच्छतेसाठी ग्रामस्थांचा स्वयंस्फूर्त पुढाकार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रिव्हर्स ऑफ इंडिया अंतर्गत उपक्रम

त्रिकुट येथील गोदावरी संगमाच्या स्वच्छतेसाठी

ग्रामस्थांचा स्वयंस्फूर्त पुढाकार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रिव्हर्स ऑफ इंडिया अंतर्गत उपक्रम

नांदेड (जिमाका)  दि. 17 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण भारतभर साजरा केल्या जाणाऱ्या रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमात गोदावरी नदीचा समावेश करण्यात आला आहे. यात नांदेड जवळील त्रिकुट येथील गोदावरी नदीच्या संगम स्थळी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. याअंतर्गत संगम परिसरातील स्वच्छता मोहिमेचा आज प्रारंभ करण्यात आला. लोकसहभाग, सेवाभावी संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणा यांच्या समन्वयातून गोदावरीचा हा उत्सव हाती घेतला असून यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेवून हा महोत्सव आपला केला.

त्रिकुट येथील गणपती मंदिर परिसर व संगमाच्या काठावर महापूरात वाहून आलेल्या प्लास्टीक पिशव्या, उन्मळून पडलेली बाभळीची झुडपे व इतर कचरा महिलांनी स्वच्छ केला. त्यांच्या मदतीसाठी उप जिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, माता साहिब गुरुद्वारा बोर्डचे सेवेदार बाबा गुलाबसिंग खालसा, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, नायब तहसिलदार मुंजाजी काकडे, गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर  मारावार, त्रिकुट गावातील जेष्ठ नागरिक व प्रतिनिधी, विस्तार अधिकारी गोविंद मांजरमकर, महिला स्वयं सहाय्यता समूहाच्या सदस्या, समूह संसाधन व्यक्ती सुजाता बुक्तरे, सारिका तिडके, मिनाक्षी वाघमारे, रयत सेवाभावी संस्थेचे प्राध्यापक संतोष शिंदे, नितिन गादेकर, अमोल टोमके, चंद्रकांत मेटकर, संतोष खोसळे आदीनी यात योगदान दिले.

रिव्हर्स ऑफ इंडिया या उपक्रमांतर्गत शुक्रवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते 11 या कालावधीत अधिकारी-कर्मचारी, अशासकीय संस्था व ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून गोदावरी नदीच्या परिसराची स्वच्छता, सपाटीकरण व हेरीटेज वॉकसाठी रस्ता तयार करणे, याबाबत आवाहन करण्यात आले होते.  नियोजनाप्रमाणे या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  रविवार दि. 19 डिसेंबर रोजी त्रिकुट ते मुगट प्राथमिक आरोग्य केंद्र मॅराथॉन स्पर्धा सोमवार 20 डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा व देशभक्तीपर गीत, छायाचित्र स्पर्धा, मंगळवार 21 डिसेंबर रोजी एकात्मतेची शपथ व योगा शिबीर, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन या विषयावर निबंध लेखन स्पर्धा, बुधवार 22 डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य, नाटक इत्यादी स्पर्धा व महिलांच्या सहभागाने नदीपात्रात दिवे लावून दिपोत्सव आदी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी प्रत्यक्ष त्रिकुट येथे भेट देवून लोक सहभागाबद्दल ग्रामस्थांना आवाहन केले होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभाग, महसूल विभाग व संबंधित विभागामार्फत तयारी पूर्ण केली जात आहे.

नदी स्वच्छतेसमवेत आरोग्याच्या दृष्टीनेही विविध उपक्रम नियोजित करण्यात आले आहेत. यात लसीकरणावर भर देण्यात आला आहे. डॉ.व्ही.डी.कसबे, डॉ. मारहा तन्वीर सिंह, डोईबळे, भंडारे, बंडेवार व आरोग्य सेविका शेगावकर हे लसीकरणाची प्रभावी मोहिम राबवित आहेत. या स्वच्छता मोहिमेची सांगता महाराष्ट्र गीत आणि भक्ती गीताने करण्यात आली.

0000 

ग्रामपंचायत पोट निवडणूक मतदान व मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

ग्रामपंचायत पोट निवडणूक मतदान  मतमोजणी

केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका)   दि. 17 :- ग्रामपंयायती मधील रिक्त झालेल्या पदांची पोट निवडणूक 2021 च्या अनुषंगाने मंगळवार 21 डिसेंबर रोजी मतदान केंद्र परिसरात तर  बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे. 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निवडणूकीच्या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोट-निवडणूक 2021 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मतदान केंद्र व बुधवार 22 डिसेंबर रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे मतमोजणीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. हा आदेश मंगळवार 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यत व मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात बुधवार 22 डिसेंबर रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

0000

 

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 552 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 526 एवढी झाली असून यातील 87 हजार 845 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 26 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, किनवट 2 आणि  अँटिजेन तपासणीद्वारे मुखेड 1 असे एकुण 6 बाधित आढळले आहे.

आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2असे एकूण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 26 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 20, खाजगी रुग्णालय 3 अशा एकूण 26 व्यक्ती उपचार घेत आहेत.

  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 88 हजार 436

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 84 हजार 398

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 526

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 845

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...