Friday, July 21, 2023

वृत्त क्र. 437 डिजीटल इंडिया सप्ताहात नोंदणी करण्याचे आवाहन

 वृत्त क्र. 437

डिजीटल इंडिया सप्ताहात नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे 25 ते 31 जुलै दरम्यान डिजीटल इंडिया सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. डिजीटल इंडिया सप्ताहात सर्व सामान्य नागरिक व विद्यार्थी यांना विविध ई-गव्हर्नन्स सेवांची माहिती मिळेल. दैनंदिन जीवनात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी या सप्ताहाचा उद्देश आहे. नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यास त्यांना त्यांच्या ईमेल व मोबाईलवर माहिती मिळत राहील, अशी माहिती तांत्रिक संचालक तथा जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रफुल कर्णेवार यांनी दिली आहे.

डिजीटल इंडिया सप्ताह भारताचे तंत्रज्ञान जगासमोर प्रदर्शित करणे, टेक स्टार्टअप साठी सहयोग, व्यवसायाच्या संधी शोधणे व पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या वेबलिंकवर नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी https://nanded.gov.in या नांदेड जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणीची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे किंवा https://www.nic.in/diw2023-reg या वेबलिंकचा नोंदणीसाठी वापर करावा.

जिल्ह्यातील महाविद्यालये, विशेषत: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्र निकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालये यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी डिजीटल इंडिया सप्ताहाच्या सर्व कार्यक्रमांचे प्रक्षेपण महाविद्यालयाच्या सभागृहात उपलब्ध करुन द्यावे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी नोंदणी करुन केंद्र शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 64.80 मि.मी. पाऊस

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  64.80  मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 21 :- जिल्ह्यात शुक्रवार 21  जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी 64.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 327.20  मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवार 21 जुलै 2023 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 37 (235.60), बिलोली-109.30 (449.60), मुखेड- 84 (408.30), कंधार-14 (170.10), लोहा-25.30 (227.10), हदगाव-90.30 (307.50), भोकर-60.20(358.80), देगलूर-152.30(400.80), किनवट-59.50(389.90), मुदखेड- 41.40 (298.30), हिमायतनगर-105.50 (289.20), माहूर- 30.60 (388.40), धर्माबाद- 79.10 (388.30), उमरी- 41.50 (358.10), अर्धापूर- 55.40 (313.20), नायगाव-34.40 (271.30) मिलीमीटर आहे.

0000 

मिशन स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियानातर्गत निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन

 मिशन स्थूलपणा जनजागृती व उपचार

अभियानातर्गत निबंध व पोस्टर स्पर्धेचे आयोजन


नांदेड (जिमाका)दि. 20 :- मिशन स्थुलपणा जनजागृती व उपचार अभियानातर्गत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवीपूर्व विद्यार्थ्यांची फुड ॲन्ड ओबेसिटी या विषयावर निबंध स्पर्धा व पोस्टर स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांची उर्स्फुत प्रतिसाद दिला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यामध्ये स्थुलतेबद्दल जागरुकता निर्माण होण्यास मदत झाली.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांचे मार्गदर्शन व जनऔषधशास्त्र विभागातील विभागप्रमुख डॉ. पी.एल.गट्टाणी यांचे नेत्वृत्वाखाली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेचे नियोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. महावीर नाकेल यांनी केले तर या स्पर्धेसाठी डॉ. आय.एफ.इनामदार, डॉ. आर.डी.गाडेकर, डॉ. साईनाथ मैदपवाड, डॉ. अक्षय नलाबले, डॉ. भार्गव यांनी सहकार्य केले.

00000 

शासकीय आणि खाजगी प्रवासी वाहन चालकांच्या नेत्र आणि आरोग्य तपासणीस प्रारंभ

                                                 शासकीय आणि खाजगी प्रवासी वाहन चालकांच्या

 नेत्र आणि आरोग्य तपासणीस प्रारंभ

नांदेड (जिमाका)दि. 20 :- जिल्हा रस्ता सुरक्षा समिती ही जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करून त्यामुळे होणारे मृत्यू आणि जखमी रुग्णांच्या अपंगत्वाचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवीत असते. या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने सर्व शासकीय आणि खाजगी प्रवासी वाहनांच्या वाहनचालकांची नेत्र आणि आरोग्य विषयक संपूर्ण तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात वाहन चालकांचे नेत्र आणि आरोग्य विषयक तपासणीस प्रारंभ करण्यात आला.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राउत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे तसेच राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक दत्तात्रय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालकांचे नेत्र आणि आरोग्य विषयक तपासणीस प्रारंभ करण्यात आला.


 

या विशेष मोहिमेतर्गत जिल्ह्यातील वाहनचालकांना संबंधित तालुक्यातील शासकीय रुग्णालयात संपूर्ण आरोग्य विषयक तपासणी करून घेण्यासाठी तसेच वाहन चालकांमधील वाढत असलेले आरोग्य समस्या आणि त्यांच्यातील व्यसनाधीनता यांच्याबाबत मोफत समुपदेशन घेण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच ही  तपासणी करून घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या प्रसंगी अपघात ग्रस्त रुग्णांना गोल्डन आवर मध्ये वैद्यकीय सेवा आणि मदत देण्यासाठी (गुड सामरिटनया संकल्पनेचा उपस्थितीतांना माहिती देण्यात आली.

यावेळी अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अभय अनुरकर, चिकित्सा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एच. साखरे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. चंद्रशेखर आपनगिरे, डॉ. विनायक कुलदीपक, चंदनकर, विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ दत्तात्रय कुलकर्णी, यंत्र अभियंता राज्य परिवहन महा.मंगेश कांबळे, माणिक कोरे आणि सहा.मोटार वाहन निरीक्षक निलेश ठाकूर तसेच जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

0000   

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत 

नांदेड (जिमाक)दि. 20 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन 2020-21,2021-22, 2022-23 व 2023-24 या वर्षासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यतरावरील पुरस्कारासाठी इच्छूक समाजसेविका, संस्थांकडून प्रस्ताव  मागविण्यात येत आहेत. परीपूर्ण प्रस्ताव 31 जुलै 2023 पूर्वी  जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, शास्त्रीनगर नांदेड येथे सादर करावेत. शासनाकडून महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर देण्यात येतो.


राज्य, जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला समाजसेविका तर विभागस्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्था यांनी प्रस्ताव सादर करावेत. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महिला व बालविकास क्षेत्रात किमान 25 वर्ष कार्य केलेले असावे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात कमीत कमी 10 वर्ष कार्य केलेले असावे आणि विभागस्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्था, पब्लिक ट्रस्ट 1950 किंवा सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट नुसार पंजीबध्द असावी. तसेच संस्थेचे महिला व बाल विकास क्षेत्रातील सेवा व कार्य 7 वर्षाहून जास्त असावे. यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार/सावित्रीबाई फुले पुरस्कार अथवा दलित मित्र पुरस्कार मिळालेला नसेल, अशा महिला समाजसेविका या पुरस्कारासाठी प्रस्ताव करु शकतात. अर्जदार महिलेचे कार्य जात, धर्म, पंथ आणि राजकिय पक्षाशी संबंधीत नसावे. पुरस्कार मिळण्याची पात्रता व्यक्तीगत मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा या बाबतीत विचार करण्यात येणार नाही.

प्रस्ताव स्विकृतीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्ष कार्य केलेले असावे. विभाग स्तरावरील पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्थानी महिला व बाल विकास क्षेत्रात 7 वर्षापेक्षा अधिक कार्य केलेले असावे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्ष कार्य केलेले असावे. सन 2020-21,2021-22, 2022-23 व 2023-24 यापैकी कोणात्या वर्षासाठीचा प्रस्ताव आहे ते नमुद करावे. जिल्हास्तर/विभाग स्तर/राज्यस्तर यापैकी जे असेल ते नमुद करावे. वैयक्तीक परिचय पत्र, विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे  पोलीस प्राधिकरणाचे पत्र. सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र याप्रमाणे निकष आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर. आर. कांगणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...