Friday, November 8, 2024

 वृत्त क्र. 1049

मुग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात 20 खरेदी केंद्र

नांदेड, दि. 8 नोव्हेंबर:- केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी 1 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी 20 खरेदी केंद्र निश्चित केले आहेत. तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केद्रावर आणण्यापूर्वी आर्द्रताचे प्रमाण 12 टक्केपर्यतच असावे व सोयाबीन एफएक्यु दर्जाचा असावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

प्रत्यक्षात मुग, उडीद खरेदी 10 ऑक्टोबर  व सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झालेली आहे. मुखेड तालुका खरेदी विक्री संघ, मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, लोहा तालुका खरेदी विक्री संघ लोहा, कृषि उत्पन्न बाजार समिती, किनवट, तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडीत दीनदयाळ उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, मष्णेश्वर फार्मर प्रोडयुसर कंपनी लि. धनज ता. मुखेड, सिद्राम फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. बेटमोगरा ता. मुखेड, किनवट तालुका कृषिमाल प्रक्रीया सह. संस्था गणेशपूर ता. किनवट, तिरुपती शहापूर फार्मर प्रोडयुसर कंपनी लि. वन्नाळी ता. देगलूर, राधामाई फार्मर प्रोड्युसर कंपनी रातोळी ता. नायगाव, अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा ता. हदगाव, श्रीजगदंब फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. जांब बु. ता. मुखेड, नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह खरेदी विक्री संस्था नांदेड ता. अर्धापूर, कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कुंडलवाडी ता. बिलोली, बळीराम पाटील फळे व भाजीपाला प्रक्रिया सहसंस्था मुखेड बेरली खुर्द ता. मुखेड, मुखेड फळे व भाजीपाला उत्पादक सहसंस्था उमरदरी ता. मुखेड , जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सहकारी संस्था कौठा ता. कंधार, नांदेड प्रगती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी चेनापूर ता. धर्माबाद, स्वामी विवेकानंद  अभिनव सहकारी संस्था मर्या शेळगावथडी ता. धर्माबाद  याठिकाणी मार्केटीग फेडरेशनमार्फत मुग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु झालेली आहे.

00000  

 वृत्त क्र. 1048

तिरंग्याच्या साक्षीने नांदेडकरांनी घेतली मतदानाची शपथ

जिल्हास्तरीय स्वीप उपक्रमांची भव्य लॉन्चिंग

मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

नांदेड,दि 8 नोव्हेंबर:-महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा पोट निवडणुकीच्या मतदार जागृतीच्या संदर्भाने स्वीप कार्यक्रमांतर्गत अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मतदार जनजागृती कार्यक्रमाची राज्यस्तरीय  लॉन्चिंग मुंबई येथे झाली. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या वतीने जिल्हास्तरीय मतदार जागृती आणि शपथ घेण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. 

व्हीआयपी रोड वरील तिरंगा ध्वज कॉर्नरवर एका भव्य कार्यक्रमात केंद्रीय निवडणूक निरीक्षक श्रीमती बी.बाला मायादेवी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महानगरपालिका आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी उपस्थित जनसमुवेत समुदायाला मतदानाची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थितांना तिरंगा ध्वजाच्या साक्षीने मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन केले. 

यावेळी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, दिलीप बनसोडे, नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेचे उपायुक्त सुप्रिया टवलारे, अजितपालसिंघ संधू, ज्येष्ठ नागरिक अशोक तेरकर, प्रभारी उपायुक्त संजय जाधव, मनीषा नरसाळे, सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक, शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, विभाग प्रमुख प.ला.आलूरकर, महेंद्र पवार, सदाशिव पतंगे, मिर्झा बेग, निलावती डावरे, रावण सोनसळे, रमेश चवरे हे उपस्थित होते.

यावेळी शाहीर रमेश गिरी आणि साहेबराव डोंगरे यांच्या संचाने मतदान जागृतीची गीते सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सेल्फी पॉईंट आणि स्वाक्षरी "मी मतदान करणारच" या स्वाक्षरी फलकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच तरुण व दिव्यांग मतदारांच्या हस्ते पहिल्यांदा स्वाक्षरी करून स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महानगरपालिकेचे वरिष्ठ सहाय्यक साईराज मुदिराज, संदीप लबडे, संजय ढवळे, आशा घुले, सारिका आचमे, माणिक भोसले यांच्यासह जिल्हास्तरीय स्वीप कक्षाचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी शहरातील नागरिक, तरुण व दिव्यांग मतदार तसेच महिला मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.

०००००






वृत्त क्र. 1047

निवडणूक निरीक्षक ए. गोविंदराज यांनी घेतला 

मुखेड येथील निवडणूक विषयक कामाचा आढावा

नांदेड, दि. 8 नोव्हेंबर:- मुख्य खर्च निरीक्षक ए. गोविंदराज यांनी आज 91-मुखेड विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयास भेट देवून निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील व सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेश जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.

खर्च निरीक्षक ए. गोविंदराज यांनी खर्च कक्षातील कामाची पाहणी करुन, मिडीया कक्षामार्फत होत असलेल्या कामाची पाहणी केली. खर्च कक्षातील उमेदवारांच्या खर्चाचे रजिस्टरची तपासणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार जोहरे, एस.बी.नरमीटवार, प्रशांत लिंबेकर, महाडीवाले, तलाठी देशमुख, मिडीया कक्ष प्रमुख उत्तम नारलावार, शिवशंकर कुच्चेवाड, संजय येनुरवार, रफिक बागवान इत्यादी उपस्थित होते.

00000




वृत्त क्र. 1046

संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 1098 ची मदत घ्या 

नांदेड दि. 8 नोव्हेंबर :- आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके, सापडलेली बालके, सोडून दिलेली बालके, बालविवाह, संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक मदत कुठून कशी मिळवून देता येईल, याकरीता कुठे संपर्क करावा याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. यासाठी आता चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 कार्यान्वित करण्यात आली आहे. 

संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी भारत सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणी व संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाइन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकांना मदत मिळवून देऊ शकतात. या संबधी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाते. याद्वारे संकटग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी संबंधीतांनी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. रंगारी यांनी केले आहे.

0000

वृत्त क्र. 1045

राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न 

पुणे,मुंबई,कोल्हापूर, अमरावती संघास अजिंक्यपद

नांदेड, दिनांक,८ नोव्हेंबर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयं नांदेड,जिल्हा क्रीडा परीषद नांदेड यांच्या संयुक्तं विद्यमाने  आयोजीत राज्यस्तरीय शालेय 14 वर्षांतील मुले- मुली बेसबॉल क्रीडा स्पर्धा पीपल्स महाविद्यालय मैदान येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मुलींच्या गटात प्रथम पुणे,द्वितीय मुंबई तर अमरावती तृतीय स्थानावर राहिले तर मुलाच्या गटात प्रथम पुणे, द्वितीय कोल्हापूर,तृतीय अमरावती संघाने स्थान संपादन केले. 

 स्पर्धेचा बक्षीस समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या हस्ते पार पडला .यावेळी उपस्थित क्रीडा मार्गदर्शक प्रकाश होनवडजकर,क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, शिवकाता देशमुख,अकोला जिल्हा सचिव नारायण बत्तुले, अमरावतीचे इंद्रजित नितनवार,ज्ञानेश काळे, चाळीसगाव चे देशमुख सर,राजेंद्र बनसोडे,संदीप लंबे,विपुल दापके, हौशी बेसबॉल जिल्हा संघटना नांदेड चे सचिव आनंदा कांबळे,सोमनाथ नरवडे निवड समिती सदस्य प्रदीप पाटील, वैष्णवी कासार,आदी मान्यवर उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवर यांनी केले व आभार प्रदर्शन बालाजी शिरसिकर यांनी केले.

अंतिम सामन्यामध्ये शिवराज शेरकर,ओम आडसुळे, आस्मी राऊत,शर्वरी देवकर (पुणे),केदार गायकवाड,समर्थ जाधव (कोल्हापूर),रियोना मेहता,काव्या कोठारी(मुंबई)या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करत आपल्या संघाना विजय प्राप्त करून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. विजय संघाना क्रीडा कार्यालयामार्फत चषक , प्रमाणपत्र व पदक देण्यात आले.

अंतिम सामन्यात पंच प्रमुख गणेश बेटूदे,सोमनाथ सपकाळ,संतोष आवचार, मुकेश बिराजदार,बालाजी गाडेकर, आकाश साबणे,विशाल कदम,राहुल खुडे,सायमा बागवान,यांनी पंच म्हणून तर गुणलेखक म्हणून गौस शेख, सोपान केदार,अर्चना कोल्होड,अमृता शेळके, इत्यादींनी म्हणून भूमिका निभावली.

 स्पर्धा पार पाडण्यासाठी संतोष कणकावार वरिष्ठ लिपिक, संजय चव्हाण,आनंद जोंधळे, दत्तकुमार दुथडे ,मोहन पवार, विजयानंद भालेराव,यश कांबळे,सुभाष धोंगडे, आकाश भोरे ,शेख अक्रम, चंदू गव्हाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी,जिल्हा बेसबॉल संघटना आदींनी परिश्रम घेतले.

उपांत्य सामन्यांचे निकाल

मुले विभाग

1) कोल्हापूर वि. वी लातूर (15-0) होमरन

2) पुणे वि. वी  अमरावती (8-0) होमरन

मुली विभाग

1) मुंबई वि.वी (7-5) होमरन

2) अमरावती वि. वी नागपूर (06-4) होमरन

अंतिम सामन्याचे निकाल

मुली विभाग

पुणे वि.वी मुंबई (11-1) होमरन 

मुले विभाग

पुणे वि.वी कोल्हापूर (10-0) होमरन

००००००





वृत्त क्र. 1044

पूर्ण दिवस सुटी अथवा किमान 2 तास मतदानाला वेळ द्या !

कामगार, मजूर, वेटरपासून ते मेकॅनिकपर्यंत सर्वांना 20 नोव्हेंबरला सवलतीचे आदेश

20 नोव्हेंबर मतदानाचा दिवस

नांदेड, दि. 8 नोव्हेंबर- नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी अत्यावश्यक सेवेपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून शेतमजूर, मेकॅनिक, वेटर या सर्वांना एक तर पूर्ण दिवसाची सुट्टी अथवा मतदान करण्यासाठी दोन तासाची सवलत द्या, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने सर्व कामगार आस्थापनांना दिले आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. नांदेड विधानसभा मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्‍यांना निवडणुकीच्‍या दिवशी बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी भरपगारी सुट्टी देण्‍याबाबत शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे.

ही सुट्टी सर्व आस्‍थापना, कारखाने, दुकाने, इत्‍यादीना लागू राहील. उदा. राज्‍य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्‍या या मधील आस्‍थापना, सर्व दुकाने व इतर आस्‍थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्‍यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्‍थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्‍या, शॉपिग सेंटर, मॉल्‍स,रिटेलर इ. अपवादात्‍मक परिस्‍थीतीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्‍यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्‍य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.

मात्र त्‍याबाबत त्‍यांनी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्‍याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्‍थापना मालकांनी घेणे आवश्‍यक राहील.

सर्व आस्‍थापना,कारखाने, दुकाने इत्‍यादींच्‍या मालकांनी , व्‍यवस्‍थापनाने या आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्‍यावी. मतदारांकडून मतदानासाठी योग्‍य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्‍त न झाल्‍याने मतदान करणे शक्‍य न झाल्‍याबाबची तक्रार आल्‍यास , त्‍यांच्‍या विरुध्‍द योग्‍य ती कारवाई करण्‍यात येईल . 

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...