Sunday, October 18, 2026

गोरठा येथे चारा टंचाईच्या वृत्ताची प्रत्यक्ष पाहणीत पडताळणी

 

गोशाळेत पुरेशा प्रमाणात कडबा व सोयाबीन कुटार उपलब्ध


वस्तुस्थितीची पडताळणी करण्याचे आवाहन


नांदेड(जिमाका), दि. १८ : उमरी तालुक्यातील मौजे गोरठा येथे चारा टंचाई निर्माण झाल्याबाबत तसेच चारा छावणी सुरू करण्याच्या मागणीसंदर्भात दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी साम टीव्हीवर प्रसारित झालेल्या वृत्ताची पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी केली. या पाहणीत संबंधित गोशाळेत पशुधनासाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले.


पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने पशुवैद्यकीय चिकित्सालय, गोरठा तसेच श्री संत दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरठा संचलित गोशाळेस प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध चारा, पशुधनाची स्थिती आणि चारा व्यवस्थापनाची पाहणी केली.


गोशाळेत पुरेसा चारा उपलब्ध


प्रत्यक्ष पाहणीदरम्यान गोशाळेत पुरेशा प्रमाणात वाळलेला कडबा व सोयाबीन कुटार उपलब्ध असल्याचे आढळून आले. तसेच संबंधित वृत्तातील व्यक्ती आणि गोशाळा व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करण्यात आली. प्रसारित वृत्तातील माहिती वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे तसेच संबंधित विधाने जाणीवपूर्वक करण्यास सांगितल्याचे त्यांनी लेखी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.


पशुपालकांना चारा उत्पादन व साठवणुकीबाबत मार्गदर्शन


पाहणीदरम्यान चारा साक्षरता अभियानांतर्गत गावातील पशुपालक व शेतकऱ्यांशी संवाद साधून चारा उत्पादनात वाढ करणे, उपलब्ध चाऱ्याचे संवर्धन, योग्य साठवणूक आणि व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


रब्बी हंगामात पशुसंवर्धन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वैरण बियाणांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन चारा उत्पादन वाढवावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.


प्रत्यक्ष पाहणीत संबंधित गोशाळेत पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध असल्याचे आढळून आले. त्यामुळे चारा टंचाईसंदर्भातील वृत्त प्रसारित करण्यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची वस्तुनिष्ठ पडताळणी करणे आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.

**********







 वृत्त क्रमांक


*चारा विक्री व वाहतुकीवरील निर्बंधांची अर्धापूरमध्ये काटेकोर अंमलबजावणी


*जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस प्रशासनाची कारवाई


*नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन


नांदेड(जिमाका), दि. १८ : जिल्ह्यातील चारा टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी उपलब्ध चारा राखीव ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार चारा पिकांचे अवशेष, कडबा व वैरण यांच्या विक्री आणि वाहतुकीवरील निर्बंधांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने अर्धापूर येथे पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.

या कारवाईच्या वेळी अर्धापूरचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी  डॉ. दिलीप उदगिरे उपस्थित होते. जिल्ह्यात निर्माण झालेल्या चारा टंचाईच्या संभाव्य परिस्थितीत उपलब्ध चारा स्थानिक पशुधनासाठीच उपलब्ध राहावा, पशुपालकांच्या चाऱ्याची गरज प्राधान्याने पूर्ण व्हावी आणि शासनाच्या आदेशांचे प्रभावीपणे पालन सुनिश्चित व्हावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.


*पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर


चारा पिकांचे अवशेष, कडबा व वैरण यांची अनधिकृत विक्री किंवा जिल्ह्याबाहेर वाहतूक झाल्यास स्थानिक पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लागू निर्बंधांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

पशुधनाचे संरक्षण, उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन आणि पशुपालकांचे हित जपण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, पशुपालक, व्यापारी तसेच संबंधित घटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लागू करण्यात आलेल्या चारा विक्री व वाहतुकीवरील निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

********





Saturday, October 17, 2026

 वृत्त क्रमांक

शेतकऱ्यांसाठी 24 तास वीज तक्रार हेल्पलाईन

 

  • रोहित्र बिघाड, कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास 8087052830 वर संपर्क साधण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका), दि. 17 : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या वीजविषयक तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी महावितरणच्या नांदेड मंडळ कार्यालयामार्फत 24 तास कार्यरत हेल्पलाईन क्रमांक 8087052830 उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्र (डीपी) जळणे अथवा बिघाड होणे तसेच अन्य तातडीच्या वीजविषयक समस्या उद्भवल्यास शेतकऱ्यांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधित महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्यात येणार असून, तक्रारींच्या निवारणासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाणार आहे.

शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविताना नाव, गाव, तालुका, संपर्क क्रमांक आणि तक्रारीचे स्वरूप याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्यास मदत होणार आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीत कृषी पंपांचा वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी शेतकऱ्यांनी 24x7 हेल्पलाईन क्रमांक 8087052830 चा उपयोग करावा, असे आवाहन महावितरणच्या नांदेड मंडळ कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

******

 वृत्त क्रमांक

पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा

पालकमंत्री अतुल सावे यांचे निर्देश

 

  • पिण्याच्या पाण्यासाठी काटेकोर नियोजन करा
  • पाणीटंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन
  • पाणी बचतीसह पुनर्वापरावर भर द्या
  • पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन करा

 

 

नांदेड (जिमाका), दि. 17 : जिल्ह्यातील पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सर्व अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत. काही ठिकाणी कामांना अडथळे येत असल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेऊन कामे वेळेत पूर्ण करावीत. विद्युत जोडणीअभावी रखडलेली कामे तातडीने सुरू करावीत. तसेच पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त धरणांतील 10 टक्के अतिरिक्त पाणीसाठा सुरक्षित ठेवावा आणि ऑगस्ट 2027 पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण पाणीपुरवठा योजना, शहरी व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाणीपुरवठा योजनांच्या रेट्रोफिटिंगच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल. पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रलंबित देयकांसाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. या देयकांचा निपटारा करण्यासाठी मुंबई येथे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे पालकमंत्री श्री. सावे यांनी सांगितले. निधीअभावी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये अडथळे येऊ नयेत, यासाठी महसूल, जलसंपदा विभाग, पोलीस, नगर पालिका, महानगर पालिका आणि जिल्हा परिषद या सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन दुष्काळी परिस्थितीवर मात करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या तसेच पूर्णत्वाच्या टप्प्यात असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेऊन उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. राज्यस्तरावर प्रलंबित असलेल्या सुधारित पाणीपुरवठा योजना, पाणीटंचाई आराखडा, इसापूर धरणातील उद्भव विहिरीचे काम आणि विद्युत जोडणीची प्रलंबित कामे यांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

शहर आणि ग्रामीण भागात पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी महानगरपालिका व नगरपालिकांनी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि पाणीकपात करावी. अनधिकृत नळजोडण्या, पाण्याचा अवैध उपसा आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. रस्त्यावर पाणी वाहून जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणीगळती आढळल्यास तिची तातडीने दुरुस्ती करावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

उद्योगांमध्ये प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करावा. पुनर्वापरित पाणी बांधकामे आणि रस्त्यांच्या कामांसाठी वापरण्यावर भर द्यावा. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा, बोअरवेल पुनर्भरण, नाला खोलीकरण, विहिरींची कामे आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि जलतारा योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईबरोबरच पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहील, यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्याचा नियमित आढावा घ्यावा. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या तलावांची सद्यस्थिती तपासून आवश्यक दुरुस्तीची कामे करावीत. जलसंधारणाच्या कामांमधील अडचणी दूर करून पाणीसाठा वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे पालकमंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी सन 2023 मधील पीकविमा, जलसंपदा आणि जलसंधारण विभागांची प्रलंबित कामे मार्गी लावण्याची आवश्यकता व्यक्त केली. जलजीवन मिशनसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. शेतकऱ्यांच्या पीककर्ज व वसुलीच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महावितरणशी संबंधित प्रश्न सोडवून बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांनाही प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. या कामांसाठी आवश्यक निधी मिळविण्याकरिता शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, संभाव्य चारा टंचाई, ‘चारा मित्र’ संकल्पना, जलतारा योजना आणि विविध धरणांतील पाणीसाठा याबाबत माहिती दिली. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचाही त्यांनी आढावा सादर केला.

या बैठकीत कृषी, पाटबंधारे, पशुसंवर्धन, महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन, रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागांनी सुरू असलेली कामे, प्रलंबित कामे आणि आवश्यक निधीबाबत सविस्तर माहिती सादर केली.

या बैठकीस नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता इ. म. चिस्ती, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. पी. राठोड, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. कांबळे, नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. बनसोड व श्रीकांत थोरात, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रा. मा. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता महेश पाटील, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश फडसे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

****** 










Friday, October 16, 2026

 वृत्त क्रमांक

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा

 

  • दुष्काळी परिस्थिती व पाणीपुरवठा योजनांचा घेणार आढावा
  • पशुधनासाठी चारा नियोजनासह पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवर होणार चर्चा

 

 

नांदेड (जिमाका), दि. 16 : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे शनिवार, दि. 17 ऑक्टोबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, अपूर्ण पाणीपुरवठा योजना, शहरी व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि पशुधनासाठी चारा उपलब्धतेच्या नियोजनाचा आढावा घेण्यात येणार आहे.

पालकमंत्री सावे यांचे सकाळी 10.30 वाजता नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होईल. सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीस ते उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता शहर व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भातील बैठकीत सहभागी होतील.

दुपारी 1 वाजता ऑगस्ट 2027 पर्यंत पशुधनासाठी चारा उपलब्धतेच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दुपारी 2 ते 4.30 या वेळेत त्यांचा कार्यक्रम राखीव राहील.

सायंकाळी 4.30 वाजता नांदेड येथील स्थानिक कार्यक्रमास पालकमंत्री अतुल सावे उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार ते नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

******

 वृत्त क्रमांक

सणासुदीतील अन्नभेसळीविरोधात प्रशासनाची धडक कारवाई

 

  • नांदेडमध्ये 29.17 लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त; 32 आस्थापनांची तपासणी

 

नांदेड (जिमाका), दि. 16 : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत नांदेड जिल्ह्यात नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून 32 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये भेसळीचा संशय असलेली मिरची पूड, हळद पूड, धने पूड आणि मीठ या पदार्थांचा एकूण 25 हजार 832 किलो साठा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 29 लाख 17 हजार 172 रुपये आहे,

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत तपासणीदरम्यान 53 अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. आढळलेल्या त्रुटींबाबत 13 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विना नोंदणी व्यवसाय करणाऱ्या एका आस्थापनेला व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुधारणा नोटीस देऊनही त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या एका आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच चार आस्थापनांविरुद्ध तडजोडीची प्रकरणे दाखल करून 21 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

माहूरगड येथे होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही प्रशासनाने विशेष तपासणी केली. यामध्ये 15 अन्न आस्थापनांची तपासणी करून 16 अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. संबंधित व्यावसायिकांना स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सणासुदीच्या काळात ग्राहकांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत. पॅकबंद पदार्थ खरेदी करताना त्यांची मुदत तपासावी. मिठाई व दुग्धजन्य पदार्थ योग्य तापमानात आणि स्वच्छ ठिकाणी साठवून त्यांचा वेळेत वापर करावा. अन्नभेसळीचा प्रकार आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा FoSCoS या ऑनलाइन पोर्टलवर तसेच complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

******

 वृत्त क्रमांक

ओबीसी महामंडळाच्या थकीत व्याजात 50 टक्के सवलत

एकरकमी कर्ज परतफेड योजनेची मुदत 31 मार्च 2027 पर्यंत

 

नांदेड (जिमाका), दि. 16: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कर्ज घेतलेल्या थकबाकीदार लाभार्थ्यांसाठी सुधारित एकरकमी परतफेड योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण थकीत कर्जाची रक्कम एकरकमी भरल्यास थकीत व्याजात 50 टक्के सवलत मिळणार आहे. ही योजना 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ज्ञानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, हिंगोली रोड, नांदेड -431605 येथे किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 2200865 वर संपर्क साधावा.

******

गोरठा येथे चारा टंचाईच्या वृत्ताची प्रत्यक्ष पाहणीत पडताळणी

  गोशाळेत पुरेशा प्रमाणात कडबा व सोयाबीन कुटार उपलब्ध वस्तुस्थितीची पडताळणी करण्याचे आवाहन नांदेड(जिमाका), दि. १८ : उमरी तालुक्यातील मौजे गो...