Tuesday, April 28, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेडला सर्वाधिक पीकविमा; पहिल्या टप्प्यात ८१३.९३ कोटी मंजूर 

​नांदेड २९ एप्रिल:-: जिल्हा प्रशासनाच्या समन्वय आणि सूक्ष्मनियोजनामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यास राज्यात सर्वाधिक ८१३.९३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. उर्वरित २१ महसूल मंडळांची रक्कम प्रलंबित आहे. एकूण विमा मंजुरी ९०० कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. 

प्रमुख आकडेवारी

 बाब

आकडेवारी

मंजूर पीकविमा रक्कम (पहिला टप्पा)

८१३.९३ कोटी रुपये

संभाव्य एकूण पीकविमा

९००+ कोटी रुपये

विमाधारक शेतकरी

४,३४,८१९

दाखल विमा अर्ज

८,२९,७३७

विमा संरक्षित क्षेत्र

५,१३,९०० हेक्टर

नुकसानग्रस्त क्षेत्र

७,२७,९३२ हेक्टर

पीक कापणी प्रयोग

३३१२

प्रलंबित महसूल मंडळे

२१           

​जिल्‍हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पिक विमा निकष पुर्तता करणे कामी आवश्‍यक असलेल्‍या पिक कापणी प्रयोगाची वस्‍तुनिष्‍ठ अमलबजावणी  करण्‍यासाठी जिल्‍हयातील विविध विभागांचे 16 समन्‍वय अधिकारी यांची नियुक्‍ती केली होती. जिल्‍हाधिकारी हे स्‍वतः पिक कापणी प्रयोग पर्यवेक्षणासाठी जातीने हजर होते. पीक कापणी प्रयोगांची पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ अंमलबजावणी, तांत्रिक पूर्तता, विमा कंपनीच्या आक्षेपांचे निराकरण आणि तिन्ही विभागांचा प्रभावी समन्वय यामुळे नांदेडला राज्यात सर्वाधिक पीकविमा मंजूर झाला आहे.  

​या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांचे कार्यालयाकडून खरीप पिकांचे काढणी कालावधीत कृषी,महसूल व ग्राम विकास या तिनही यंत्रनेकडील पिक कापणी प्रयोगावार पिक विमा कंपणीकडून घेण्‍यात आलेल्‍या काही महसूल मंडळात पिक कापणी प्रयोगावर विमा कंपनीकडून घेण्यात आलेल्या आक्षेपा बाबत निवासी उपजिल्‍हाधिकारी  किरण अंबेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली वेळोवेळी सुकाणू समितीच्या बैठक घेऊन समस्‍यांचे निराकरण केल्यामुळे नांदेडला चांगली विमा नुकसान भरपाई रक्कम मिळण्यास  मदत झाली आहे.  

जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी "शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेले सुक्ष्‍म नियोजन व सातत्‍यपुर्ण पाठपुरावा आणि वस्तुनिष्ठ पीक कापणी प्रयोगांमुळे नांदेड जिल्‍हयास राज्यात सर्वाधिक पिक विमा रक्‍कम मंजुरी बाबत यशस्वी कामगिरी शक्य झाली."

00000




वृत्त क्रमांक 

जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त स्व-गणना करावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 

नांदेड दि. 28 एप्रिल :- भारताची जनगणना-2027 ही पहिली डिजिटल जनगणना लवकरच सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सर्व नगारिकांनी येत्या 1 ते 15 मे पर्यंत स्व-गणना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्ह्यातील प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, एनएसएस व एनसीसीचे समुपदेशक यांची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

स्व-गणनेची माहिती se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 1 ते 15 मे 2026 पर्यंत भरता येईल. नोंदणी केलेली संपूर्ण माहिती ही गोपनीय राहणार असून स्व-गणनेत नांदेड जिल्हा प्रथम येईल, अशा पद्धतीने सर्वांनी स्व-गणनेचे नियोजन करुन जास्तीत जास्त स्वगणना करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

0000




 

 

 निमंत्रण_महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस 2026..



वृत्त क्रमांक 

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात अनुभवाधारित शिक्षणाचा नवा आदर्श

अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. वंदना दुधमल यांच्या अभिनव पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी शरीरक्रियाशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन 

नांदेड, दि. 28 एप्रिल :- वैद्यकीय शिक्षणात अनुभवाधारित, कौशल्यकेंद्रित आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनपद्धती रुजविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या दूरदर्शी शैक्षणिक नेतृत्वाखाली शरीरक्रियाशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन करण्यात आले होते. 

स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी “भविष्यातील सक्षम व कौशल्यसंपन्न डॉक्टर घडविण्यासाठी अनुभवाधारित आणि विश्लेषणात्मक शिक्षणपद्धती आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. 

शरीरक्रियाशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना दुधमल(कंधारे)यांच्या अभिनव संकल्पना, शैक्षणिक नियोजन व प्रभावी अंमलबजावणीमुळे हा उपक्रम संस्थेच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांपैकी एक ठरला असून, वैद्यकीय शिक्षणात “Learning by Doing” संकल्पनेचे प्रभावी उदाहरण म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे. 

प्रथम वर्ष एमबीबीएसच्या २० गटांतील १५१ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत मानवी शरीरक्रियेतील गुंतागुंतीच्या संकल्पना वैज्ञानिक, त्रिमितीय आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्सद्वारे सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचारशक्ती आणि सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन या स्पर्धेत घडले.

अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण व आधुनिक वैद्यकीय शिक्षणासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून, विद्यार्थ्यांना पारंपरिक अध्यापनाबरोबरच अनुभवाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. 

या दृष्टीकोनातूनच ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आल्याचे मानले जाते. 

प्रास्ताविकात डॉ. वंदना दुधमल (कंधारे) यांनी शरीरक्रियाशास्त्र विषय विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ, आकर्षक आणि समजण्यासारखा करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. 

स्पर्धेतील मानकरी विजेते 

प्रथम क्रमांक : गट क्र. ०५ (सर विल्यम मॅडॉक बेलीस) कृत्रिम मूत्रपिंड आणि डायलिसिस , द्वितीय क्रमांक : गट क्र. १५ (लुईस अँटोइन रनवीर) प्रकाश प्रतिक्षेप, तृतीय क्रमांक गट क्र. ०७  जॉन स्कॉट हलदणे- प्रतिप्रवाह यंत्रणा स्पर्धेचे परीक्षण डॉ. वैशाली इनामदार, डॉ. किशोर राठोड, डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. समीर व डॉ. बोडके यांनी केले. कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे, उपअधिष्ठाता डॉ. शितल राठोड, डॉ. इस्माईल इनामदार,डॉ. हुमेरा, डॉ. भावना,डॉ. कदम, डॉ. देशमुख जे बी, डॉ. डाके, डॉ. माने, सतिश इंगळे ,मेट्रोन मुदिराज तसेच विविध विभागांतील प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता कदम यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी केले. 

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शरीरक्रियाशास्त्र विभागातील प्राध्यापक, डॉ मसरत फिरदोस, डॉ. सीमा टाकरस, डॉ. नौशिन, निवासी डॉक्टर डॉ भागवत, डॉ अनुब्रता, डॉ अक्षय, डॉ अनिरुद्ध, डॉ. अली, डॉ. दीपक, डॉ सीमा, डॉ. सावंत,डॉ.यशस, डॉ इनशा लीपिक इंगोले,प्रयोगशाळा  तंत्रज्ञ केंद्रे ,फोटोग्राफर रवी हिवाळे, इलेक्ट्रिशन चव्हाण तसेच श्रीमती पाटील व इतर कर्मचारी विजू मावशी, फुलकली मावशी आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

000000






 वृत्त क्रमांक 

महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई;

अक्षय तृतीयापासून जिल्ह्यात 11 बालविवाह रोखले

नांदेड, दि. 28 एप्रिल :- महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापासून नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी होऊ घातलेले एकूण 11 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

चाईल्ड लाईन 1098 ही राष्ट्रीय आपत्कालीन सेवा 24 तास कार्यरत असून, बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यात येते. 19 एप्रिलपासून अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी बालविवाह होत असल्याच्या तक्रारी 1098 या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाल्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून थेट घटनास्थळी जाऊन कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईदरम्यान संबंधित वधू-वरांचे वय तपासून बालविवाह थांबविण्यात आले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळले. देगलूर तालुक्यातील 1, नायगाव तालुक्यातील 2, लोहा तालुक्यातील 3, नांदेड तालुक्यातील 3, भोकर तालुक्यातील 1 व मुखेड तालुक्यातील 1 असे एकूण 11 बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार विवाहासाठी मुलाचे किमान वय 21 वर्षे व मुलीचे 18 वर्षे असणे आवश्यक आहे. या संदर्भात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर ग्रामपंचायत अधिकारी व अंगणवाडी सेविका यांची भूमिका बालविवाह प्रतिबंधासाठी महत्त्वाची ठरत आहे.

जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सेवा हक्‍क दिन साजरा 

सर्व ऑनलाईन सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्‍याचे निर्देश 

उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

नांदेड दि. 28 एप्रिल:- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात 'सेवा हक्क दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांना पारदर्शक, गतीमान व कालबद्ध सेवा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच, आपले सरकार पोर्टल द्वारे ऑनलाइन सेवांचा लाभ सक्षमतेने देण्याचे आणि अधिसूचित सेवा वेळेत प्रदान करण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी  निर्देश दिले. सेवा हक्‍क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कै. डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन येथे लोकसेवा हक्‍क दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी डॉ. रत्‍नदिप गायकवाड, उपजिल्‍हाधिकारी अजय शिंदे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी  दत्रात्र्यय गिरी, जिल्‍हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड, मनपाचे अपर आयुक्‍त गिरीश कदम, तहसिलदार विकास बिरादार, उषा इज्‍जपवार, सहायक प्रकल्‍प अधिकारी पी.बी. आडे, कौशल्‍य विकासचे एस.जे. परळीकर,नायब तहसिलदार जया अन्‍नमवार , प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक नीरज धामनगावे, समन्‍वयक कोंडीबा चोपडे आदींची उपस्थिती होती.

नागरिकांना शासकीय सेवा विहित मुदतीत, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने मिळवून देण्‍यासाठी जिल्‍हाभरातील सर्व सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र पुर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील याबाबत खबरदारी घेण्‍याच्‍या सूचना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिल्‍या. ज्‍या केंद्रावरुन सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात हयगय होईल अशा केंद्रावर कार्यवाही करण्यात येईल असे  निर्देश त्यांनी दिले.

जिल्‍हयातील उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या भूमि अभिलेख उपअधिक्षक बळवंत विठ्ठलराव मस्‍के, संतोष बिहारीलाल जगने, नायब तहसिलदार राजेश नागोराव पाठक, नंदकिशोर शंकरराव भोसीकर, ग्रामपंचायत अधिकारी रवि क्षीरसागर, दत्‍ता करपे, गोपाल टोकले, राज तोटावार व श्रीमती एस.बी.श्रीमणवार या लोकसेवकांचा जिल्‍हाधिकाऱ्याच्या हस्‍ते प्रशस्‍तीपत्र देवून गौरव करण्‍यात आला.

सेवा हक्क दिनाचे औचित्‍याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी जिल्‍हाधिकारी कार्यालयासह, पोलिस प्रशासन, जिल्‍हा परिषद, भूमी अभिलेख, कृषी, कौशल्‍य विकास, सिंचन आदी विविध  विभागातील अधिकारी , कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

000000






वृत्त क्रमांक 

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन 

पोलीस कवायत मैदानावर 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ 

नांदेड दि. 28 एप्रिल :- महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस समारंभ शुक्रवार 1 मे 2026 रोजी वजिराबाद पोलीस मुख्यालय कवायत मैदान,  नांदेड येथे सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ होणार आहे.  राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया बँग सोबत आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा

मेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - मंत्री अतुल सावे 

नांदेड दि. 28 एप्रिल महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्यावतीने लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील लाभार्थींसाठी कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे दि.30 एप्रिल 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे, तरी या मेळाव्यात लाभार्थींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती आणि वनार्टी यांच्या संयुक्त विद्यामाने लातुर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील लाभार्थ्याकरीता श्री. शंकरराव चव्हाण सभागृह, विष्णुनगर, नांदेड या सभागृहात दि.30 एप्रिल 2026 रोजी  सकाळी 10.00 वाजता “कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. 

या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी या महामंडळाच्या कर्ज वाटप व प्रशिक्षण योजनांबाबत ऑनलाईन अर्ज कसा करावा, अर्जाकरीता आवश्यक कागदपत्रे कोणती आणि अर्जातील त्रृटी कशा टाळाव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी या योजनेतील पात्र, निवड झालेल्या लाभार्थ्यांना सशर्त हेतुपत्र (LOI), मंजुरी पत्राचे वाटप, प्रशस्तीपत्र, मेडलचे वाटप, ट्रॅक्टर, वाहने वगैरे वस्तुचे वितरण करण्यात येणार आहे. 

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी, लाभार्थींना तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने, या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांनी केले आहे.

अधिक माहितीस्तव संपर्क –

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय यांचे संकेतस्थळ :- obcbahujankalyan.maharashtra.gov.in

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,

प्रशासकीय भवन, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,

चेंबूर, मुंबई – 400 071 

संकेतस्थळ :- www.msobcfdc.org

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ,

पहिला मजला, जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर,

गुलमोहर क्रॉस रोड न.09,

जे.व्ही.पी.डी., विलेपार्ले (पश्चिम), मुंबई 400 049 

संकेतस्थळ :-  www.vnvjntdc.org

000000

 वृत्त क्रमांक 

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई  

ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 28 एप्रिल :- राष्ट्रीय कार्यक्रम,  महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिक चे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

वृत्त क्रमांक   हवामान विभागाच्या सूचना  जिल्ह्यात 20 मे रोजी येलो अलर्ट जारी नांदेड, दि. 19 मे : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांन...