Thursday, June 18, 2026

 वृत्त क्रमांक

नीट (युजी) 2026 प्रवेश परिक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी

नांदेड दि. 18 जून :- नीट (युजी)-2026 प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधित वस्तूच्या वापरांवर प्रशासनाचे कडक लक्ष असून, इलेक्ट्रॉनिक, ब्लूटूथ वापर बंदी करण्यासाठी परीक्षार्थींची वैद्यकीय तपासणी होणार आहे. जर परीक्षा केंद्रावर प्रतिबंधीत करण्यात आलेल्या वस्तू परीक्षार्थीकडे आढळून आल्यास तो अनुचित साधनांचा वापर मानला जाईल. नियमानुसार व कायद्यानुसार संबंधित उमेदवाराविरुध्द कारवाई करण्यात येईल. याची नोंद सर्व परीक्षार्थीनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली मार्फत आयोजित नीट (युजी)-2026 फेर प्रवेश परीक्षा नांदेड जिल्ह्यात 21 जून 2026 रोजी दुपारी 2 ते 5.15 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. सदरील परीक्षेकरिता नांदेड जिल्ह्यात एकूण 42 केंद्र असून त्यापैकी नांदेड शहरात 25 परीक्षा केंद्रे तसेच ग्रामीण भागात 17 परीक्षा केंद्र अशी एकूण 42 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. NEET UG-2026  प्रवेश परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी 21 जून 2026 रोजी परीक्षा केंद्रावर सकाळी ठीक 11 वाजता रिपोर्टींग करावे. स.11 ते 1.30 ही वेळ परिक्षार्थीची तपासणीची वेळ राहील. 

परीक्षा केंद्रावर परीक्षा कालावधीत परीक्षार्थी मार्फत कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब होऊ नये. जसे की, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा, ब्लूटूथचा वापर तसेच मनगटी डिजिटल घडयाळीचा वापर करण्याचे परीक्षार्थी यांनी कटाक्षाने टाळावे तसेच वरील बाबींना आळा घालण्यासाठी परीक्षार्थी यांची परीक्षा केंद्रावर वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत ELECTRONIC DIVICE, EAR BUD व तत्‍सम बाबीची तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्‍यामार्फत पडताळणी केली जाणार आहे याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद  घ्यावी.

उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत नीट (युजी)-2026 फेर प्रवेश परीक्षा केंद्रामध्ये खालील वस्तू घेऊन जाण्याची परवानगी असणार नाही. 

उदा. मजकूर साहित्य, मुद्रित किंवा लिखित कागदाचे तुकडे, भूमिती पेन्सिल, बॉक्स, प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, स्केल, लेखन पॅड, पेन ड्राईव्ह, कॅल्क्युलेटर लॉंग टेबल,  इलेक्ट्रॉनिक पेन स्कॅनर इत्यादी कोणतीही स्टेशनरी वस्तू उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर आणू नये. 

NEET (UG)-2026 फेरप्रवेश परीक्षा केंद्रावर ड्रेस कोड संदर्भाने आयोगाने दिलेल्‍या निर्देशाचे तंतोतंत पालन परीक्षार्थी यांनी करावे. जसे की, वजनाने भारी असलेला पोशाख फुलबाहीचा शर्ट प्रतिबंधित असून सांस्कृतिक व पारंपारिक पोशाखास तपासणी संदर्भाने परीक्षेच्या दिवशी सकाळी 11.30 वा. च्‍या अगोदर परीक्षा केंद्रावरील यंत्रणेकडून तपासणी करून घ्यावी. तसेच परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना परीक्षार्थी यांनी ओळख पटविण्यासाठी आपला पूर्ण चेहरा दोन्ही कानांसह दिसेल याची योग्‍य ती काळजी घ्यावी.

परीक्षार्थी यांनी परीक्षा केंद्रावर इतर वस्तू जसे की वॉलेट, गॉगल, हॅन्डबॅग, मायक्रो कॅमेरा, असलेली कोणतीही वस्तु बेल्ट, कॅप, कोणतेही मनगटी घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरा, कोणतेही दागिने, कोणतेही  खादयपदार्थ खुल्‍या स्‍वरुपातील किंवा पॅकेजडं, पाणी बॉटल (पारदर्शक पाणी बॉटल वगळून) इ. 

कोणत्याही लपवून आणण्याजोग्या वस्‍तू मायक्रोचीप, कॅमेरा, ब्लूटूथ, इ. उपकरण संप्रेषण साधने इतर कोणतीही वस्तू जी अनुचित साधनांसाठी वापरली जाऊ शकते त्या सर्व वस्तू प्रतिबंधित करण्यात आलेल्‍या आहेत त्याची परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026

99.78 टक्के मतदान, आठ पैकी सात केंद्रावर शंभर टक्के मतदान

नांदेड, दि. 18 जून  :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आज 18 जून रोजी शांततेत व सुरळीत पार पडले. या निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 452 पैकी 451 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे एकुण मतदानाची टक्केवारी 99.78 टक्के नोंदवण्यात आली. किनवट, हदगाव, नांदेड, कंधार, धर्माबाद, बिलोली, देगलूर या सात ठिकाणी 100 टक्के मतदान तर भोकर मतदान केंद्रावर 97.92 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार 22 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता कॅबिनेट हॉल, नियोजन भवन तळमजला जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे होणार आहे.  

नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार आहेत. निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत पार पडली. त्यासाठी निवडणूक कार्यालयाने काटेकोर नियोजन केले होते. निवडणूक प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी पुरेशा पोलीस बंदोबस्तासह, मतदान  प्रक्रियेवर वेब कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवण्यात आली होती. मतदानासाठी मतदान केंद्र म्हणून आठही उपविभागीय कार्यालयस्तरावर तहसील कार्यालयांची निश्चिती करण्यात आली होती. निवडणूक निरिक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी नांदेड, बिलोली, हदगाव, भोकर, धर्माबाद या मतदान केंद्रास भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनीही नांदेड मतदान केंद्रातील व्यवस्थेची पाहणी केली.

सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळी 10 वाजेपर्यत 4.87 तर दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात 56.86 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत 88.94 टक्के मतदान झाले. अंतिमतः दुपारी 4 वा. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 452 पैकी 451 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या 452 मतदारांमध्ये 228 मतदार पुरूष तर 224 मतदार स्त्रिया होत्या. त्यातील 228 पुरूष मतदारांनी तर 223 स्त्री मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे जमा करून, त्या कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. या स्ट्राँगरूमवरही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने सांगितले. 

0000

वृत्त क्रमांक

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे-६७

नांदेड दि. 17 जून:- जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या 'एल निनो'च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन मा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

पशुपालकांना या संकटाचा सामना समर्थपणे करता यावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालक व शेतकरी यांना पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाई व म्हशींच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनात घट होऊ नये म्हणून पशुपालकांनी पोषक असणाऱ्या चारा पिकांची लागवड करावी. अशी पिके निवडावीत ज्यातून मुख्य शेतमाल (धान्य/उत्पादन) तर मिळेलच, सोबतीला जनावरांच्या पोषणासाठी दर्जेदार चाराही उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर अथवा पडीक जमिनीवर येणारे नैसर्गिक गवत वाया न घालवता त्याचे योग्य जतन करावे. पावसाची ओढ किंवा टंचाईच्या संकट काळात हेच गवत जनावरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा आधार ठरणार आहे. भविष्यातील संभाव्य टंचाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादनावर भर द्यावा. उत्पादित केलेला अतिरिक्त चारा 'मुरघास' किंवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवावा, जेणेकरून जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. 

पशुसंवर्धन विभागामार्फत 'एल निनो'च्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी पशुपालक-शेतकरी बांधवांना विविध माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी विभागाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. या संभाव्य संकटकाळात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सक्षम असून, कोणत्याही शंका तसेच अडचणी संदर्भात पशुपालकांनी १९६२ या कॉल सेंटर नंबरवरुन माहिती व पशुवैद्यकीय सेवा प्राप्त करुन घ्याव्यात, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अशी पिके घ्यावीत जी तीव्र टंचाईच्या काळात पशुखाद्य (चारा) म्हणूनही उपयुक्त ठरतील; तसेच चाऱ्याची नासाडी न करता त्याचा प्रभावी वापर व व्यवस्थापन करावे. त्याचबरोबर, खरीप आणि रब्बी हंगामातील चारा पिके साठवून ठेवण्यासाठी 'सायलेज' (silage) तंत्रज्ञानाचा वापर करावा; जेणेकरून फेब्रुवारी ते जून २०२७ या टंचाईच्या काळात त्याचा वापर करता येईल. एल निनोच्या सावटामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य टंचाईचा फटका आपल्या पशुधनाला बसू नये, ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड व उपलब्ध चाऱ्याची साठवणूक करून आपण पशुधनाचे पोषण आणि आपले आर्थिक उत्पन्न दोन्ही सुरक्षित ठेवू शकतो. सर्व पशुपालकांनी या आवाहनाचा गांभीर्याने विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी, ही विनंती.

00000

  वृत्त क्रमांक एल निनोच्या पार्श्वभुमीवर पेरणी व पिक पध्दतीत बदल करावा  - दत्तकुमार कळसाईत (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोयाबीन उत्पादन खर्...