Wednesday, May 2, 2018


एमएचटी- सीईटी 2018 परीक्षा
आयोजनासाठी प्रथम प्रशिक्षण संपन्न
नांदेड, दि. 2 :- एमएचटी सीईटी 2018 या परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षेसाठी नियुक्त उपकेंद्र प्रमुख, समवेक्षक, पर्यवेक्षक यांच्यासाठीचे प्रथम प्रशिक्षण वर्ग नुकतेच संपन्न झाले. येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात प्रशिक्षण संपन्न झाले.
प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी तहसिलदार सुरेश घोळवे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तहसिलदार उज्ज्वला पांगरकर या उपस्थित होत्या.
परीक्षेचे जिल्हा संपर्क अधिकारी तथा प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे पी. डी. पोपळे यांनी बारावी नंतरचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील परीक्षेचा टप्पा महत्वाचा असल्याने परीक्षा सुरळीत संपन्न होण्यासाठी संबंधितांनी आपआपली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडावी. तसेच उपकेंद्र प्रमुख यांनी आपला मोबाईल परिक्षेच्या दिवशी केवळ नियंत्रण कक्षातच वापरावा. इतर सर्व पर्यवेक्षक व समवेक्षक यांनी आपले मोबाईल नियंत्रण कक्षात पुर्णवेळ ठेवावेत, असे सांगितले.
तहसिलदार श्री. घोळवे यांनी आपला परिक्षेतील अनुभव सांगतांना वारंवार सांगून प्रशिक्षण देऊनही न कळतपणे काही समवेक्षक व पर्यवेक्षक प्रश्नपत्रिका वाटप करतांना चुका करतात. त्या त्यांनी टाळल्या पाहिजे, अशी सुचना केली.
परीक्षेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे आहे, जिल्ह्यात एकूण 34 परीक्षा केंद्र असून विद्यार्थी संख्या 10 हजार 154 इतकी आहे. गुरुवार 10 मे 2018 रोजी होणारी एमएचटी-सीईटी 2018 ही अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषध निर्माण शास्त्र (फार्मसी), फार्मडी व कृषि शास्त्र या अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आहे. केंद्राची विभागणी एमएम, एमबी, बीबी अशी करण्यात आली आहे. जिल्हा केंद्र प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा होणार आहे.
एमएम केंद्रावर पेपर-1 गणित व पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री) असून सकाळी 9.15 पासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 2 वा. परीक्षा संपणार आहे. एम. बी. केंद्रावर पेपर-1 गणित, पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री) आणि पेपर-3 (बायोलॉजी) आहे. सकाळी 9.15 वाजेपासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार असून सायं. 4.30 वा. परीक्षा संपणार आहे. बीबी केंद्रावर पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री ) व पेपर-3 (बायोलॉजी) असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर दुपारी 12 वाजेपासून प्रवेश मिळणार असून सायं. 4.30 वा. परीक्षा संपणार आहे.
सर्व परीक्षा केंद्रावर वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. दोन-तीन परीक्षा केंद्राच्या जवळपास एक वैद्यकीय पथक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तैनात रहणार आहे. उपकेंद्र प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक उपकेंद्रावर "तक्रार निवारण समिती" कार्यरत असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी 144 कलम लागू करण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरुप बहुपर्यायी स्वरुपाचे असल्याने ओएमआर शीट उत्तरपत्रिकेवर केवळ काळ्या शाईचे बॉलपेन विद्यार्थ्यांना वापरता येणार आहे. परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेचे, नियोजनाचे सुक्ष्म निरिक्षण करण्यासाठी राज्य सामायिक कक्षातर्फे निरीक्षक म्हणून केंद्राच्या संस्थेच्या प्रमाणात नेमण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर मोबाईल, घडयाळ नेण्याची परवानगी नाही. तसेच इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक संयंत्र आणण्याची परवानगी नाही. 
प्रा. डी. एम. लोकमनवार यांनी परीक्षेची रुपरेषा व जबाबदारीचे वाटप याबाबत प्रास्ताविकात माहिती दिली. प्रा. डॉ. एस. एस. चौधरी व प्रा. दमकोंडवार यांनी दृकश्राव्य माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रथम प्रशिक्षणासाठी सहाय्यक जिल्हा संपर्क अधिकारी प्रा. यादव, डॉ. डक, प्रा. कळसकर, प्रा. मुधोळकर, प्रा. साहूसाकडे, श्री. दुलेवाड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ज्योती बाराळीकर, दिपक गुरनळे, शासकीय तंत्रनिकेतनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 
परिक्षा आयोजनासाठी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा मंगळवार 8 मे 2018 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठी उपकेंद्र प्रमुख समवेक्षक, पर्यवेक्षक उपस्थित राहणार आहेत. जिल्हा संपर्क अधिकारी यांच्या मदतीला सात सहाय्यक जिल्हा संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत.
000000


डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा मिळण्यास प्रारंभ
डिजिटल स्वाक्षरीचा सातबारामुळे नागरिकांची सोय
जमीन नोंदणीची प्रक्रिया पारदर्शी होणार   
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
           
नांदेड, दि. 2 :- ऑनलाईन स्वरुपातील व डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा वितरणामुळे नागरिकांच्या सोयी बरोबर जमीन नोंदणीची प्रक्रिया पारदर्शी होणार असल्याचे मत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उताऱ्याचे वितरण जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे हस्ते येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे नुकतेच 1 मे रोजी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नागपूर विभागाचे उपायुक्त सुधाकर तेलंग, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, श्रीमती दिपाली मोतीयेळे, व्ही. एल. कोळी, तहसीलदार किरण अंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी सातबारा देण्याच्या कामात नांदेड जिल्‍हा राज्‍यात आघाडीवर असल्याचे नमूद करुन जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत अचूक संगणकीकृत सातबारा व आठ अ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जिल्ह्यात चावडी वाचन पुर्ण करुन आक्षेपानुसार संगणकीकृत सातबारा मुळ हस्‍तलिखीत सातबाराशी तपासून 99.94 टक्के काम पुर्ण झाले आहे. डिजीटल स्‍वाक्षरीयुक्‍त ऑनलाईन सातबारा नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्यात येत आहे. या कामात तलाठ्यांच्‍या समस्या जाणू त्या सोडविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.     
ऑनलाईन स्वरुपातील व डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारासाठी जिल्‍हा नियोजन विभागाच्‍या नाविन्‍यपुर्ण योजनेतून माहिती तंत्रज्ञान म‍हामंडळाकडून मंडळ अधिकारी व तलाठ्यांना 386 लॅपटॉप व प्रिंटर्स वितरी करण्‍यात आले होते. या कामासाठी जिल्ह्यातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा तयार करण्याच्या प्रक्रियेत उत्कृष्ट व अचूक काम करणाऱ्या तलाठी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.  
संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी सातबारा वितरणानंतर काही शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांनी केले तर आभार श्रीमती मिना सोलापूरे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, शेतकरी, कोतवाल आदी उपस्थित होते.
000000


खाजगी बस, ट्रॅव्हल्सकडून अधिक तिकिटदर
आकारल्यास तक्रार नोंदवण्याचे आवाहन
नांदेड दि. 2 :- खाजगी बस, ट्रॅव्हल्स आदी कंत्राटी वाहनांचे महत्तम भाडेदर निश्चित केले आहे. कंत्राटी बस परवानाधारकाकडून विहितदरापेक्षा अधिक दराने आकारणी केल्यास 022- 6242666 या नि:शुल्क क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
तसेच ही तक्रार परिवहन विभागाच्या www.transportcomplaints.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर नोंदविता येईल. तक्रारी संदर्भात चौकशीअंती संबंधीत कंत्राटी बस परवानाधारकांच्या परवान्यावर निलंबनाची / रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. शासन निर्णयाद्वारे खाजगी कंत्राटी वाहन खाजगी बस, ट्रॅव्हल्स आदींना गर्दीच्या हंगामाच्या काळात एसटी बसच्या तुलनेत जास्तीतजास्त दीडपट भाडे आकारता येईल. यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी तक्रार नोंदवावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000000


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरा
शनिवारी सचिन ढवळे यांचे व्याख्यान
            नांदेड दि. 2 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड मनपा, जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने "उज्ज्वल नांदेड" माेहिमेंर्गत शनिवार 5 मे 2018 रोजी सकाळी 9.30 ते सायं 5 वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे गणित व बुद्धिमता या विषयावर पुणे येथील सचिन ढवळे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.   
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिराउपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...