Saturday, December 9, 2023

 दहावी-बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या

विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने अर्ज करण्यास 20 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ  

नांदेड (जिमाका) दि. 9 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने अतिविलंब शुल्काने करण्यास बुधवार 20 डिसेंबर 2023 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी अर्ज स्विकारण्याची मुदत 7 नोव्हेंबर पर्यंत निश्चित करण्यात आली होती. जे विद्यार्थी दिलेल्या या मुदतीत नावनोंदणी करु शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने अतिविलंब शुल्काने सादर करावयाची सुविधा राज्य शिक्षण मंडळाकडून उपलब्ध करुन दिली आहे.    

अतिविलंब शुल्कासह अंतिम मुदतवाढ कालावधी पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे. अतिविलंब शुल्क इयत्ता दहावी व बारावीसाठी प्रती विद्यार्थी प्रती दिन 20 रुपये स्विकारुन नावनोंदणी अर्ज सोमवार 11 डिसेंबर 2023 ते बुधवार 20 डिसेंबर 2023 या कालावधीत भरावयाचा आहे.    

खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in हे आहे.  

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. 

संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्का जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या मध्यामिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहे.   

खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + 100 रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क / अतिविलंब शुल्क. तर इयत्ता बारावीसाठी 600 रुपये नोंदणी शुल्क + 100 रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क / अतिविलंब शुल्क राहिल.  

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी विद्यार्थ्यांची पूर्वीची शाळा किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळची माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करावयाचे आहे. याबाबत सर्व माध्यमिक शाळांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे. या वर्षापासून संपर्क केंद्र पद्धत बंद करण्यात आली असल्याने मान्यताप्राप्त सर्व शाळांमधून खाजगी  विद्यार्थी अर्ज स्विकारणे अनिवार्य आहे. याची सर्व मान्यताप्राप्त शाळांनी नोंद घ्यावी व उचित कार्यवाही करावी. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील विद्यार्थ्यांची शाळा/कनिष्ठ महाविद्यालय किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळच्या शाळेची/कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.   

इयत्ता दहावी व बारावी फेब्रुवारी-मार्च 2024 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने जसे डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:कडे ठेवून त्याच्या दोन छायाप्रती माध्यमिक शाळेस/कनिष्ठ महाविद्यालयास देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.  

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा. 

विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेन जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. खाजगी विद्यार्थी अतिविलंब शुल्काने नाव नोंदणी करण्याकरीता अंतिम मुदत बुधवार 20 डिसेंबर 2023 असणार आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही  यांवी सर्व संबंधितानी नोंद  घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे प्र. सचिव माणिक बांगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा आयोजीत 

विभागस्तरीय युवा महोत्सवात नांदेडचे वर्चस्व 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह व स्टेडियम परिसरात संपन्न झालेल्या विभाग स्तरीय युवा महोत्सवात नांदेडने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व  कृषि विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 व 9 डिसेंबर रोजी हा युवा महोत्सव संपन्न झाला. 

क्रीडा व युवक सेवा लातूर विभागाचे उपसंचालक जगन्नाथ लकडे, राज्य निवडणूक दुत डॉ. सान्वी जेठवाणी, नेहरू युवा केंद्राच्या चंदा रावळकर, कविता जोशी, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, संतोष कनकावार, प्रांजली रावणगावकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. 

विभागीय युवा महोत्सवातील हे आहेत विजेते   

सांस्कृतीक (समुह लोकनृत्य) – प्रथम- अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, धाराशिव, द्वितीय- दयानंद वाणिज्य महा. लातूर, तृतीय- ओझोन फाऊंडेशन, किनवट जि.नांदेड,  (वैयक्तीक सोलो लोकनृत्य)- प्रथम- आदिती केंद्रे (नांदेड),  द्वितीय- अर्पणा पवार, (लोकगीत समूह)- प्रथम- कलाधिराज सांस्कृतिक कला  संघ, लातूर, द्वितीय- शिव बहुउददेशिय सेवाभावी संस्था, हदगाव जि.नांदेड, तृतीय- धनंजय शिंगोडे संस्था, धाराशिव,  (वैयक्तिक सोलो लोकगीत)- शिवकुमार मठपती (नांदेड), द्वितीय- अपेक्षा डाके. 

कौशल्य विकास (कथा लेखन )- प्रथम- रितेश पडोळे,   द्वितीय- आदित्य भांगे,  3) शिवप्रसाद भोळे,  (पोस्टर स्पर्धा)- प्रथम- प्रतिक्षा हळदे,  द्वितीय- सुरेश गवाले,  तृतीय- जगदीश सुतार,  (वकृत्व स्पर्धा इंग्रजी व हिंदी)- अंकिता ढगे,  द्वितीय- अक्षरा मोरे,  तृतिय- समीर शेख (धाराशिव),  (फोटोग्राफी)- प्रथम- रमेश गायकवाड (नांदेड),  द्वितीय- प्रसाद शिंदे. 

संकल्पना आधारीत स्पर्धा 1) तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर- प्रथम – शुभांगी संजय जावळे,  द्वितीय- नेताजी सुभाषचंद्र बोस महा.नांदेड  2) सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान- प्रथम- हनुमंत पांचाळ,  द्वितीय- आकांक्षा दांडगे,  तृतीय– आसावरी संतोष भोसीकर 4) युवा कृती (हस्तकला)- प्रथम- रमेश एकनाथ गायकवाड,  (वस्त्रउद्योग)- प्रथम- रमेश एकनाथ गायकवाड,  (अग्रो प्रोडक्ट)- जितेंद्र सुधाकर रुद्रकंठवार,  द्वितीय- शेख लईख शेख बाबु,  तृतीय- प्रसाद नवनाथ गवाले.  

या विभागीय युवा महोत्सवाकरीता विविध कलाप्रकाराचे परिक्षक म्हणुन डॉ. सान्वी जेठवाणी, प्रा. संदीप काळे, डॉ. पांडुरंग पांचाळ, प्रा. पंकज खेडकर, डॉ. संदेश हटकर, प्रा. शुभम बिरकुरे, प्रा. शिवराज शिंदे, डॉ. सिध्दार्थ नागठाणकर, श्रीमती कविता जोशी, डॉ. सिध्दार्थ नागठाणकर, कविता जोशी, जाहीर उमेर, डॉ. पुरण शेटटीवार, डॉ. बालाजी पेनुरकर, डॉ. मनिष देशपांडे आदींनी काम पाहिले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी संजय गाढवे, राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे,  बंटी सोनसळे, वैभव दमकोंडवार, उत्तम कांबळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ, ज्ञानेश्वर रोठेआदींनी परिश्रम घेतले असल्याचे मा.जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड यांनी कळविले आहे. 

विजेते स्पर्धक क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात लातूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी सांगितले.

0000 




 लोहा तालुक्यात बनावट मद्यसाठ्यासह आरोपीला जागेवरच अटक 

·  आरोपीच्या माहितीवरून बीड जिल्ह्यातील साकुड येथे

छापा टाकून आरोपीसह 3 हजार बनावट मद्याचा साठाही जप्त

·  राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे बनावट विदेशी मद्याविरूद्ध मोहिम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील आष्टूर येथे बनावट मद्यसाठ्यासह आरोपीला जागेवरच अटक केली. आष्टूर येथे आरोपी पंडीत मारोती गोटमुकले याच्या ताब्यातील आष्टूर येथील  पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल 547 बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. यात 180 मिली देशी दारूच्या 144, 90 मिली क्षमतेच्या 96, बनावट मॅकडॉन नं 1 नावाच्या विदेशी मद्याच्या 106, रॉयल स्टॅग नावाच्या 21 अशा एकुण 547 मद्यपेयासह बॉटल्स, जिओ कंपनीचा ॲन्ड्रॉइड मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

राज्य उत्पादन शुल्‍क विभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त श्रीमती उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अतुल कानडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये देगलूर अ विभागाच्या पथकामार्फत ही प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. 

आरोपीने दिलेल्या माहितीवरून बीड जिल्ह्यातही

पथकाने केली मोठी कारवाई

आरोपी पंडीत गोटमुकले याने सदर बनावट विदेशी मद्य हे अंबेजोगाई तालुक्यातील मोजे साकुड येथून हा बनावट माल खरेदी करत असल्याची माहिती दिली. आरोपीच्या माहितीवरून सदर ठिकाणी ही राज्य उत्पादन शुल्क पथकाने आरोपीसह साकुड येथे छापा टाकला. या छाप्यात तब्बल 3 हजार 229 बनावट मद्य पेयासह असलेल्या बॉटलचा साठा आरोपीसह जप्त केला. यात 180 मिलीच्या बनावट मद्याच्या मग्‍डोवेल नंबर 1 च्या 144 बॉटल्या, रॉयल स्टॅग विक्सीच्या बनावट 192 बाटल्या, गोवा येथून विक्रीसाठी आणलेल्या इम्पेरिअल ब्ल्यूच्या 480 सीलबंद बाटल्या, रॉयल चॉलेंजच्या 528 बाटल्या, रॉयल क्लासिकचे 750 एमएलच्या 96 बाटल्या, अड्रील क्लासिकच्या 60 सीलबंद बाटल्या, विदेशी मद्याचे 25 लेबल, विदेशी मद्याचे 1 हजार 499 बनावट बुचे, रॉयल चॉलेंज विस्किच्या 205 रिकाम्या बाटल्या, विवोचा ॲन्ड्रॉइड मोबाईल, एक चार चाकी सुमो वाहन, एक दुचाकी (स्कुटी) असा एकुण 8 लाख 53 हजार 583 इतक्या किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. आरोपी महादेव उर्फ अण्णा धारमोड रा. दौनापूर तालुका परळी याला तेथून अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार सदर बनावट मद्य व मद्य निर्मिती करण्याकरीता लागणारे साहित्य आरोपी जावेद युनूस इनामदार रा. यरमाळा ता. कळंब याने पुरविल्याचे सांगितले. सदर आरोपी जावेद हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. 

जवान विकास नागमवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुय्यम निरीक्षक आर. डी. सोनवणे यांनी महाराष्ट्र दारू बंदी कायद्याच्या कलम 65 (A), (B), (D), (E), (F), 80, 81, 83,90, भारतीय दंड विधानचे कलम 328 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.   

वरील दोन्ही गुन्ह्यात अधिक्षक अतुल कानडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थित निरीक्षक एस. एस. खंडेराय, ए. एम. पठान, आशिष महिंद्रकर, दुय्यम निरीक्षक राजकिरण सोनवणे, अनिल पिकले, एस. टी. कुबडे, बी. बी. इथर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बालाजी पवार, शिवाजी कारनुळे, विकास नागमवाड, जी. डी. रेनके, श्रीनिवास वजिराबादे, मुरलीधर आनकाडे, जवान खतीब फाजील, संतोष संगेवार यांचा सहभाग होता. 

अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्रि क्रमांक 1800 233 9999 व व्हॉटसॲप क्र. 8422001133, दूरध्वनी क्र. 02462-287616 वर संपर्क करावा, असे आवाहन अधिक्षक अतुल कानडे यांनी केले.

0000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...