Saturday, October 7, 2023

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला

औषध व यंत्र सामुग्रीसाठी अतिरिक्त प्रशासकीय मान्यता प्रदान
▪️जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दैनंदिन भेटीत सार्वजनिक बांधकाम, मनपा यांना समन्वयाच्या दिल्या सूचना
▪️खाजगी डॉक्टर्स व परिचारिका अतिरिक्त मदतीला उपलब्ध
नांदेड (जिमाका), दि. 7 :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या दैनंदिन भेटीत सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करून तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा यांचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनासमवेत परस्पर समन्वय साधून दिला असून आपआपली जबाबदारी व कर्तव्य काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने येत्या काळात काही आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर यशस्वी नियोजन करता यावे यादृष्टिने औषध व यंत्रसामुग्रीसाठी अतिरिक्त प्रशासकीय मान्यता देऊन ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर असून खाजगी डॉक्टर्स व परिचारिका अतिरिक्त मदतीसाठी उपलब्ध करून दिल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून दररोज 800 ते 1 हजार या संख्येच्या मर्यादेत रुग्ण उपचार घेत आहेत. अतिगंभीर असलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून गत 3 दिवस दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये जे अति गंभीर आजारी असेलेले रुग्ण आहे त्यांचा मृत्यू दर 0.7 टक्क्याहून कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
00000







दिवाळीसाठी फटाका दुकानाच्या परवान्यासाठी

23 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- दिपावली उत्‍सव दिनांक 9 ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत साजरा होत आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरते फटाका परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महापालिका हद्दीतील तात्पुरते फटाका परवाना जिल्हादंडाधिकारी तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरता फटाका विक्री परवाना देतील. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. इच्छुकांचे विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 9 ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. अर्ज स्विकारण्‍याची अंतीम तारीख 23 ऑक्‍टोबर 2023 आहे. तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात खाली नमुद कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 

 

नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता फटका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत व जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनियम 2008 नुसार दिनांक 9 ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात पुढील कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत.

 

नमुना AE-5 मधील अर्ज, परवाना घेण्‍याच्‍या दुकानाचा नकाशा ज्‍यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक क्षमता, त्‍याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्‍यादी तपशील दर्शविण्‍यात यावा. The Explosive Rules 2008 मधील नियम 84 अन्‍वये सदर दुकानातील एकमेकापासून किमान अंतर 03 मीटर असावे. तसेच संरक्षीत क्षेत्रापासूनचे अंतर 50 मीटर असणे आवश्‍यक आहे. सदर नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा तसेच नकाशा स्‍थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो. लायसन फीस 600 रुपये चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिकरित्‍या दुकाने टाकण्‍यात येत असल्‍यास संबंधीत अर्जदारास देण्‍यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). आयुक्‍त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड / मुख्‍याधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत / ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्‍टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र.

 

जिल्‍हा व्‍यवसायकर अधिकारी,नांदेड या कार्यालयाचे   नाहरकत प्रमाणपत्र. विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग,उद्योग,उर्जा व कामगार विभाग नांदेड यांचे नाहरकत प्रमाणपत्र. जागेच्‍या मालकी हक्‍काचा पुरावा. नोंदणीकृत/मान्‍यताप्राप्‍त असोसिएशन मार्फत तात्‍पूरता फटाका परवानासाठी अर्ज केल्‍यास या कार्यालया मार्फत देण्‍यात येणा-या परवान्‍यातील नमूद ज्‍या अटी व शर्तीनूसार सबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहिल. तसेच कोणत्‍याही विस्‍फोटक नियमांचे व परवान्‍यातील अटी व शर्तीचे उल्‍लंघन होवून कोणताही अनूचित प्रकार घडल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी सबंधित असोसिएशनची असेल या बाबत सबंधित असोसिएशन कडील शपथपत्र. दुकानाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था तपशील जसे अग्निशमन दलसुरक्षा रक्षक इत्यादी. इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार. तसेच शासनस्‍तरावरुन तसेच विस्‍फोटक नियंत्रक व इतर सबंधित विभागाकडून वेळोवेळी फटाका परवाना निर्गमना बाबत प्राप्‍त होणा-या अटी व शर्तीचे अधीन राहून सदर प्रेस नोट देण्‍यात येते.

 

अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनद्वारे फिस शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने दिनांक 30 व  31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍या मार्फत तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या मार्फत निर्गमित केले जातील.

 

दिपावली सण-उत्‍सवाच्या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यंतचाच व्‍यवहार करता येईल याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

0000

 वृत्त

 

नांदेड डाक विभागात

राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :- युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) च्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त डाक विभाग दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करतो. ज्याची सुरुवात जागतिक टपाल दिन 9 ऑक्टोबर पासून होते. यंदाच्या जागतिक टपाल दिनाची संकल्पना टुगेदर फॉर ट्रस्ट आहे. या वर्षाच्या टपाल सप्ताहामध्ये ते 13 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत  नांदेड डाक  विभाग पुढील उपक्रम राबविणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या कालावधी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाला भेट देऊन डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड डाक विभागाचे डाक अधीक्षक आर. व्ही. पाळेकर यांनी केले आहे.

 

जागतिक टपाल दिन

सोमवार ऑक्टोंबर 2023 रोजी जागतिक टपाल दिनानिमित्त नांदेड विभागात सर्व कार्यालयात स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे.

 

वित्तीय सशक्तीकरण दिवस

मंगळवार 10 ऑक्टोंबर 2023 रोजी नांदेड डाक विभागातील सर्व-कार्यालयांमध्ये विविध प्रकारची नवीन खाती उघडण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

फिलाटेली डे

बुधवार 11 ऑक्टोंबर 2023 रोजी लिटल स्टेप इंग्लिश स्कूल नायगाव जिल्हा नांदेड आणि नवोदय विद्यालय शंकरनगर येथे प्रश्न मंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संग्रह (फिलाटेली) हा विषय एक छंद म्हणून जोपासला जावा यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

मेल आणि पार्सल डे

गुरूवार 12 ऑक्टोबर 2023 रोजी मेल्स आणि पार्सल्सच्या वाटपाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे डाक विभागाच्या प्रमुख ग्राहकांसोबत ग्राहक मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला आहे.

 

अंत्योदय दिवस

शुक्रवार 13 ऑक्टोंबर 2023 रोजी समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत डाक विभागाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी जसे की थेट लाभ हस्तांतरण (DBT), सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतनजन सुरक्षा योजना (PMJJY, PMSBY, APY) सुकन्या समृद्धी खाती, AePS, आधार कार्ड काढण्याची विशेष मोहीम आणि इतर योजनांच्या उपलब्धते बद्दल सर्व पोस्ट ऑफिसमध्ये मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. डाक विभागाची उत्पादने आणि सेवाडिजिटल पेमेंट करताना सुरक्षा उपायाचा अवलंब करण्यासाठी आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता मोहीम देखील या ठिकाणी राबवली जाणार आहेअशी माहिती  नांदेड डाक विभागाचे डाक अधीक्षक आर. व्ही. पाळेकर यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000

 वृत्त 


जिल्हाधिकारी कार्यालयात

मंगळवारी पेन्शन अदालत 

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 10 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000 


 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 134 रुग्ण बरे होऊन परतले घरी

▪️47 रुग्णांवर शस्त्रक्रिया
▪️819 रुग्णांवर उपचार
▪️रुग्णालयामध्ये भरती रुग्ण 768
नांदेड, (जिमाका) दि. 6 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 819 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 768 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 4 ऑक्टोंबर ते 5 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण 136 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात 134 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, याचबरोबर या 24 तासात 11 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 3 नवजात बालक (पुरुष जातीचे 1, स्त्री जातीचे 2 ) व बालक 1 (स्त्री जातीचे) व प्रौढ 7 (पुरुष जातीचे 6, स्त्री जातीचे 1) यांचा समावेश आहे.
गत 24 तासात एकूण 47 शस्त्रक्रिया झाल्या. यात 34 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 13 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 23 प्रसुती करण्यात आल्या. यात 9 सीझर होत्या तर 14 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...