Wednesday, February 3, 2021

कोरोना संकटावर मात करत शासनाची वर्षभर घोडदौड

                                                                        - राज्यमंत्री बच्चू कडू

 

          


  महाविकास आघाडीच्या शासनास एक वर्ष झालेले आहे. या एक वर्षाच्या कालावधीत कोरोना सारखे महाभयंकर संकट असतानाही आम्ही विविध विभागांच्या माध्यमातून बरेच लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे. काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात अडचणी असू शकतील पण त्याही लवकरच दूर होतील.

            आम्ही दिव्यांग, निराधार, माता भगिनी, वंचित घटक यांच्या कडे मानवतेच्या दृष्टीने, माणुसकीच्या भावनेने आपल्या घरातील ती एक व्यक्ती आहे असे समजून लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. वंचित घटकांसाठी असलेल्या शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शासनाची आहे.त्यानुसार आमचे नियोजन व प्रयत्न सुरू आहेत. अनाथांना प्रमाणपत्र मिळावे यासाठी देखील आम्ही विशेष सप्ताहाचे आयोजन केले. त्याद्वारे अनाथांना प्रमाणपत्र मिळवून दिले. शासनाच्या विविध योजनांमध्ये आता 1 टक्का आरक्षण अनाथांना मिळणार आहे.

              मी राज्य मंत्री असलेल्या विभागांच्या बाबतीत सांगावयाचे झाल्यास शालेय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण व कामगार हे विभाग माझ्याकडे आहेत.

            जलसंपदा विभागानेया एका वर्षाच्या काळात सिंचन प्रकल्पांद्वारे 172.201 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला. 1 लाख 4 हजार 586 हेक्टर सिंचनक्षमता निर्माण करुन  7बांधकामाधिन सिंचन प्रकल्प पुर्ण केले. पुराच्या पाण्याचे नियोजन, दुष्काळी भागातील शेतीसाठी, जनतेसाठी पाणी, राज्याच्या इतर भागातील प्रकल्पासाठी स्वतंत्र असा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष देखील कार्यान्वित केला आहे.

            शिक्षण क्षेत्रातही महाराष्ट्र निश्चित अग्रेसर आहे. आपणास माहीत आहे की अजूनही कोविड-19 प्रादुर्भावाचे संकट आहे. विविध उपक्रम राबवून त्याद्वारे, शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि त्यांना शिक्षण मिळावे यासाठी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून हे साध्य करण्यात येत आहे.

            शाळा बंद पण शिक्षण आहे. या अभ्यास मालेच्या साहाय्याने "दीक्षा" ॲप आधारित विद्यार्थ्यांना स्वयंम् अध्ययन करण्यासाठी चे उपक्रम आपण राबवित असून,आपल्या राज्याची ही कामगिरी देशातील सर्वोत्तम कामगिरी आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची तजविज करणारे शिक्षणत्यांना मिळेल यासाठी शासन कटिबद्ध आहे.

            महिला व बालकल्याण विभागामार्फत ही आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात प्रामुख्याने "नव तेजस्विनी- महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प" राबवण्याचा निर्णय आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत साहाय्यित 523 रुपये यासाठी खर्च अपेक्षित आहे. यामुळे ग्रामीण महिलांच्या उन्नत उपजीविकेकरिता मूलभूत बदलाचा हा कार्यक्रम दहा लाख कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. पोषण महिना राष्ट्रीय कार्यक्रमात आपल्या राज्याने सर्वाधिक उपक्रम राबवून देशात पहिला क्रमांक मिळवला आहे ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे.

            इतर मागास बहूजन कल्याण विभागामार्फत इमाव,विजाभज आणि विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्थेची म्हणजे महाज्योती ची नागपूर येथे स्थापना तसेच त्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देखील देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार,नामांकित शाळांमध्ये प्रवेश, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरबांधणी योजना असे लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले आहेत.

            कामगार विभागामार्फत बांधकाम कामगार,माथाडी कामगार, सुरक्षारक्षक, इतर कामगार यांच्यासाठीही मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. टाळेबंदीच्या काळात या वर्गाला मोठ्या प्रमाणात दिलासा देण्यात आला.

            अगदी स्पष्ट सांगायचे झाल्यास कोरोनासारखे महासंकट असतानाही महाविकास आघाडी शासनाने गेली वर्षभर या संकटाशी मुकाबला करीत लोकांना विश्वास दिला आहे की,शासन जनतेच्या पूर्णपणे पाठीशी आहे. या पुढील वर्षांमध्येही महाविकास आघाडी शासनाकडून लोकांच्या आशा आकांक्षापूर्तीचे कार्य होणारच आहे. 

                                                                         राज्यमंत्री - बच्चू कडू

शब्दांकन-डॉ. राजू पाटोदकर

विभागीय संपर्क अधिकारी

000

 




 

अध्यापक महाविद्यालयात हुतात्मा दिन संपन्न  

नांदेड (जिमाका) दि. 3 :- येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात 30 जानेवारीला हुतात्मा दिन 2 मिनिटे मौन स्तब्धता पाळून साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे या होत्या. सुत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. उमेश मुरुमकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

0000

 

न्याय आपल्या दारी संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात

फिरते लोकअदालत, कायदेविषयक शिबीराचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 3 :- ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबीरासाठी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथून आलेल्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन सोमवार 8 फेब्रुवारीला प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. आर. जगताप यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे सकाळी 10.30 वा.करण्यात येणार आहे.  

समाजातील अगदी तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून मा. सर्वोच्च न्यायालय, नवीदिल्ली यांच्या ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबीराचे आयोजन राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हयातीत काही तालुक्यांच्या निवड गावात 8 ते 23 फेब्रुवारी 2021 या कालावधीत करण्यात आले आहे. 

न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच बॅंकांचे, विमाकंपनी, विद्युत महामंडळ, बीएसएनएल, व इतर दिवाणी दाखलपुर्व प्रकरणे या  लोकअदालतीत नियोजीत गावात फिरुन तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यात कायदेविषयक शिबीराद्वारे जनजागृती केली जाणार आहे. लोकअदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सौ. कमल वडगावकर यांची नियुक्ती केली आहे. हे फिरते लोकअदालत यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करुन या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे.

000000

 

ई-छायाचित्र मतदान ओळखपत्राची सुविधा  

नांदेड (जिमाका) दि. 3 :- मतदारांना सहज आणि सोप्‍या पद्धतीने ई-छायाचित्र मतदार ओळखपत्र (e-EPIC) डाऊनलोड करुन घेण्‍यासाठी https://nvsp.in, https://voterportal.eci.gov.in/ या वेबपोर्टलद्वारे तसेच Voter Helpline Mobile App (Android & iOS) या अॅपद्वारे सुविधा उपलब्‍ध करुन दिली आहे. नव मतदारांनी यासंधीचा लाभ घेऊन जास्‍तीत जास्‍त e-EPIC डाऊनलोड करुन घ्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.     

मा. भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2021 या राष्‍ट्रीय मतदार दिनाच्‍या दिवशी e-EPIC या सुविधेची सुरुवात केली आहे. याकार्यक्रमात 3 लाखांपेक्षा अधिक नवीन मतदारांनी नोंदणी करुन त्‍यांचे e-EPIC डाऊनलोड करुन घेतले आहे. मतदारांची मोठया प्रमाणातील मागणी लक्षात घेता आणि या e-EPIC च्‍या प्रणालीवरील सातत्‍याने येत असलेला भार पाहता नविन नोंदणी झालेल्‍या मतदारांना यासाठी प्राधान्‍य देण्‍याचे आयोगाने ठरविले आहे. त्‍याअनुषंगाने मतदार यादीच्‍या विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम-2021 दरम्‍यान ज्‍या नविन मतदारांनी नोंदणी केली त्‍या मतदारांना फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत e-EPIC डाऊनलोड करता येऊ शकेल. मतदार यादीच्‍या विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम-2021 पूर्वी नोंदणी झालेल्‍या आणि योग्‍य  दूरध्‍वनी क्रमांक नमूद केलेल्‍या इतर सर्वसाधारण मतदारांना e-EPIC डाऊनलोड करण्‍याचा दिनांक स्‍वतंत्रपणे जाहीर करण्‍यात येणार आहे.

00000

16 कोरोना बाधितांची भर

30 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- बुधवार 3 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 16 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 4 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 30 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 759 अहवालापैकी 736 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 593 एवढी झाली असून यातील 21 हजार 505 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 298 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 586 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 17, गोकुंदा कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 3, बिलोली तालुक्यांतर्गत 3, खाजगी रुग्णालय 4 असे एकूण 30 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.18 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, उमरी तालुक्यात 1, अर्धापूर 1 असे एकुण 12 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 1, माहूर तालुक्यात 2, उदगीर 1  असे एकूण 4 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 298 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 14, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 13, मुखेड कोविड रुग्णालय 3, हदगाव कोविड रुग्णालय 3, महसूल कोविड केअर सेंटर 9, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 179, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 40, हैदराबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 12 आहेत.   

बुधवार 3 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 163, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 85 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 13 हजार 001

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 86 हजार 65

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 593

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 505

एकुण मृत्यू संख्या-586

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.18 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-04 

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-03

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-410

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-298

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-10.          

0000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...