वृत्त क्र. 571
मियावाकी वृक्षलागवडीच्या प्रसारासाठी
सर्व विभाग प्रमुखांनी पुढाकार घ्यावा
-
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड (जिमाका) दि. 24 :- राष्ट्रीय वनधोरणानुसार एकुण भौगोलिक
क्षेत्राच्या 33 टक्के वनाच्छादन असणे आवश्यक आहे. यादृष्टिने महाराष्ट्र
शासनातर्फे पूर्वी पासून प्रयत्न केले जात आहेत. आजही शासकीय कार्यालयाच्या
परिसरात मोठ्या प्रमाणात रिकाम्या जागा उपलब्ध आहेत. या जागेवर प्राथमिकस्तरावर
मियावाकी पद्धतीने घनवन लागवड करण्यासाठी शासनाच्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी
पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
नांदेड वनविभागमार्फत वसंतराव नाईक हरित
महाराष्ट्र अभियान अंतर्गत अटल आनंदवन घनवन (मियावाकी) कार्यशाळा आज डॉ. शंकरराव
चव्हाण जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस पोलीस
अधीक्षक विजयकुमार मगर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. अभिनव गोयल, औरंगाबाद विभागाचे मुख्य वनसंरक्षक
प्रकाश महाजन, उपवन संरक्षक अशिष ठाकरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने उपस्थित होते.
शासन व ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये
स्मशानभुमी, शाळा, पेयजल योजनेच्या टाक्या आदी परिसरात मियावाकी पद्धतीने
वृक्षलागवड केल्यास या परिसराच्या सुशोभीकरणासह पर्यावरणालाही हातभार आपल्याला
लावता येईल. याच्या प्रचार व प्रसारासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी तालुका
पातळीवर बैठका घेऊन त्या-त्या ठिकाणच्या सेवाभावी संस्थांचा यात सहभाग करुन
घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
झाड हे मानसांकडून काहीही मागत नाही. उलट
प्रत्येकाला ते अनेक चांगल्या गोष्टी देत राहते. यात फुले, सुगंध, फळे, पाला, लाकूड
सारेकाही झाड माणसाला देते, असे प्रकाश महाजन यांनी सांगून अटल आनंदवन घनवन
वृक्षलागवडीचे तंत्रज्ञान समजून सांगितले. मियावाकी लागवडीबाबत जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटनकर यांनी त्यांच्या लातूर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
म्हणून राबविलेल्या मियावाकी वृक्षलागवडीचे सचित्र सादरीकरण करुन माहिती दिली.
00000