Tuesday, May 9, 2017

"समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण"बाबत
नांदेड तहसिलमध्ये कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 9 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील सर्व यंत्रणांची "समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजने"च्‍या अनुषंगाने कार्यशाळा नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय नांदेड येथे आज संपन्न झाली.    
नांदेड तालकास्‍तरीय तहसिलदार, गटविकास अधिकारी, नायब तहसिलदार, ग्रामसंपर्क अधिकारी, तालक्‍यातील सरपंच, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, अव्‍वल कारकुन, एपीओ, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, ऑपरेटर यांची यावेळी उपस्थिती होती.  

            कार्यशाळे शासनाच्‍या समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेच्‍या 11 कलमी कार्यक्रमाबाबत चर्चा करण्‍यात आली. यापर्वीच्‍या तसेच विभागीय आयुक्‍त यांच्‍या कार्यशाळेच्या अनुषंगाने कामांचा आढावा घेण्यात आला. यात ग्रामस्‍तरावर कशाप्रकारे कामे सुरु करण्‍यात येतील, जास्‍तीतजास्‍त कामे कसे घेण्‍यात येतील याबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. ग्रामस्‍तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्‍या व सरपंचांच्‍या अडचणी जाणून घेण्‍यात आल्‍या व त्‍यावर संबंधीत विभागाच्‍या अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी कुलकर्णी, तालका संपर्क अधिकारी श्री. कोंडेकर, तहसिलदार किरण अंबेकर गटविकास अधिकारी श्री. घोलप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर सरपंच जिल्‍हा संघटनेचे अध्यक्ष दासराव हंबर्डे यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. 
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा दौरा
नांदेड दि. 9 :- राज्याचे परिवहन, खारभुमी विकास मंत्री दिवाकर रावते हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार 9 मे 2017 रोजी औरंगाबाद विमानतळ येथून शासकीय मोटारीने रात्री 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.
बुधवार 10 मे 2017 रोजी सकाळी 8 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून शासकीय मोटारीने मुखेडकडे प्रयाण करतील. सकाळी 9.30 वा. मुखेड येथे आगमन व आमदार सुभाष साबणे यांच्या निवासस्थानी भेट. सकाळी 9.45 वा. मुखेड येथून शासकीय मोटारीने कंधार मार्गे चिखलीकडे प्रयाण करतील. सकाळी 10.45 वा. चिखली येथे आगमन व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी भेट. सकाळी 11 वा. चिखली येथून शासकीय मोटारीने भोकरकडे प्रयाण करतील. दुपारी 12 वा. भोकर येथे आगमन व धनराज पवार यांचे चि. अमोल आणि चि सौ. कां. नेहा यांच्या शुभविवाहनिमित्त भेट. दुपारी 12.15 वा. भोकर येथून शासकीय मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण करतील.  

OOO
"जीएसटी" करप्रणालीमध्ये भारतीय व्यवस्थेतील
विविध घटकांचा साकल्याने विचार - तीरथ
जीएसटीबाबत जागरुकता, चर्चासत्र संपन्न 

नांदेड दि. 9 :- प्रस्तावित वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) प्रणालीमध्ये विविध घटकांचा साकल्याने विचार करण्यात आला आहे. त्यामुळे या करप्रणालीमुळे देशातील प्रत्येक क्षेत्राला फायदाच होईल, असे प्रतिपादन "जीएसटी" कर प्रणालीशी निगडीत केंद्रीय समितीचे सदस्य राम तीरथ यांनी आज येथे केले.  
वस्तू आणि सेवाकर विधेयकाविषयी (GST- गुडस ॲण्ड सर्व्हीस टॅक्स) जनजागृती व्हावी यासाठी केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क विभागाच्या, नांदेड क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने आज येथे जागरुकता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये श्री. तीरथ प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे  चर्चासत्र संपन्न झाले. चर्चासत्रास उद्योजक, व्यापारी, व्यावसायीक, कर सल्लागार अशा विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क विभाग औरंगाबादचे आयुक्त सी. एल. महर, अतिरिक्त आयुक्त दिनेश पांगारकर, सहआयुक्त अशोक कुमार, सहआयुक्त (व्हॅट) एम. एम. कोकणे, नांदेड परिक्षेत्राचे सहायक आयुक्त धीरकुमार कांबळे, सहाय्यक आयुक्त विक्रम फडके आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. तीरथ पुढे म्हणाले की, जगातील 160 देशात जीएसटी करप्रणाली अस्तित्वात आहे. येत्या 1 जुलै पासून ही करप्रणाली लागू होणार आहे. या करप्रणालीबाबत केंद्र आणि राज्यस्तरावर संवैधानीक पद्धतीने कार्यवाही सुरु आहे. भारतातील समाज व्यवस्था, उद्योग प्रणाली त्यातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी समजावून घेत या करप्रणालीच संरचना करण्यात आली आहे. यापुर्वीचा केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा हा स्त्रोत अधारीत होता. पण नवी करप्रणाली ही व्यवहाराच्या अंतीम स्थानाशी निगडीत आहे. परवाना राज समाप्तीच्यादृष्टिने ही करप्रणाली महत्वाची आहे. या करप्रणालीमुळे एक देश- एक कर- एक बाजारपेठ हे तत्व अंमलात येईल. देशात कुठेही उत्पादन करा व कुठेही विका अशी स्थिती येईल. व्यापारी व्यवसायिकांना विविध राज्यातील करांबाबत माहिती घेण्याची चिंता करण्याची आवश्यकता उरणार नाही. यामुळे ग्राहक ते उत्पादकांपर्यंतच्या सर्वच घटकांसाठी ही करप्रणाली सुखकर ठरेल, असेही ते म्हणाले.
ते म्हणाल की, जीएसटी करप्रणाली लागू करतांना विविध घटक निहाय कार्यगट तयार करण्यात आले होते. या कार्यगटांनी छोटे व्यापारी, उपहार गृह , टेलिफोन अशा विविध घटकांचा अभ्यास केला आहे. ज्यामुळे या घटकांना केवळ आपल्याशी निगडीत कर प्रणालीची माहिती ठेवणे आणि त्यानुसार कर भरणे सोपे जाईल अशी पद्धती अवलंबिण्यात येणार आहे. ही सर्व प्रणाली संगणकीकृत आणि ऑनलाईन पद्धतीने असल्याने यामध्ये कुठल्याही अन्य गोष्टींचा हस्तक्षेप होणार नाही. ही प्रणाली समजून घेत, त्याबाबत संवाद, समन्वय साधत स्विकारुन पुढे गेल्यास देशाच्यादृष्टीने ही बाब मोठी क्रांतीकारक ठरेल. जीएसटीमुळे कर चुकविण्यापेक्षा तो प्रामाणिकपणे भरणे किफायतशीर राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. आयुक्त श्री. महर यांनी जीएसटी करप्रणाली पारदर्शक आणि सुलभ असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. अधीक्षक डी. आर. गुप्ता यांनी जीएसटी कर प्रणालीविषयी सविस्तरपणे संगणकीय सादरीकरण केले. चर्चासत्रास उपस्थीत विविध घटकांच्या प्रतिनिधींनी या अधिकाऱ्यांशी संवाद साधला, प्रश्नोत्तरेही झाली, अनेकांच्या शंकांचेही समाधान करण्यात आले. या कर प्रणालीविषयी विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून तसेच हेल्पडेस्क आदींद्वारे माहिती उपलब्ध असल्याचेही  कार्यक्रमात  सांगण्यात आले. सहाय्यक आयुक्त फडके यांनी सुत्रसंचलन केले.

0000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...