Monday, September 15, 2025

वृत्त क्रमांक 964 

तात्पुरता फटाका परवानासाठी

3 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत 

नांदेड, दि. 16 सप्टेंबर :-  यावर्षीचा दिपावली उत्सव 17 ते 23 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत साजरा होत आहे. त्यानिमित्त नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता फटाका परवाना जिल्हादंडाधिकारी हे निर्गमित करणार आहेत व जिल्हयातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरता फटाका परवाना निर्गमित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत व जिल्हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनिमय 2008 नुसार 16 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 3 आक्टोंबर 2025 आहे. 

नांदेड शहराकरिता नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरते फटाका दुकानासाठी गुरुद्वारा बोर्ड मैदान हिंगोली गेट नांदेड, इंदिरा गांधी मैदान स्टेडीयम नांदेड, विविध कार्यालयासाठी संपादित सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडील जमीन गट क्र. 111 ते 118 मामा चौकाजवळ असर्जन नांदेड अथवा इतर जे उपलब्ध असेल अशा ठिकाणी तात्पुरते फटाका दुकानाकरीता स्थळ अर्जदारास निश्चित करता येईल. 

तात्पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्यातील अर्ज पुढे नमुद कागदपत्रांसह आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावा.  नमुना AE-५ मधील अर्ज. परवाना घेण्याच्या दुकानाचा नकाशा ज्यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक क्षमता,त्याचा मार्ग, परिसरातील सुविधा इत्यादी तपशील दर्शविण्यात यावा. The Explosive Rules २००८ मधील नियम 84 अन्वये सदर दुकानातील एकमेकांपासून किमान अंतर 3 मीटर असावे तसेच संरक्षीत क्षेत्रापासूनचे अंतर 50 मीटर असणे आवश्यक आहे. नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा तसेच सदर नकाशा स्थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो. लायसन्स शुल्क 600 रुपये चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिकरित्या दुकाने टाकण्यात येत असल्यास संबंधीत अर्जदारास देण्यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र. आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड, मुख्याधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र. संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व ना हरकत प्रमाणपत्र. जिल्हा व्यवसायकर अधिकारी नांदेड या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळ नांदेड या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र. विद्युत निरीक्षक विद्युत निरीक्षण विभाग उद्योग उर्जा व कामगार विभाग नांदेड यांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

जागेच्या मालकी हक्काचा पुरावा. नोंदणीकृत, मान्यताप्राप्त असोसिएशनमार्फत तात्पुरता फटाका परवानासाठी अर्ज केल्यास या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या परवान्यातील नमूद अटी व शर्तीनुसार संबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहील. कोणत्याही विस्फोटक नियमांचे व परवान्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन होवून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सबंधित असोसिएशनची असेल याबाबत संबंधित असोसिएशनकडील शपथपत्र. दुकानाच्या ठिकाणी करण्यात आलेली व्यवस्था तपशील अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक इत्यादी. इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार. संबंधित तहसिलदार यांचे ना हरकत प्रमाणपत्र. शासनस्तरावरुन तसेच विस्फोटक नियंत्रक व इतर सबंधित विभागाकडून वेळोवेळी फटाका परवाना निर्गमनाबाबत प्राप्त होणाऱ्या अटी व शर्तीचे अधीन राहून सदर प्रेस नोट देण्यात येते. 

अर्जदाराने विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रांची पुर्तता केली असल्याची खात्री झाल्यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्यात येईल. चलनद्वारे फिस शासन खाती जमा झाल्यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, संबंधित परिपूर्ण अर्जाच्या अनुषंगाने 13 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्हादंडाधिकारी नांदेड यांच्यामार्फत तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्या हद्दीतील परवाने सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत निर्गमित केले जातील. 

दिपावली सण-उत्सव कालावधीत The Explosive Rules २००८ मधील नियम 84 (6) अन्वये एकाच ठिकाणी 30 पेक्षा जास्त दुकानास अनुज्ञप्ती दिली जाणार नाही. विहित केलेल्या साठा व विक्री परिमाणा पर्यंतचाच व्यवहार करता येईल. याबाबत The Explosive Rules २००८ मधील नियमानुसार व SET-X ते SET-XV मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्ध ठेवावी लागेल. The Explosive Rules २००८ अन्वये अनाधिकृतपणे विस्फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 963

दहावी परीक्षेचे अर्ज सादर करण्याच्या तारखा निश्चित 

नांदेडदि. 15 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी फेब्रु-मार्च 2026 परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत. अर्ज भरण्यासाठी मुदत सोमवार 15 सप्टेंबर ते 6 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे.

 

पुनर्परिक्षार्थीनावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थीश्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी)चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

शुल्क प्रकार

माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच पुनर्परिक्षार्थीनाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी तसेच आयटीआय (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची मुदत सोमवार 15 सप्टेंबर ते 6 ऑक्टोंबर 2025 पर्यंत आहे.

 

माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरणा करणे व RTGS/NEFT पावती/ चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व ब्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे. याची सर्व माध्यमिक शाळा प्रमुख यांनी नोंद घ्यावी.


सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी School Profile मध्ये शाळासंस्थामान्यताप्राप्त विषयशिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिनमधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेलमाध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. या प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

 

इ. दहावी परीक्षेची आवेदनपत्रे हे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

 

माध्यमिक शाळांना नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. UDISE + मध्ये विद्यार्थ्यांची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्रे सादर करता येईल.

 

पुनपरिक्षार्थीनावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थीश्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थी यांची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळाने केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 962 

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा  

नांदेड दि. 15 सप्टेंबर :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.                 

मंगळवार 16 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई येथून विमानाने सायं 5 वा. नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ येथे आगमन. सायंकाळी 6 वा. श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथून शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण. 

गुरूवार 18  सप्टेंबर रोजी हिंगोली येथून दुपारी 2 वा. श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड प्रयाण. दुपारी 4 वा. श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरकडे प्रयाण करतील.

0000

वृत्त क्रमांक 961

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन 

नांदेड, दि. 15 सप्टेंबर :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी  राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल. यानंतर  सकाळी  9 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होईल. या समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.   

समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये.  या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालये, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना व आदेश दिले आहेत. 

00000

वृत्त क्रमांक 960

राष्ट्रीय लोकअदालतीत नांदेड जिल्ह्यात विक्रमी प्रकरणे निकाली

नांदेड दि. 15 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व सत्र न्यायालय नांदेडच्या प्रांगणात शनिवार 13 सप्टेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हयामध्ये एकुण 5 हजार 54 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून 20 कोटी 24 लाख 16 हजार 512 इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणात तडजोड झाली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक हे होते. तसेच डॉ. एस.डी. तावशीकर, जिल्हा न्यायाधीश-2, शरद  देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, अध्यक्ष अभिवक्ता संघ नांदेड व रणजीत देशमुख जिल्हा सरकारी वकील नांदेड, नांदेड येथील सर्व न्यायाधीश उपस्थित होते. 

अध्यक्षीय भाषणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित पक्षकारांना लोकअदालतीचे महत्व प्रभावीपणे सांगितले. चित्रपटातील संवादाचा आधार घेतला ‘‘माझ्याकडे गाडी आहे, पैसा आहे, चांगला वकील, पुरावे देखील आहेत तुझ्याकडे काय आहे? यावर समोरच्या पक्षकाराने असे म्हणाले पाहिजे ‘‘माझ्याकडे लोकन्यायालय आहे’’.  त्यामुळे लोकअदालत ही एक संधी असून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित पक्षकारांना केले.

प्रास्ताविकात आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावीत. कधी-कधी तडजोड करुन शांती मिळवणे गरजेचे असते. लोकन्यायालय ही त्यासाठी संधी असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शरद देशपांडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांनी केले.  

नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयात व कौटुंबिक न्यायालय नांदेड येथे शनिवार 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरीत झालेली प्रकरणे, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, लोहमार्ग गुन्हा कबुली प्रकरणे, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय येथील प्रलंबीत प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगर पालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकांचे तसेच विद्युत प्रकरणे, दूरसंचार विभागाचे टेलिफोन, ट्रॅफिक चालन इत्यादींचे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विषेश मोहिमेअतंर्गत 1184 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

या लोकअदालतीमध्ये जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्याकरिता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांच्या मार्गदर्षनाखाली शरद देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विषेश प्रयत्न केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये परिश्रम घेतलेल्या सर्व न्यायालयीन कर्मचारीवृंदांचे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करुन यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

0000




 वृत्त क्रमांक 959

१५ व १६ सप्टेंबर या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट 

नांदेड,दि.१५ सप्टेंबर:-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक १५ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १५ व १६ सप्टेंबर २०२५ या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. 

दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी.

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

०००००

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...