Monday, August 31, 2020

 

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या

प्रकृती स्वास्थ्यासाठी आमची प्रार्थना

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अध्यातमाबरोबर सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ अनुभवत समाजाला विवेक देण्याचे खऱ्या अर्थानी त्यांनी कार्य केले आहे. त्यांची प्रकृती ही अत्यंत काळजी करण्याची असून या वयात ते कोरोनाशी लढा देत आहेत. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आम्ही ईश्वराजवळ प्रार्थना करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी आज हॉस्पिटलला भेट देऊन डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार श्यामसुंदर शिंदे, लिंगायत समाजाचे प्रमुख पदाधिकारी, प्रा. मनोहर धोंडे, किशोर स्वामी, संतोष पांडागळे, बालाजी बंडे, बालाजी पांडागळे आदी उपस्थित होते.    

विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी लाखो भक्तांवर प्रेम केले आहे. चव्हाण कुटुंबियांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांचे स्नेह आम्हाला लाभल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

00000



    

 

189 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

290 बाधितांची भर तर दहा जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- सोमवार 31  ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 189 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 290 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 83 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 207 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 328 अहवालापैकी  959 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 6 हजार 715 एवढी झाली असून यातील 4 हजार 558 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाण 71 टक्के एवढे झाले आहे. एकुण 1 हजार 881 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 206 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

रविवार 30 ऑगस्ट रोजी वसंतनगर तांडा उमरी येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा उमरी कोविड केअर  सेंटर येथे, मुखेड तालुक्यातील वसूर येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, हदगाव नांदेड येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, मुखेड येथील 45 वर्षाच्या एका महिलेचा, मगनपुरा नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर सोमवार 31 ऑगस्ट रोजी भोकर तालुक्यातील भोसी येथील 66 वर्षाच्या एका पुरुषाचा, हदगाव तालुक्यातील तामसा येथील 56 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, गोकुळनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा, परवानानगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा, सावरगाव देगलूर येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 3, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, हदगाव कोविड केअर सेंटर 6, देगलूर जेनब कोविड केअर सेंटर 2, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 9, कंधार कोविड केअर सेंटर 3, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड 109, किनवट कोविड केअर सेंटर 5, धर्माबाद कोविड केअर सेंटर 1, मुखेड कोविड केअर सेंटर 31, खाजगी रुग्णालय 6, माहूर कोविड केअर सेंटर 3 असे एकूण 189 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.    

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 39,  देगलूर तालुक्यात 2, माहूर 1, लोहा 6, नायगाव 12, कंधार 2, लातूर (अहमदपूर) 1, नांदेड ग्रामीण 12, अर्धापूर 1, हदगाव 1, किनवट 1, मुखेड 5, यवतमाळ 2 असे एकुण 836 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपाक्षेत्र 155, अर्धापूर तालुक्यात 1, माहूर 1, मुखेड 1, किनवट 8, नायगाव 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 16, मुदखेड 14, हदगाव 1, लोहा 3, कंधार 1, हिंगोली 2 असे एकुण 207 बाधित आढळले. 

 जिल्ह्यात 1 हजार 881 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 196, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे 639, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 60, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 35, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 72, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 140,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 43, लोहा कोविड केअर सेंटर येथे 68, हदगाव कोविड केअर सेंटर 40, भोकर कोविड केअर सेंटर 8,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 20,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 76, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 17, मुदखेड कोविड केअर सेटर 26,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 14, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 28, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 52, उमरी कोविड केअर सेंटर 45, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 276 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 17, निजामाबाद 2, मुंबई 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 51 हजार 988,

घेतलेले स्वॅब- 47 हजार 291,

निगेटिव्ह स्वॅब- 38 हजार 609,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 290,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 6 हजार 715,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-48,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 05,

एकूण मृत्यू संख्या- 229,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 4 हजार 558,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 881,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 347, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 206.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.  

 

00000

देगलूर शासकिय तंत्र प्रशाला केंद्रात प्रवेश सुरु

 नांदेड (जिमाका) दि. 31 :- शासकीय तंत्र प्रशाला केंद्र देगलूर या संस्थेत शैक्षणिक सत्र 2020-21 साठी एचएससी व्होकेशनल इयत्ता 11 वी करिता आयटीआय समकक्ष व्यवसाय अभ्यासक्रमांना प्रवेश देणे चालू आहे. ॲटोमोबाईल, इलेक्ट्रीकल व कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमता प्रत्येकी 30 असून कालावधी दोन वर्षांचा आहे. इच्छूक दहावी व पुरवणी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी  अधिक माहितीसाठी शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय केंद्र, रामपूर रोड देगलूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.

000000


 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ;

पूर परिस्थितीत नागरिकांनी काळजी घ्यावी  

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर   

 नांदेड (जिमाका) दि. 31 :- राज्यासह नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्प, बंधारे, नद्या, ओढे, पाझर तलाव, साठवण तलाव इ. काही पूर्ण क्षमतेने भरले तर काही भरण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी, नाले, ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पूर परिस्थिती उद्भवू शकते अशा गावांसाठी उपाययोजना करुन खबरदारी घ्यावी.  पावसाळ्यातील उद्भवणाऱ्या पूर आपत्तीपासून नागरीकांनी स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

पूर परिस्थितीत काय करावे

गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास अथवा पूराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्त्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात अचानक पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. गावात व घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या. पूरस्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जातेवेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी ठेवावीत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा. कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र न भिजता राहील याची काळजी घ्या. पूरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रमचा वापर करावा), एखादी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरून जाऊ नका, शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा.

मदत आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष क्र. 0262-235077 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना बांधले असेल तर त्यांना खुले करून सुरक्षित स्थळी हलवावे व स्वतः सुरक्षित स्थळाचा आसरा घ्यावा. सोबत रेडीओ, बॅटरी, मोबाईल इत्यादी संपर्काची साधने ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे साहित्य भिजणार नाही व सुरक्षित राहील याची योग्य खबरदारी घ्यावी.

पूर परिस्थितीत काय करु नये

पूर असलेल्या भागात, नदीच्या पूलावर विनाकारण भटकू नका. पूराच्या पाण्यात चुकूनही जावू नका. तसेच पूर ओसरल्यानंतर प्रशासनानाने परवानगी दिल्याशिवाय पूलावरुन गाडी घालण्याचा अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका. दूषित, उघड्यावरील अन्न व पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत तारांना स्पर्श करू नका. पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतू अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका. जलसाठ्याजवळ, नदीजवळ जाऊ नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर / नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. मच्छिमार व अन्य व्यक्तींनी पाण्यामध्ये जाऊ नये, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

00000

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री

संजय बनसोडे यांचा दौरा

नांदेड (जिमाका) दि. 31 :- राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) रोजगार हमी, भूकंप व पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 

सोमवार 31 ऑगस्ट 2020 रोजी उदगीर येथून मोटारीने शिरुर ताजबंद-मुखेड-नायगाव मार्गे नांदेड येथे रात्री 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. मंगळवार 1 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10.50 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000


 

जनतेच्या जागरुक भक्ती भावाला सलाम !

संकलन केंद्रावर गणेश मुर्ती सुपूर्द करण्याचे

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- गेली सहा महिने कोरोनाच्या अदृश्य प्रादुर्भावाशी लढत जनतेने आयुष्यभर जपलेल्या गणेशोत्सव, मोहरम-ताजिया, बुद्धपौर्णिमा, बकरी ईद सारखे सण उत्सव अतिशय संयमाने भक्ती भावाला जपत पार पाडले आहेत. जो विवेक जिल्ह्यातील जनतेने दाखविला आहे त्याच विवेकाच्या बळावर काळजी घेत दहा दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप देवू यात. सद्य परिस्थिती आव्हानात्मक असून कोविड-19 ची लस उपलब्ध होईपर्यंत सर्वजण अधिक कर्तव्य दक्षता बाळगतील असा विश्वास पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

 अनंत चतुर्थी निमित्त घरोघरी बसलेल्या गणपत्ती बाप्पाला निरोप देतांना जिल्हा प्रशासनाला योग्य ती खबदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महानगरपालिकेच्या अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी लोकांना सुरक्षितरित्या आपल्या लाडक्या बाप्पाचे भक्तीभावपूर्ण विसर्जन करता यावे यासाठी स्वतंत्र केंद्राचीही निर्मिती केली आहे. या संकलन केंद्रावर जनतेने गणेश मुर्ती सुपूर्द कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले. 

आपल्या सर्वांच्या संयमी वागण्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करता येईल. ज्या पद्धतीने गेली सहा महिने जिल्ह्यातील जनता शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करत आहेत त्याला तोड नसल्याचेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. यावर्षी सर्वदूर सर्वत्र चांगला पाऊस असल्यामुळे गोदावरी नदीही दुथडी भरुन वाहते आहे. तेथील पाण्याला प्रवाह आलेला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करुन जे नियोजन केले आहे त्याला सर्व जनता भक्ती भावाने साथ देईल याची खात्री असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...