Thursday, August 17, 2023

 सांस्कृतिक महोत्सवात लोकशाही मूल्यांसाठी विविध उपक्रम हीच भविष्याची आश्वासकता

- अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
▪️किन्नरांवरील “मिशन गौरी” डॉक्युमेंट्रीने दिल्या नव्या संवेदना
नांदेड (जिमाका) दि. 17 :- लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी, साक्षरतेसाठी लोककला, लोकसाहित्य, विविध सांस्कृतिक महोत्सव यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. अलिकडच्या काळात साहित्य संमेलनापासून ते विविध जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित होत असलेल्या सांस्कृतिक कला महोत्सवात लोकशाही, मतदान जागृती या महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन केले जात आहे. अशा उपक्रमातूनच वरचेवर लोकशाही अधिक प्रगल्भ व भक्कम होत जाईल, असा विश्वास अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला.
नांदेड येथे तीन दिवसीय सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, परलिंगी समाजाच्या सलमा खान, गौरी सावंत, दिशा पिंकी शेख, शमीबा पाटील, राणी ढवळे, गुरू अहमद बकस आदी किन्नर पदाधिकारी उपस्थित होते.
या सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाच्या सांगता समारोपासाठी संयोजक डॉ. सान्वी जेठवाणी यांनी अतिशय कल्पकतेने मतदार जागृती व तृतीयपंथी मतदार जनजागृतीच्या उद्देशाने भर देऊन या महोत्सवाला जबाबदारीचे भान दिल्याचे गौरोद्गार मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी काढले. आपल्या न्याय हक्कासाठी संघर्षाची पार्श्वभूमी आपल्याला त्या हक्काची व कर्तव्याची जाणिव करून देते. तुम्ही सर्व किन्नर आपल्या अधिकारासाठी कायद्याच्या दृष्टिनेही सतर्क आहात याचे मला कौतूक वाटते. तृतीयपंथीयात एक विधायक रचनात्मकता दडलेली आहे. तुमच्या अस्तित्वाचा स्विकार हा लोकशाहीचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
किन्नरांना विविध शासकीय योजनांचे लाभ विनासायास व तात्काळ मिळाले पाहिजे. एक नागरिक म्हणून प्रत्येकाला मतदानाचा जो अधिकार मिळालेला आहे तो किन्नरांना बजावता यावा यासाठी आम्ही युद्धपातळीवर मतदान ओळखपत्र किन्नरांपर्यंत पोहचवित आहोत. अनेक किन्नरांजवळ ओळखपत्र / आधार नसल्याने त्यांची गैरसोय होते. शासनाने ही बाब अतिशय गांभीर्याने घेऊन त्यांना ज्या सुविधा देता येतात त्या सर्व लाभ सामाजिक न्याय विभागाकडून पोहोचविले जात आहेत. यापुढे त्यांच्या हक्काचे मतदान कार्ड प्रत्येक किन्नरांना मिळावेत यादृष्टीने स्वयंघोषणा पत्राच्या आधारावर मतदानाचा अधिकार पोहोचविण्याचा प्रयत्न करून असे सुतोवाचही राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शन केले. तर पुरस्काराने सन्मानित किन्नरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी परलिंगी समाजाच्या किन्नरांना अस्मिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात किन्नरमा ट्रस्टच्या अध्यक्षा सलमा खान, श्रीगौरी सावंत, दिशा पिंकी शेख, शमीभा पाटील, राणी ढवळे, मयुरी आळवेकर, रंजिता बकस, कादंबरी, गौरी बकस, फरिदा बकस, जया, अर्चना, बिजली, समाजसेवक अमरदीप गोधने यांचा सन्मान करण्यात आला. या समारोप समारंभात स्कॉच अवार्ड सन्मानित सेजल हिचा विशेष सन्मान करण्यात आला.
किन्नरांवरील “मिशन गौरी” डॉक्युमेंट्रीने दिल्या नव्या संवेदना
या महोत्सवाच्या निमित्ताने विशेषत: किन्नर मतदान व अधिकार साक्षरतेच्यादृष्टिने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याला वेगळी जोड दिली. किन्नरांच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासमवेत त्यांच्यासाठी ज्या शासकीय योजना आहेत याबाबत विचारमंथन व्हावे यावर भर देण्याबाबत संयोजकांना सूचित केले होते. त्यानुसार युवा मतदार साक्षरतेसह तृतीयपंथीयांना माणूस म्हणून जगण्याचा असलेला हक्क व त्यांच्या भावभावनांवर आधारीत “मिशन गौरी” ही डॉक्युमेंट्री समारोप समारंभात आवर्जून दाखविण्यात आले. किन्नरांना विकास व सामाजिक समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सेतू केंद्र देण्याच्या उपक्रमावर व त्यांना मतदान ओळखपत्रासह रेशनकार्ड व इतर विकास उपक्रमांवर आधारीत ही डाक्युमेंट्री नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आली. या डाक्युमेंट्रीचे राज्याचे अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व मान्यवरांनी विशेष कौतूक केले.
000000









विशेष लेख

दांडी यात्रा ते मेरी माटी मेरा देशचा अन्वयार्थ 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर विविध उपक्रमांनी साजरा करून आपण आता सांगता पर्वाकडे वळालो आहोत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्याप्रती, जी आंदोलने झाली त्या आंदोलनाचे मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे व यातून आपल्या देशाच्या अस्मितेसह संहिष्णुतेचे मूल्यही नव्या पिढीत रूजावे या हेतूने आता मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हे अभियान संपूर्ण भारतभर राबविले जात आहे. माती हे प्रतिक आहे आपल्या अस्मितेचे. माती प्रतिक आहे आपल्या जन्मभूमीचे. आपल्या संस्कृतिने जन्मभूमीला आईच्या रूपात पाहिले आहे. माती हे प्रतीक आपल्या कृतज्ञतेचेही आहे. पारतंत्र्यात असलेल्या आपल्या मातृभूमीला, भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करणे सोपे नव्हते. स्वातंत्र्याचा इतिहास व यासाठी जे लढे आपल्या पूर्वजनांनी दिले त्या लढ्याकडे जर आपण बारकाईने पाहिले तर त्याचे खरे सत्व आपल्या लक्षात येईल. 

आंदोलनाचे स्वरूप आणि त्याची नावे पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की ही आंदोलने किती धोरणात्मक पद्धतीने आपल्या पूर्वजांनी लढले. या आंदोलनात चंपारण सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहयोग, खिलाफत चळवळ, बारडोली सत्याग्रह, चौरीचौरा, काकोरी काण्ड, चितगाव शस्त्रागार, हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा, चलेजाव आंदोलन, विभाजन, संस्थानचे विलीनीकरण, संविधान सभा अशा अनेक महत्वपूर्ण घटनांचे उल्लेख करावे लागतील.  भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील प्रत्येक आंदोलनाने एक नवे मानवी मूल्य दिले आहे. यातील चौरीचौरा आंदोलनात आंदोलनकर्ते भावनिक झाले होते. यातील संवेदनेचा काठ जपण्यासाठी महात्मा गांधींनी खूप आग्रह धरला. स्वातंत्र्यासाठी हे काही लढे आपण देऊ त्यात संहिष्णुता ही जपलीच पाहिजे, असा आग्रह त्यांचा होता. 

या सर्व आंदोलनापैकी अत्यंत महत्त्वपूर्ण व लोकांच्या अस्मितेच्यादृष्टिने प्रभावी ठरलेले आंदोलन म्हणजे मिठाचा सत्यागृह. 12 मार्च 1930 चे ते वर्षे. अवघ्या 79 लोकांनी दांडी यात्रेच्या माध्यमातून ब्रिटिशांना हादरून सोडले. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील ही दांडी यात्रा म्हणजे ब्रिटिशांना आपले राज्य सोडून जाण्यास कारणीभूत ठरलेली महायात्रा होती. संपूर्ण देशात ब्रिटिशांच्या राज्य पद्धतीने असंतोष पसरलेला होता. अनेक प्रकारच्या करांचा सपाटा ब्रिटिशांनी लादला होता. जनतेचा रोष थांबविण्यासाठी इंग्रज फक्त वादे करीत होते. अखेर 1929 च्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वतंत्रता अर्थात संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. 

रविंद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांची भेट भारतीय स्वातंत्र्याच्या पर्वातील दोन महान व्यक्तीमत्वाची भेट होती. आपल्या देशाला तुम्ही काही तरी देण्याचा पण केला होता, आपल्या जवळ यासाठी काही योजना आहे का ? असा प्रश्न टागोर यांनी महात्मा गांधींना केला. महात्मा गांधींनी या प्रश्नाबाबत खूप विचार केला. महात्मा गांधी सतत आत्मपरिक्षण करायचे. सतत अंत:करणातील आवाज ओळखायचे. मीठ अर्थात नमक हा अंत:करणातील आवाज त्यांनी ओळखला. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मिठाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. जी कृतज्ञता आपल्या मातीशी निगडीत आहे तेवढीच पवित्र कृतज्ञता मिठाशीपण आहे. मिठाला जागणे म्हणजेच आपल्या कर्तव्याला जागणे ! ज्यांच्या घरात खाण्यास पिठ नाही, प्रकाशासाठी लागणाऱ्या दिव्याला तेल नाही अशा गोरगरिबांच्या जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या साध्या मिठावर ब्रिटिशांनी 24 पटीने कर लावला होता. मीठ तयार करण्यासाठी भारतीयांना परवानगी नव्हती. या आंदोलनाची स्टेटमेंट कलकत्ता, इरविन, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू सारेच साशंक होते.

2 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी लॉर्ड इरविन यांना एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी या आंदोलनाचे सूतोवाच केले. यात त्यांनी 11 मागण्यांचा उल्लेख केला. शेवटी त्यांनी स्पष्ट अतिशय नम्रतेने एक वाक्य लिहिले. ते होते या पत्राचा आपल्यावर जर काही परिणाम होणार नसेल तर आम्ही या महिन्याच्या 11 व्या तारखेपासून आश्रमातील सहकार्यांसमवेत मिठा संदर्भातील कायदा तोडण्यासाठी आपली पावले उचलूत. 12 मार्च 1930 रोजी सकाळपासून हीच ती ऐतिहासिक दांडी यात्रा त्यांनी प्रारंभ केली. 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर यात्रेचा मार्ग निवडण्याची जबाबदारी सोपवली होती. साबरमती आश्रम ते दांडी पर्यंत बरोबर 224 मैल अंतर 24 दिवसात पूर्ण करायचे होते. रस्त्यात जी गावे लागतील त्या प्रत्येक गावात रचनात्मक कार्य करण्याचे आवाहन करणे यावर भर देण्यात आला होता. गावांची निवड करण्यासाठी काही निकषही ठरविण्यात आले होते. यात प्रामुख्याने हिंदू, मुस्लिम एकतेचे कार्य करता येईल अशी गावे, जिथे खादी व स्वच्छता यावर काम करता येईल, ज्या गावात अस्पृशतचे प्रमाण अधिक आहे ती गावे, ज्या गावात सरकारी अधिकारी भारतीय स्वातंत्र्याप्रती सकारात्मक होऊन ब्रिटिशांच्या चाकरीचे राजीनामे देतील. 

महात्मा गांधींनी यात्रेसाठी गावाकडून अत्यंत प्राथमिक अपेक्षा ठेवली. यात दुपारी अथवा रात्री थांबण्यासाठी सावली असलेली स्वच्छ जागा पुरेशी आहे, जिथे सावली  नसेल तिथे बांबू अथवा गवताचे काम चलावू मंडप पुरेशा राहील. जेवन अत्यंत साधे व आंदोलनकर्ते स्वत: हाताने बनवतील. त्यांना केवळ आवश्यक तेवढी सामग्री मिळाली तेवढे पुरेशे राहील एवढी स्पष्टता महात्मा गांधींनी बाळगली होती. याचबरोबर गांधींचा कटाक्ष स्वच्छतेकडे असल्याने शौचालयाची रचना व त्याची आवश्यकता त्यांनी गृहित धरली होती. आश्रमात राहणारे व गुजराथ विद्यापिठातील विद्यार्थी असे केवळ 79 सत्याग्रहींची दांडी यात्रेसाठी निवड केली गेली. यात गुजराथ मधील मधील 31, महाराष्ट्रातील 14, उत्तरप्रदेशातील 8, कच्छ मधील 6, केरळ मधील 4, पंजाब मधील 3, राजस्थानमधील 3, मुंबईमधील 2, सिंधमधील 1, नेपाळमधील 1, तामिळनाडूमधील 1, आंध्रप्रदेशमधील 1, उत्कल अर्थात ओडिसामधून 1, कर्नाटक, बिहार, बंगालमधील प्रत्येकी 1 असे सत्याग्रही सहभागी झाले होते. एका दृष्टिने दांडी यात्रा हे भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संपूर्ण राज्याचे प्रतीक होते. 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेतील सहभागी सत्याग्रहींच्या माथ्यावर कस्तुरबा गांधी यांनी टिळा लावला. आम्ही यौद्धांच्या आर्धांगिनी आहोत, आपली कणखरता जेवढी अधिक असेल तेवढी अधिक कणखरता त्यांच्यात येईल असे बोल कस्तुरबाने मनिलालच्या पत्नीला सुनावून धीर दिला होता. 

या लढ्याने संपूर्ण जगाला एक वेगळे अधिष्ठान दिले. आपले विचार, शब्द हे पवित्र असले  पाहिजे. सुत कातून स्वदेशी खादीचे वस्त्र आपण घातले पाहिजेत. स्वदेशीला चालना दिली पाहिजे. दारू व इतर व्यसने सोडून समाजातील वाईट चालीरिती संपविल्या पाहिजे. संघटित होऊन शांती आणि अंहिषाचे पालन करत मिठाचा कायदा तोडण्यासाठी तत्पर रहा, या संदेशाने हा लढा लढला गेला. विदेशी कपड्यांची होळी करून खादी खरेदी करा हे आवाहन गांधींनी केले होते. गोरगरीब स्त्रीया बबुल व दातून विक्रीसाठी ज्या पद्धतीने निघतात त्याच श्रद्धेने सर्वांनी मीठ उचलून ते विकण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. ब्रिटिशांनी यावर लादलेला कर झुगारण्याचे हे प्रतीक आहे. संपूर्ण जगाच्या इतिहासात एवढ्या अन्यायकारक मिठासारख्या वस्तूवर कर लावल्याचा कुठेही उल्लेख मिळत नाही. याचबरोबर केवळ मिठाचा कर मागे घेतला म्हणजे आपल्या स्वातंत्र्य मिळाले असेही होणार नाही. प्रत्येकाने अत्यंत सजगतापूर्वक अन्य रचानात्मक कार्याकडे वळले पाहिजे. विदेशी वस्त्र व पेयांवर बहिष्कार घालून स्वराज्याच्या खऱ्या मूल्याला आपण ओळखले पाहिजे, हा आग्रह महात्मा गांधींचा होता. भारताचे स्वातंत्र्य ही अनेक लढ्यातून अनेकांच्या योगदानातून दिलेल्या बलिदानाची, रचनात्मक आंदोलनाची, महिलांच्या योगदानाची फलश्रृती आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

 -   विनोद रापतवार, 

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड  

 धर्माबादच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरुमची सुविधा

§  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीव्दारे उद्घाटन 

§  राज्यातील 75 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी शासनाचा उपक्रम

नांदेड (जिमाका) दि. 17 :-राज्याच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्यातील विद्यार्थ्यांना तंत्र कुशलतेसह इतर कौशल्याचे शिक्षण, व्यवस्थापनाचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आता व्हर्च्युअल क्लासरुमची भर पडली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्किल इंडिया व डिजीटल उपक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये व्हर्च्युअल क्लासरुम या आवश्यक त्या तंत्रज्ञानासह विकसित केल्या जात आहेत. याचबरोबर कुशल रोजगार युक्त महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभिनव उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले. त्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीव्दारे ७५ औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आले.



 

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह ,आयुक्त डॉ रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांची उपस्थिती होती. तर राज्यातील विविध आयटीआयमध्ये लोकप्रतिनिधींसह ७५ आयटीआयचे प्रशिक्षणार्थी  दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.

धर्माबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 272 विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. यात वायरमन, इलेक्ट्रीशियन, टर्नर, फिटर, ट्रॅक्टर मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, सुतार काम या ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाते. इर्व्हटरसह इंटरनेट सुविधा असलेल्या या नव्या व्हर्च्युअल क्लासरुम उपलब्धीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना नवे धैर्य मिळेल असा विश्वास प्राचार्य ए.एस. त्रिचूरकर यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे साधलेल्या कार्यक्रमास येथील विद्यार्थ्यांसह प्रभारी गट निदेशक डी.जी.शिंदे, भांडारपाल जी.डी. पांढरे यांची उपस्थिती होती.

00000

 

 लोहा आयटीआयमध्ये  शिल्पनिदेशकांच्या पदासाठी मुलाखती

 

नांदेड (जिमाका), दि. 17 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोहा येथे  शिल्पकारागीर योजनेअंतर्गत शिल्पनिदेशकांची/निदेशकांची पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात निव्वळ तासिका तत्वावर सैध्दांतिक (थेअरी) व प्रात्यक्षिक तसेच इंजि. ड्रॉइंग व वर्कशॉप कॅल्क्युलेशन ॲण्ड सायन्स शिकविण्यासाठी भरावयाची आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2023 पर्यत अर्ज करावेत. तसेच 29 ऑगस्ट 2023 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी व प्रात्यक्षिकासाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह सकाळी 11 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोहा येथे उपस्थित रहावेअसे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोहा यांनी केले आहे. 

 

ज्या व्यवसायासाठी शिल्पनिदेशकाचे पद निव्वळ तासिका तत्वावर भरावयाची आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. फिटर, इलेक्ट्रिशियन, इंजि. ड्रॉइंग व वर्कशॉप कॅल्क्युलेशन ॲण्ड सायन्न याप्रमाणे आहेत. या व्यवसायासाठी/विषयासाठी उमेदवार हा तत्सम इंजिनिअरिंग पदवी व एक वर्ष अनुभव/पदविका व दोन वर्षे अनुभव किंवा आयटीआय तत्सम व्यवसाय/एन.सी.व्ही.टी/सी.टी.आय.उत्तीर्ण व तीन वर्षे अनुभव, पदवी/पदविका किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असावा. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारांना तीन वर्षे अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येईल, असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोहा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 उमरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 28 ऑगस्ट रोजी

शिल्पनिदेशकांच्या पदासाठी मुलाखतीचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरी येथे 7 व्यवसायासाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशकांची पदे भरावयाची आहेत. ईच्छूक व पात्र उमेदवारांनी सोमवार 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 12 वाजेपर्यत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, वय व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन उमरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गायकवाड यांनी केले आहे.

 

ज्या व्यवसायासाठी शिल्पनिदेशकाचे पद निव्वळ तासिका तत्वावर भरावयाची आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. कोपा 1, सुईग टेक्नॉलॉजी 1, एमआरएसी 1, एम्पॉयबीटी 1, हेल्थ सॅनेटरीज इन्सपेक्टर 1, हॉस्पीटल हाऊसकिंपीग 1, फिजीओथेरपी टेक्नीशीयन 1 या व्यवसायासाठी पदे भरावयाची आहेत असे औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 लागू

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या

पात्र परिसरात कलम 144 लागू 


नांदेड (जिमाका) दि. 17 :-  मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 ऑगस्ट 2023 ते 19 सप्टेबर 2023 पर्यत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत. 


याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 सप्टेंबर 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे पोहोचले थेट धनेगाव येथील भटक्या विमुक्तांच्या वसतीवर

 मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे पोहोचले थेट

धनेगाव येथील भटक्या विमुक्तांच्या वसतीवर

§  प्रत्येक भटक्या विमुक्तांना मतदार यादीत समाविष्ट करु

§  मतदान कार्डासमवेत भटक्या विमुक्तांपर्यत विविध शासकीय योजनाही पोहोचविणार

नांदेड (जिमाका), दि. 16 :- विकासाच्या संकल्पनेत सर्वाचा विकास यासाठी शासन कटिबद्ध आहे. समाजातील सर्वच घटकांचे प्रतिबिंब हे शासकीय योजनांसह मतदान प्रक्रियेच्या, मतदानाच्या हक्कापर्यत अभिप्रेत आहे. रोजच्या जगण्यासाठी हातावर पोट घेवून संघर्ष करणाऱ्या भटक्या विमुक्तांना मतदानाच्या हक्कासह विविध शासकीय योजनाही प्रभावी पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे, प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.  धनेगाव येथील पाल टाकून राहणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या वसतीवर भेट देवून त्यांनी संवाद साधला.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संगिता चव्हाण, तहसीलदार संजय वारकड, भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे, धनेगावचे सरपंच गंगाधर शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.





प्रशासनात काम करणारे अधिकारी हे तुमच्या विकासासाठी कटिबध्द आहेत. ते आपले आहेत आपल्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजना तुमच्या सकारात्मक सहभागाशिवाय साकार होवू शकणार नाही. ज्या योजना आहेत त्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लाभ घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आवाहन केले. यावेळी 71 व्यक्तींना मतदान फार्म भरुन घेतले, 107 व्यक्तींना जात प्रमाणपत्र, 10 व्यक्तींना रेशन कार्ड, 40 व्यक्तींची आधार नावनोंदणी, 8 व्यक्तींना संजय गांधी फॉर्म, 7 व्यक्तींना उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 7 व्यक्तींना रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले.  यावेळी भटक्या विमुक्तांतील गारुडी, कुडमुडे जोशी आदींनी आपल्या पारंपारिक पोषाखात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व मान्यवरांचे स्वागत केले.

छाया-सदा वडजे

00000  

 लोकशाही सशक्तीकरणासाठी युवा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे

-   अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
 
▪️प्रत्येक मतदारांच्या मतदानातच सक्षम व सुदृढ लोकशाहीचा मार्ग
▪️मतदान जागृतीसाठी निवडणूक विभागाचे विविध उपक्रम
 
नांदेड (जिमाका), दि. 16 :- देश घडवण्याची ताकद मतदारामध्ये असते.  यात युवा मतदारांनी राष्ट्र सेवा म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासह मतदान साक्षरतेसाठीही सहभाग घेणे आवश्यक आहे. लोकशाहीत युवकांची भूमिका ही प्रत्येक देशात सिध्द झालेली आहे. अनेक देशात युवकांनी क्रांती केली आहे. भारतातही आपला युवा वर्ग अत्यंत सक्षम असून मतदारांच्या नोंदणीत असलेले मतदानाचे प्रमाण वाढविणे हे सुध्दा कोणत्या क्रांती पेक्षा कमी नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालय व निवडणूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.




 
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)  संगिता चव्हाण, उप प्राचार्य एस. एल. कोटगिरे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एम. राजुरकर, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
 
राज्यातील युवकांपर्यत निवडणूक विभागाची भूमिका पोहचावी, युवकांच्या मनातील मतदान प्रक्रियेविषयी असलेल्या विविध शंकाचे समाधान व्हावे, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मतदार साक्षरता चळवळीत युवकांचा सहभाग वाढावा याउद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे यांनी लोकशाही प्रक्रियेपासून, सुशासन ते मतदानाची पवित्रता आणि युवा मतदारांच्या मतदानापर्यत विविध प्रश्नांना उत्तरे दिली.  
 
देशाच्या प्रगतीपासून ते गावपातळीपर्यतच्या समस्यापर्यत प्रत्येकजण हा विविध प्रकारच्या अत्यंत जबाबदारीने चर्चा करीत असतो. प्रत्येकाला विकास कामात बदल हवा असतो. ही प्रक्रिया आपल्या मतदानाच्या हक्कातून,कर्तव्यातून आपण पार पाडू शकतो. मतदान करणे हे जेवढे प्रत्येक नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आहे तेवढेच त्याचे पावित्र्य जपणे हे सुध्दा अत्यंत मोलाचे आहे असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. मतदार जागृतीसाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला 18 दिवसांची विद्यार्थ्यांची मतदार जागृती दिंडी काढली जाते. विविध प्रतिथयश शैक्षणिक संस्थामधील गुणवंत विद्यार्थ्यांना, कलाकारांना, चित्रकारांना मतदान साक्षरतेच्या चळवळीला अधिक रचनात्मक करण्यासाठी निवडणूक विभाग प्रोत्साहन देत आहे. यात विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पना वापरुन जास्तीत जास्त नव मतदार वाढविण्यासाठी भर द्यावा, असे आवाहन श्रीकांत देशपांडे यांनी केले.   
 
आजच्या स्थितीत देशात 141 कोटी मतदार असून त्यापैकी 94 कोटी 50 लाख 25 हजार 694 मतदार आहेत. मतदारांना मतदानाच्या प्रक्रीयेत सहभागी करुन घेणे हे आव्हान असून त्यासाठी निवडणूक विभाग प्रयत्नशिल आहे.  यासाठी विभागाकडून विविध उपक्रम, स्पर्धा राबविण्यात येतात. तसेच युवा मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने सन 1980 मध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी मतदाराचे वय 21 वरुन 18 केले आहे. मतदानाचा अधिकार मिळूनही अनेक युवक मतदानाचे कर्तव्य बजाविण्यापासून टाळाटाळ करत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. 

समाजातील प्रत्येक घटकाला निवडणूक प्रक्रीयेत सामावून घेतले जावे यासाठी राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी राज्यात एक वेगळी दिशा दिली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.  दिव्यांग, तृतीयपंथी, भटके, विमुक्त आदीचा मतदान प्रक्रीयेत सहभाग वाढावा यासाठी ते वाडी-वस्तीवर जावून मतदारांशी संपर्क साधत आहेत. यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वेगळा संदेश पोहचला असून स्थानिक पातळीवरील बीएलओ पासून मतदानाची एक नवी साक्षरता चळवळ सुरु झाल्याचे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
 
जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी तुषार व ईश्वरी यांनी मतदानाचे महत्व विषद केले.  कार्यक्रमाचे सुत्र संचालन सतपालसिंग गिल यांनी केले तर आभार राहुलसिंह बिसेन यांनी केले.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...