Thursday, August 17, 2023

विशेष लेख

दांडी यात्रा ते मेरी माटी मेरा देशचा अन्वयार्थ 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर विविध उपक्रमांनी साजरा करून आपण आता सांगता पर्वाकडे वळालो आहोत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्याप्रती, जी आंदोलने झाली त्या आंदोलनाचे मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे व यातून आपल्या देशाच्या अस्मितेसह संहिष्णुतेचे मूल्यही नव्या पिढीत रूजावे या हेतूने आता मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हे अभियान संपूर्ण भारतभर राबविले जात आहे. माती हे प्रतिक आहे आपल्या अस्मितेचे. माती प्रतिक आहे आपल्या जन्मभूमीचे. आपल्या संस्कृतिने जन्मभूमीला आईच्या रूपात पाहिले आहे. माती हे प्रतीक आपल्या कृतज्ञतेचेही आहे. पारतंत्र्यात असलेल्या आपल्या मातृभूमीला, भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करणे सोपे नव्हते. स्वातंत्र्याचा इतिहास व यासाठी जे लढे आपल्या पूर्वजनांनी दिले त्या लढ्याकडे जर आपण बारकाईने पाहिले तर त्याचे खरे सत्व आपल्या लक्षात येईल. 

आंदोलनाचे स्वरूप आणि त्याची नावे पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की ही आंदोलने किती धोरणात्मक पद्धतीने आपल्या पूर्वजांनी लढले. या आंदोलनात चंपारण सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहयोग, खिलाफत चळवळ, बारडोली सत्याग्रह, चौरीचौरा, काकोरी काण्ड, चितगाव शस्त्रागार, हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा, चलेजाव आंदोलन, विभाजन, संस्थानचे विलीनीकरण, संविधान सभा अशा अनेक महत्वपूर्ण घटनांचे उल्लेख करावे लागतील.  भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील प्रत्येक आंदोलनाने एक नवे मानवी मूल्य दिले आहे. यातील चौरीचौरा आंदोलनात आंदोलनकर्ते भावनिक झाले होते. यातील संवेदनेचा काठ जपण्यासाठी महात्मा गांधींनी खूप आग्रह धरला. स्वातंत्र्यासाठी हे काही लढे आपण देऊ त्यात संहिष्णुता ही जपलीच पाहिजे, असा आग्रह त्यांचा होता. 

या सर्व आंदोलनापैकी अत्यंत महत्त्वपूर्ण व लोकांच्या अस्मितेच्यादृष्टिने प्रभावी ठरलेले आंदोलन म्हणजे मिठाचा सत्यागृह. 12 मार्च 1930 चे ते वर्षे. अवघ्या 79 लोकांनी दांडी यात्रेच्या माध्यमातून ब्रिटिशांना हादरून सोडले. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील ही दांडी यात्रा म्हणजे ब्रिटिशांना आपले राज्य सोडून जाण्यास कारणीभूत ठरलेली महायात्रा होती. संपूर्ण देशात ब्रिटिशांच्या राज्य पद्धतीने असंतोष पसरलेला होता. अनेक प्रकारच्या करांचा सपाटा ब्रिटिशांनी लादला होता. जनतेचा रोष थांबविण्यासाठी इंग्रज फक्त वादे करीत होते. अखेर 1929 च्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वतंत्रता अर्थात संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. 

रविंद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांची भेट भारतीय स्वातंत्र्याच्या पर्वातील दोन महान व्यक्तीमत्वाची भेट होती. आपल्या देशाला तुम्ही काही तरी देण्याचा पण केला होता, आपल्या जवळ यासाठी काही योजना आहे का ? असा प्रश्न टागोर यांनी महात्मा गांधींना केला. महात्मा गांधींनी या प्रश्नाबाबत खूप विचार केला. महात्मा गांधी सतत आत्मपरिक्षण करायचे. सतत अंत:करणातील आवाज ओळखायचे. मीठ अर्थात नमक हा अंत:करणातील आवाज त्यांनी ओळखला. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मिठाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. जी कृतज्ञता आपल्या मातीशी निगडीत आहे तेवढीच पवित्र कृतज्ञता मिठाशीपण आहे. मिठाला जागणे म्हणजेच आपल्या कर्तव्याला जागणे ! ज्यांच्या घरात खाण्यास पिठ नाही, प्रकाशासाठी लागणाऱ्या दिव्याला तेल नाही अशा गोरगरिबांच्या जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या साध्या मिठावर ब्रिटिशांनी 24 पटीने कर लावला होता. मीठ तयार करण्यासाठी भारतीयांना परवानगी नव्हती. या आंदोलनाची स्टेटमेंट कलकत्ता, इरविन, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू सारेच साशंक होते.

2 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी लॉर्ड इरविन यांना एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी या आंदोलनाचे सूतोवाच केले. यात त्यांनी 11 मागण्यांचा उल्लेख केला. शेवटी त्यांनी स्पष्ट अतिशय नम्रतेने एक वाक्य लिहिले. ते होते या पत्राचा आपल्यावर जर काही परिणाम होणार नसेल तर आम्ही या महिन्याच्या 11 व्या तारखेपासून आश्रमातील सहकार्यांसमवेत मिठा संदर्भातील कायदा तोडण्यासाठी आपली पावले उचलूत. 12 मार्च 1930 रोजी सकाळपासून हीच ती ऐतिहासिक दांडी यात्रा त्यांनी प्रारंभ केली. 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर यात्रेचा मार्ग निवडण्याची जबाबदारी सोपवली होती. साबरमती आश्रम ते दांडी पर्यंत बरोबर 224 मैल अंतर 24 दिवसात पूर्ण करायचे होते. रस्त्यात जी गावे लागतील त्या प्रत्येक गावात रचनात्मक कार्य करण्याचे आवाहन करणे यावर भर देण्यात आला होता. गावांची निवड करण्यासाठी काही निकषही ठरविण्यात आले होते. यात प्रामुख्याने हिंदू, मुस्लिम एकतेचे कार्य करता येईल अशी गावे, जिथे खादी व स्वच्छता यावर काम करता येईल, ज्या गावात अस्पृशतचे प्रमाण अधिक आहे ती गावे, ज्या गावात सरकारी अधिकारी भारतीय स्वातंत्र्याप्रती सकारात्मक होऊन ब्रिटिशांच्या चाकरीचे राजीनामे देतील. 

महात्मा गांधींनी यात्रेसाठी गावाकडून अत्यंत प्राथमिक अपेक्षा ठेवली. यात दुपारी अथवा रात्री थांबण्यासाठी सावली असलेली स्वच्छ जागा पुरेशी आहे, जिथे सावली  नसेल तिथे बांबू अथवा गवताचे काम चलावू मंडप पुरेशा राहील. जेवन अत्यंत साधे व आंदोलनकर्ते स्वत: हाताने बनवतील. त्यांना केवळ आवश्यक तेवढी सामग्री मिळाली तेवढे पुरेशे राहील एवढी स्पष्टता महात्मा गांधींनी बाळगली होती. याचबरोबर गांधींचा कटाक्ष स्वच्छतेकडे असल्याने शौचालयाची रचना व त्याची आवश्यकता त्यांनी गृहित धरली होती. आश्रमात राहणारे व गुजराथ विद्यापिठातील विद्यार्थी असे केवळ 79 सत्याग्रहींची दांडी यात्रेसाठी निवड केली गेली. यात गुजराथ मधील मधील 31, महाराष्ट्रातील 14, उत्तरप्रदेशातील 8, कच्छ मधील 6, केरळ मधील 4, पंजाब मधील 3, राजस्थानमधील 3, मुंबईमधील 2, सिंधमधील 1, नेपाळमधील 1, तामिळनाडूमधील 1, आंध्रप्रदेशमधील 1, उत्कल अर्थात ओडिसामधून 1, कर्नाटक, बिहार, बंगालमधील प्रत्येकी 1 असे सत्याग्रही सहभागी झाले होते. एका दृष्टिने दांडी यात्रा हे भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संपूर्ण राज्याचे प्रतीक होते. 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेतील सहभागी सत्याग्रहींच्या माथ्यावर कस्तुरबा गांधी यांनी टिळा लावला. आम्ही यौद्धांच्या आर्धांगिनी आहोत, आपली कणखरता जेवढी अधिक असेल तेवढी अधिक कणखरता त्यांच्यात येईल असे बोल कस्तुरबाने मनिलालच्या पत्नीला सुनावून धीर दिला होता. 

या लढ्याने संपूर्ण जगाला एक वेगळे अधिष्ठान दिले. आपले विचार, शब्द हे पवित्र असले  पाहिजे. सुत कातून स्वदेशी खादीचे वस्त्र आपण घातले पाहिजेत. स्वदेशीला चालना दिली पाहिजे. दारू व इतर व्यसने सोडून समाजातील वाईट चालीरिती संपविल्या पाहिजे. संघटित होऊन शांती आणि अंहिषाचे पालन करत मिठाचा कायदा तोडण्यासाठी तत्पर रहा, या संदेशाने हा लढा लढला गेला. विदेशी कपड्यांची होळी करून खादी खरेदी करा हे आवाहन गांधींनी केले होते. गोरगरीब स्त्रीया बबुल व दातून विक्रीसाठी ज्या पद्धतीने निघतात त्याच श्रद्धेने सर्वांनी मीठ उचलून ते विकण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. ब्रिटिशांनी यावर लादलेला कर झुगारण्याचे हे प्रतीक आहे. संपूर्ण जगाच्या इतिहासात एवढ्या अन्यायकारक मिठासारख्या वस्तूवर कर लावल्याचा कुठेही उल्लेख मिळत नाही. याचबरोबर केवळ मिठाचा कर मागे घेतला म्हणजे आपल्या स्वातंत्र्य मिळाले असेही होणार नाही. प्रत्येकाने अत्यंत सजगतापूर्वक अन्य रचानात्मक कार्याकडे वळले पाहिजे. विदेशी वस्त्र व पेयांवर बहिष्कार घालून स्वराज्याच्या खऱ्या मूल्याला आपण ओळखले पाहिजे, हा आग्रह महात्मा गांधींचा होता. भारताचे स्वातंत्र्य ही अनेक लढ्यातून अनेकांच्या योगदानातून दिलेल्या बलिदानाची, रचनात्मक आंदोलनाची, महिलांच्या योगदानाची फलश्रृती आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

 -   विनोद रापतवार, 

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...