Thursday, August 17, 2023

 लोकशाही सशक्तीकरणासाठी युवा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे

-   अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
 
▪️प्रत्येक मतदारांच्या मतदानातच सक्षम व सुदृढ लोकशाहीचा मार्ग
▪️मतदान जागृतीसाठी निवडणूक विभागाचे विविध उपक्रम
 
नांदेड (जिमाका), दि. 16 :- देश घडवण्याची ताकद मतदारामध्ये असते.  यात युवा मतदारांनी राष्ट्र सेवा म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासह मतदान साक्षरतेसाठीही सहभाग घेणे आवश्यक आहे. लोकशाहीत युवकांची भूमिका ही प्रत्येक देशात सिध्द झालेली आहे. अनेक देशात युवकांनी क्रांती केली आहे. भारतातही आपला युवा वर्ग अत्यंत सक्षम असून मतदारांच्या नोंदणीत असलेले मतदानाचे प्रमाण वाढविणे हे सुध्दा कोणत्या क्रांती पेक्षा कमी नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालय व निवडणूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.




 
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)  संगिता चव्हाण, उप प्राचार्य एस. एल. कोटगिरे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एम. राजुरकर, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
 
राज्यातील युवकांपर्यत निवडणूक विभागाची भूमिका पोहचावी, युवकांच्या मनातील मतदान प्रक्रियेविषयी असलेल्या विविध शंकाचे समाधान व्हावे, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मतदार साक्षरता चळवळीत युवकांचा सहभाग वाढावा याउद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे यांनी लोकशाही प्रक्रियेपासून, सुशासन ते मतदानाची पवित्रता आणि युवा मतदारांच्या मतदानापर्यत विविध प्रश्नांना उत्तरे दिली.  
 
देशाच्या प्रगतीपासून ते गावपातळीपर्यतच्या समस्यापर्यत प्रत्येकजण हा विविध प्रकारच्या अत्यंत जबाबदारीने चर्चा करीत असतो. प्रत्येकाला विकास कामात बदल हवा असतो. ही प्रक्रिया आपल्या मतदानाच्या हक्कातून,कर्तव्यातून आपण पार पाडू शकतो. मतदान करणे हे जेवढे प्रत्येक नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आहे तेवढेच त्याचे पावित्र्य जपणे हे सुध्दा अत्यंत मोलाचे आहे असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. मतदार जागृतीसाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला 18 दिवसांची विद्यार्थ्यांची मतदार जागृती दिंडी काढली जाते. विविध प्रतिथयश शैक्षणिक संस्थामधील गुणवंत विद्यार्थ्यांना, कलाकारांना, चित्रकारांना मतदान साक्षरतेच्या चळवळीला अधिक रचनात्मक करण्यासाठी निवडणूक विभाग प्रोत्साहन देत आहे. यात विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पना वापरुन जास्तीत जास्त नव मतदार वाढविण्यासाठी भर द्यावा, असे आवाहन श्रीकांत देशपांडे यांनी केले.   
 
आजच्या स्थितीत देशात 141 कोटी मतदार असून त्यापैकी 94 कोटी 50 लाख 25 हजार 694 मतदार आहेत. मतदारांना मतदानाच्या प्रक्रीयेत सहभागी करुन घेणे हे आव्हान असून त्यासाठी निवडणूक विभाग प्रयत्नशिल आहे.  यासाठी विभागाकडून विविध उपक्रम, स्पर्धा राबविण्यात येतात. तसेच युवा मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने सन 1980 मध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी मतदाराचे वय 21 वरुन 18 केले आहे. मतदानाचा अधिकार मिळूनही अनेक युवक मतदानाचे कर्तव्य बजाविण्यापासून टाळाटाळ करत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. 

समाजातील प्रत्येक घटकाला निवडणूक प्रक्रीयेत सामावून घेतले जावे यासाठी राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी राज्यात एक वेगळी दिशा दिली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.  दिव्यांग, तृतीयपंथी, भटके, विमुक्त आदीचा मतदान प्रक्रीयेत सहभाग वाढावा यासाठी ते वाडी-वस्तीवर जावून मतदारांशी संपर्क साधत आहेत. यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वेगळा संदेश पोहचला असून स्थानिक पातळीवरील बीएलओ पासून मतदानाची एक नवी साक्षरता चळवळ सुरु झाल्याचे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
 
जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी तुषार व ईश्वरी यांनी मतदानाचे महत्व विषद केले.  कार्यक्रमाचे सुत्र संचालन सतपालसिंग गिल यांनी केले तर आभार राहुलसिंह बिसेन यांनी केले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...