Thursday, October 31, 2019



पदवीधर मतदारांची नोंदणी अधिक प्रमाणात करा
कोणताही पात्र पदवीधर मतदार मतदानापासून वंचित राहू  नये
                                                  - विभागीय आयुक्त  सुनिल  केंद्रेकर
औरंगाबाद, दि-31:  05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत सहा नोंव्हेंबर आहे. त्यामुळे  कोणताही पात्र पदवीधर मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विभागातील प्रत्येक पदनिर्देशित  निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील पदवीधर मतदारांची जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनिल  केंद्रेकर यांनी  संबंधीतांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनिल  केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचेसाठी "पदवीधर मतदारसंघ निवडणूक" प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी उदय चौधरी ,उपायूक्त वर्षा ठाकूर, पराग सोमण,अप्पर जिल्हाधिकारी भानूदास पालवे, अविनाश पाठक यांनी  पदवीधर मतदारांची नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. तर उपजिल्हाधिकारी श्री.अरगुंडे आणि शिवाजी शिंदे यांनी पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रमासंबंधी सादरीकरणाव्दारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपजिल्हाधिकारी पी.आर.कुलकर्णी यांनी प्रशिक्षणाचा समारोप केला.
यावेळी, मतदारांच्या नोंदणीसाठी प्राप्त अर्जांवर तात्काळ अचुक व गतीने निर्णय घेऊन त्याची संगणक प्रणालीवर नोंद घ्यावी. त्याबाबतचा अहवाल वेळेवर सादर करण्याची सूचना यावेळी केंद्रेकर यांनी केली.
जिल्हाधिकारी श्री. चौधरी  यांनी पदवीधर मतदारांची यादी अद्ययावत करून नवीन पात्र मतदारांची अचुकपणे नोंदणी करण्याच्या कामास गती देण्याची सुचना केली. सर्व अधिकाऱ्यांनी नमुना नं. 18 नुसार दाखल अर्जाची कसून तपासणी करावी व मुळ अभिलेख्यांशी ती माहिती पडताळून घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच श्रीमती ठाकूर यांनीही सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील  सर्व शासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे येथील पदवीधर मतदार नोंदणीला प्राधान्य द्यावे व अधिकाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी करुन लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची सुचना केली.
       मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ () अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम  ०१ ऑक्टोबरपासून जाहीर झाला आहे. मतदार नोंदणीसाठी एक ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत पात्र पदवी अहर्ता, पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना नं.१८ मध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. या नोंदणीसाठी एक नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष अगोदर पात्र पदवी अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका इ. धारण करणा-या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. नमुना १८ च्या अर्जासह मूळ कागदपत्रे अथवा राजपत्रित अधिका-याकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी , पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रक देखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणित झाले असले पाहिजे.
शासकीय कार्यालयात सामाजिक उपक्रमामध्ये काम करणा-या व्यक्तीच्या अर्हताबद्दल संस्थेकडील अभिलेख पाहून कार्यालय प्रमुखांना मतदार नोंदणीसाठी विहित नमुन्यात प्रमाणपत्र देता येईल. तसेच विद्यापीठांकडील पदवीधारकांची नोंदणी, अभियंत्यांची नोंदणी, विधी अभिकर्त्याची नोंदणी, वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी , सनदी लेखापालांची नोंदणी आदी नोंदणीबाबतचा दाखला अर्जासोबत अर्हतेबाबत पुरावा म्हणून देता येईल. तसेच राजकीय पक्ष संघटना अथवा कोणत्याही व्यक्तीस एका गठ्ठा अर्ज मिळणार नाहीत, तसेच एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारलेही जाणार नाहीत. मात्र, एका कुटुंबासाठी अथवा कार्यालय प्रमुख अथवा संस्थेस त्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांसाठी अर्जाची एकत्रित मागणी करता येईल व एकत्रित अर्ज सादर करता येतील.
                           प्राप्त मतदारांची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येऊन २३ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबरपर्यंत संबंधितांना दावे, हरकती नोंदविता येतील. दिनांक ३० डिसेंबर रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.यावेळी  उपस्थित उपजिल्हाधिकारी,तहसीलदार यांच्या शंकाचे निरसन करण्यात  आले.
                                           000000000000

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या
 मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 31 :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समावेश करण्याबाबत सर्व पदवीधरांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी मतदार यादीत नाव असेल ती यादी सदर निवडणुकीत वैध नाही. कुठलाही शाखेचा पदवीधर किंवा डिप्लोमा 1 नोव्हेंबर 2016 पूर्वीचा असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधीत तहसिल कार्यालयात संपर्क साधावा.  
अर्ज करण्याची शेवटचा दिनांक 6 नोव्हेंबर 2019 असून अर्जासोबत कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती पदवी किंवा डिप्लोमा, रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र / आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज नि:शुल्क उपलब्ध आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.    
0000


उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी
सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2019 या वर्षासाठी शनिवार 30 नोव्हेंबर 2019 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे.
उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सुक्ष्म व लघु  उद्योगांना पुरस्कार दिले जातात.  सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे  15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.
जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या  वेळी,  उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी पासून उद्योग आधार व एमएसएमई डेटा बँक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापुर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे.  
नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी शनिवार 30 नोव्हेंबर 2019 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा,  असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ,नांदेड यांनी केले आहे.
000000



लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 31 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 4 नोव्हेंबर 2019 दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 11 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...