Wednesday, June 14, 2023

 देगलूर येथील अपंग प्रशिक्षण केंद्रात

5 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत म.रा. व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तनकला, कॉम्प्युटर अकॉऊटींग व ऑफिस ऑटोमेशन व वेल्डरकम फॅब्रिकेटर इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासची व जेवणाची विनामुल्य सोय केलेली आहे.

 

इच्छूक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी 5 जुलै 2023 पर्यंत प्राचार्य तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर येथे पत्रव्यवहार करावा किंवा समक्ष भेटावे. अधिक माहितीसाठी मो. 9960900369, 9403207100, 7378641136,9420846887 वर संपर्क साधावा, असे आवाहन कर्मशाळा अधिक्षक तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर यांनी केले आहे.

00000

 वृत्त 

आदर्श गाव योजनेत गाव समाविष्ट

करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) 14 :- लोकसहभाग ग्रामविकास व लोकाभिमुख कार्यक्रमात शासनाचा सहभाग या संकल्पनेवर आदर्शगाव योजना ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय 10 मार्च 2015 नुसार आधारलेली आहे. इच्छूक गावांनी या योजनेअंतर्गत सहभाग घेण्यासाठी संबधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

राज्यातील प्रत्येक तालुक्यात लोकांच्या सक्रीय सहभागातून किमान एक पथदर्शक काम करणे व त्यानंतर इतर गावाना त्यांचे गाव आदर्श करण्यासाठी प्रेरीत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. गाव निवडीची पद्धत परिशिष्ट-अ मध्ये नमुद केलेल्या संस्थेच्या तपशिलासह ग्रामसभेने शिफारस केलेल्या गावांची निकषानुसार जिल्हा स्तरावर छाननी करुन शिफारस करण्यात येईल. तसेच अंतिम मान्यता कार्यकारी समिती प्रदान करेल.

 

निवडीचे निकष

गावाच्या एकूण क्षेत्रापैकी सर्व प्रकारचे मिळून 30 टक्क्यापेक्षा जास्त सिंचन क्षेत्र नसावे. या क्षेत्रात कॅनाल आणि लिफट या बाबीखाली भिजणाऱ्या क्षेत्राचा समावेश राहील. गावाची लोकसंख्या 10 हजाराच्या आत असावी. गावाचे महसुली क्षेत्र 2 हजार 500 हेक्टरपर्यंत असावे. गटग्रामपंचायत अंतर्गत स्वतंत्रवाडी / वस्तीस योजनेत सहभागी होता येईल. ग्रामविकास निधी उभारुन तो चालविण्यासाठी ग्रामस्थांची तयारी असणे आवश्यक आहे. सप्तसुत्री (नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, श्रमदान, लोटाबंदी (निर्मलग्राम), शेतीसाठी बोअरवेल बंदी (पाण्याचा ताळेबंद), पालन करण्याची ग्रामस्थांची तयारी असणे आवश्यक आहे.) विधी ग्राम अभियानात (उदा. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, तंटामुक्त गावे, संत तुकाराम वनग्राम योजना) पुरस्कार प्राप्त गावे सहभाग घेऊ शकतील. गाव विविध ग्रामअभियानात पुरस्कार प्राप्त किंवा गावाचा अशा अभियानात सहभाग असणे आवश्यक आहे. गावास किमान एका अभियानात पुरस्कार प्राप्त असावा तसेच गाव हागणदारी मुक्त असावे.

 

प्राधान्यक्रम

वरीलप्रमाणे निकष असणाऱ्या गावाच्या निवडीत पुढीलप्रमाणे प्राधान्यक्रम राहील. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असलेली गावे. विविध ग्राम अभियानात गावांचा सहभाग. पडीत जमीन, वन जमीन, गायरान जमीन जास्त असणारी गावे. स्थानिक मजूरी कमी असणारी गावे. मृद / जलसंधारणाची कामे काही प्रमाणात झालेली गावे, तथापि मृद व जलसंधारण कामांना 50 टक्केपेक्षा जास्त वाव असणे आवश्यक आहे.

 

अर्ज करण्याची पद्धत

आदर्श गाव योजनेअंतर्गत समावेश होण्यासाठी इच्छूक गावाने ग्रामसभा बोलावून कार्यकारी समितीने विहीत केलेल्या नमुन्यात आपला अर्ज पुढे नमूद केलेल्या सहपत्रासह जिल्हा समितीमार्फत आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती कार्यालयाकडे सादर करावा. ग्रामसभेची चित्रफित (व्हिडीओ रेकॉर्डिंग). विविध ठराव- ग्रामसभेद्वारे गाव निकडीचे ठराव, संस्था निवडीचा ठराव, सप्तसुत्री अंमलबजावणीचा ठराव, आदर्शगाव ग्राम समितीची निवड, ग्राम कार्यकर्ता निवडीचा ठराव (ग्राम कार्यकर्ता हा संस्थेशी संबधित नसावा.). प्रमाणपत्र- ग्रामपंचायतीचे लोकसंख्या प्रमाणपत्र, तलाठयाचे सिंचन व महसुली  क्षेत्र, विविधि ग्राम अभियानातील व गावात राबविल्या जाणा-या उपक्रमाबाबत उपक्रम राबविण्याबाबत येणा-या शासकिय यंत्रणा, कृषि विभागाचे पाणलोट विकास कामास 50 टक्केपेक्षा जास्त वाव असण्याचे प्रमाणपत्र, विविध अभियानात मिळालेले पुरस्कार, प्रमाणपत्राची सत्यप्रत, ग्रामपंचायताकडून मतदार संख्या प्रमाणपत्र, प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण स्वयंसेवी संस्था असल्यास परिशिष्ठ ब मध्ये नमूद सर्व संबधित प्रमाणपत्रे. प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण शासकिय यंत्रणा असल्यास ग्रामसभेचा ठराव आणि यंत्रणेची तयारी असल्याचे पत्र आवश्यक राहील असेही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

00000 

 वृत्त 

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी

- प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर

 

▪️ कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांच्याकडून या अभियानाचा गौरव

▪️ हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- शासनाशी संबंधित अनेक बाबींसाठी सर्वसामान्यांच्या गरजा निगडीत असतात. यात शासनाच्या विविध विभागांकडून मिळणारी प्रमाणपत्रे ही शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक असतात. ही कागदपत्रे मिळवतांना नागरिकांची दमछाक होऊ नये, विनासायास त्यांना त्यांची हक्काची प्रमाणपत्रे, कागदपत्रे मिळावेत यादृष्टिने आता जनतेला शासनाच्या दारात नाही तर शासन जनतेच्या दारात पोहचत आहे, ही या अभिनव योजनेची फलनिष्पती असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी केले.

 

हदगाव तालुक्यातील पिंपळगाव सर्कल येथे आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमात ते बोलत होते. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, सरपंच आडे, तहसिलदार विनोद गुंडमवार, तालुका कृषि अधिकारी जाधव, गटविकास अधिकारी आडेराव, बाबुराव कदम, भागवत देवसकर आणि एकात्मिक बालविकास, आरोग्य, महावितरण, मंडळअधिकारी, तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शासकीय व्यवस्थेमध्ये शासनाने जनसेवेसाठी, लोककल्याणकारी योजनांसाठी शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित केलेली आहे. जनतेच्या सेवेसाठी आम्ही आहोत ही भावना शासन आपल्या दारी अभियानातून प्रभावीपणे रुजली जात असल्याने या उपक्रमाचे विशेष कौतूक करावे लागेल, या शब्दात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी गौरव केला.

 

या अभियानात कृषि, महसूल, सीडीपीओ व इतर विभागासंदर्भात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या लाभार्थ्यांमध्ये रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, आरोग्य तपासणी, स्तनदा माता यांना पोषण आहार, कृषि विभागामार्फत प्रात्यक्षिकासाठी व इतर उद्देशाने बियाणांचे वाटप, शासकीय येाजनेतून ट्रॅक्टर ज्यांना मिळाले असा लाभाधारकांशी संवाद आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांच्या पात्रताधारक लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप लगेच करण्यात आले.

000000









  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...