Thursday, March 28, 2024

वृत्त क्र. 283

 वृत्त क्र. 283

निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ;

खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन

नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गंभीर अशी प्रक्रिया असून प्रत्येक कर्मचारी हा या काळात भारत निवडणूक आयोगाचे कान व डोळे आहेत. त्यामुळे उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून खर्चाचा सर्व तपशील योग्य पद्धतीने नोंदला जाईल याकडे लक्ष ठेवा, प्रत्येक कामाचे व्हिडिओ चित्रण काटेकोरपणे करा,असे आदेश आज नांदेड लोकसभा क्षेत्राचे निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी दिले.

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी ८५- भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दाक्षिण या तीन विधानसभेसाठी एक तर ८९- नायगाव, ९०- देगलूर, ९१- मुखेड या तीन अन्य विधानसभा क्षेत्रासाठी दुसरे असे दोन खर्च निवडणूक निरीक्षक म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी नांदेडसाठी नियुक्त करण्यात आले आहे. यापैकी खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जंगिड यांचे आगमन झाले असून दुसरे खर्च निवडणूक निरीक्षक मग्पेन भुटीया रात्री दाखल होणार आहेत.

आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन मध्ये आयोजित बैठकीत त्यांनी यावेळी निवडणुकीतील खर्चाच्या संदर्भातील सर्व यंत्रणांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वान्ने यांच्यासह विविध कक्षाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक ही अतिशय गंभीर प्रक्रिया असून गांभीर्याने पूर्ण प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असते. त्यामुळे विविध तपासणी पथकांनी पोलिसांच्या मदतीने रोकड,साहित्य, मद्य या संदर्भातील कोणतीही तस्करी जिल्ह्यात होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील हमरस्त्यांपासून गल्लीबोळातून होणाऱ्या वाहतुकीवर देखील लक्ष ठेवून तपासणी आणखी सक्रिय करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

 

उमेदवाराच्या प्रचाराच्या खर्चावर देखील यावेळी लक्ष ठेवण्याचे त्यांनी सांगितले उमेदवारांच्या जाहिराती, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवरील प्रचार - प्रसार,सोशल माध्यमांवरील प्रचार - प्रसार याबाबत गांभीर्याने लक्ष ठेवण्याचे त्यांनी सुचविले. प्रमाणीकरण केल्याशिवाय कोणीही जाहिराती प्रसारित करत असेल तर त्यावर माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समितीने लक्ष वेधण्याचे त्यांनी निर्देशित केले.

 

लोकसभा ही मोठी निवडणूक असून त्याचे गांभीर्य अनेक वेळा काही उमेदवारांना नसते. राजकीय पक्षांच्या विविध बैठकांमध्ये यापूर्वी ही निवडणूक लढणे व त्यासाठीच्या प्रक्रिया समजावून सांगण्याचा टप्पा पार पडला आहे. आता उमेदवाराच्या खर्चावर काटेकोर लक्ष देण्याची वेळ आली असून खर्च कसा नाही झाला, हे सिद्ध करणे उमेदवाराचे काम असते. योग्य खर्च व तपशील सादर न करणारे उमेदवारांवर गुन्हे दाखल होतात व त्यांना अनेक निवडणुका लढता येत नाही. त्यामुळे सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण करण्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी यापूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत झालेल्या प्रशिक्षणाचा आढावा घेतला. उपस्थित निवडणूक कर्मचाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांनी आतापर्यंत केलेल्या तयारीची देखील चाचपणी केली.

निवडणूक खर्च निरीक्षकांशी

कोणीही साधू शकतो संपर्क

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी ८५- भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दाक्षिण या तीन विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून दाखल झालेले डॉ. दिनेश कुमार जांगिड हे नांदेड विश्रामगृहाच्या व्हीआयपी रूम नंबर तीन येथे निवासी आहेत. जिल्ह्यातील सामान्य नागरिकापासून कोणीही त्यांना कार्यालयीन वेळेमध्ये भेटू शकतो. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणतीही तक्रार, गऱ्हाणी, सूचना तोंडी लेखी मांडू शकतो. त्यांचा मोबाईल क्रमांक ७७०९३०७८०९ आहे. निवडणुकीमध्ये होणाऱ्या पैशांच्या गैरव्यवहारापासून तर उमेदवारांच्या संदर्भात कोणतीही माहिती निरीक्षकांना दिली जाऊ शकते.

0000











 वृत्त क्र. 282

व्हाटस अॅपवर कर्मचाऱ्याकडून प्रचार नांदेड जिल्ह्यातील कर्मचारी निलंबित

नांदेड, दि. २८ : निवडणूक काळात आपल्या 'व्हाट्सअप ', ग्रुप वरून प्रचार करणे एका कर्मचाऱ्याला महागात पडले आहे.आचारसंहितेचा भंग करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला आज निलंबित करण्यात आले आहे. पंचायत समिती नायगाव येथील यु. एस. धोटे या वरिष्ठ सहाय्यकाला निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज जारी केले आहे.

'व्हाट्सअप 'द्वारे निवडणुकीच्या प्रचाराबाबतचा संदेश देऊन या कर्मचाऱ्याने आदर्श आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ मधील कलम ३व ४ कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या काळात निलंबनाची ही पहिली कारवाई ठरली असून आदर्श आचारसंहितेचा भंग कोणाकडूनही होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
000000

वृत्त क्र. 281

नांदेडमध्ये पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल

इच्छुकांकडून 50 अर्जांची कक्षातून उचल

नांदेड दि.२८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आज नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक अधिसूचना जारी झाली असून नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एक नामनिर्देशनपत्र दाखल  झाले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे नाव जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण आहे, अशी माहिती १६- नांदेड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा निवडणूक होत आहे.२८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. तर नांदेड लोकसभा निवडणुकीतील अंतीम एकूण उमेदवार हे आठ तारखेच्या रात्री निश्चित होईल.  

 ५० अर्जाची इच्छूकांकडून उचल
नांदेड लोकसभेची निवडणूक २६ एप्रिल रोजी घेण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला किंवा त्यांच्या सूचकाला नामनिर्देशनपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातील उमेदवार सहाय्य कक्षात मोफत उपलब्ध आहेत. आज पहिल्या दिवशी 50 कोरे फॉर्म उमेदवार सहाय्यता कक्षातून इच्छूकांनी घेतले आहे.

शनिवारी अर्ज घेता येईल
गुरुवार ४ एप्रिलपर्यत (सार्वजनिक सुट्टी व्यक्तीरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून इच्छूकांना कोरे अर्ज प्राप्त करता येतील.उद्या गुड फ्रायडे असल्यामुळे शुक्रवारला सुट्टी आहे. मात्र शनिवारी कार्यालय सुरू राहणार आहे. ११ ते ३ या कालावधीत अर्ज प्राप्त करणे अर्ज सादर करणे ही प्रक्रिया करता येणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.

 ५ एप्रिलला छाननी 
नामनिर्देशनपत्राची छाननी शुक्रवार 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवारांना सोमवार ८ एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यत देता येईल.

 प्रवेशासाठी ओळखपत्र अनिवार्य
उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या दिनांकापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांपासून तर उमेदवारी अर्ज दाखल करणे व अर्ज प्राप्त करण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना ओळख ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षापुढेच सहाय्यता कक्ष असल्यामुळे सकाळी ११ ते ३ या काळात अत्यावश्यक काम असल्याशिवाय या परिसरात प्रवेश बंदी आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ९.४५ वाजताच कार्यालयात स्थानापन्न होण्याची ताकीद निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे
 00000







महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...