Saturday, August 26, 2017

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 26  :- जिल्ह्यात रविवार 10 सप्टेंबर 2017 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
000000


अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी
संमतीपत्र भरुन देण्याचे आवाहन
मंगळवारी शोभायात्रेचे आयोजन
नांदेड दि. 26 :- राष्ट्रीय पातळीवर अवयवदान अभियानाचे 25 ते 30 ऑगस्ट या कालावधीत जनजागरण आयोजन करण्यात आले आहे. अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वांनी अवयावदानाचे संमतीपत्र भरुन दयावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासोबत मंगळवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ते डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहापर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी केले आहे.
अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी वयाच्या 5 व्या वर्षापासून शंभराव्या वर्षापर्यंत स्त्री-पुरुष अवयावदानाचे संमतीपत्र भरुन अवयवदान करु शकतात. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे जवळपास 8 ते 9 लोकांचे जीवन सुकर व आनंदी होते. त्यामध्ये हृदय, फुफुस, यकृत, स्वादुपिंड, डोळे, मुत्रपिंड, हाडे, त्वचा इत्यादी अवयवाचे दान करता येते. आपण जे निधनानंतर अमुल्य अवयव नष्ट करुन टाकतो.
अवयवदान  जीवनाच्या तीन वेगवेगळ्या टप्प्यात किंवा पायरीत करता येतात. व्यक्तीच्या मृतनंतर 6 तासाच्या आत डोळ्याचे, हाडाचे आणि त्वचेचे अवयवदान करता येते. जीवंतपणी स्वतः रक्ताच्या नातेवाईकास एक मुत्रपिंड, फुफुस, यकृताचा तुकडा इत्यादी दान करु शकतात. मेंदू मृत झाल्यावर हे रुग्ण अत्यावश्यक अतिदक्षता विभागात असतात त्यांचा मेंदू मृत आसतो आणि इतर सर्व अवयव हे चांगल्या स्वरुपात कार्यरत असतात. त्यामुळे ते अवयव इतर रुग्णांना दानाच्या स्वरुपात देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची संमती लागते. जे रुग्ण प्रतिक्षा यादीवर आहेत ज्यांना अवयावदानाची अती निकड आहे तसेच त्यांच्या आजाराचे स्वरूप इत्यादी बाबींची तपासणी करुनच त्यांना ते अवयव मोफत देण्याची शिफारस अवयव प्रत्यारोपण समिती करते.
अवयवदान झाल्यावर संबंधीत अवयवाचे नियोजीत ठिकाणी हवाई मार्गाने अथवा रेल्वेने घेऊन जाऊन त्या अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. यासाठी ग्रीन कॉरीडोअर निर्माण करावा लागतो. त्यासाठी जिल्हा पोलीस, जिल्हाधिकारी व वाहतूक विभागाचे सहकार्य लागते. कमीतकमी वेळात हे अवयव ज्या रुग्णांना प्रत्यारोपित करावयाचे आहे त्यांच्या पर्यंत पोहोचणे गरजेचे आसते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गुंटूरकर यांनी दिली आहे.

00000
जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 17.47 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 48.61 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यात शनिवार 26 ऑगस्ट 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 17.47 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्‍ह्यात  दिवसभरात एकुण 279.56  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 464.49 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात शनिवार 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय पुढील प्रमाणे असून  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 9.00 (713.14), मुदखेड- 25.67 (638.84), अर्धापूर- 11.33 (524.33), भोकर- 2.00 (477.50), उमरी- 42.33 (462.00), कंधार- 24.67 (461.18), लोहा- 27.00 (493.66), किनवट- 13.86 (436.72), माहूर- 9.50 (371.15), हदगाव- 6.00 (481.18), हिमायतनगर- 2.00 (357.82), देगलूर- 23.33 (285.99), बिलोली- 16.00 (419.40), धर्माबाद- 22.67 (446.33), नायगाव- 19.20 (427.86), मुखेड- 25.00 (434.71) आज अखेर पावसाची सरासरी 464.49 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 7431.81) मिलीमीटर आहे.

जिल्ह्यात वार्षिक सरासरी नुसार आतापर्यंत 48.61 टक्के एवढा पाऊस झाला आहे. तालुकानिहाय झालेला टक्केवारीत पाऊस पुढीलप्रमाणे. नांदेड 78.20 टक्के, मुदखेड- 74.84, अर्धापुर- 60.30, लोहा- 59.24, कंधार- 57.18, हदगाव- 49.24, मुखेड- 49.02, धर्माबाद- 48.75, भोकर- 47.92, नायगाव- 46.73, उमरी- 46.37, बिलोली- 43.32, हिमायतनगर- 36.61, किनवट- 35.22, देगलूर- 31.77,माहूर- 29.93 टक्के आहे.      
स्वच्छता पुरस्कारासाठी प्रस्ताव
सादर करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 26 :- नेहरु युवा केंद्राशी संलग्न असणाऱ्या ग्रामीण भागातील युवा मंडळ संस्था, महिला मंडळानी तालुकास्तरीय स्वच्छता पुरस्कारासाठी 18 सप्टेंबर पर्यंत विहित नमुन्यात प्रस्ताव नेहरु युवा केंद्र मालेगाव रोड नांदेड येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र नांदेड यांनी केले आहे.
सन 2016-17 चा प्रस्ताव सादर करताना पाणी पुरवठा, विहीर, परीसर स्वच्छता, गाळ काढणे, नदीकाठ स्वच्छता, गवत, जलपर्णी काढणे, वृक्षारोपण, वृक्षसंगोपन तत्सम कामे, स्वच्छता रंगरंगोटी, ग्रामस्वच्छता, मैदान स्वच्छ करणे, पाणी अडविण्यासाठी बंधारे, शोषखड्डे, शौचालय बांधकामास प्रोत्साहन देणे अशी कामे करणाऱ्या पात्र युवा मंडळ संस्था व महिला मंडळांना हा पुरस्कार देण्यात येतो.
पुरस्काराचे स्वरुप प्रथम पुरस्कार 8 हजार रुपये, द्वितीय 4 हजार रुपये रोख व गौरवपत्र देण्यात येते. तसेच ग्रामस्तरीय युवा सांसद कार्यक्रमांतर्गत 18 ते 30 वयोगटातील नवीन युवा मंडळांना 2 हजार 400 रुपये तसेच संलग्नीत युवा मंडळ, संस्था, महिला मंडळांना 700 रुपये ( सन 2015-16 पर्यंतचे)  देण्यात येणार आहे, अशी माहिती नेहरु युवा केंद्र नांदेड यांनी दिली आहे.  

000000








फोटो ओळी :-

नांदेड नगरीत गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर आता आगमन होणार आहे, ते गौरीचे (महालक्ष्मी) हनुमानपेठ (वजिराबाद) भागात उत्कृष्ट, सुंदर, सुबक, विलोभनीय गौरींच्या मुर्ती बाजारात आल्या आहेत. ( छाया : विजय होकर्णे नांदेड )
 लेख क्र. 11                                                                                      दि. 24 ऑगस्ट 2017
        महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड
--------------------------------------------------------------------------------------------------------------

 अवयवदान : एक सामाजिक कार्य
                                                                                                                                            अनिल आलुरकर,
जिल्हा माहिती अधिकारी,
नांदेड
          
 अवयवदानाला चालना मिळावी याकरीता राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन जनजागृतीसाठी महा अवयवदान महोत्सव-2017 हा दिनांक 29 ऑगस्ट, 2017 ते 30 ऑगस्ट, 2017 दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवू या ! असा जर विचार मनात आणला तर समाजातील हजारो नागरिक या अवयवदान अभियानात स्वत:हून सहभागी होतील, अवयवदानाचा अर्ज भरतील. याचाच एक भाग म्हणून अवयवदानाचे महत्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.

             अवयवदान प्रत्यारोपणाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. एखाद्या चांगल्या व्यक्तीने जवळच्या नातेवाईकांस किडनी, यकृत दिले तर त्याच्या शरिरावर काही परिणाम होईल का? अवयव पुन्हा निर्माण होऊ शकतो का? असे काही प्रश्न आहेत. खरे तर वैद्यकीय शास्त्राने मोठी प्रगती केली असून प्रत्यारोपण प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक केली जाते. किडनी, हृदय, फुफ्फुस, यकृत, डोळे आदी अवयवांचे यशस्वीपणे प्रत्यारोपण झाल्याचे आपण माध्यमातून वाचतो. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही.
             रुग्ण दवाखान्यात भरती झाला म्हणजे त्याचे अवयव काढून घेणे, अनाथ मुले, व्यक्ती, भिकारी यांना पकडून अवयव काढून घेणे, पैशाचे आमिष दाखवून अवयव काढणे अशा प्रकारच्या घटनांमध्ये काही डॉक्टर्स व अवयवांची तस्करी करणारी माणसे सहभागी होती. त्यामुळे माणसे अपंग व्हायची, मरायची. अशा अवयव प्रत्यारोपणामध्ये गरजूंना फायदा व्हावा, त्या प्रक्रियेतील धोका कमी होऊन सुरक्षित प्रत्यारोपण होण्यासाठी मानवी उपचाराकरिता व अवयवांची व्यावयायिक विक्री थांबावी म्हणून केंद्र सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-1994 लागू केला. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 मध्ये अंमलात आल्यानंतर आजपर्यंत 11364 किडनी, 468 लिव्हर, 19 हृदय, 3 फुफ्फुसांचे आणि 479 डोळ्यांचे प्रत्यारोपण करून रुग्णांना नवे जीवन देण्यात आले आहे. आताच्या स्थितीत संपूर्ण देशामध्ये सुमारे 5 लाख मुत्रपिंड, 50 हजार यकृत व 2000 हून अधिक हृदय विकारांनी ग्रस्त रुग्ण असून ते अवयव दात्याच्या प्रतिक्षेत आहेत. प्रत्यक्षात ही आकडेवारी अधिक असून त्यात रोजच्या रोज वाढच होत आहे
             या प्रत्यारोपण कायद्यानुसार कोणत्याही नोंदणीकृत संबंधित डॉक्टरला कुठल्याही व्यक्तीचे अवयव काढणे, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यापुर्वी त्याचे परिणाम, धोके याची माहिती रुग्णास व त्याच्या नातेवाईकास दिली पाहिजे. या कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयातच शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर पीडित रुग्णासाठी अवयव देणारी व घेणारी व्यक्ती जवळचे नातेवाईक असणे गरजेचे असते. जर असे नातेवाईक नसतील तर प्रत्यारोपण समितीची परवानगी घेणे आवश्यक असते. या समितीतील सदस्यांकडून सखोल तपासणी केल्यानंतरच प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा होतो. त्याचबरोबर ज्या रुग्णावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची व तो जेथे दाखल आहे त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रत्यारोपण प्राधिकरण समितीला संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच संपूर्ण राज्यातील अवयवदान समन्वय करण्यासाठी मुंबई येथे झोनल ट्रान्सप्लांट कॉ-ऑर्डिनेशन सेंटर उभे करण्यात आले आहे. या सेंटरच्या औरंगाबाद पुणे, नागपूर येथे शाखा सुरू करण्यात आल्या असून अवयवदान प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचे काम केले जाते. मोठ्या शहरातील कोणत्या रुग्णालयात किती गरजू रुग्णांना अवयवाची गरज आहे. दाते कोण आहेत, याची संपूर्ण माहिती या शाखांमध्ये उपलब्ध आहे.
             प्रत्येक अवयवाच्या प्रत्यारोपणासाठी काही नियम केलेले आहेत. उदा. किडनी अवयवदानाबाबत नियम आहे की, किडनी दात्याला महिनाभर डायलिसिसवर ठेवावे लागते. पती-पत्नी किंवा रक्ताचे नातेवाईक एकमेकांना किडनी देऊ शकतात. तसेच किडनी दात्याला हा अवयव किती महत्त्वाचा आहे व तो काढल्याने शरिरावर काय काय परिणाम होतात याची संपूर्ण लेखी माहिती द्यावी लागते
             प्रत्यारोपण करण्यापूर्वी रुग्ण व अवयवदाता यांचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधावाटप पत्रिका आदी कागदपत्रे तपासली जातात. तसेच रक्ताचे नाते ओळखण्यासाठी जन्माचा दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रेशनकार्ड आदी पुराव्याची शहानिशा करावी लागते. ज्या रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे तेथील समन्वयक ही सर्व कागदपत्रे तपासतो. त्यानंतर प्रत्यारोपण प्राधिकरण समितीपुढे सादर करतो व त्यानंतरच प्रत्यारोपणाची परवानगी मिळते.
          अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रिया अतिशय पारदर्शी ठेवावी असा नियम आहे. उदा.प्रत्यारोपण प्राधिकरण समितीकडे विविध रुग्णांची यादी असते. किती रुग्णांना कोणत्या अवयवांची गरज आहे हे नमूद असते. त्यासाठी प्रतिक्षा यादीतीलच रुग्णांना अवयवदान केले जाते. या प्रत्यारोपण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टर्स आणि त्या रुग्णालयाला लाखो रुपयांचा दंड आकारल्या जाऊ शकतो. तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास डॉक्टरांनाही तुरुंगाची हवा खावी लागते.
           सध्या मुंबई शहरात जवळपास 35 रुग्णालयांनी अवयवदान प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली आहे. त्यात महानगरपालिका, सरकारी रुग्णालये, तसेच काही खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. जगामध्ये स्पेन हा देश अवयवदानात पहिल्या क्रमांकावर असून इंग्लंड, अमेरिका, हाँगकाँग, जपान आदी देशात एक लाख मृत्यूच्या मागे 50 जण अवयवदान करतात. त्या प्रमाणात भारतात हे प्रमाण खूपच कमी आहे.
          अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून रुग्णांना चांगल्या सोयी सुविधा मिळत आहेत. समाजामध्ये देखील नवनवीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया, नवे उपचार याबाबत उत्सुकता असते. कुठल्याही आजारावर मात करण्याची किमया वैद्यकीय क्षेत्राने केली आहे. आजार कितीही गंभीर असो, नवे संशोधन, नव्या उपचार पद्धतीमुळे तो बरा होण्याची शक्यता ९५ टक्क्यापर्यंत गेली आहे. वैद्यकीय शास्त्राचे हे मोठे यश म्हणावे लागेल.
           पूर्वी रक्तदान, नेत्रदान करण्यास सहजासहजी कुणी व्यक्ती पुढे येत नव्हती. आता एवढी जनजागृती झाली की अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरे होताना दिसतात. नेत्रदानासाठीही लोकांचा सहभाग वाढलेला आहे. तशाच प्रकारे जगभर अवयव दानाचे महत्त्व वाढताना दिसत आहे. काहीजण देहदान करून समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवताना पाहतो. अवयवदान म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते, किंवा ज्या व्यक्तींचा मेंदू डेड होतो. तेव्हा त्या व्यक्तीच्या शरिरातील किडनी, हृदय, यकृत, डोळे, फुफुसे, स्वादुपिंड व त्वचा हे अवयव देणे होय. एखादी आजारी व्यक्ती आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवते की, माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर दवाखान्यात द्या, देहदान करा किंवा शरिरातील किडनी, यकृत डोळे, त्वचा गरजू रुग्णांना द्या. तेव्हा गरजू रुग्णांवर डॉक्टर्स या अवयवाचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करतात. त्यामुळे कुणाला किडणी मिळते तर कुणाला डोळे! किडनी, लिवरमुळे जीवनदान मिळते. मरणाच्या अवस्थेत असलेली माणसे पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतात. हे मोठे सामाजिक कार्य म्हणावे लागेल.
            धडधाकट माणसे अपघातात मृत्यू पावतात. कुणाला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होतो. कुणाला स्मृतीभ्रंश होतो, अशावेळी त्यांच्या शरिरातील अवयव गरजूंना देणे याच्याशिवाय मोठे कार्य नाही. माणसे मरतात तेव्हा आपण एकतर त्यांना जमिनीत पुरतो नाहीतर जाळतो. तेव्हा शरिरातील चांगले अवयव नष्ट होतात. त्यापेक्षा त्यांच्या अवयव दानामुळे गरजू रुग्ण जर मरणाच्या दारातून परत येणार असेल व तो पुढे चांगले आयुष्य जगणार असेल तर अवयवदानासारखे महान काम नाही.
             सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारावर उपचार होतात. अवयवदानाद्वारे लाईव्ह ऑर्गन डोनेशनद्वारे किडनी, लिव्हर, प्रत्यारोपण करण्यात येते. सध्या राज्यभरात जवळपास बारा हजारापेक्षा नोंदणीकृत रूग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत असून ही संख्या वाढतच आहे. शरिरातील अवयवांना कुठलाही धर्म, जात नसते. एका धर्माची व्यक्ती दुसऱ्या जाती धर्माच्या व्यक्तीला अवयव दान करू शकते. अशी अनेक उदाहरणे समाजासमोर आहेत. कुणाला किडनीची गरज होती, कुणाला यकृताची तर कुणाला डोळ्यांची ! एकमेकांना अवयवदान करताना त्यांनी फक्त माणुसकी पाहिली! अशी हजारो उदाहरणे आहेत. अवयव प्रत्यारोपण करून ते आपले पुढील आयुष्य सुखा-समाधानाने जगत आहेत.


डबेवाल्यांचा अवयवदानाचा संकल्प
         अवयवदानाचे महत्त्व नागरिकांना कळावे म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनी पुढाकार घेतला आहे. सुमारे शंभर डबेवाल्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय जाहिर करून अर्ज भरला. एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यावर त्याच्या शरिरातील महत्वाचे अवयव नष्ट होतात, परंतु अंत्यसंस्कारापूर्वी त्या मृत झालेल्या व्यक्तीचे अवयवदान केल्यास अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. म्हणून अशावेळी वारसांनी पुढे येऊन अवयवदान केले पाहिजे, असे आवाहन डबेवाल्यांनी केले आहे.
    
           अवयवदान एक चळवळ म्हणून उभी राहत आहे. लोकांना या दानाचे महत्त्व कळू लागले आहे. आपले बदलते जीवन चक्र पाहता, त्याचबरोबर निसर्ग पर्यावरणातील बदल, आहारातील चटपटीत, तेलकट, खाद्य पदार्थाचा समावेश, व्यायामाचा अभाव, जंक फूडचे आकर्षण यामुळे शरीरामध्ये अनेक व्याधी निर्माण होत आहेत. तरूण वयात अनेक अवयव निकामी होत आहेत. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनी आजार, यकृतात बिघाड अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही आजार असे आहेत की, त्याचे उशीरा निदान होते. जेथे लवकर उपचार करायला हवे तेथे खूप उशीर झालेला असतो. बऱ्याचदा उपचाराची माहिती नसणे, डॉक्टरांची सोय नसणे, आर्थिक अडचण यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. म्हणूनच वेळीच निदान झाले तर अवयव प्रत्यारोपण करून आपले आयुष्य आपण सुखाने, आनंदाने अधिक काळ जगू शकतो!
           अवयवदान कुणीही करू शकते. आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत. मुलाने वडिलांना किडनी दिली. बहिणीने भावाला दिली. मुलाने वडिलांना यकृत दिले. तर फ्राँन्सिसच्या हृदयामुळे हरिप्रसादला जीवनदान मिळाल्याचे ऐकतो. कुठे ऋषिकेशच्या किडनीमुळे इब्राहिमचे आयुष्य फुलले अशा बातम्या वाचतो. अवयवदानाला ना जात आडवी येते ना धर्म! म्हणूनच अवयवदान हे जात-धर्मापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे.
           अवयवदानाची प्रक्रिया सोपी आहे. अवयवदानाचा फॉर्म भरला असेल तर, एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यास, किंवा एखादा ब्रेनडेड झाल्यास नातेवाईकांच्या इच्छेनुसार सहा तासाच्या आत अवयवदान करता येते. किमान तीन वर्षे ते अधिक वयाच्या व्यक्तीचे अवयवदान केले जाऊ शकते. म्हणूनच आपल्या मृत्यूनंतर दुसऱ्यांसाठी अवयवदान करुन त्यांचे जीवन समृद्ध करूया. अवयवदानाचा फॉर्म भरुया!
            ही अवयवदानाची प्रक्रिया आता कायद्यामुळे अधिक सुरक्षित झाली आहे. मानवी उपचाराकरिता तसेच मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री होऊ नये म्हणून मानवी अवयव काढणे, जतन करणे, प्रत्यारोपण करणे यासाठी केंद्र सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ लागू केला आहे. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवू या ! असा जर विचार मनात आणला तर समाजातील हजारो नागरिक या अवयवदान अभियानात स्वत:हून सहभागी होतील. अवयव दानाचा अर्ज भरतील यात शंका वाटत नाही.
                                                                                                00000


  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...