Saturday, August 26, 2017

अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी
संमतीपत्र भरुन देण्याचे आवाहन
मंगळवारी शोभायात्रेचे आयोजन
नांदेड दि. 26 :- राष्ट्रीय पातळीवर अवयवदान अभियानाचे 25 ते 30 ऑगस्ट या कालावधीत जनजागरण आयोजन करण्यात आले आहे. अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वांनी अवयावदानाचे संमतीपत्र भरुन दयावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासोबत मंगळवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ते डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहापर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी केले आहे.
अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी वयाच्या 5 व्या वर्षापासून शंभराव्या वर्षापर्यंत स्त्री-पुरुष अवयावदानाचे संमतीपत्र भरुन अवयवदान करु शकतात. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे जवळपास 8 ते 9 लोकांचे जीवन सुकर व आनंदी होते. त्यामध्ये हृदय, फुफुस, यकृत, स्वादुपिंड, डोळे, मुत्रपिंड, हाडे, त्वचा इत्यादी अवयवाचे दान करता येते. आपण जे निधनानंतर अमुल्य अवयव नष्ट करुन टाकतो.
अवयवदान  जीवनाच्या तीन वेगवेगळ्या टप्प्यात किंवा पायरीत करता येतात. व्यक्तीच्या मृतनंतर 6 तासाच्या आत डोळ्याचे, हाडाचे आणि त्वचेचे अवयवदान करता येते. जीवंतपणी स्वतः रक्ताच्या नातेवाईकास एक मुत्रपिंड, फुफुस, यकृताचा तुकडा इत्यादी दान करु शकतात. मेंदू मृत झाल्यावर हे रुग्ण अत्यावश्यक अतिदक्षता विभागात असतात त्यांचा मेंदू मृत आसतो आणि इतर सर्व अवयव हे चांगल्या स्वरुपात कार्यरत असतात. त्यामुळे ते अवयव इतर रुग्णांना दानाच्या स्वरुपात देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची संमती लागते. जे रुग्ण प्रतिक्षा यादीवर आहेत ज्यांना अवयावदानाची अती निकड आहे तसेच त्यांच्या आजाराचे स्वरूप इत्यादी बाबींची तपासणी करुनच त्यांना ते अवयव मोफत देण्याची शिफारस अवयव प्रत्यारोपण समिती करते.
अवयवदान झाल्यावर संबंधीत अवयवाचे नियोजीत ठिकाणी हवाई मार्गाने अथवा रेल्वेने घेऊन जाऊन त्या अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. यासाठी ग्रीन कॉरीडोअर निर्माण करावा लागतो. त्यासाठी जिल्हा पोलीस, जिल्हाधिकारी व वाहतूक विभागाचे सहकार्य लागते. कमीतकमी वेळात हे अवयव ज्या रुग्णांना प्रत्यारोपित करावयाचे आहे त्यांच्या पर्यंत पोहोचणे गरजेचे आसते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गुंटूरकर यांनी दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...