Wednesday, January 10, 2018

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2017 साठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नांदेड, दि. 10 :- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याच अंतिम मुदत बुधवार 31 जानेवारी 2018शी आहे.
            स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा  www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.  
 राज्यस्तरीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे- बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू), यशवंतराव चव्हाण पुरस्कार - शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे- अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद विभाग) (लातूरसह), आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग), नानासाहेब परूळेकर पुरस्कार (पुणे विभाग), शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग), ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग), ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) तर दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) (51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.) या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000
 केळी, हरभरा पीकासाठी कृषि संदेश  
नांदेड, दि. 10 :- केळीच्या पानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आकाराने जास्त असेल तर त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर होत असल्याने जास्तीतजास्त पाने कार्यरत ठेवण्यासाठी फक्त पानाचा रोगग्रस्त भाग काढून बागेबाहेर नेऊन नष्ट करावा. पानावरील लहान-लहान तपकिरी ठिपके वाढून एकत्र होतात. त्यामुळे मोठा ठिपका होऊन पानाचा जास्त भाग रोगग्रस्त होतो. त्यासाठी झाडावर प्रोपिकोनेझॉल 0.05 टक्के (0.5 मिली) मिनरल ऑईल 1 टक्के ( 10 मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तसेच हरभरा घाटेअळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, फवारणी करावी. मर रोग नियंत्रणासाठी कार्बेडेझीम 50 डब्ल्यु पी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000
राष्ट्रीयकृत बॅकेच्या सहकार्याने
विविध व्यवसायासाठी कर्ज योजना
नांदेड, दि. 10 :- शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक यांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या सहकार्याने राबवण्याची कर्ज योजना सन 2017-18 करीता प्रकल्प खर्च एक लाख रुपयाच्या आतील विविध व्यवसायासाठी शाखा कार्यालय व जिल्हानिहाय लाभार्थी लक्षांक निश्चित केले आहे, अशी माहिती शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ किनवटचे शाखा व्यवस्थापक यांनी दिली आहे.
यामध्ये किनवट शाखा कार्यालयाच्यावतीने नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यासाठी प्रत्येकी, पिठाची गिरणी युनिट  संख्या-9, पेपर डिश बनविणे / ज्यूस सेंटर- 9, दुग्ध व्यवसाय युनीट- 15, तंबू सजावट व लाऊड स्पीकर केंद्र- 2, थ्रेशर युनीट-9, ऑटो वर्कशॉप-5, किराणा दुकान- 5, कापड दुकान-9, इलेक्ट्रिक दुकान-9, खाद्य उद्योग (पापड, मसाला, शेवाळ्या)-2, कटलरी दुकान-2 यांचा समावेश आहे. या व्यवसायाव्यतिरिक्त लाभार्थीच्या पसंती, मागणीनुसार इतर कोणत्याही वर्धनक्षम ( नियमित उत्पन्न देणारा ) व्यवसायासाठी कर्ज उपलब्धतेसाठी शिफारस करण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची
22 जानेवारीला बैठक, तक्रारी देण्याचे आवाहन
नांदेड, दि. 10 :- जिल्ह्यातील  शासनाच्या  कोणत्याही  कार्यालयामध्ये  चालू  असलेल्या  किंवा आजपर्यंत  केल्या  गेलेल्या  भ्रष्टाचाराबाबत  कोणाची  काही  तक्रार  असल्यास  अथवा एखाद्या कार्यालयामध्ये होत असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी  स्वरुपात  तक्रार सोमवार 22 जानेवारी 2018 रोजी आयोजित  जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीच्या  बैठकीत  सादर  करावी , असे  आवाहन नांदेड जिल्हाधिकारी  तथा  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीचे  अध्यक्ष  यांच्यावतीने  करण्यात  आले.    
येथील  जिल्हाधिकारी कार्यालयातील  जिल्हाधिकारी  यांचे निजी कक्षात सोमवार 22 जानेवारी 2018 रोजी  दुपारी 4 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत  निवेदन  लेखी  स्वरुपात  प्रत्यक्ष  उपस्थित  राहून  सादर  करावे  लागेल.  हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मूलन  समिती  नांदेड  या  नावाने  सबळ  पुराव्यासह  दोन  प्रतीत  सादर  करावे  लागेल.
या  बैठकीसाठी  सर्व  विभागांचे  प्रमुख  अधिकारी  उपस्थित  राहणार   असल्यामुळे  आपल्या  निवेदनाची तातडीने दखल  घेवून  शासनाच्या  नियमानुसार   भ्रष्टाचार  करणाऱ्या  अथवा भ्रष्टाचारास  वाव  देणाऱ्या  जबाबदार  अधिकारी  व कर्मचारी  यांच्याविरुध्द  कार्यवाही  करण्यात  येईलअसे  आवाहनही  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीतर्फे  करण्यात  आले आहे.

00000
सण, उत्सवात ध्वनी वापराची
अधिसूचना निर्गमीत 
नांदेड, दि. 10 :-  ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2018 साठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केली आहे.
या अधिसूचनेत म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 173 / 210 दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेला आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन 1 मे, दिवाळी, ईद-ए-मिलाद, ख्रिसमस, 31 डिसेंबरसाठी एक दिवस. गणपती उत्सव दोन दिवस (पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव तीन दिवस ( पहिला दिवस, अष्टमी व नवमी ) तर  उर्वरित तीन दिवस ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या शिफारशी नुसार जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले जाईल.
या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधीत महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांनी ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत प्राप्त तक्रारीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर सण उत्सव समाप्तीनंतर लगेच जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ही अधिसूचना आदेश 1 जानेवारी 2018 रोजीपासून नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे, असेही अधिसूचनेत नमुद केले आहे.

000000
लोहा येथील जमीन खरेदीसाठी   
समाज कल्याणचे आवाहन
नांदेड, दि. 10 :- लोहा येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी लगतची खाजगी जमीन शासकीय दराने खरेदी करावयाची आहे. जमीन विक्रेत्यांना शासनास जमीन विक्री करावयाची आहे त्यांनी सात/बारा उतारा व जमीन मालकाचे संमतीपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड  या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण नांदेडचे सहाय्यक आयुक्त बी. एन. वीर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत लोहा येथील शहरावास्तव्य करीत असलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्पन्नाचे  स्त्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी ग्रामीण भागा या योजनेद्वारे लाभार्थी कुटुंबांना विविध शासकीय योजनाद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी  लोहा शहरात अथवा शहरा लगतची पाच एकर खाजगी निर्विवाद जमीन शासकीय दराने खरेदी करावयाची आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...