Monday, February 24, 2025

वृत्त क्रमांक 224

 मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेतील अखर्चित रकमांचा आढावा 

नांदेड दि. 24 फेब्रुवारी :- इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे येथील संचालक यांच्या निर्देशानुसार आज इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या उपसंचालक श्रीमती गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागास बहुजन कल्याण येथे मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०२३-२४ यावर्षातील अखर्चित रक्कमांचा आढावा घेण्यात आला.  शिल्लक असलेल्या रक्कमा जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी अर्ज मागणी करुन खर्च कराव्यात, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.


तसेच 2024-25 मधील इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे प्रस्ताव हे संबंधित मुख्याध्यापक यांचेकडुन मागवुन गटशिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या शिफारसीने तात्काळ सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे शिफारशीसह सादर करण्याबाबत सूचित केले. या आढावा बैठकीमध्ये सन 2023-24 यावर्षातील प्राप्त तरतुद व झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन शिल्लक असलेल्या रक्कमा खर्च करण्याबाबतही सुचित केले.

 

त्यानुसार तांडावस्ती सुधार योजनामोदी आवास योजनापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना व इत्यादी योजनेचा आढावा घेण्यात आला.
याबैठकीस इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगीरेजिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी डी.एच.राजेमोडसहायक लेखाधिकारी राहुल शेजुळ, शिक्षणविस्तार अधिकारी बस्वदे, शिक्षण अधिकारी (योजना) यांचे प्रतिनिधी शिंगडे, इतर मागास बहुजन कल्याण निरिक्षक आर.डी.सुर्यवंशी तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सर्व योजनेची तरतूद 15 दिवसात खर्च 
करण्याबाबत  निर्देश देण्यात आले.

00000




  विशेष वृत्त क्रमांक 223

महसूलमधूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नांदेड दि.२४ फेबुवारी : करिअरच्या धावपळीत आपल्या अंगीभूत कलागुणांना मागे ठेवावे लागते.त्यामुळे महसूल विभागातील खेळाडूंना मिळालेली ही संधी असून कामाचे नियोजन करून कला, क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करावे.महसूल मधूनही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना गवसणी घालणारे क्रीडापटू तयार झाल्यास मला अधिक आनंद होईल, अशी अपेक्षा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

काल रविवारी रात्री राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.21, 22 व 23 फेब्रुवारीला आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप त्यांच्या हस्ते झाला.

यावेळी आपल्या संबोधनात त्यांनी क्रीडा व कलाक्षेत्रातील गुणवंतांना नोकरी बढतीमध्ये प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले. महसूल मधून ऑलिंपिकला गवसणी घालणारा एखादा खेळाडू तयार झाल्यास तो आनंदाचा क्षण असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महसूल मंत्री खास महसूल कर्मचाऱ्यांच्या आग्रहास्तव आपल्या व्यस्त कार्यक्रमात नागपूर वरून नांदेड येथे समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित झाले.यावेळी महसूल मधील विविध संघटना, कर्मचारी संघटना, वरिष्ठ अधिकारी यांनी देखील आपल्या मागण्या त्यांच्या समोर सादर केल्या.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रामुख्याने इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार डॉ.अजित गोपछडे,आ.बाबुराव कदम कोहळीकर, आ. तुषार राठोड,आ. राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलिप गावडे, विशेष पोलीस महानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी, महसूल मधील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महसूलच्या आकृतीबंध पासून तर महसूल मधील नोकर भरतीपर्यंत अनेक विषयांवर तातडीने निर्णय घेण्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच महसूल विभागाच्या आस्थापनांमध्ये वाढ करण्याचे प्रस्ताव आहेत. राज्यात अनेक ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अपर तहसीलदार कार्यालय, यासोबतच लातूर किंवा नांदेडमध्ये विभागीय महसूल आयुक्तालय करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल खात्यातील मोक्याच्या पोस्टिंग आता कुणाच्या शिफारसीने नाही तर मेरीटवर होतील, असे सांगताना त्यांनी महसूलमध्ये जवळपास 15 नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, 65 अप्पर तहसीलदार कार्यालय तयार करण्याचे प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले. |

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करावे. शासनाला आपल्याकडच्या अशा नाविन्यपूर्ण कल्पनांची माहिती द्यावी. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. महसूल विभागातील सुनावण्या घेताना AI चा वापर पुढील काळात होईल, सुनावण्यामध्ये AI तंत्र अतिशय उपयोगी ठरणार असून, निकालपत्रासाठी AI ची मदत घेऊ अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

गेल्या 10 वर्षात 12 हजार प्रकरणे महसूल विभागात निर्णयासाठी पडून आहेत. रोज 100 सुनावण्या घेतल्या तरी ते कमी होणार नाहीत, त्यामुळे AI ची मदत घेणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.

नांदेड येथे १२ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आयोजित क्रीडा स्पर्धासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व टीमचे त्यांनी अभिनंदन केले. राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी एक कोटी अनुदान दरवर्षी देणार
व दरवर्षी राज्यस्तरीय महसूल क्रीडा महोत्सव होईल, अशी घोषणा उपस्थित खेळाडूच्या समक्ष केली.

यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले ,निलंबन आणि वेतनवाढ रद्द करण्याच्या फाईलवर निर्णय घेण्याची वेळ महसूल मंत्र्यांवर आणू नका, इतके चांगले कामकाज ,जनतेशी समन्वय, कार्यालयीन शिस्त आणि पारदर्शी राहा, महसूल हा महाराष्ट्राचा चेहरा आहे. महसुल खाते क्रमांक एकचे राहील यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी त्यांच्या हस्ते विभागीय स्पर्धेतील विजेते कोकण विभागाला प्रथम, दुसरा क्रमांक यजमान छत्रपती संभाजी नगरला तर पुणे विभागाला तिसरा क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद बहाल करण्यात आले.
00000


















 वृत्त क्रमांक 222

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात

ए‍क वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती 

नांदेड दि. 24 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2025-26 या सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील आयटीआय/अभियांत्रिकी पदवी, पदवीका उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्याव्यतीरीक्त इतर जिल्हयातील आयटीआय/अभियांत्रिकी पदवी, पदवीका उत्तीर्ण उमेदवारांचा अर्ज व मागील तीन वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

यात मेकॅनिक मोटर व्हेईकल -45, मेकॅनिक डिझेल- 42,  शिट मेटल वर्क्स-18, ॲटो इलेक्ट्रीशियन-6, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनर-8, पेंटर(जनरल) -4, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-04, अभियांत्रिकी पदवी, पदविका (मेकॅनिकल ॲटोमोबाईल मेकॅनिक /इंजिनीअर)-2 अशी एकुण 129 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. (अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व दिव्यांगासाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षीत आहेत.) 

त्यासाठी आयटीआय उत्तीर्ण किंवा शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणाऱ्या विहीत केलेल्या व्यवसायाचे व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व अॅटो इंजिनिअरींग टेक्निशिअन कोर्स उत्तीर्ण उमेदवारांना www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर स्वत: चे रजिस्ट्रेशन करावे अभियांत्रिकी पदवी, पदवीका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी NATS पोर्टलवरील www.mhrdnats.gov.in या वेबसाईटवर स्वत:चे रजिस्ट्रेशन करावे. व रजिस्ट्रेशन झाल्यावर एमआरटीसी डिव्हीजन नांदेड या आस्थापनेकरीता ऑनलाईन अप्लाय करुन रा.प. महामंडळाने विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन सादर करणे आवश्यक राहील. हे छापील अर्ज 27 फेब्रुवारी ते 10 मार्च 2025 रोजी 3 वाजेपर्यंत शनिवार, रविवार व सुटटीचा दिवस विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा.प.नांदेड येथे मिळतील व लगेच स्वीकारले जातील. या अर्जाची किंमत खुल्या प्रवगाकरीता 590 रुपये व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी जातीचा दाखला सादर केल्यास 295 रुपये आहे.

00000

वृत्त क्रमांक 221

शुक्रवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

यशवंत महाविद्यालयात आयोजन 

नांदेड दि. 24 फेब्रुवारी :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10  वा. यशवंत महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक व इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10  वा. यशवंत महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

00000



 विशेष वृत्त क्रमांक 220

राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांमुळे नांदेडच्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ 

 नांदेडच्या खेळाडूंनी सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड दि. २४ फेब्रुवारी : नांदेडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात मोठी भर पडली आहे. या भव्य स्पर्धेच्या आयोजनामुळे क्रीडाविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली असून, नांदेड आता महाराष्ट्रातील एक प्रमुख क्रीडा केंद्र म्हणून उदयास येत आहे.

स्पर्धेसाठी अत्याधुनिक मैदाने,धावपट्टी, जलतरण तलाव आणि इनडोअर क्रीडागृहे अद्ययावत करण्यात आली.स्पर्धेनंतर स्थानिक क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंनी या सुधारित सुविधांचा लाभ घेत क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची संधी मिळू शकते , त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

काल राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्याला स्पोर्ट हब बनविण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्या खेळाडूंपर्यंत पोहोचाव्यात.त्यातून उत्तमात उत्तम खेळाडू मिळावे,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

 या स्पर्धेमुळे स्थानिक प्रशासन आणि क्रीडा संघटनांचे लक्ष नांदेडच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासाकडे वेधले गेले आहे. यापुढेही अशा मोठ्या स्पर्धा आयोजित करून नांदेडला महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर अधिक महत्त्वाचे स्थान मिळावे, अशी अपेक्षा आहे.

 राज्यस्तरीय स्पर्धांमुळे या मैदानांचे अद्यावतीकरण 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय इनडोअर हॉलमध्ये बॅडमिंटन आणि टेबल टेनिस, तसेच बुद्धिबळाचे प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. तसेच आउटडोरला बास्केटबॉलची दोन मैदाने आणि स्केटिंग रिंग अंतर्गत दोन्ही प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे, ही सुविधा अद्यावत झाली.

श्री.गुरुगोविंद सिंघ जी स्टेडियममध्ये क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार आहे. या मैदानावरील स्टेडियम वरील रंगरंगोटी करण्यात आली तसेच आऊटफिल्ड अद्यावत करण्यात आले.

इंदिरा गांधी मैदान, मनपा,या ठिकाणी खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रो बॉलचे मैदान तयार झाले.

सायन्स कॉलेजच्या अथलेटिक्स ट्रॅक, व्हॉलीबॉलचे मैदान, खो -खो चे मैदान,इन्डोअर व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस,त्याचबरोबर आऊटडोरला लॉन टेनिसचे मैदान अद्यावत झाले. 

पीपल्स कॉलेजचे फुटबॉल मैदान, बास्केटबॉल कोर्ट तयार आहेत.

नांदेड क्लबच्या ठिकाणी लॉन टेनिसचे मैदान उपलब्ध आहेत.

खालसा स्कूल या ठिकाणी हॉकीचे मैदान उपलब्ध आहे.

दशमेश स्कूल या ठिकाणी हॉकीचे टर्फचे मैदान उपलब्ध आहे.

श्री स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठातील 400 मीटर ट्रॅक व सर्व खेळाचे मैदान यामध्ये व्हॉलीबॉल खो -खो खेळाचे मैदान अद्ययावत झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी ही अद्यावत झालेली मैदाने पुढेही अशाच पद्धतीने खेळाडूंना उपलब्ध होईल. यासाठी सर्व स्थानिक प्रशासनांनी त्याची निगा राखावी, असे आवाहन केले आहे. 

राज्यस्तरीय खेळांमुळे राज्य व राजकीय खेळांना योग्य ठरेल अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असून खेळाडूंनी कसून सराव करून आपल्या शहराचे देखील नाव मोठे करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

00000













वृत्त क्रमांक 224   मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेतील अखर्चित रकमांचा आढावा   नांदेड दि. 24 फेब्रुवारी :-  इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय...