Tuesday, May 2, 2023

 मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव समितीतर्फे

जिल्ह्यात सांस्कृतिक व लोकोत्सवाचे आयोजन
- खासदार प्रताप पाटील चिखलीकर
▪️“बोलतो मराठी, गर्जतो मराठी” या बहारदार कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने
नांदेड (जिमाका) दि. 2 :- मराठवाडा मुक्तिसंग्रामचा चळवळीचा समृद्ध वारसा आपल्या जिल्ह्यातील अनेक गावांनी जपला आहे. अनेक लोकांनी मराठवाडा मुक्तिसाठी दिलेले योगदान, सोसलेले कष्ट, दिलेले बलिदान जोपर्यंत नव्या पिढीपर्यंत पोहचणार नाहीत तोपर्यंत त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ लक्षात येणार नाही. यादृष्टीने मराठवाडा मुक्तिच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत जिल्ह्यातील कल्लाळी, इस्लापूर, उमरी, अर्जापूर सारख्या ऐतिहासिक ठिकाणी आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहोत. यात लोकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा यादृष्टिने काही सूचना असतील तर समिती त्याचे स्वागत करेल, असे प्रतिपादन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी “बोलतो मराठी, गर्जतो मराठी” कार्यक्रमाचे कुसूम सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राची लोकधारा ही प्रतिभा संपन्न आहे. लोककलेतील अनेक माध्यमांनी स्वातंत्र्य लढ्यापासून विविध चळवळींना आकार दिला. लोकसाक्षरतेसाठी हा धागा खूप महत्त्वाचा आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याचा इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहोचविण्यासाठी वक्त्तृत्त्व स्पर्धा, कला महोत्सव, लोकोत्सव सारखे उपक्रम राबवू असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. अमृत महोत्सवासाठी शासनाने नेमलेली समिती सर्व पक्षातील लोकांना घेऊन असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाड्याला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाखमोलाचा आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. यावेळी प्रवीण साले यांनी मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्राची लोकसंस्कृती व लोकधारा यावर आधारित परंपरागत गीत-संगीत, नृत्य, मराठी परंपरा आणि कलागुणांचा अनोखा अविष्कार असलेला “बोलतो मराठी, गर्जतो मराठी” या बहारदार कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. संवाद बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था नांदेड, आरती क्रिएशन छत्रपती संभाजीनगर आणि सोहम नाद-आळंदी-पुणे मधील कलावंत यांनी “बोलतो मराठी, गर्जतो मराठी” साकारला. पत्रकार विजय जोशी व सहकारी कलावंतांनी नटरंग मधील गीताच्या बहारदार सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरूवात केली. गजानन पिंपरखेडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
00000








 खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हिताचा

होण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन  

-  पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जागतिक हवामानातील बदल व त्यांचे होणारे दुष्पपरिणाम आपण सारेच अनुभवत आहोत. सद्यस्थितीत धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठी आपल्याला जरी समाधानकारक वाटत असला तरी या पाण्याचे अधिक काळजीपूर्वक काटेकोर नियोजन केल्याशिवाय पर्याय नाही. हवामान तज्ञांनी अलनिनो व इतर घटकामुळे जुलै ते ऑगस्ट या कालावधीत उष्णता अधिक आणि पावसाचे प्रमाण कमी अशी स्थिती दर्शविली आहे. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता विविध प्रकल्पातील पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे कालवा सल्लागार समिती, खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा आणि मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्ष आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार राम पाटील रातोळीकरआमदार राजेश पवारआमदार मोहन हंबर्डेआमदार बालाजी कल्याणकरमाजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरजिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने,  नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता बा. क. शेटे, कार्यकारी अभियंता ए. एस. चौगले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदेप्रविण साले,  व इतर विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती.

 

शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या पंपहाऊस मधील पंपांची स्थिती व त्यामुळे पाणी पुरवठ्यावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारा परिणाम याबद्दल पालकमंत्री महाजन यांनी काळजी व्यक्त केली. पंपांची दुरूस्ती, याबाबत जलसंपदा विभागाने केलेली कार्यवाही, तांत्रिक समितीसाठी सादर केलेला प्रस्ताव याची इत्यंभूत माहिती घेऊन मंत्रालयीन पातळीवर हा प्रश्न लवकर मार्गी लावू असे त्यांनी सांगितले. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याबाबत पालकमंत्री महाजन यांचे लक्ष वेधले होते.

 

बोगस बियाण्यांच्या माध्यमातून

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याची काळजी घ्या

खरीप हंगामाचे नियोजन करतांना प्रशासकीय पातळीवर शासन योग्य ती खबरदारी घेत आहे. तथापि शेतकऱ्यांनीही पुरेशा पाऊस जोपर्यंत होत नाही तो पर्यंत पेरणीच्या मोहापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. कृषि तज्ज्ञ आणि कृषि विभाग वेळोवेळी ज्या काही सूचना देतील त्याचे पालन करून खरीप हंगामाचे नियोजन शेतकऱ्यांनी करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या बियाण्यांच्या नावाखाली चुकीचे, उगवण क्षमता कमी असलेले बियाणे दिली जातात. यात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक ही मोठ्या आर्थीक हानीची होऊ शकते. यासाठी कृषि विभागाने बियाणे विक्री होत असतांना बाजारपेठांवर अधिक लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी कृषि विभागाला दिले.  

 

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी खरीप हंगाम 2023 साठी कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती सादर केली. यामध्ये जिल्ह्यात खरीप प्रस्तावित 7.74 हेक्टर क्षेत्र आहे.  नांदेड जिल्हा पर्ज्यन्यमानची तालुकानिहाय माहितीसन 2023 मधील प्रस्तावित पिकवार क्षेत्रउत्पादन व उत्पादकता,अतिवृष्टी पुरामुळे शेती पिकांचे झालेले नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपपिकनिहाय बियाणे गरज व मागणीखताची मागणी व पुरवठा खरीप हंगाम 2023 ची आकडेवारी याबाबत तपशील पीपीटीद्वारे सादर केला.

 

जिल्ह्यात खरीप ज्वारीची गतवर्षी 18 हजार 959 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यावर्षी सुमारे 30 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. मका पिकाची गतवर्षी 537 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यावर्षी 500 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तूर यावर्षी 70 हजार हेक्टर क्षेत्र, मुग 27 हजार हेक्टर क्षेत्र, उडीद 27 हजार हेक्टर क्षेत्र, सोयाबीन 4 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्र, कापूस 1 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्र असे एकुण 7 लाख 74 हजार 519 हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यासमवेत ऊस 32 हजार हेक्टर क्षेत्र, हळद 20 हजार हेक्टर, केळी 6 हजार हेक्टर, इतर भाजीपाला व फळपिके 6 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले असून 2023 मध्ये हे एकुण क्षेत्र 8 लाख 38 हजार 519 हेक्टर एवढे राहिल. यावर्षी सर्वाधिक प्रस्तावित क्षेत्र हे सोयाबीनचे असून याची टक्केवारी 126.63 एवढी आहे.

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारुप आढावा 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती पालकमंत्री महाजन यांना दिली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकत्याच झालेल्या विविध कार्यक्रमांचे प्रारुप सादर करून त्यास बैठकीत मान्यता घेतली.   समितीतर्फे प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत पालकमंत्री महाजन यांना देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अनेक महत्त्वपूर्ण स्थळ आहेत. यात उमरी येथील ऐतिहासिक स्थळाचे शुशोभिकरण व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा उभारणीसाठी  निधीची तरतुद होण्याची मागणी आमदार राजेश पवार यांनी पालकमंत्री महाजन यांच्याकडे केली.

000000

छाया :- सदा वडजे, नांदेड 





 शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

-  पालकमंत्री गिरीश महाजन


·   महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

·  कर्तव्यदक्ष अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देवून गौरव

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आघात सहन करावे लागत आहेत. यातून शेतकरी बांधवांना कसे सावरता येईल याला शासनाने प्राधान्यक्रम दिला आहे.  शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून मी स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती अनुभवली आहे. सततचा पाऊस ही अलिकडच्या काळात मोठी समस्या झाली आहे. निसर्गातील हे बदल लक्षात घेऊन सततचा पाऊस याला राज्य शासनाने नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.  

 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय  कवायत मैदान  येथे  मुख्य शासकीय ध्वजारोहन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊतनांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शशिकांत महावरकर,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगेजिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेमनपा आयुक्त डॉ. सुनिल लहानेगृहरक्षक दलाचे विजयकुमार यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक व जेष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

 

मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील 36 हजार 543 बाधित शेतकऱ्यांना आपण अवघ्या महिन्याच्या आत मदत उपलब्ध करून दिली. बाधित शेतकऱ्यांसाठी सुमारे 30 कोटी 52 लाख रुपये एवढा निधी शासनाकडे मागितला. एप्रिल महिन्यातच शासन निर्णयान्वये याला मंजुरीही देण्यात आली. सदर मदत बाधित शेतकऱ्यांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे.  यात पुन्हा दिनांक 25 एप्रिल पासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊसामुळे अनेक शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. या संकटातूनही शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला आपण दिले असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

 

प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये आपण 8 लाख शेतकऱ्यांना 464.49 कोटी रुपये एवढी विमा रक्कम वाटप केली आहे. यात काही शेतकऱ्यांचे आधार व इतर तांत्रिक कारणांमुळे राहिलेले वाटप तेही पूर्ण केले जात आहे.

  

चालुक्यकालीन सर्कीट विकसित करणार  

जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या आमाप संधी उपलब्ध आहेत. यादृष्टीने होट्टल, येरगी, करडखेडा हे चालुक्यकालीन सर्कीट म्हणून विकसित करण्यावर भर दिला जात आहे. याचबरोबर कंधार, राहेर, शिऊर, तामसा हे नवीन पर्यटन क्षेत्र म्हणून चालना देवून गडकिल्ल्याच्या विकासासाठी यावर्षी काही निधीची तरतूद करण्यात येणार आहे. मोठ्या तीर्थक्षेत्रासमवेत ब आणि क वर्गातील तीर्थक्षेत्राचाही विकास व्हावा यासाठी तीर्थक्षेत्र-यात्रा स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सोई-सुविधा परिपूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत चालना देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.    

 

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

महाराष्ट्र दिनाचे  औचित्य साधून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.  पोलिस दलात उकृष्ट सेवेबद्ल पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र द्वारकादास गोविंदराव चिखलीकरसंभाजी रामराव शिवभक्तआनंद मारोती बिचेवारश्रीकांत माधवराव मोरेशंकर नामदेवराव भोसलेमिलींद सिताराम बोडकेशिवसांब रामेश्वर मठपतीअशोक मनोहर वाव्हळेश्रीराम तातेराव हमंदसंजय लक्ष्मण शिरगिरेआनंद हंगरगेकिरण संभाजी अवचार मारोती भुजंगराव मुलगीर यांना देण्यात आले. यात जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आदर्श तलाठी पुरस्कार किनवट तालुक्यातील जलधारा सज्जाचे अंकुर उल्हास सकवान यांना देण्यात आला. 

 

 

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत समाजात स्त्रियांना समानतेने वागविणारे व माणूस म्हणून अधिकार जपणाऱ्या सुधारक पुरुषांचा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात संभाजी नामदेव मेटेनाळेश्वरसंजय केरबा सोनकांबळे,बळीरामपूरकिशोर रघुनाथ आनकाडे झेंडीगुडा यांचा समावेश आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने भगीरथी गोदावरी इंडस्ट्रीज नांदेड व आर.के. डॅडी फुड्स प्रोडक्टस नांदेड या दोन उद्योग घटकांना पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्काऊट व गाईडच्या चळवळीत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या सन 2021-22 वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श स्काऊटर पुरस्कार स्काऊट मास्टर प्रलोभ कुलकर्णी यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. महिला व बाल क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज सेविकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार सौ. सुरेखा प्रकाशचंद पाटणीसौ. विजया दत्तात्रय गोडघासेश्रीमती पुरणशेट्टीवार व्यंकटलक्ष्मी नारायणडॉ. सुरेखा अशोक कलंत्री यांना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयजिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषदसहाय्यक आयुक्त राज्यकर आयुक्त वस्तु व सेवाकर विभागजिल्हा अधिक्षक भूमी अभिलेखराज्य उत्पादन शुल्क विभागातील निवड झालेल्या उमेदवारांना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश वितरण करण्यात आले. तसेच यावेळी डाक विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आपली पेंशन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.  

 

पोलीस उपअधिक्षक लक्ष्मण कसेकर यांनी केले पथसंचलनाचे नेतृत्व

परेड कमांडर पोलीस उपअधीक्षक लक्ष्मण कसेकर आणि सेंकड इन परेड कमांडर राखीव पोलिस निरीक्षक विजयकुमार धोंडगे यांच्या नेतृत्वात केंद्रीय राखीव पोलिस दल मुदखेड, सशस्त्र पोलिस पथक, सशस्त्र पोलिस पथक (पुरूष)  पोलिस मुख्यालय नांदेड, सशस्त्र महिला पोलिस पथक नांदेड, सशस्त्र पोलीस पथक ग्रामीण विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल, पुरूष  गृहरक्षक दल पथक, महिला गृहरक्षक दल पथक नांदेड, पोलिस बँड पथक, डॉग स्कॉड युनिट, बॉम्ब शोधक व नाशक पथक, मार्क्स मॅन क्युआरटी वाहन, बुलेट रायडर, मिनी रेक्स्यु फायर टेंडर (देवदुत) हे पथसंचलनात सहभागी होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कवायतीचे निरिक्षण केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.  

00000

छाया :- सदा वडजे, नांदेड 








 सर्वसामान्यांच्या आरोग्य सुविधेसाठी

प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकिय व नर्सिंग कॉलेजचा विचार

-       वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

 

·   शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात हृदयरोग रूग्णांसाठी अतिदक्षता कक्षाचा शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- राज्यातील कोणताही व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, गरिबाला मोफत उपचार उपलब्ध व्हावेत ही शासनाची भूमिका आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकिय सेवा-सुविधा भक्कम व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्यांना चांगल्या वैद्यकिय सुविधा मिळाव्यात यादृष्टिने आम्ही प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकिय महाविद्यालयासमवेत नर्सिंग कॉलेज देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकिय शिक्षण, ग्रामविकास, पंचायतीराज,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

 

येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील ई.सी.आर.पी. अंतर्गत नुतनीकरण  करण्यात आलेल्या दोन अद्ययावत हृदयरोग अतिदक्षता कक्षाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, प्रवीण साले आदी मान्यवर उपस्थित होते.  

 

वैद्यकिय सेवा-सुविधेसाठी उपलब्ध करून दिलेला निधी हा सर्वसामान्यांच्या जीवाशी निगडीत असतो. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, रुग्णालय हे वैद्यकिय सेवेचे द्योतक आहे. हे लक्षात घेता जी काही विकास कामे घेतली जातात अथवा पूर्ण केली जातात त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड असता कामा नये. जे काम करू ते भविष्यासाठी उत्तमच करू ही धारणा वैद्यकिय क्षेत्रात प्रत्येकाजवळ असणे आवश्यक आहे. एखादा वार्ड, कक्ष जेंव्हा निर्माण होतो तेंव्हा त्यात कोणत्याही प्रकारच्या उणिवा असता कामा नये याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केल्या.

 

अपुरे मनुष्यबळ याची मला कल्पना आहे. दवाखाणा आणि स्वच्छता या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. रुग्णांना केवळ चांगले उपचार व सुविधा देऊन चालत नाही तर तितक्याच चांगल्या स्वच्छतेच्या सुविधाही आवश्यक असतात. प्रत्येक वार्डाची स्वच्छता असलीच पाहिजे. याचबरोबर रुग्णांना मनोधैर्य देण्यासाठी डॉक्टरांपासून सर्व कर्मचाऱ्यांनी आस्थेवाईकपणे रुग्णांची विचारपूसही केली पाहिजे. शासकीय वैद्यकिय क्षेत्रात हे तत्व पाळल्या जाते याचे मला समाधान असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले. याचबरोबर मनुष्यबळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन येत्या दीड महिन्यात सुमारे 5 हजार कर्मचारी नियुक्त केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

वैद्यकिय सेवासुविधा हा मी माझ्या कर्तव्य तत्परतेतून जपलेल्या आस्थेचा भाग आहे. एखाद्या रुग्णाला झालेले आजार व त्याच्या उपचारासाठी होणारा कोंडमारा मी दररोज अनुभवतो. गेल्या 30 वर्षांपासून सर्वसामान्यांच्या वैद्यकिय सेवेसाठी मला जी संधी मिळाली त्या सेवेच्या संधीतूनच जनतेने सलग सहावेळा लोकप्रतिनिधी म्हणून जवळ केल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. वरचेवर महिलांमधील वाढत जाणारे कॅन्सरचे आजार याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. याचबरोबर व्यसनाधिनतेमुळे होणाऱ्या कर्करोगाकडे त्यांनी लक्ष वेधले. वैद्यकिय सेवा-सुविधा व उपचारासाठी रुग्णालय अत्यावश्यक असली तरी केवळ आपल्या व्यवसनामुळे जर आजार वाढत असतील तर त्याही दृष्टीने समाजाने विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी स्टाफ नर्स / परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, वैद्यकिय शिक्षण घेणारे विद्यार्थी, डॉक्टर्स व विविध संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे व सूचना ऐकुण घेतल्या. सर्वांशी सुसंवाद साधून त्यांनी आपल्या भेटीत काही वार्डांची अनपेक्षित स्वच्छतेची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या.

00000

छाया – सदा वडजे, नांदेड





  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...