Tuesday, May 2, 2023

 सर्वसामान्यांच्या आरोग्य सुविधेसाठी

प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकिय व नर्सिंग कॉलेजचा विचार

-       वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

 

·   शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात हृदयरोग रूग्णांसाठी अतिदक्षता कक्षाचा शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- राज्यातील कोणताही व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, गरिबाला मोफत उपचार उपलब्ध व्हावेत ही शासनाची भूमिका आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकिय सेवा-सुविधा भक्कम व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्यांना चांगल्या वैद्यकिय सुविधा मिळाव्यात यादृष्टिने आम्ही प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकिय महाविद्यालयासमवेत नर्सिंग कॉलेज देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकिय शिक्षण, ग्रामविकास, पंचायतीराज,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

 

येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील ई.सी.आर.पी. अंतर्गत नुतनीकरण  करण्यात आलेल्या दोन अद्ययावत हृदयरोग अतिदक्षता कक्षाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, प्रवीण साले आदी मान्यवर उपस्थित होते.  

 

वैद्यकिय सेवा-सुविधेसाठी उपलब्ध करून दिलेला निधी हा सर्वसामान्यांच्या जीवाशी निगडीत असतो. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, रुग्णालय हे वैद्यकिय सेवेचे द्योतक आहे. हे लक्षात घेता जी काही विकास कामे घेतली जातात अथवा पूर्ण केली जातात त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड असता कामा नये. जे काम करू ते भविष्यासाठी उत्तमच करू ही धारणा वैद्यकिय क्षेत्रात प्रत्येकाजवळ असणे आवश्यक आहे. एखादा वार्ड, कक्ष जेंव्हा निर्माण होतो तेंव्हा त्यात कोणत्याही प्रकारच्या उणिवा असता कामा नये याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केल्या.

 

अपुरे मनुष्यबळ याची मला कल्पना आहे. दवाखाणा आणि स्वच्छता या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. रुग्णांना केवळ चांगले उपचार व सुविधा देऊन चालत नाही तर तितक्याच चांगल्या स्वच्छतेच्या सुविधाही आवश्यक असतात. प्रत्येक वार्डाची स्वच्छता असलीच पाहिजे. याचबरोबर रुग्णांना मनोधैर्य देण्यासाठी डॉक्टरांपासून सर्व कर्मचाऱ्यांनी आस्थेवाईकपणे रुग्णांची विचारपूसही केली पाहिजे. शासकीय वैद्यकिय क्षेत्रात हे तत्व पाळल्या जाते याचे मला समाधान असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले. याचबरोबर मनुष्यबळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन येत्या दीड महिन्यात सुमारे 5 हजार कर्मचारी नियुक्त केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

वैद्यकिय सेवासुविधा हा मी माझ्या कर्तव्य तत्परतेतून जपलेल्या आस्थेचा भाग आहे. एखाद्या रुग्णाला झालेले आजार व त्याच्या उपचारासाठी होणारा कोंडमारा मी दररोज अनुभवतो. गेल्या 30 वर्षांपासून सर्वसामान्यांच्या वैद्यकिय सेवेसाठी मला जी संधी मिळाली त्या सेवेच्या संधीतूनच जनतेने सलग सहावेळा लोकप्रतिनिधी म्हणून जवळ केल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. वरचेवर महिलांमधील वाढत जाणारे कॅन्सरचे आजार याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. याचबरोबर व्यसनाधिनतेमुळे होणाऱ्या कर्करोगाकडे त्यांनी लक्ष वेधले. वैद्यकिय सेवा-सुविधा व उपचारासाठी रुग्णालय अत्यावश्यक असली तरी केवळ आपल्या व्यवसनामुळे जर आजार वाढत असतील तर त्याही दृष्टीने समाजाने विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी स्टाफ नर्स / परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, वैद्यकिय शिक्षण घेणारे विद्यार्थी, डॉक्टर्स व विविध संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे व सूचना ऐकुण घेतल्या. सर्वांशी सुसंवाद साधून त्यांनी आपल्या भेटीत काही वार्डांची अनपेक्षित स्वच्छतेची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या.

00000

छाया – सदा वडजे, नांदेड





No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...