Tuesday, July 12, 2022

 लेख

 

प्रधानमंत्री पीक विमा योजना

शेतकऱ्यांचा मोलाचा आधार

 

शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण दिले जाते. जर कोणत्याही आपत्तीमुळे तुमच्या पिकावर परिणाम झाला असेल  तर तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाते. शेतकरी अन्नधान्य पिके (तृणधान्ये, बाजरी आणि कडधान्ये), तेलबिया, वार्षिक व्यावसायिक/वार्षिक फलोत्पादन पिके घेतात, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

हवामान घटकांचा पिकांवर होणारा परिणाम

हवामान घटकांच्या  प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे नुकसान होते. यासाठी खरीप हंगामातील अपुरा पाऊस हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित किंवा मुख्य पिकांच्या सर्वसाधारण  क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी किंवा लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहते.

 

प्रतिकुल परिस्थितीत पिकांचे होणारे नुकसान

सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसूचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण देय राहते.

 

पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात होणारी घट

 पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट टाळता न येणाऱ्या जोखमीमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पनाशी करून नुकसान भरपाई निश्चित केली जाते.जर सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी झाले तर नुकसान भरपाई देय राहील.

 

स्थानिक नैसर्गिक आपत्ती

स्थानिक नैसर्गिक आपत्ती  याबाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. काढणी पश्चात नुकसान झाल्यास ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी, काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत 14 दिवस गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधिन राहुन नुकसान भरपाई निश्चित केली जाते.

 

पीक काढणीच्या वेळी होणारे नुकसान

काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घटल्या पासून 72 तासाच्या आत क्रॉप इंश्युरन्स ॲप संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक/बँक/कृषी व महसुल विभाग यांना कळविण्यात यावे.नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे.

 

या योजनेअतर्गत कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा व न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे.शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर देणे आवश्यक आहे.योजनेच्या मार्गदर्शन सूचनेनुसार विमा कंपनी शेतकरी विमा हप्ता आणि केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर पीक पेरणी/लावणीपूर्वी नुकसान भरपाई हंगामामध्ये प्रतिकुल परिस्थिती मुळे झालेले नुकसान स्थानिक आपत्ती या जोखमींच्या बाबीकरिता नुकसान भरपाई पूर्तता करतील. ज्याप्रमाणे उत्पन्नाच्या आकडेवारीवर आधारीत व काढणी पश्चात नुकसान भरपाई या जोखिमींच्या नुकसान भरपाईची पुर्तता केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदान अंतिम हप्ता प्राप्त झाल्यानंतर करतील.

 

विमा योजनेअंतर्गत विविध जोखिमी अंतर्गत निश्चित होणारे नुकसान भरपाई ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहुन निश्चित केले जाते.हंगामात घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करून हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. नुकसान भरपाई निश्चित करताना पैसेवारी, दुष्काळ, टंचाई, परिस्थिती आणि पुरामुळे झालेल्या नुकसान संदर्भात कोणत्याही शासकीय विभाग संस्थेमार्फत घोषित करण्यात आलेली आकडेवारी ग्राह्य धरता येणार नाही.पीक विमा नोंदणी सीएससी केंद्रामध्ये विनाशुल्क केला जाईल. पीक विमा भरण्यासाठी मोबदला म्हणून सीएससी केंद्र चालकास प्रति अर्जानुसार 32 रुपये शुल्क शासनाकडून अदा केले जाणार आहे.यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी विमा हफ्प्याव्यतिरिक्त झेरॉक्‍स व इतर खर्च वगळून जास्त रक्कम सीएससी चालकास देवू  नयेत.

 

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, बॅक पासबुक, पीक पेरा स्वंय घोषणापत्र, सातबारा होल्डींग तसेच योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका अधिकारी , यांच्या कार्यालयाशी तसेच जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

श्वेता पोटुडे-राऊत

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

 जिल्हा परिषद, पंचायत समितीचा

आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- राज्‍य निवडणुक आयोगाने जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यांच्‍या आरक्षण सोडत कार्यक्रम तुर्त स्‍थगित केला आहे. याबाबतचा सुधारीत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम यथावकाश देण्‍यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांनी दिली आहे.

 

राज्‍य निवडणूक आयोगाच्‍या कार्यक्रमानुसार नांदेड जिल्‍हा परिषदेच्या सदस्‍यपदासाठी आरक्षणाची सोडत 13 जुलै रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भव‍न येथे  जिल्‍हाधिकारी यांच्या अध्‍यक्षतेखाली  काढण्‍यात येणार होती. तसेच सर्व तालुका मुख्‍यालयी संबधीत पंचायत समिती सदस्‍यांच्‍या आरक्षणाची सोडत संबधीत तहसिलदार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी यांच्‍या नियंत्रणात 13 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वा. काढण्‍यात येणार होती. हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तुर्त स्‍थगित केला आहे.

000000

 प्रादेशिक परिवहन प्राधिकरणावर

अशासकीय सदस्य नेमणुक करण्यासाठी अर्ज सादर करावेत

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 68 अन्वये प्रादेशिक परिवहन प्राधिकरण गठीत करण्यात आले आहेत. यानुसार अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत वाहतूक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या कामाबाबत पुराव्यासह अर्ज रविवार 17 जुलै 2022 पर्यंत  जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय एमआयडीसी सिडको येथे सादर करावा.

 

ज्या व्यक्तीचा परिवहन उपक्रमात मालक किंवा कर्मचारी म्हणून किंवा अन्यथा कोणताही आर्थिक हितसंबध असेलअशी कोणतीही व्यक्ती राज्य किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा सदस्य म्हणून नियुक्त करता येणार नाही यांची सदस्यांनी नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 कार्यालये, संस्था व इतर आस्थापनेत 

महिला संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- महिलाचे संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 नुसार प्रत्येक कार्यालयीन / कामाच्या ठिकाणी तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुर्वी अशा समित्या काही कार्यालयाने स्थापन केल्या आहेत त्या अद्यावत कराव्यात. या अंतर्गंतची तक्रार समिती गठीत करुन त्याचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास iccdwcdned@gmail.com या ई-मेलवर उपलब्ध करुन देण्यात यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिलिंद वाघमारे  यांनी केले आहे.   

 

शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, संघटना, शासन अनुदानित संस्था, महामंडळे, आस्थापना संस्था, ज्याची शासनाने स्थापना केली असेल किंवा नियंत्रणाखाली असेल किंवा पुर्ण किंवा अंशत: प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निधी शासनामार्फत किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनी, नगरपरिषद, सहकारी संस्था किंवा कोणत्याही खाजगी क्षेत्र कंपनी किंवा खाजगी उपक्रम, संस्था, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना सोसायटी ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार, रुग्णालये, सुश्रुषालये, क्रिडा संस्था, प्रेक्षागृहे इत्यादी ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे बंधनकारक आहे. ज्या आस्थापनेवर 10 किंवा त्यापेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी असतील अशा कार्यालयीन किंवा कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी स्वंतत्र अधिनियम करण्यात आले आहे. 

 

अधिनियमातील कलम 26 मध्ये जर एखादया मालकाने () अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही. () अधिनियमातील कलम 13,14,22 नुसार कारवाई केली नाही () या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदारीचे पालन न केल्यास 50 हजार रुपयापर्यत दंड होईल तसेच हाच प्रकार पुन्हा केल्यास लायसन्स रद्द, दुप्पट दंड अशी तरतूद आहे, असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 अस्थिव्यंग, दिव्यांग व्यक्तीसाठी

आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या पुढाकाराने नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील अस्थिव्यंगदिव्यांग व्यक्तींसाठी 10 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हा रुग्णालय वजिराबाद येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

आरोग्य तपासणी शिबिरात ज्या अस्थिव्यंग व दिव्यांग व्यक्तींनी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी केली असेल त्यांना दर सोमवार व मंगळवारी सकाळी ते सायं. वाजेपर्यंत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल. यामुळे जास्तीत-जास्त व्यक्तींनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निलंकठ भोसीकर यांनी केले आहे.

000000

 शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील

पाणीसाठा 80 टक्क्यांवर पोहोचला

 

·       पाण्याची आवक व पाऊस लक्षात घेता एक दरवाजा उघडला


नांदेड (जिमाका) दि. 12 :- शंकररावजी  चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात आज  80 टक्के क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. व  बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा विसर्ग-377 क्युमेक्स (13313.00 क्युसेस)  दुपारी 2.30 वाजता उघडण्यात आला आहे.

 

विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे,‍ जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य,  इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून  नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आली आहे.

 

बळेगाव बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडले

गोदावरी नदीमध्ये पाण्याचा येवा वाढल्यामुळे व शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आल्यामुळे बळेगाव उच्च पातळी  बंधाऱ्याचे दोन दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या खालील बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या / शेतकऱ्यांच्या मालमत्तेची, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 22.20 मि.मी. पाऊस

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात मंगळवार 12 जुलै 2022 रोजी सकाळी 8.20 वाजता संपलेल्या गत 24 तासात सरासरी 22.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 388.50 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

जिल्ह्यात मंगळवार 12 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 18.60 (403.40) बिलोली-15.60 (385.90), मुखेड- 14.60 (401), कंधार-17.20 (445.80), लोहा-18.30 (384.10), हदगाव-19.50 (294.90), भोकर- 23.70 (359.80), देगलूर-13.60 (394.60), किनवट-41.70 (403.10), मुदखेड- 18.90 (487.10), हिमायतनगर-24.70 (477.40), माहूर- 55.80 (338.70), धर्माबाद-17.90 (356.90), उमरी- 26.20 (441.70), अर्धापूर- 16.20 (374.20), नायगाव- 18.20 (315.50) मिलीमीटर आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...