Wednesday, February 2, 2022

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  

नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड जिल्ह्यात दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 17 फेब्रुवारी 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 नांदेड जिल्ह्यात 212 व्यक्ती कोरोना बाधित

तर 306 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 804 अहवालापैकी 212 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 164 तर अँटिजेन तपासणीद्वारे 48 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 851 एवढी झाली असून यातील 96 हजार 995 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 182 रुग्ण उपचार घेत असून यात 6 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे माहूर तालुक्यातील अंमल येथील 27 वर्षाच्या एका पुरुषाचा, पिरबुऱ्हाण येथील 48 वर्षाची महिला, कंधार तालुक्यातील कळहली येथील 50 वर्षाचा पुरुषाचा 1 फेब्रुवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 674 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 85, नांदेड ग्रामीण 21, अर्धापूर 3, बिलोली 2, धर्माबाद 4, हदगाव 2, कंधार 6, किनवट 4, लोहा 2, मुखेड 10, नायगाव 3, लातूर 1, औरंगाबाद 2, हिंगोली 3, परभणी 8, बीड 1, बिहार 3, मध्यप्रदेश 1, हैद्राबाद 1, राजस्थान 1, उमरखेड 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा  34, बिलोली 2, देगलूर 4, धर्माबाद 2, हदगाव 2, कंधार 2, माहूर 1, नायगाव 1 असे एकुण 212 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 129, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 166, खाजगी रुग्णालय 7 असे एकुण 306 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 28, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, किनवट कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 65, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 51, खाजगी रुग्णालय 33, माहूर कोविड रुग्णालय 1 असे एकुण 2 हजार 182 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 48 हजार 402

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 30 हजार 485

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 1 हजार 851

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 96 हजार 995

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 674

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.23 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-34

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 182

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-6.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

 जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे

प्रलंबित प्रकरणात त्रुटीची पूर्तता करण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदत 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- माहे डिसेंबर 2021 अखेर जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये अर्जदाराने त्रुटीची पुर्तता केलेली नाही. अशा प्रकरणांमध्ये अर्जदारांना कागदपत्रांची त्रुटीची पुर्तता करण्यासाठी 1 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्जदाराकडून या कालावधीत कागदपत्रांची त्रुटी पूर्तता न झाल्यास त्यांची प्रकरणे बंद करण्यात येतील. अर्जदारांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावा यांची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर यांनी केले आहे. 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून प्रलंबित प्रकरणांची संख्या पाहता शासनाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी 1 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेतंर्गत नांदेड जात पडताळणी समितीकडे माहे-डिसेंबर 2021 अखेर शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर विषयक जाती दावा पडताळणीच्या प्राप्त झालेल्या ऑनलाईन व ऑफलाईन अशा प्रकरणामध्ये ज्या प्रकरणात समितीने तपासणी केल्यानंतर कागदपत्रात पुराव्याअभावी त्रुटी आढळून आलेल्या आहेत. अशा सर्व प्रलंबित प्रकरणामध्ये संबंधित अर्जदारांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेशाद्वारे एसएमएस तसेच त्यांच्या ई-मेल आयडी वर ई-मेलद्वारे त्रुटीची पुर्तता करण्याबाबत संबंधित अर्जदारांना ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने कळविण्यात आलेले आहे असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

00000

 विद्यार्थ्यांना शिष्यवृती अर्ज करण्यास 15 फेब्रुवारीपर्यत मुदत

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नवीन अर्ज नोंदणी व नुतनीकरणासाठी मंगळवार 15 फेब्रुवारी 2022 पर्यत मुदत आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील प्रवेशीत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे अर्ज www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर मुदतीत करावेत. त्यानंतर त्या अर्जाची छायांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयात सादर करावी. महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासन मान्य अनुदानित/विनाअनुदानीत/कायमविना अनुदानीत महाविद्यालयातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचे अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडीबीटी पोर्टल सुरु झालेले आहे, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने

सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणी 

नांदेड (जिमाका) 2 :- प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्यावतीने पक्क्या लायसन्ससाठी दिनांक 5 फेबुवारी 2022 रोजी सुट्टीच्या दिवशी अनुज्ञप्ती चाचणी शिबिराचे आयोजन केले आहे. 

या शिबीरासाठी 3 फेबुवारी 2022 रोजी कार्यालयीन वेळेत अपॉईन्टमेंट निर्गमीत करण्यात येतील. इच्छूक अर्जदारांनी उपलब्ध अपॉईन्टमेट घेऊन कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी दिलेल्या वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

गुलाबी बोंडअळी नियंत्रण कार्यशाळा संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 2 :- गुलाबी बोंड अळी नियंत्रण कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेत कृषि विकास अधिकारी डॉ. टी. जी. चिमणशेटे त्यांनी गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हयाचे कापसाचे क्षेत्र हे सरासरी क्षेत्रापेक्षा कमी होत असून गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फडदड कापूस घेऊ नये व कापसाचे अवशेष नष्ट करावेत असे यावेळी सांगितले.

 

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या कापसाच्या उत्पादकवर परिणाम होत आहे. गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी फडदड काढून टाकण्याची मोहीम प्रत्येक गावात राबविणे गरजेचे असल्याचे सांगितले. कापूस विशेषज्ञ कापूस संशोधन केंद्राचे डॉ.भेदे यांनी गुलाबी बोंडअळी जिवनचक्राची माहिती देऊन गुलाबी बोंडअळी जिवनचक्र ब्रेक करण्यासाठी फडतड कापूस जानेवारी नंतर न घेणे. जिनिंग मध्ये फेरोमन ट्रॅप लावणे, कापूस अवशेष नस्ट करणे गरजेचे असल्याचे सांगितले. राशी कंपनीचे प्रतिनिधी शिरसाठ व महाजन यांनी जिल्हयात गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी केलेल्या कारवाईचे माहिती सादर केली. तसेच महिको कंपनीचे प्रतिनिधी माधव हते यांनी त्यांच्या मार्फत नोडल कंपनी म्हणून जिल्हयात कापूस पिक गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी केलेली कामाची माहिती सादर केली. यावेळी कापूस गुलाबी बोंडअळी नियंत्रण घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.


या बैठकीत तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती, कृषि सेवा केंद्रधारक, जिनिंग मालक प्रतिनिधी, कृषि अधिकारी पुंडलिक माने, इबितवार उपस्थित होते.

0000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...