Sunday, September 6, 2020

 

अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण

गर्दी न करता धान्य प्राप्त करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

 नांदेड (जिमाका) दि. 6 :- कोविड-19 प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजना व  सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेंतर्गत जिल्ह्यातील अंत्‍योदय अन्‍न योजना आणि प्राधान्‍य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्‍यांना सप्‍टेंबर 2020 या महिन्यासाठी अन्‍नधान्‍याचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

राज्याच्या अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार केंद्र शासनाच्‍या खरेदी धोरणानुसार विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत राज्‍यातील आधारभूत किंमत खेरदी योजनेंतर्गत खरेदी करण्‍यात आलेल्‍या भरड धान्‍याचे राज्‍यातच वाटप करावयाचा आहे. त्‍याअनुषंगाने ज्‍या जिल्‍हयातील ज्‍वारी आणि मका खरेदी करुन त्‍याच जिल्‍हयामध्‍ये गव्‍हाचे नियमन कमी करुन ज्वारी व मका हा अंत्‍योदय अन्‍न येाजना व प्राधान्‍य कुटुंबातील लाभार्थ्‍यांना वाटप करावे तसेच तसेच सदर भरड धान्‍य खराब होणार नाही या दृष्‍टीने सप्‍टेंबर 2020 पर्यंत भरडधान्याचे वाटप पुर्ण करावे अशा सुचना शासनाने दिल्या आहेत. 

त्याअनुसार नांदेड जिल्‍हयातील भरड धान्‍य असलेले गोदाम हे किनवट तालुक्‍यात असुन शासनाचे सुचनेनुसार किनवट पासुन वाहतुकीचे अंतर कमी असलेल्‍या किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, नांदेड, उमरी, धर्माबाद या तालुक्‍यातील  अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटुंबातील लाभार्थ्‍यांना वाटप करण्‍यासाठी सप्‍टेंबर 2020 करीता गव्‍हाचे नियमन कमी करुन ज्वारी व मका भरड धान्‍य मंजुर करण्‍यात आलेले आहे. भरड धान्य ज्‍वारी व मका हा प्रति किलो रुपये एक प्रमाणे वितरीत करण्‍यात येणार आहे. 

नांदेड तालुक्‍यातील अंत्‍योदय अन्‍न येाजना योजनेतील लाभार्थ्‍यांना सप्टेंबर 2020 करीता प्रतिमाह प्रति कार्ड ज्‍वारी 11 किलो, मका 7 किलो, गहू 5 किलो असे एकुण 23 किलो, तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे. तसेच किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, उमरी, धर्माबाद या तालुक्‍यातील अंत्‍योदय अन्‍न येाजनेतील लाभार्थ्‍यांसाठी प्रति कार्ड ज्‍वारी 11 किलो, मका 12 किलो, असे एकुण 23 किलो प्रतिकार्ड असुन तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे. कंधार, लोहा, देगलुर, बिलोली, नायगाव, मुखेड या तालुक्‍यातील अंत्‍योदय अन्‍न येाजनेतील लाभार्थ्‍यांसाठी प्रति कार्ड गहू 23 किलो, तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे.  तसेच अंत्‍योदय योजनेतील नांदेड जिल्‍हयातील सर्व लाभार्थ्‍यांना प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजनेंतर्गत मोफत प्रतिमाह प्रति सदस्‍य 3 किलो गहू, 2 किलो तांदुळ व जुलै ते सप्‍टेंबर 2020 या कालावधीतील मोफत चनाडाळ 3 किलो सप्‍टेंबर 2020 मध्‍ये वितरीत करण्‍यात येणार आहे. 

प्राधान्‍य कुटुंब येाजनेतील लाभार्थ्‍यांना सप्‍टेंबर 2020 मध्‍ये नांदेड, किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, उमरी, धर्माबाद या तालुक्‍यातील लाभार्थ्‍यांसाठी प्रति सदस्‍य मका 3 किलो, तांदुळ 2 किलो व प्रति कार्ड साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे. कंधार, लोहा, देगलुर, बिलोली, नायगाव, मुखेड या तालुक्‍यातील प्रति सदस्‍य गहू 3 किलो, तांदुळ 2 किलो व प्रति कार्ड साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे. तसेच या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजनेंतर्गत मोफत प्रतिमाह प्रति सदस्‍य 3 किलो गहू, 2 किलो तांदुळ व जुलै ते सप्‍टेंबर 2020 हया कालावधीतील मोफत चनाडाळ 3 किलो ही सप्‍टेंबर 2020 मध्ये वितरीत करण्‍यात येणार आहे.  

या धान्‍याचे वाटप PoS मशीनमार्फत होणार आहे. साधारणतः प्रत्‍येक महिन्याच्या पहिल्‍या पंधरवडयामध्‍ये विहीत दराने (ज्‍वारी व मका 1 रु किलो, गहू 2 रु.किलो, तांदुळ 3 रु.किलो) वाटप झाल्‍यानंतर दुसऱ्या पंधरवडयामध्‍ये मोफत धान्‍याचे वितरण होणार आहे. याबाबत सर्व संबंधित तहसिलदार व जिल्‍हयातील सर्व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांना वरीलप्रमाणे जिल्‍हयातील पात्र लाभार्थ्‍यांना धान्‍य वाटप करण्‍याबाबत सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 

208 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

328 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- रविवार 6 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 208 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 328 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 87 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 241 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 243 अहवालापैकी  842 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 8  हजार 910 एवढी झाली असून यातील  5  हजार 653 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 65.80 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 937 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 256 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

 

या अहवालात शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी हदगाव तालुक्यातील तळेगाव येथील 50 वर्षाची एक महिला, शनिवार 5 सप्टेंबर रोजी व्यंकटेशनगर कंधार येथील 85 वर्षाचा एक पुरुष, कंधार तालुक्यातील निपाणी सावरगाव येथील 70 वर्षाची एक महिला, तथागतनगर नांदेड येथील 57 वर्षाचा एक पुरुष तर रविवार 6 सप्टेंबर रोजी दत्तनगर किनवट येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर वजिराबाद नांदेड येथील 49 वर्षाचा एक पुरुष, मुदखेड शिकारा येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 265 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 4, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 13, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 5,  हदगाव कोविड केंअर सेंटर 9, मुखेड कोविड केंअर सेंटर 80, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर नांदेड 23, नायगाव कोविड केंअर सेंटर 7, बारड कोविड केंअर सेंटर 1, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 8, किनवट कोविड केंअर सेंटर 18, कंधार कोविड केंअर सेंटर 3, भोकर कोविड केंअर सेंटर 4, माहूर कोविड केंअर सेंटर 2, उमरी कोविड केंअर सेंटर 11, बिलोली कोविड केंअर सेंटर 16, लोहा कोविड केंअर सेंटर 4 असे  बाधित व्यक्तींना 208 औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 50, बिलोली तालुक्यात 10, लोहा 3, उमरी 1, हिंगोली 2, हदगाव 5, मुखेड 7, कंधार 7, धर्माबाद 1, निजामाबाद 1 असे एकुण 87 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 96, अर्धापूर तालुक्यात 5,  मुखेड 60, किनवट 14, नायगाव 18, उमरी 6, धर्माबाद 6, नांदेड ग्रामीण 13, मुदखेड 7, लोहा 5, कंधार 6, हदगाव 2, माहूर 3 असे  एकुण 241 बाधित आढळले

 जिल्ह्यात 2 हजार 937 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 268, एनआरआय व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 1 हजार 264, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 101, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 67, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 67, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 105,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 69, लोहा कोविड केअर सेंटर येथे 112, हदगाव कोविड केअर सेंटर 68, भोकर कोविड केअर सेंटर 30,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 37,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 94, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 47, मुदखेड कोविड केअर सेटर 36,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 65, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 52, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 56, उमरी कोविड केअर सेंटर 54, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 6, बारड कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयात 309 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 18, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 5 बाधित, लातूर येथे 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 55 हजार 616,

निगेटिव्ह स्वॅब- 44 हजार 497,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 328,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 8 हजार 910,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 14,

एकूण मृत्यू संख्या- 265,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 653,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 937,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 474, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 256.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

दिलखुलास मध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे

यांचीकोरोना: कालावधी, क्वारंटाईनचे प्रकार व काळजी

या विषयावर मुलाखत

    


मुंबई दि.6:माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची कोरोनाशी दोन हात या संवादातील  दुसरा भाग कोरोना: कालावधी,क्वारंटाईनचे प्रकार व काळजी या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर व न्यूज ऑन एअर या ॲपवर सोमवार दिनांक 7   मंगळवार दि.8 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकता येईल.ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथ्था यांनी ही मुलाखत घेतली आहे.   

        कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळेत उपचार,कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे कसे गरजेचे आहे? होम आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर किंवा राहत असताना प्रत्यक्षात कुठल्या प्रकारची खबरदारी किंवा काळजी घेतली पाहिजे, या संदर्भात  सविस्तर  माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलखुलास मध्ये  दिली आहे.

****

 

 

 

दिनांक ६ सप्टेंबर २०२०

कोरोनाशी दोन हात 

भाग पाचवा - बातमी 

जीवनशैली बदलावी लागेल

शरीरासोबत मनाची मशागत आवश्यक

-         आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.६ : सकारात्मकता व इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनासारख्या महामारीवर विजय मिळविण्यासाठी आपल्याला पुढील वाटचाल करतानाच जीवनातसुद्धा यशस्वी व्हायचे आहे. कोरोनाने आपल्याला सुदृढ राहायला शिकवले. सुदृढ रहा, निरोगी रहाल तर कुठलही संकट अचानक उद्भवलं तरी ते तुम्हाला हात लावू शकणार नाही. मानसिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला सशक्त रहावे लागेल, असा सल्ला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. 

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील सुरू असलेल्या कोरोनाशी दोन हात या चर्चासत्र मालिकेच्या पाचव्या भागात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी कोरोना: प्रतिकारशक्ती व इच्छाशक्तीचे महत्व याविषयी संवाद साधला. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते. 

आरोग्यमंत्री  श्री. टोपेम्हणाले, प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवावी. योग्य आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. जे हंगामी सासंर्गिक आजार असतात जसे डेंग्यू व मलेरिया या सगळ्यांवर आपल्याला मात कारायची असेल तर आपली प्रतिकारशक्ती चांगलीच पाहिजे. आयुष, योग, प्राणायाम, व्यवस्थितपणे आहार घेणं या सगळ्या गोष्टींचं खूप महत्व आहे. कोरोना काळात जास्त काळजी घ्यायची असेल तर  वाफ घेणं, गरम पाणी पिणे, काढा घेणं यासुद्धा महत्वाच्या बाबी असल्याचे त्यांनी सांगितले. 

आता आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शिक्षित व्हावंच लागेल. शिस्तबद्ध जीवनशैलीची सवय लावून घ्यावी लागेल. नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे मधुमेह, रक्तदाब, कर्करोग ज्यांच्यामुळे संसर्ग होत नाही, पण हे झाल्यानंतर आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा निर्माण होऊ शकतो. त्यासाठीसुद्धा आपल्याला खाण्या-पिण्याच्या सवयी नीट समजून घ्याव्या लागणार आहेत. जिभेवर आणि मनावर ताबा हे सगळं प्राणायमाने, योगासनांनी योग्य पद्धतीने शिस्तबद्ध आयुष्य जगूनच करावे लागणार आहे. तर आणि तरच आपली प्रतिकारशक्ती चांगली राहू शकेल. जंक फुड खाण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याला आता पर्याय नाही, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सकारात्मक दृष्टीकोन आणि इच्छाशक्ती या दोन गोष्टी तुमची  ताकद आहे. बऱ्याचदा ताण खूप असतो. तणावाचे व्यवस्थापन याविषयावर आरोग्य विभाग सुद्धा निश्चित प्रकारे काम करीत आहे. 

याकाळात लोकांना समुपदेश (counselling) करणे हा महत्वाचा विषय आहे. आपल्या जीवनात आपण पुन्हा सगळे कमवू शकतो. नोकरी परत मिळेल. तुमच्या हातात स्कील आहे. ज्ञान आहे. सगळे परत मिळेल. बुद्धिमत्ता असेल तर व्यवसाय पुन्हा उभा राहील. कुठेही निराश होता काम नये. खचून जाता काम नये. हिमतीने उभे राहिले पाहिजे. खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. स्वबळावर पुढे पुढे जायला पाहिजे. मला वाटतं सकारात्मक राहणे हा जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे. याच विश्वासावर आज कितीही वाईटातील वाईट प्रसंगातूनही मी पुन्हा उभा राहू शकतो, हीच मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याच्या मुद्दयावर आरोग्यमंत्र्यांनी भर दिला.

मनाची मशागत ही शरीराच्या मशागती इतकीच महत्वाची आहे आणि दोन्हीची मशागत झाली तर तो मनुष्य अशा कितीही संकटांवर मात करू शकतो, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

००००


मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दररोज रात्री ९.०० वाजता ही चर्चासत्र मालिका प्रसारीत होत आहे. उद्या सोमवारी या चर्चासत्र मालिकेचा समारोप होणार असून शेवटच्या भागात  दि. ७ सप्टेंबर रोजी ‘ कोरोना: प्लाझ्मा व सिरो सर्व्हेलन्स या विषयावर चर्चा होणार आहे.

 

अजय जाधव..विसंअ...६.९.२०२० 

 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...