Tuesday, February 10, 2026

बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी ‘मुक्तीरथ’द्वारे जनजागृती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी

 बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी ‘मुक्तीरथ’द्वारे जनजागृती

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी

 

नांदेड, दि. १० फेब्रुवारी :-जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय  व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत ‘मुक्तीरथ’ला आज मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

 बालविवाह मुक्त भारत अभियान हे भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येणारे राष्ट्रीय पातळीवरील जनजागृती व कृती अभियान आहे. १८ वर्षांखालील मुलींचे व २१ वर्षांखालील मुलांचे विवाह पूर्णतः थांबवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

 या अभियानाच्या माध्यमातून बालविवाहाची सामाजिक रूढी नष्ट करणे, मुलींचे शिक्षण टिकवून ठेवणे, बालकांचे आरोग्य व सुरक्षित भविष्य सुनिश्चित करणे, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच समाजात जनजागृती वाढवणे, ही प्रमुख उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

 यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ, महिला व बालकल्याण जिल्हा परिषदेचे प्रशांत थोरात   जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री. व्ही. एस. नरसीकर,  परिविक्षा अधिकारी गजानन जिंदमवार,  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे, जनसेवा प्रतिष्ठानचे निलेश कुलकर्णी, श्रीमती आशा सूर्यवंशी, अरुण कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 



यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवून बालविवाह निर्मूलनाचा संदेश दिला. मुक्तीरथाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

००००००

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत — जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत

— जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 






नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात आल्याने पहिला पेपर सुरळीत पार पडला अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

 पोलीस यंत्रणेमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणत्याही परीक्षा केंद्रावर बाहेरून जमाव दिसून आला नाही. शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून बारावीच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर झूम वेबकास्टद्वारे थेट निरीक्षण करण्यात आले.

 या निरीक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष (वॉर रूम) कार्यान्वित करण्यात आला होता. या प्रभावी व्यवस्थेमुळे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवरील परीक्षा शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडली.

 दरम्यान, सीसीटीव्ही निरीक्षणादरम्यान एका परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आला. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी (ता. कंधार) येथील एका परीक्षार्थ्याविरुद्ध गैरप्रकाराची नोंद करण्यात आली. उर्वरित सर्व केंद्रांवर परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

  जिल्हा नियंत्रण कक्षाची संकल्पना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली आहे.

 स्वतः जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महात्मा फुले आश्रमशाळा, वाघाळा येथील परीक्षा केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांची रांग योग्य पद्धतीने न लावल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. याच केंद्रास मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांनीही भेट दिली.

 तसेच शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी श्री. भीमाशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, शिराढोण व नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी या केंद्रांना भेटी दिल्या. शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी विद्याविकास उच्च माध्यमिक विद्यालय, बा-हाळी व आश्रमशाळा, चव्हाणवाडी या केंद्रांची पाहणी केली.

 रामचंद्र पाचंगे यांनी राष्ट्रमाता उच्च माध्यमिक विद्यालय, वाजेगाव येथील केंद्रास, तर अवधूत गंजेवार यांनी आश्रमशाळा, मरवाळी तांडा येथील केंद्रास भेट दिली.

 डायटचे प्राचार्य अमोल निळेकर यांनी लाल बहादूर शास्त्री उच्च माध्यमिक विद्यालय, संगुचीवाडी येथे, तर ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीमती मंजूषा औंढेकर यांनी जिल्हा परिषद हायस्कूल व दि ओअ‍ॅसिस स्कूल, कुंटूर येथील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

 परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात महसूल विभागाचे ८, जिल्हा परिषदेचे १२ व शिक्षण विभागाचे ६ पथके कार्यरत होती. याशिवाय उपविभाग स्तरावर ८ उपविभागीय अधिकारी, तालुका स्तरावर १६ तहसीलदार, १६ गटविकास अधिकारी, १६ नायब तहसीलदार व १६ कृषी विकास अधिकारी यांची भरारी पथके सक्रिय होती. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण १०१ भरारी पथकांनी परीक्षेच्या पहिल्या दिवशी प्रभावी कामकाज केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रदीप दुमणे व जिल्हा परिषदेत सुनील आलूरकर,श्री. पोकले व इतर अधिकारी लक्ष ठेऊन होते.

 आजच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरसाठी एकूण ४२ हजार ८०३ परीक्षार्थ्यांपैकी ४१ हजार ७२३ परीक्षार्थी उपस्थित होते. यामध्ये उपस्थितीचे प्रमाण ९७.४८ टक्के असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

०००००

सुरक्षित इंटरनेट दिन साजरा

 सुरक्षित इंटरनेट दिन साजरा

 नांदेड, दि.१० फेब्रुवारी:- Safer Internet Day हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जगभर साजरा केला जातो. यावर्षी Smart Tech, Safe Choices – Exploring the Safe and Responsible Use of Artificial Intelligence (AI) या संकल्पनेखाली आज १० फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिन शासकीय पॉलिटेकनिक कॉलेज, नांदेड येथे साजरा करण्यात आला.

 सकाळी १० वाजता ऑनलाइन सुरक्षिततेबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सुरक्षित इंटरनेट दिनाच्या निमित्ताने सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुका, इंटरनेट वापरातील सुरक्षितता तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 या मोहिमेत विद्यार्थी व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा, सोशल मीडिया वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, ओटीपी व पासवर्ड सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व तसेच बँकिंग व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

 व्याख्यानादरम्यान सायबर गुन्हे, फिशिंग हल्ले, ऑनलाइन फसवणूक, सुरक्षित पासवर्ड व्यवस्थापन तसेच डिजिटल स्वच्छता (Digital Hygiene) या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध प्रश्न विचारले व सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळवली.

 ऑनलाइन गुन्हेगारी रोखण्यासाठी व नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत सजग करण्याच्या उद्देशाने ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

 हा कार्यक्रम १० फेब्रुवारी रोजी शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज, नांदेड येथील माहिती तंत्रज्ञान (IT) विभागात आयोजित करण्यात आला होता.

 कार्यक्रमासाठी संबंधित विभागाचे विभागप्रमुख (HOD), प्राचार्य व इतर प्राध्यापक उपस्थित होते. तसेच जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रदीप दुमणे यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले.

 

प्रशिक्षण व उपक्रम

 प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी व कर्मचारी यांच्याकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा सुरक्षित व जबाबदार वापर करण्याची प्रतिज्ञा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. सदर प्रतिज्ञेसाठी

🔗 https://www.staysafeonline.in/pledge

 या संकेतस्थळाचा वापर करण्यात आला

 तसेच सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने ऑनलाइन सायबर सुरक्षा विषयक प्रश्नमंजुषा (Online Quiz) आयोजित करण्यात आली. प्रश्नमंजुषेसाठी

🔗 https://assessment.isea.app/instructions/sid2026

 या दुव्याचा उपयोग करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 तसेच या ऑनलाइन उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे (Online Certificates) प्रदान करण्यात आली.


 जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष उपक्रम

 सेफर इंटरनेट डे निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे विशेष डिजिटल जनजागृती डॅशबोर्ड प्रदर्शित करण्यात आला. या डॅशबोर्डद्वारे नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेच्या उपाययोजना, सायबर हल्ल्यांपासून संरक्षणाचे मार्ग तसेच सुरक्षित ऑनलाइन व्यवहार याविषयी माहिती देण्यात आली. प्रदर्शित व्हिडिओ व प्रतिमा नागरिकांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरल्या.

 

कार्यक्रमाचे उद्दिष्ट व परिणाम

 या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी तसेच नागरिकांना सायबर सुरक्षेच्या धोरणांबाबत आणि डिजिटल साधनांचा जबाबदारीने वापर करण्याबाबत जागरूकता मिळाली. वाढत्या इंटरनेट वापराच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वतःच्या डिजिटल सुरक्षिततेबाबत सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे.

 






मुख्य उद्दिष्टे :

 इंटरनेट व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा सुरक्षित व जबाबदार वापर याबाबत जनजागृती करणे

 सायबर स्वच्छतेच्या (Cyber Hygiene) उत्तम पद्धतींचा प्रसार करणे

 प्रमुख सायबर धोके व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहिती देणे

 इंटरनेट सुरक्षितता व सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण

 वैयक्तिक माहिती व गोपनीयतेचे संरक्षण

 डिजिटल जबाबदारी व योग्य ऑनलाइन वर्तन

 सायबर धमकी व फसवणुकीपासून बचाव

 शिक्षण, संशोधन व सर्जनशीलतेसाठी तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर.

००००००

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ

 

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ

 

नांदेड, दि. १० फेब्रुवारी:-आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ आज आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पंचायत समिती किनवट येथे करण्यात आला आहे.

 केंद्र सरकार नीती आयोगाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत किनवट तालुका समाविष्ट असून यात एकूण ४० निर्देशकांचा समावेश करण्यात आलेला आहे.  मागील वर्षी जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आला. यातील मिळालेल्या यशानंतर केंद्र सरकारच्या नीती आयोगाने सध्या २८ जानेवारी ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत संपूर्णता अभियान २.० अभियानाची सुरुवात केली असून यात आरोग्य-पोषण, शिक्षण आणि कृषी-पशुसंवर्धन या क्षेत्रांतर्गत ६ निर्देशक समाविष्ट करण्यात करण्यात आले आहेत जे कि १४ एप्रिल २०२६ पर्यंत १०० टक्के पूर्ण करावयाचे आहेत.

 याचाच एक भाग म्हणून आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते आज किनवट येथील पंचायत समिती सभागृहात सदर अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी संजय राठोड माजी सभापती (समाजकल्याण), दत्ता भाऊ आडे माजी सभापती पंचायत समिती, आमदार महोदयांचे स्वीय सहाय्यक संतोष मरसकोल्हे, प्रशांत थोरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा),  जयश्री वाघमारे गटविकास अधिकारी, संतोष बघेले उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, डॉ.के पि गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी, अनिल महामुने गटशिक्षणाधिकारी, शिवाजी जामोदे बालविकास प्रकल्प अधिकारी, उमेश धोंड पशुधन विकास अधिकारी (विस्तार), विस्तार अधिकारी वसंत वाघमारे, निवृत्ती मूकनर वरिष्ठ सहाय्यक राजेश म्याकलवार हे उपस्थित होते.

 यावेळी आमदार श्री. केराम  यांनी सदर अभियानात समाविष्ट निर्देशांक १०० टक्के संप्रूक्त करण्यासाठी अधिक गतीने काम करावे, यासाठी विविध विभागाशी समन्वय ठेवून निर्धारित उद्दिष्ट साध्य करावे, अधिक प्रभाविपणे काम करून तालुक्याचे नाव दैदिप्यमान करणाऱ्या विभागांचा व संबंधित अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येईल यासाठी सर्वांनी सदर महत्वाकांक्षी कार्यक्रमात सर्वांनी पुढे येऊन योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.

 उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी ही संबंधित निर्देशांक कसे पूर्ण करता येईल यासाठी सखोल मार्गदर्शन केले आणि आरोग्य विभाग व महिला बालविकास व ग्रामपंचायत विभाग यांच्या समन्वयाने हे सहज शक्य आहे असे प्रतिपादन केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांनी केले. सदर प्रस्ताविकेतुन त्यांनी यंत्रणानिहाय समावेशित निर्देशकांची माहिती दिली व एकंदरीत उपस्थितांना सदर कार्यक्रमाचा परिचय करून दिला आहे.

 सदर अभियांनात समावेशित निर्देशक -

1. ICDS च्या SNP कार्यक्रमांतर्गत ०६ महिने ते ०६ वर्षापर्यंतच्या लाभार्थी बालकांना पूरक पोषण आहार वितरण करणे

2. प्रत्येक अहवाल महिन्यातील नोंदीत सर्व बालकांची कार्यक्षमता मोजणे

3. प्रत्येक अंगणवाडीस शौचालय सुविधा उपलब्ध करणे

4. प्रत्येक अंगणवाडीस पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे

5. प्रत्येक शाळेत मुलींसाठी शौचालय सुविधा उपलब्ध करणे

6. सर्व गोवंशिय जनावरांचे लाळ व खुरकत रोगाविरुद्ध लसीकरण करणे

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षित कार्यक्रमाचे समन्वयक पांडुरंग मामीडवार यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी निवृत्ती मूकनर यांनी मानले.

सदर शुभारंभ कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, सहा.प्रशासन अधिकारी श्री टोम्पे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अल्केश शिरसेटवार, सर्व विस्तार अधिकारी, RGSA तालुका व्यवस्थापक अभिजित गरड, कनिष्ठ सहाय्यक अंकुश राठोड, सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, पशुधन विकास अधिकारी, सर्व पशुवैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, सर्व कार्यालयीन कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 तालुका कक्ष वॉर रूमची केली पाहणी

 आमदार महोदयांनी यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियांन अंतर्गत पंचायत समिती स्तरावर प्रचार प्रसिद्धी व योजणांच्या सार्वत्रिकिकरणासाठी तयार करण्यात आलेल्या वॉर रूमची ही यावेळी पाहणी करून शुभेच्छा दिल्या.

 पोषण आहार जनजागृती स्टॉलचे उदघाटन

 






यावेळी आमदार श्री. केराम  यांनी ICDS विभागाने संपूर्णता अभियानाच्या शुभारंभाचे औचित्य साधून तयार केलेल्या पोषण आहार जनजागृती संदर्भात तयार केलेल्या स्टॉल ला भेट देऊन पाहणी केली व विभागाचे कौतुक केले.

००००००

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

 

नांदेड, दि. १० फेब्रुवारी:- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचे कामकाज सुरळीत, पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला आहे.

 या नियंत्रण कक्षामार्फत परीक्षाकाळात जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यात येणार असून, परीक्षेच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी, शिस्तभंग, गैरप्रकार तसेच आपत्कालीन परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे कामही या कक्षामार्फत केले जाणार आहे.

 





परीक्षा कालावधीत नियंत्रण कक्ष सतत कार्यरत राहणार असून, परीक्षेच्या पारदर्शकतेसह विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

०००००

  वृत्त क्रमांक     दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या   खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवल तीचे गुण  प्रस्ताव ऑनलाईन सादर   करण्याचे आव...