Friday, August 7, 2026

 महाडीबीटी 2.0 शिष्यवृत्ती अर्जासाठी प्राचार्यांची कार्यशाळा संपन्न

अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट

नांदेड, दि. ७ : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाडीबीटी २.० संकेतस्थळाद्वारे विनाअडथळा मिळावा, तसेच अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांची कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नांदेड येथे नुकतीच आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेत सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेची शंभर टक्के प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थी, संस्था आणि जिल्हास्तरावर नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पात्र विद्यार्थ्यांचे मॅपिंग व नोंदणी, आधार व बँक खाते संलग्नता, संस्थास्तरीय उत्तरदायित्व, मदतकेंद्रांची स्थापना, त्रुटी निवारण आणि नियमित आढावा यावर विशेष भर देण्यात आला.

मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या किंवा अर्ज न करू शकलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन यंदा त्यांचा शंभर टक्के समावेश करण्याचे निर्देशही देण्यात आले.

आधार व बँक खाते संलग्नतेवर विशेष भर

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, बँक खाते आणि एनपीसीआय (NPCI) मॅपिंग अथवा आधार संलग्नीकरणासाठी भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक तसेच स्थानिक बँकांच्या सहकार्याने विशेष शिबिरे आयोजित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला किंवा बँक खात्याशी संबंधित त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहू नयेत, यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संस्थास्तरावर शिष्यवृत्तीचे अर्ज विनाकारण प्रलंबित ठेवणाऱ्या महाविद्यालयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आणि सेवा स्तर करार (SLA) निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

जनजागृती व मदतकेंद्रांवर भर

ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी दवंडी, माहितीपत्रके आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयात शिष्यवृत्ती मदतकेंद्र स्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

महाडीबीटी २.० पोर्टलवरील तांत्रिक अडचणींचे तातडीने निराकरण करणे, मागील वर्षी अर्ज बाद होण्याची कारणे वर्गीकृत करून त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे तसेच याबाबत जिल्हास्तरावर वेळोवेळी प्राचार्यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सर्व महाविद्यालयांनी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले.

 मराठी भाषा विभागासह अधिनस्त कार्यालयांची सात संकेतस्थळे नव्या स्वरूपात कार्यान्वित

नव्या संकेतस्थळांचा लाभ घेण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन

नांदेड, दि. 7 ऑगस्ट : मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त कार्यालयांची एकूण सात संकेतस्थळे महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार नव्या स्वरूपात कार्यान्वित करण्यात आली आहेत. नागरिक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या नव्या संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाने केले आहे.

मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या एकूण सात संकेतस्थळांच्या हस्तांतरणाची कार्यवाही MahaIT मार्फत सुरू होती. या हस्तांतरण प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळांसाठी महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार नवीन डोमेन वापरण्याची कार्यवाही करण्यात आली.


या तांत्रिक प्रक्रियेदरम्यान आवश्यक प्रणालीगत बदल करण्यात येत असल्यामुळे संबंधित संकेतस्थळे काही काळ तात्पुरती अनुपलब्ध होती. आता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व संकेतस्थळे नव्या स्वरूपात नियमितपणे कार्यान्वित करण्यात आली आहेत.


नवीन संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे :

१. मराठी भाषा विभाग – https://marathi.maharashtra.gov.in

२. भाषा संचालनालय – https://directorate-marathi. Maharashtra.gov.in

३. राज्य मराठी विकास संस्था –https://rmvs-marathi.maharashtra.gov.in

४. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ – https://sahitya-marathi.maharashtra.gov.in

५. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ – https:// marathivishwakosh.maharashtra.gov.in

६. विश्वकोश प्रथमावृत्ती (खंड १ ते २०) – https://vishwakosh-marathi.maharashtra.gov.in

७. मराठी परिभाषा कोश – https://shabdakosh-marathi.maharashtra.gov.in

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, विश्वकोश, परिभाषा तसेच विविध संदर्भसाहित्याशी संबंधित माहिती नागरिकांना अधिक सुलभपणे उपलब्ध व्हावी, यासाठी ही संकेतस्थळे उपयुक्त ठरणार आहेत. सर्व नागरिक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधितांनी नव्या संकेतस्थळांची नोंद घेऊन त्यांचा उपयोग करावा, असे मराठी भाषा विभागाने कळविले आहे.

00000

 जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन 

नांदेड, दि. 7 ऑगस्ट :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यावतीने 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयात व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय नांदेड येथे ही राष्ट्रीय लोकअदालत संपन्न होईल. सर्व संबंधित पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्मे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश  शरद जी. देशपांडे यांनी केले आहे. 


या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याबाबतची प्रकरणे तसेच कौंटुबीक न्यायालयातील तडजोड होण्यायोग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे इत्यादी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. 


याशिवाय या लोकअदालतीत  दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलीफोन बिल, विविध बॅंकांचे कर्ज वसुलीचे प्रकरण, थकीत पाणी बिल इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढल्या जातील. 


राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरुद्ध अपील नाही. प्रलंबीत प्रकरणात भरलेली कोर्ट शुल्काची रक्कम शंभर टक्के परत मिळते. नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही अशा प्रकारे लोकन्यायालयाच्या माध्यमातून सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो. पक्षकारांनी येतांना आपले अधिकृत ओळखपत्र घेवून यावे. या लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 महाडीबीटी 2.0 शिष्यवृत्ती अर्जासाठी प्राचार्यांची कार्यशाळा संपन्न अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती ला...