Monday, October 26, 2026

 वृत्त क्रमांक

मोटार सायकलसाठी MH26-DE ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार 

पसंतीच्या क्रमांकासाठी २८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, दि. २६ ऑक्टोबर : परिवहनेतर संवर्गातील मोटारसायकलींसाठी MH26-DE ही नवीन वाहन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील पसंतीचा क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी बुधवार २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी अर्जासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाइल नंबर आणि ई-मेलची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच संबंधित पसंतीच्या क्रमांकासाठी निर्धारित शुल्काचा धनादेश (डिमांड ड्राफ्ट) अर्जासोबत सादर करावा लागणार आहे.

 

निर्धारित तारीख व वेळेनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. एखाद्या पसंतीच्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांना बुधवार २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. त्यामुळे इच्छुक वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज सादर करून पसंतीचा क्रमांक मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

0000

विशेष लेख-

 *दुष्काळ निवारण्यासाठी खारीचा वाटा उचलू या* 

दुष्काळ म्हणजे केवळ पाऊस कमी पडणे नव्हे. पाण्याची टंचाई, शेतीच्या उत्पन्नात घट, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पशु पक्षांचा जगण्याचा प्रश्न,  वाढता घरखर्च आणि रोजगाराच्या संधींवर होणारा परिणाम,असे त्याचे अनेक पैलू आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि लगतच्या काही भागातील  जनतेला दुष्काळाचे चटके वारंवार सहन करावे लागतात. अशा वेळी शासनाच्या मदतकार्याबरोबरच नागरिकांनीही उपलब्ध साधनसंपत्तीचा जपून वापर करणे आवश्यक आहे. जुन्या पिढीने अनुभवातून सांगितलेले एक वाक्य आजही महत्त्वाचे आहे, ‘दुष्काळ सगळ्यांना काटकसर शिकवतो!’ मात्र, ही काटकसर नेमकी कशी करावी, हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

 

 *पाण्याचा अपव्यय टाळा, काटेकोर नियोजन करा.*

 दुष्काळात प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. पाण्याचे दुर्भिक्ष होऊ शकते हे आपल्या प्रत्येकाच्या लक्षात असले पाहिजे. आपण पाणी कमी वापरल्याने काय फरक पडणार हा प्रश्न पहिले मनातून काढून टाकणे आवश्यक आहे. घरातील गळणारे नळ त्वरित दुरुस्त करावेत. दात घासताना, दाढी करताना किंवा भांडी घासताना नळ सतत सुरू ठेवू नये. आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करावा. वाहन धुण्यासाठी पाइपऐवजी बादली वापरावी. भाजी धुण्यासाठी वापरलेले  पाणी झाडांना वापरता येईल. घरातील पाण्याच्या टाकीला स्वयंचलित नियंत्रण किंवा ओव्हरफ्लो रोखण्याची व्यवस्था करावी.

 

 *पिण्यासाठी पाण्याला प्राधान्य*

 पिण्याचे व स्वयंपाकाचे पाणी प्राधान्याने राखून ठेवावे. उपलब्ध पाण्याचा वापर पिणे, स्वयंपाक, स्वच्छता आणि इतर कामांसाठी आवश्यकतेनुसार विभागून करावा. पिण्याचे पाणी स्वच्छ, झाकलेल्या भांड्यात साठवावे. पाणीटंचाई असताना पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये.

 

 *सार्वजनिक पुरवठ्यांवर नजर ठेवणे*

 गावांमध्ये सार्वजनिक नळांवरील गळती थांबवणे, पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचे पालन करणे आणि पाण्याचे समान वाटप सुनिश्चित करणे, ओलीतासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे, शेततळी, नालाबांध, बंधारे आणि भूजल पुनर्भरण यांसारख्या उपाययोजना स्थानिक परिस्थितीनुसार राबवाव्यात. रोजगार हमीच्या कामांतून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी ग्रामपंचायत आणि प्रशासनाशी समन्वय साधावा.पुढील पावसाळयात भूजल पुनर्भरण करता यावे, यासाठी आवश्यक कामांचे नियेाज आजपासून करावे. त्यासाठी बंधारे, छोटे बांध,नाला खोलीकरण रुंदीकरण असे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.  मराठवाड्यातील प्रत्येक घरावर टीन असो वा कवेलू त्यावरील पाणी जमिनीत मुरेल याचे नियोजन करण्याची सूचना देखील हा दुष्काळ करतो आहे हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आता प्रत्येक घरासाठी अनिवार्य स्वतः करणे महत्त्वाचे ठरते. भूजल पुनर्भरणासाठी  या छोट्या उपाययोजना अधिक आवश्यक ठरतात.

 

 *दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होतो.*

 आपली सर्व अर्थव्यवस्था ही शेतीवर आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था उत्पादनावरून अवलंबून असते. त्यामुळे दुष्काळ पडू शकतो हे गृहीत धरून उपलब्ध पाणी, जमिनीतील ओलावा, पीकस्थिती आणि संभाव्य उत्पन्न यांचा हिशेब करणे गरजेचे आहे. पुढील पेरणीपूर्वी कृषी विभागाच्या सल्ल्याने कमी पाण्यात येणारी, स्थानिक हवामानाला  अनुरूप पिके निवडावीत. पाणी उपलब्ध नसताना जास्त पाणी लागणाऱ्या पिकांसाठी मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी संभाव्य नुकसानाचा विचार करावा. शक्य असेल तेथे ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचनातून पाणी थेट पिकांच्या मुळांजवळ पोहोचते. सिंचनासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी योग्य वेळ निवडावी आणि शेतातील पाइप, व्हॉल्व्ह व जोडण्यांमधील गळती थांबवावी. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी पिकांचे अवशेष किंवा योग्य आच्छादन वापरावे. गरजेपेक्षा जास्त पाणी देणे टाळावे.

 

 *माती परीक्षण ; चाऱ्याची उपलब्धता*

 खते आणि कीटकनाशके अंदाजाने वापरण्याऐवजी माती परीक्षण, पीकस्थिती आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरावीत. बियाणे, खते आणि औषधे एकत्रित खरेदी करणे, यंत्रसामग्री सामायिक वापरणे आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून खर्च विभागून घेणे शक्य आहे. पीकविमा, शासकीय मदत आणि रोजगार योजनांची माहिती अधिकृत यंत्रणांकडून घ्यावी.

पशुधन आणि चाऱ्याची बचत करावी, जनावरे ही ग्रामीण कुटुंबांची महत्त्वाची संपत्ती आहे. उपलब्ध चारा मोजून वापरावा आणि चाऱ्याची नासाडी होणार नाही, अशी व्यवस्था करावी. पिकांचे सुरक्षित अवशेष योग्य पद्धतीने साठवावेत. शक्य असल्यास चारा उत्पादनासाठी नियोजन करावे. जनावरांना स्वच्छ पाणी नियमित उपलब्ध करून द्यावे. त्यांच्या आहारात अचानक बदल करू नये आणि पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घ्यावी. चाऱ्याची टंचाई गंभीर झाल्यास चारा छावण्या किंवा अन्य शासकीय सुविधांसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

 

 *रोजगार, बचत आणि सामूहिक मदत*

 शेतीतून उत्पन्न कमी झाल्यास ग्रामपंचायत आणि रोजगार हमी यंत्रणेकडे उपलब्ध कामांची माहिती घ्यावी. पात्रतेनुसार रोजगार व मदत योजनांसाठी अर्ज करावा. घरातील उपलब्ध धान्याचे नियोजन करावे. आर्थिक अडचणीच्या काळात जास्त व्याजाचे कर्ज घेण्याऐवजी अधिकृत मदत आणि उपलब्ध पर्याय तपासावेत.


दुष्काळ हा केवळ शेतकऱ्यांचा प्रश्न नसून संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक, सामाजिक संस्था, व्यापारी आणि सेवाभावी संघटनांनी गरजू कुटुंबांना अन्नधान्य, शैक्षणिक साहित्य किंवा आवश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करावी. ही मदत स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आणि लाभार्थ्यांची प्रतिष्ठा जपत करावी.

 

 *घरखर्चाचे नियोजन करा; अनावश्यक खर्च टाळा*

 दुष्काळात उत्पन्न कमी होण्याची शक्यता असताना कुटुंबाने मासिक खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवावा. अन्नधान्य, औषधे, शिक्षण, वीज आणि आवश्यक प्रवास यांसाठीचा खर्च प्रथम बाजूला ठेवावा. अनावश्यक खरेदी, महागड्या वस्तू, दिखाऊपणा आणि परवडत नसताना घेतलेले कर्ज टाळावे. बाजारात जाण्यापूर्वी आवश्यक वस्तूंची यादी करावी. काटकसरीने खरेदी करायचे आहे आवश्यक तीच खरेदी करायची आहे हे लक्षात घेऊनच बाजारात पाऊल ठेवणे उपयुक्त ठरेल.आठवड्याचा भाजीपाला आणि महिन्याचा किराणा नियोजन केल्यास अनावश्यक खरेदी कमी होते. यंदाच्या दिवाळीत फटाके, महागडे कपडे, सजावटीच्या वस्तू आणि अनावश्यक भेटवस्तूंवरील खर्च कमी करता येईल. सणाचा आनंद साधेपणानेही घेता येतो. आज वाचवलेली रक्कम पुढील काही महिन्यांतील अडचणींसाठी उपयोगी पडू शकते. मात्र, काटकसर करताना पोषण, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये.

 

 *काटकसर हीच सामूहिक ताकद*

 दुष्काळ पूर्णपणे टाळणे प्रत्येकाच्या हातात नसले, तरी त्याचे परिणाम कमी करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही करू शकतो.अगदी समूह शेती सारख्या सहकार तत्वाचा स्वीकार करणे. सार्वजनिक पानवठ्यांचा योग्य वापर करणे, घरात पाण्याची बचत, शेतीत खर्चाचे नियोजन, पशुधनाची काळजी, अनावश्यक खरेदीला आळा आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणे, या कृती संकटाची तीव्रता कमी करू शकतात.


सण-उत्सवात आपल्या शेजाऱ्याची परिस्थिती समजून घेणे आणि शक्य ती मदत करणे हेही सामाजिक दायित्व आहे. अशावेळी सण देखील सामूहिकरित्या साजरे केले जाऊ शकतात. एकत्रित येऊन साधेपणाने उत्सव साजरा केला जाऊ शकतो. त्यासाठी पुढाकार कोण घेईल याची वाट पाहता एक पाऊल पुढे टाकून गावागावात वेगवेगळे उपक्रम राबविणे गरजेचे ठरते.

 

 *दुष्काळ भविष्याची बांधणी करतो*

 यापूर्वीही अनेकदा दुष्काळाचा सामना दुष्काळी प्रदेशाने केला आहे.मात्र,ज्याच्याकडे मदतीची दानत आहे त्यांनी इतरांना मदतीसाठी हात पुढे केला आहे. सामान्यातला सामान्यमाणूस एकत्रित येऊन अशा वेळी असामान्य कामे करू शकतात. त्यामुळे विवाहसोहळ्यांना सामूहिक स्वरूप देण्यापासून तर सण उत्सवही एकत्रित करण्यापर्यंत अनेक उपाययोजना गावागावात होऊ शकतात. खरे तर अशी परिस्थिती भविष्यात उद्भवू नये यासाठी निसर्ग दुष्काळाच्या नावाने एक संधीही निर्माण करत असते. मराठवाड्यातील प्रत्येक गाव पाणीदार व्हावे, प्रत्येक गावाचे पाण्याचे ऑडिट व्हावे,त्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना करण्यासाठी या दुष्काळात चिंतन होणे गरजेचे आहे.शासनस्तरावरून सर्वांची काळजी घेतली जाते मात्र गावे जर स्वावलंबी बनली तर अशावेळी प्रशासनालाआणखी मदत होते. त्यामुळे या दुष्काळात खर्चापासून पाण्याच्या बचतीपर्यंत थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे दुष्काळावर मात करणाऱ्या घटकांसाठी प्रयत्न करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.


प्रवीण टाके

उपसंचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय

छत्रपती संभाजीनगर मोबाईल न.9702858777

00000



वृत्त 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक व शांततेत पार पाडा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

विभागीय आयुक्तांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी; अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर, दि. २६ (विमाका) : विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी उद्या, मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे मतमोजणी होणार आहे. विभागीय आयुक्त श्रीकांत यांनी आज मतमोजणी केंद्राला भेट देऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षातील टेबलांची मांडणी, स्ट्राँग रूम, मतपेट्यांची सुरक्षितता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतमोजणीच्या फेऱ्या, निकाल संकलन व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

मतमोजणीसाठी ७० टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, प्राथमिक मतमोजणीच्या १३ फेऱ्यांचे नियोजन आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक व दोन सहाय्यक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक सात टेबलांवर एका सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र दोन टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतपत्रिकांचे वर्गीकरण, वैध व अवैध मतांचा निर्णय, पसंतीक्रमानुसार मतांची नोंद तसेच निकालपत्रकांची पडताळणी करताना विशेष दक्षता घ्यावी. मतमोजणीदरम्यान कोणतीही शंका अथवा अडचण उद्भवल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीद्वारे देखरेख, प्रवेश नियंत्रण व आवश्यक मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती देण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.

यावेळी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या तसेच टेबलनिहाय कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सर्वांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून मतमोजणी प्रक्रिया यशस्वी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त श्रीकांत यांनी दिले.

***

 वृत्त क्रमांक

40 टन मका मुरघासासह चारा व्यवस्थापनाचा कारेगावच्या पशुपालकाचा आदर्श

• सुधाकर किरवले पाटील यांचे दुष्काळपूर्व नियोजन अनुकरणीय

• पशुसंवर्धन विभागाकडून चारा व्यवस्थापनाची पाहणी व मार्गदर्शन

• मुरघास, सोयाबीन कुटार आणि हिरव्या चाऱ्याचे नियोजन

नांदेड, दि. 26 : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याचे शास्त्रोक्त नियोजन व साठवणूक करण्याचे महत्त्व वाढले आहे. लोहा तालुक्यातील कारेगाव येथील उपक्रमशील पशुपालक व प्रगतिशील शेतकरी सुधाकर किरवले पाटील यांनी सुमारे 40 टन मका मुरघासाची निर्मिती, सोयाबीन कुटाराचा साठा आणि वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी केलेले नियोजन इतर पशुपालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या चारा व्यवस्थापनाची पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

या भेटीदरम्यान पशुधनाची सद्यस्थिती, उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा, चारा साठवणुकीची व्यवस्था आणि संभाव्य टंचाईच्या काळातील नियोजनाचा आढावा घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला पुरेसा व पौष्टिक चारा उपलब्ध राहावा, यासाठी किरवले पाटील यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली.

किरवले पाटील यांनी जमिनीत खड्डा तयार करून सुमारे 40 टन मका मुरघासाची निर्मिती व साठवणूक केली आहे. याशिवाय पशुधनासाठी सोयाबीन कुटाराचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवला आहे. वर्षभर हिरवा चारा मिळावा, यासाठी सुपर नेपियर आणि मका पिकांची लागवड केली असून, चारा उत्पादनासाठी सिंचनाची सुविधाही उपलब्ध आहे. आगामी रब्बी हंगामात चारा पिकांची लागवड करण्यासाठी त्यांनी अनुदानित चारा बियाणे मिळण्याबाबत अर्जही सादर केला आहे.

उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून चारा उत्पादन, संवर्धन आणि साठवणुकीचे केलेले हे नियोजन संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

या वेळी परिसरातील शेतकरी व पशुपालकांना चारा साक्षरता अभियानांतर्गत मुरघास निर्मिती, सोयाबीन कुटाराचे संवर्धन, निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे, सुपर नेपियरची लागवड, रब्बी हंगामातील चारा उत्पादन तसेच उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने व शास्त्रोक्त पद्धतीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्ह्यातील इतर पशुपालकांनीही सुधाकर किरवले पाटील यांच्या नियोजनाचा आदर्श घेऊन चारा उत्पादन व साठवणुकीसाठी पुढाकार घ्यावा आणि संभाव्य चारा टंचाईच्या काळात पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पूर्वतयारी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.

या पाहणीवेळी जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, सहाय्यक आयुक्त, नायगाव डॉ. गौतम खिल्लारे आणि पशुवैद्यकीय अधिकारी, सोनखेड डॉ. बालाजी जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.

**



वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यासाठी 28 ऑक्टोबरला ‘येलो अलर्ट’

विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

नांदेड, दि. 26 : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 28 ऑक्टोबर 2026 रोजी एक दिवसासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. नागरिकांनीही हवामानाची स्थिती लक्षात घेऊन सतर्क राहावे आणि वीज, वादळी वारे व पावसाच्या कालावधीत सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

विजा चमकत असताना ही खबरदारी घ्या

विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यास अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळावे. मोकळ्या जागेत असताना जवळपास सुरक्षित इमारत उपलब्ध नसल्यास सखल जागेचा आश्रय घ्यावा आणि गुडघ्यात डोके घालून सुरक्षित स्थितीत बसावे. घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. बाल्कनी, छत किंवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे तात्काळ बंद करावीत. तारांचे कुंपण, विजेचे खांब आणि अन्य लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे. पाण्यात असल्यास तात्काळ पाण्याबाहेर यावे.

वीज पडण्याचा धोका असताना हे टाळा

घरातील लँडलाइन दूरध्वनीचा वापर करू नये. शॉवरखाली अंघोळ करू नये तसेच बेसिनचे नळ, पाण्याच्या पाइपलाइनला स्पर्श करू नये. वीज चमकत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुरू असताना लोखंडी संरचनेच्या तंबूत किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये. उंच झाडाखाली आसरा घेऊ नये. धातूच्या उंच मनोऱ्यांजवळ उभे राहू नये. घरात असताना उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नये. अशा ठिकाणी उभे राहणेही धोकादायक ठरू शकते.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत हवामानविषयक सूचनांकडे लक्ष द्यावे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

**

वृत्त क्रमांक

राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी बोरगाव तेलंग व माळ कौठा येथे कुटुंबीयांचे केले सांत्वन

• मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देणार

नांदेड, दि. 26: नांदेड तालुक्यातील बोरगाव तेलंग येथील मयत शेतकरी शंकर क्षीरसागर आणि मुदखेड तालुक्यातील माळ कौठा येथील मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबीयांची राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले. शासन त्यांच्या पाठीशी असून, शासनाच्या विविध योजनांमधून पात्रतेनुसार लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

बोरगाव तेलंग येथे कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस

राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी बोरगाव तेलंग येथे मयत शेतकरी शंकर क्षीरसागर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या पत्नी, आई, वडील व मुलींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. कुटुंबीयांना धीर देत शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शंकर क्षीरसागर यांच्या वडिलांवर आवश्यक उपचार करण्यासाठी संबंधित आरोग्य विभागाला निर्देश दिले.

माळकौठा येथे शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन

मुदखेड तालुक्यातील माळ कौठा येथे मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या घरी भेट देऊन राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी त्यांच्या आई, पत्नी व मुलांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या कठीण प्रसंगी शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असून, विविध शासकीय योजनांचे पात्रतेनुसार लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोरगाव तेलंग येथे तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. माळ कौठा येथे आमदार श्रीजया चव्हाण यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

***












वृत्त क्रमांक

पाणीटंचाई, पीक कर्ज वाटप आणि सक्तीच्या वसुलीबाबत संवेदनशीलतेने काम करा - राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांचे संबंधित विभागांना निर्देश

* सक्तीच्या वसुलीला आळा घाला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

* अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतःपासून जलसंधारणाला सुरुवात करावी

* पीक कर्ज वाटपाचा नियमित आढावा घ्या

नांदेड, दि. 26 : संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई, जलजीवन मिशनची कामे, पीक कर्ज वाटप आणि खासगी सावकारी व मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून होणाऱ्या वसुलीच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. शेतकरी व नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सक्तीच्या वसुलीला आळा घालून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने पाणीटंचाई व जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार श्रीजया चव्हाण, महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या तसेच पूर्णत्वाच्या टप्प्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेऊन उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. निधीअभावी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये अडथळे येऊ नयेत, यासाठी जिल्हा वार्षिक योजना आणि आमदार निधीतून आवश्यक कामे मार्गी लावावीत. महसूल, जलसंपदा, पोलीस, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या विभागांनी समन्वयाने काम करून संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा, अशा सूचना राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतःपासून जलसंधारणाला सुरुवात करावी

पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलतारा आणि भूजल पुनर्भरणाची कामे प्रभावीपणे राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व प्रशासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम स्वतःच्या घरापासून जलतारा आणि पाणी पुनर्भरणाच्या कामांना सुरुवात करावी. यामुळे नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जागरूकता निर्माण होईल. प्रत्येक गावात जाऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

पीक कर्ज वाटपाचा नियमित आढावा घ्या

संभाव्य दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी पीक कर्ज वाटपाला प्राधान्य द्यावे. दर 10 ते 15 दिवसांनी पीक कर्ज वाटपाचा आढावा घेऊन पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी. पीक कर्ज, पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा, पशुधनाचा विमा उतरविणे या महत्त्वाच्या विषयांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सक्तीच्या वसुलीला आळा घाला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

खासगी सावकारी आणि मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून होणाऱ्या वसुलीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर जाऊन नागरिकांशी संवाद साधावा. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना आवश्यक मदत करावी. मायक्रो फायनान्सच्या वसुलीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू होणे ही गंभीर बाब आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे. वित्तीय संस्थांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत सक्त निर्देश द्यावेत. सक्तीने वसुली होणार नाही, याची खात्री करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिला.

प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संवेदनशीलतेने वागावे, त्यांना मानसिक आधार द्यावा आणि त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

या बैठकीत कृषी, पाटबंधारे, पशुसंवर्धन, महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन, ग्रामीण पाणीपुरवठा आणि सहकार विभागांनी सुरू असलेली व प्रलंबित कामे, आवश्यक निधी तसेच संभाव्य दुष्काळाच्या अनुषंगाने केलेल्या नियोजनाची माहिती सादर केली.

या बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. कांबळे, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश फडसे, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

**











 वृत्त क्रमांक

दिवाळी प्रवासात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स विरुद्ध तक्रार करा

प्रवाशांनी तिकीट, भाड्याचा पुरावा जतन करण्याचे प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन
नांदेड , दि. २६ ऑक्टोबर : दिवाळी सण व सुट्यांच्या कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता खासगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी निर्धारित भाड्यापेक्षा जादा भाडे आकारले जात असल्यास संबंधितांविरुद्ध तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेसाठी शासन किंवा सक्षम प्राधिकरणाने लागू केलेल्या विशेष सणकालीन भाडेवाढीच्या तरतुदीनुसार नियमित भाड्याच्या दीडपट (१.५ पट) भाडे आकारण्यास परवानगी आहे. मात्र कोणत्याही खासगी ट्रॅव्हल्सना मनमानी पद्धतीने यापेक्षा जादा भाडे आकारण्याचा अधिकार नाही. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आकारण्यात येणाऱ्या भाड्याची खात्री करूनच तिकीट घ्यावे.
जादा भाडे आकारल्यास तक्रार नोंदवा
खासगी ट्रॅव्हल्सकडून निर्धारित भाड्यापेक्षा जादा रक्कम आकारण्यात आल्यास प्रवाशांनी तात्काळ तक्रार नोंदवावी. तक्रारीसाठी संबंधित ट्रॅव्हल्सचे नाव, बस क्रमांक, प्रवासाचा मार्ग, प्रवासाची तारीख आणि आकारलेले भाडे याची नोंद ठेवणे आवश्यक आहे.
जादा भाडे आकारल्याचा पुरावा म्हणून प्रवासाचे तिकीट व भाडे भरल्याची पावती जतन करावी. तसेच संबंधित ट्रॅव्हल्सचे नाव, बस क्रमांक, प्रवासाचा मार्ग, दिनांक आणि आकारलेले भाडे याबाबतची सविस्तर माहिती तक्रारीसोबत द्यावी.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा
जादा भाडे आकारणीबाबतची तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे नोंदविता येईल. या कार्यालयाचा ई-मेल rto.26-mh@gov.in व दूरध्वनी क्र. ०२४६२-२५९९०० हा असून दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांची आर्थिक लूट होऊ नये यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे. प्रवासापूर्वी भाड्याची खात्री करावी आणि निर्धारित भाड्यापेक्षा जादा आकारणी होत असल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000

 वृत्त क्रमांक

नांदेड जिल्हा दुष्काळ निवारण अभियानासाठी जिल्हा प्रशासनाचे शाळा, विद्यार्थी, पालक व शिक्षकांना विशेष आवाहन

‘पाणी वाचवा, जनावरे जगवा, शेतकऱ्यांना साथ द्या’; 

दुष्काळ निवारणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन

नांदेड दि. 26 ऑक्टोबर :- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई तसेच पशुधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासन, नांदेड जिल्हा प्रशासन आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत शाळा, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि दुष्काळ निवारणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाचे संस्कार रुजविण्यावर भर

विद्यार्थ्यांनी शाळेत आयोजित विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, पाण्याची बचत करावी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विहिरी, तलाव, नद्या आणि ओढे यासारख्या स्थानिक जलस्रोतांची माहिती घेऊन जलसंपत्तीचे महत्त्व जाणून घेण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुतल्यानंतर उरलेले योग्य पाणी झाडांना वापरणे, भाजी धुतलेले पाणी वाया न घालवता झाडांसाठी वापरणे आणि घर, शाळा व गावात पाणी बचतीबाबत जनजागृती करणे, अशा छोट्या कृतींतून मोठा बदल घडविण्याचा संदेश देण्यात आला आहे.

शाळांमधून जनजागृती उपक्रम राबविण्याचे निर्देशात्मक आवाहन

शिक्षकांनी निबंध, वक्तृत्व, चित्रकला आणि पोस्टर स्पर्धा, प्रभात फेरी, परिसंवाद, नाटिका व पथनाट्य यांच्या माध्यमातून पाणी बचत, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि दुष्काळ निवारणाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैलीची सवय लावण्याबरोबरच पालक आणि समाजाच्या सहकार्याने लोकसहभाग वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे.

पालकांनीही घ्यावा सक्रिय सहभाग

पालकांनी घरातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा, नळांची गळती तातडीने दुरुस्त करावी आणि मुलांना निसर्गप्रेम, वृक्षसंवर्धन, स्वच्छता व आरोग्याचे संस्कार द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळीसह सण-उत्सव साधेपणाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करून फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच शेतकरी आणि पशुपालक कुटुंबांना चारा व पाण्याच्या उपलब्धतेसाठी मदत करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

मुख्याध्यापकांनी तयार करावा शालेय कृती आराखडा

मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर पाणी बचत व पर्यावरण संवर्धन समिती स्थापन करून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा सहभाग सुनिश्चित करावा. शाळेतील जलस्रोतांची तपासणी, पाण्याची गळती रोखणे, आवश्यक दुरुस्ती करणे आणि पाणी बचतीचे नियोजन यासाठी पुढाकार घ्यावा. दुष्काळ निवारणासाठी शालेय कृती आराखडा तयार करून स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

छोट्या कृतींतून मोठा बदल घडविण्याचा संदेश

“पाणी वाचवा, जीवन वाचवा; जनावरे जगवा, शेतकऱ्यांना साथ द्या; पर्यावरण जपा, भविष्य घडवा,” हा संदेश या अभियानाच्या केंद्रस्थानी आहे. देशाच्या विकासासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच मुक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग नोंदवून पुढाकार घेणे आवश्यक आहे. छोट्या-छोट्या कृतींतूनही मोठा सकारात्मक बदल घडवून आणता येतो. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर, जनावरांची काळजी घेणे, शेतकऱ्यांना सहकार्य आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे. 

000000

वृत्त क्रमांक नांदेडमध्ये १४ वर्षीय प्रणव मेंडके बेपत्ता ; शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन नांदेड, दि. २८ ऑक्टोबर : नांदेड शहरातील भाग्यनगर प...