Thursday, September 10, 2026

 वृत्त क्रमांक

प्रारूप मतदार यादी अंतिम नसून, पात्र मतदारांनी नोंदणीची संधी घ्यावी

विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत अंतिम यादी नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रसिद्ध होणार

नांदेड(जिमाका), दि. १० : राज्यात सध्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR- Special Intensive Revision)-२०२६ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी ही अंतिम मतदार यादी नसल्याने, तिची २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदारसंख्येशी अथवा मतदानाच्या आकडेवारीशी तुलना करणे अयोग्य व दिशाभूल करणारे ठरेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ च्या पहिल्या टप्प्यात मतदार अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर सर्वसाधारणपणे वास्तव्यास असल्याची वस्तुस्थिती पडताळण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे संबंधित पत्त्यावर प्रत्यक्ष वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची नावे प्रारूप यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. तसेच मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पुढील टप्प्यात अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर उपलब्ध नसलेले किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले, मात्र राज्याच्या हद्दीतच वास्तव्यास असलेले मतदार त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय १ ऑक्टोबर २०२४ नंतर वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नवमतदारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यात दीर्घकाळ घराबाहेर राहणे अथवा अन्य कारणांमुळे ज्यांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा पात्र नागरिकांनाही आता मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याचा टप्पा हा प्रामुख्याने पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यावर केंद्रित आहे. एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वंचित राहू नये, याची सुनिश्चिती या प्रक्रियेद्वारे केली जात आहे.

विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण प्रक्रिया नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण होणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे सध्या प्रकाशित झालेल्या प्रारूप यादीतील मतदारसंख्या आणि पूर्वीच्या संक्षिप्त पुनरीक्षणावर आधारित अंतिम मतदार यादीतील आकडेवारी यांची तुलना करणे योग्य ठरणार नाही.

अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच तुलना करावी

विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी मतदारसंख्येबाबत कोणतेही निष्कर्ष काढणे अथवा तुलना करणे टाळावे. अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्यानंतरच तिच्या आधारे कोणतेही विश्लेषण किंवा मूल्यमापन करणे योग्य ठरेल. त्यामुळे सर्व संबंधित घटक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी अंतिम यादी प्रसिद्ध होईपर्यंत प्रतीक्षा करून त्यानंतरच मतदारसंख्येबाबत निष्कर्ष काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

***

लोकशाही दिन सोमवार ७ सप्‍टेबर रोजी जिल्‍हाधिकारी राहूल कर्डिले यांच्‍या अध्‍यक्षतेखाली लोकशाही दिन घेण्‍यात आला. विविध नागरीकांच्‍या तक्रारी / समस्‍या ऐकूण घेवून संबंधीत विभागास प्रकरणांचा त्‍वरेने निपटारा करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले.




 वृत्त क्रमांक

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे

देगलूर येथील कार्यशाळेत डॉ. महेंद्र ढवळे यांचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. १० : कमी पावसाच्या परिस्थितीतही चांगले व शाश्वत उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी केले.

‘मेरा रेशीम, मेरा अभिमान’ या उपक्रमांतर्गत सांगवी (क) येथे आयोजित रेशीम शेती कार्यशाळेत ते बोलत होते. पावसाचे प्रमाण कमी होत असताना पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून रेशीम शेती उपयुक्त ठरू शकते. कमी पाण्यात उत्पादन घेता येत असल्याने शेतकऱ्यांनी या व्यवसायाचा गांभीर्याने विचार करावा, असे डॉ. ढवळे यांनी सांगितले.

जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी रेशीम शेतीच्या आर्थिक फायद्यांची माहिती दिली. योग्य नियोजन व व्यवस्थापनातून प्रति एकर एक ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तुती लागवडीसाठी ४५ हजार रुपये, तर कीटक संगोपन गृहासाठी २ लाख ४३ हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

केंद्रीय रेशीम मंडळाच्या वैज्ञानिक बी डॉ. अंतरा गुप्ता यांनी रेशीम शेतीतील तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले. उत्पादनादरम्यान येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी विभागाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तालुका कृषी अधिकारी सोनकांबळे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्राप्त प्रस्तावांना लवकर मान्यता देऊन अनुदान वितरणाची प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले.

कार्यशाळेस रेशीम कार्यालयाच्या क्षेत्र सहायक कांचन जाधव, अमर सूर्यवंशी, नरोजी कोरके, कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेड जिल्ह्याच्या कर्नाटक सीमेलगतच्या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने मनमत काळे यांनी रेशीम विभागाचे आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि गावातील शेतकऱ्यांनी सहकार्य केले.

****





वृत्त क्रमांक

प्रतीक्षेनंतर पाच पालकांना मिळाले हक्काचे बालक

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मान्यतेने नात्यांतर्गत व सावत्र दत्तक प्रकरणांना अंतिम आदेश

नांदेड(जिमाका), दि. १० : आई-वडील होण्याची इच्छा मनाशी बाळगून दत्तक प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या पालकांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मान्यतेने नात्यांतर्गत व सावत्र दत्तक प्रक्रियेतील पाच प्रकरणांना एकाच दिवशी अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यामुळे संबंधित पालकांना कायदेशीर प्रक्रियेतून हक्काचे बालक, तर बालकांना हक्काचे व सुरक्षित कुटुंब मिळाले आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत या पाचही प्रकरणांची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची प्रथम सीएआरए संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत गृहचौकशी करून प्रकरणे बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आली. समितीची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

सीएआरए मार्गदर्शिका, २०२२ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित प्रकरणांना सीएआरए मार्फत ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यानंतर अंतिम आदेशासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कक्षात सुनावणी घेण्यात आली. बालकांचे सर्वोत्तम हित या तत्त्वाला प्राधान्य देत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर बालकांना त्यांच्या दत्तक पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच दत्तक विधानाचा अंतिम आदेश पारित करण्यात आला.

दि. ४ मे २०२६ पासून जिल्हाधिकाऱ्यांना दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यानुसार संबंधित प्रकरणांमध्ये दत्तक आदेशाची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. बालकांचे सुरक्षित व कुटुंबाधारित पुनर्वसन सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ही कार्यवाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या सक्रिय सहभागातून राज्यभर दत्तक प्रक्रियेला गती देण्यात येत असून, बालकांना सुरक्षित कुटुंब मिळवून देण्याच्या या प्रक्रियेत महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरत आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दत्तक पालकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. विधी सल्लागार ॲड. आनंद माळाकोळीकर यांच्या कायदेशीर मार्गदर्शनानुसार संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, बाल संरक्षण अधिकारी संदीप फुले आणि बाल विकास शाखेचे परिवीक्षा अधिकारी गजानन जिंदमवार यांनी या प्रक्रियेसाठी सहकार्य केले.

कायदेशीर दत्तक प्रक्रियेतूनच बालक स्वीकारावे

नात्यांतर्गत, सावत्र तसेच नियमित दत्तकग्रहणासाठी इच्छुक पालकांनी मिशन वात्सल्य पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

****

 कुणबी प्रमाणपत्र वाटपात मराठवाड्याची ऐतिहासिक झेप !

९१.८% कार्यक्षमता गाठत मराठवाडा प्रशासनाची दमदार कामगिरी !
कुणबी प्रमाणपत्र वाटपाला मिळालेली गती, जुन्या नोंदींचा व्यापक शोध आणि नागरिकांना सुलभ सेवा यामुळे लाखो नागरिकांना प्रमाणपत्रे कमी वेळेत उपलब्ध झाली आहेत.
📌 ३,१६,१७७ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप
📌 ९१.८% कार्यक्षमता
📌 २,९५,३०५ SEBC प्रमाणपत्रांचे वाटप
📌 बीड, जालना, हिंगोलीत एकही अर्ज प्रलंबित नाही
📌 जुन्या नोंदींच्या आधारे नागरिकांना मोठा लाभ
प्रशासकीय तत्परता • पारदर्शक प्रक्रिया • नागरिकांना जलद सेवा

 कुणबी प्रमाणपत्र वाटपात मराठवाड्याची ऐतिहासिक झेप !

९१.८% कार्यक्षमता गाठत मराठवाडा प्रशासनाची दमदार कामगिरी !
कुणबी प्रमाणपत्र वाटपाला मिळालेली गती, जुन्या नोंदींचा व्यापक शोध आणि नागरिकांना सुलभ सेवा यामुळे लाखो नागरिकांना प्रमाणपत्रे कमी वेळेत उपलब्ध झाली आहेत.
📌 ३,१६,१७७ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप
📌 ९१.८% कार्यक्षमता
📌 २,९५,३०५ SEBC प्रमाणपत्रांचे वाटप
📌 बीड, जालना, हिंगोलीत एकही अर्ज प्रलंबित नाही
📌 जुन्या नोंदींच्या आधारे नागरिकांना मोठा लाभ
प्रशासकीय तत्परता • पारदर्शक प्रक्रिया • नागरिकांना जलद सेवा

 मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा वेगवान प्रवास !

३,१६,१७७ नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून, प्राप्त अर्जांपैकी बहुतांश अर्ज निकाली काढून पात्र नागरिकांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
🔹 ५७ लाख जुन्या अभिलेखांतील नोंदी नागरिकांसाठी उपलब्ध
🔹 १६,११० जात पडताळणी प्रकरणे निकाली
🔹 १० ते १७ सप्टेंबर ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे
🔹 मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत प्रमाणपत्र प्रक्रियेला वेग
गतिमान कार्यवाही • पारदर्शक प्रक्रिया • नागरिकांना सुलभ सेवा

  वृत्त क्रमांक चारा साक्षरता अभियानांतर्गत आज रामतीर्थ येथे निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक • पशुपालकांनी या प्रात्यक्षिकाचा लाभ घ...